महायुद्ध, पहिले : जागतिक स्वरूपाचे हे पहिले महायुध्द १ ऑगस्ट १९१४ रोजी सुरू झाले व ११ नोव्हेंबर १९१८ रोजी संपले. आधुनिक काळातील युध्दांची कारणपरंपरा प्रदीर्घ असते मात्र ते एखाद्या विवक्षीत घटनेमुळे भडकते. पहिल्या महायुध्दाची कारणपरंपरा संक्षेपाने पुढीलप्रमाणे होती : या युध्दाची ठिणगी जरी ऑस्ट्रिया−हंगेरी साम्राज्याचा युवराज फ्रान्सिस फर्डिनंड याच्या खुनाने पडली तरी खरा संघर्ष जर्मनी व शेष यूरोप यांच्यातच होता. १८७० पर्यंत जर्मनीत अनेक स्वतंत्र संस्थाने होती तथापि जनतेमध्ये एकराष्ट्रीयत्वाची तीव्र भावनादेखील होती. १८७०-७१ ह्या ⇨फ्रँको-प्रशियन (जर्मंन) युध्दानंतर प्रशियाचा पंतप्रधान बिस्मार्क याने ऑस्ट्रिया सोडून इतर जर्मन संस्थानांचे एकत्रीकरण बनविण्यात यश मिळविले. त्याने प्रशियाच्या राजाच्या नेतृत्वाखाली आधुनिक जर्मनीची स्थापना केली व प्रशियाचा राजा हा जर्मनीचा बादशहा ऊर्फ कैसर बनला. जर्मन राष्ट्राच्या निर्मितीने ब्रिटन, फ्रान्स व रशिया यांना एक बलवान प्रतिस्पर्धी निर्माण होऊन यूरोपातील बलसमतोल अस्थिर झाला. जर्मनीलाही साम्राज्य-विस्तार करण्याची महत्त्वकांक्षा होतीच पण जर्मनीच्या निर्मितीपूर्वीच आफ्रिका व आशिया यांचा बराच भूभाग वरील तिघांनी बळकावलेला होता. जर्मनीनेही त्यांच्या मागोमाग आफ्रिकेतील काही प्रदेश, चीनमधील काही बंदरांत इतर यूरोपीय साम्राज्यवादी राष्ट्रांच्या धर्तीवर विशेषाधिकार व पॅसिफिक महासागरातील काही बेटे मिळविली. पुढे जर्मनीत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाले आणि त्याबरोबर ब्रिटन व जर्मनी यांच्यामध्ये व्यापारी स्पर्धाही सुरू झाली. यूरोपातील राजकरणातदेखील आपल्याला धुरीणत्व (हेगिमनी) मिळावे, असे जर्मनीस वाटू लागल्याने जर्मनीची फ्रान्स व रशियाशी चढाओढ सुरू झाली. जर्मनीत लष्करी अधिकारीवर्गाचा ज्रमनीच्या धोरणावर प्रभाव होता. जर्मनीला फ्रान्स व रशिया हेच दोन प्रमुख शत्रू वाटत असल्याने जर्मन सेनाधिकाऱ्यांनी या दोन्ही देशांशी युध्द झाल्यास त्याविरूध्द करावयाच्या लष्करी कारवाईच्या योजना तयार ठेवली होती.

ऑस्ट्रियाच्या ताब्यात पोलंडचा काही भाग, हंगेरी व बाल्कन प्रदेशातील काही भाग होता. एकोणीसाव्या शतकात ऑटोमन साम्राज्यातील स्लॉव्ह वांशिक व भाषिक प्रदेश रशियाच्या साहाय्याने व प्रोत्साहनाने स्वतंत्र बनले होते. बाल्कन संस्थानातील लोक व रशियन लोक एकाच स्लॉव्ह वंशाचे आणि धर्मपंथाचे (ग्रीक अथवा ईस्टर्न आर्थोडॉक्स चर्च) होते. बाल्कन राष्ट्रांत आपल्याला धुरूणत्व मिळावे ही रशियाची इच्छा होती. आपल्या ताब्यातील पोलंडचा प्रदेश व बाल्कन प्रदेशांवर रशियाचा डोळा आहे, हे ऑस्ट्रियास माहीत असल्याने ऑस्ट्रिया व रशियात तेढ होती.

इ. स. १८७८ साली ऑस्ट्रियाने तुर्कस्तानचे बॉझनिया व हेर्ट्सेगोव्हीना हे बाल्कन प्रांत बळकावले होते. तेथे शांतता स्थापल्यानंतर ते सोडण्याचे ऑस्ट्रियाने आश्वासन दिले पण तुर्कस्थानात १९०८ साली  ‘तरूण तुर्क’ या संघटनेने क्रांती केल्यावर ऑस्ट्रियाने वरील प्रांत आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून टाकले त्यामुळे बाल्कन विभागातील जनमत प्रक्षुब्ध झाले व स्लॉव्हवंशीय प्रांत बळकविल्यामुळे रशिया नाराज झाला.

पुढे २८ जून १९१४ रोजी ऑस्ट्रियन साम्राज्याचा युवराज फ्रान्सिस फर्डिनंड हा बॉझनियाची राजधानी सारायेव्हो येथे गेला असताना ‘काळा हत’ या सर्बीयातील दहशतवादी संघटनेच्या सदस्याने त्याचा खून केला. बाल्कन राष्ट्रीयत्वाचा प्रचार सर्बीया देश करीत होता व त्या प्रचारामुळे ऑस्ट्रियाच्या ताब्यातील बाल्कन प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली होती. सर्बीयाचा मोड करून आपली बाल्कन प्रदेशावरील पकड बळकट करण्याची संधी ऑस्ट्रिया पाहात होता. म्हणून खूनाचे निमित्त पुढे करून ऑस्ट्रियाने सर्बीयास चेचण्याचा विचार केला. याच वेळी आक्रमक वृत्तीच्या कोनगट फोन ह्यटसेनडोर्फ याच्या हाती ऑस्ट्रियन सैन्याची सूत्रे आली व बेर्खटोल्ड हा परराष्ट्रमंत्री झाला. ऑस्ट्रियाच्या गुप्त पोलीसखात्याने या खूनात सर्बीयन सरकारचा हात असल्याचा पुरावा नसल्याचे सांगितले. या राजकीय हत्येमुळे जर्मनी, ऑस्ट्रिया−हंगेरी व इटली यांची त्रिराष्ट्रीय युती (ट्रिपल अलायन्स) व फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आणि रशिया यांची त्रिराष्ट्रीय समहित (ट्रिपल एन्टीटी) यांच्यातील बलसमतोल ढळला. बाल्कन प्रदेशात सत्ताविस्ताराची मनीषा ऑस्ट्रिया−हंगेरीची असल्याने जर्मनीच्या साहाय्याची खात्री बाळगून ऑस्ट्रिया−हंगेरीने २३ जुलै १९१४ रोजी सर्बीयाला निर्वाणीचा खलिता पाठविला. सर्बीयाने खलित्यातील सर्व अटी मान्य केल्या नाहीत. २५ जुलै १९१४ रोजी सर्बीयाने सेनासज्जता जारी केली. २८ जुलै रोजी ऑस्ट्रिया−हंगेरीने सर्बीयाविरूध्द युध्द पुकारले.

ऑस्ट्रियाने युध्द पुकारताच, रशियाने स्ट्रियाविरूध्द सेनासज्जता पुकारली. रशियाची सेनासज्जता-घोषणा म्हणजे युध्दाची नांदी समजण्यात येईल, असे जर्मनीने रशियाला ठणकाविले. जर्मनीने ३१ जुलै १९१४ रोजी सेनासज्जता उघडपणे जाहीर केली. प्रत्युत्तर म्हणून रशियानेही जर्मनीविरूध्द सेनासज्जता जाहीर केली.

रशियाची सेनासज्जता जाहीर होताच १ ऑगस्ट १९१४ रोजी जर्मनीने रशियाविरूध्द युध्द पुरकारले व लक्सेंबर्ग आणि बेल्जियम या तटस्थ राष्ट्रांच्या प्रदेशामधून पश्चिमेकडे− फ्रान्सकडे−जर्मन सैन्याने आक्रमणास सुरूवात केली. आक्रमणानंतर ३ ऑगस्ट रोजी जर्मनीने फ्रान्सविरूध्द युध्दघोषणा केली. तटस्थ राष्ट्रांवर आक्रमण केल्याबद्दल ४ ऑगस्ट रोजी जर्मनीविरूध्द ब्रिटनने युध्दस्थिती जाहीर केली. ऑस्ट्रियाने ६ ऑगस्ट १९१४ रोजी रशियाविरूध्द युध्द पुकारले. इटली जरी त्रिराष्ट्रीय युति-सदस्य होते, तरी ऑस्ट्रियाने युध्दास प्रथम प्रारंभ केला ही सबब दाखवून तटस्थवृत्ती पतकारली जो पक्ष विजयी होण्याचा संभव दिसेल, त्या पक्षाला मिळण्याची वाट पाहण्याचे इटलीने ठरविले असावे. यूरोपातील परिस्थितीची उकल नीट लावता न आल्याने अमेरिका गोंधळात पडली होती तरीही अमेरिकेचा ओढा ब्रिटनकडे होता.


सेनाबळ व युध्दसज्जता : ग्रेट ब्रिटन वगळता सर्व युध्दखोर राष्ट्रांच्या सेना या सक्तीसैनिकांच्या (काँसक्रिप्ट) सेना होत्या फ्रान्सची सक्तीसैनिक-भरतीपध्दती जर्मनीच्या पध्दतीपेक्षा अकार्यक्षम होती.

जर्मन सेना ही शस्रास्रे व प्रशिक्षण दृष्ट्या १९१४ साली सर्वांत श्रेष्ठ प्रतीची होती. सांग्रामिक साहित्य-उत्पादनासाठी जर्मनीची औद्योगिक संघटना भक्कम होती. आक्रमणशील युध्दखोरतेबरोबर संरक्षणात्मक युध्द लढविण्याचे शिक्षण जर्मन सैनिकांना दिले जात असे.

एकंदर युध्दकार्यक्षमतेच्या दृष्टीने फ्रान्सची सेना दुसऱ्या क्रमांकाची होती तथापि आक्रमकवत्तीनेच युध्द लढविण्यावर तिचा भर होता. संरक्षणात्मक अंगाकडे बहुतांश दुर्लक्ष होते. रणांगणीय ⇨तटबंदी व ⇨मशीनगनचा वापर संरक्षणाच्या दृष्टीने करण्यात फ्रेंच सेना अनभिज्ञ होती. फ्रेंचांनी मध्यम व भारी ⇨तोफ व तोफखाना यांकडे दुर्लक्ष केले होते.

ऑस्ट्रिया-हंगेरीची सेना, जर्मन सेनासदृश होती तथापि ८०% सैनिक बिगर-जर्मन वंशांचे असून त्यांना जर्मन भाषाही अवगत नव्हती. सैनिकांना रशियाविषयी सहानुभुती वाटे. त्यांची राज व राज्यनिष्ठाही ऑस्ट्रियाविरोधी होती.

ग्रेट ब्रिटनच्या खड्या सैन्यात स्वखुषीने भरती झालेले सैनिक होते. नेतृत्व श्रेष्ठ दर्जाचे होते. खड्या सैन्याला प्रादेशिक सेना व ⇨लोकसेना इ. स्वयंसेवी सेनांचे पाठबळ होते. रशिया−जापान युद्धात मशीनगनच्या शक्तीचा प्रभाव दिसून आला होता तरीही युद्धखोर राष्ट्रांच्या सेनाधिकाऱ्यांना मशीनगनच्या सुप्त मारक व संरक्षक शक्तीची पूर्णपणे जाणीव नव्हती.

युद्धयोजना : जर्मनी : जनरल आल्फ्रेड फोन श्लीफेन (१८३३−१९१३) या जर्मन स्टाफ-प्रमुखाने युद्धपूर्व कालातील (१८९१−१९०६) जर्मनीला फ्रान्स व रशिया यांच्याविरूद्ध दोन युद्ध आघाड्यांवर एकाचवेळी लढाव्या लागणाऱ्या युद्धाची योजना आखली होती.

श्लीफेन योजनेची पाश्वभूमी : श्लीफेन पूर्वी मोल्तके हा जर्मन जनरल स्टाफ-प्रमुख होता. ऑस्ट्रिया−जर्मनी (१८६६) आणि

फ्रान्स−प्रशिया (१८७०) या युद्धातील जर्मन विजयांच्या अनुभवावरून त्याने खालीलप्रमाणे निष्कर्ष काढले : (१) पुढील युद्धात जर्मनीला मागीलप्रमाणे यश मिळविणे शक्य नाही (२) पुढील युद्धात फ्रान्सवरील चढाईत रशिया पूर्वीप्रमाणे तटस्थ राहणार नाही (३) जर्मनीची पश्चिम आघाडी फ्रान्सच्या चढाईला दुर्मेद्य असल्याने     रशियाचे आक्रमण बहुतांश जर्मन सेना परतवू शकेल (४) सर्व यूरोप पादाक्रांत करण्यास जर्मनी समर्थ नाही आणि तसे करण्याची आवश्यकताही नाही. जर्मनी सुरक्षित राहिले म्हणजे पुरे झाले (५) आगामी युद्ध २० वर्षेही चालेल. असे त्याचे मत.

महायुद्ध, पहिले. पश्चिम आघाडी : श्लीफेन योजना

ज्येष्ठ मोल्तकेनंतर आलेल्या श्लीफेनने (१८९१−१९०६) वरील निष्कर्ष झिडकारले. श्लीफेन योजना म्हणून ओळखली जाणारी योजना, त्याच्या पुढील मतावर उभारली गेली : (१) कोणतेही आधुनिक राष्ट्र दीर्घकाल युद्ध लढण्यास समर्थ नाही म्हणून जर्मनीच्या दोन प्रमुख शत्रूंपैकी एकावर प्रथम संपूर्ण विजय मिळवावयाचा आणि नंतर उरलेल्यावर चढाई करून त्याचा निःपात करावयाचा (२) रशिया व फ्रान्स यांच्या एकंदर सेनाबळापेक्षा जर्मनीचे बळ कमी आहे तथापि रशिया काही मोठे राष्ट्र नाही (३) फ्रान्स व ग्रेट ब्रिटन यांच्या युतिविरूद्धच युद्ध करावे लागेल तेव्हा सर्व शक्तीनिशी फ्रान्सवर आघात करणे अनिवार्य आहे रशियाच्या अवाढव्य भौगोलिक क्षेत्रामुळे त्याच्यावर थोड्या आठवड्यांत विजय मिळविणे सोपे नाही. फ्रान्सला प्रथम नेस्तनाबूत कसे करावे याबद्दल विचार करीत असताना श्लीफेनपुढे बऱ्याच अडचणी व विकल्प उभे राहिले. शेवटी त्याने आपली ‘श्लीफेन योजना’ पक्की केली. (१९०६) ही पक्की योजना पुढील प्रमाणे होती :  (१) युद्धघोषणा होताच फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम व लक्सेंबर्ग या राष्ट्रांच्या तटस्थतेचा भंग करणार नाही. बेलफॉर आणि सडॅन यांमधील प्रदेशांतून ॲल्सेस-लॉरेन जिंकण्यासाठी फ्रान्स चढाई करील (२) जर्मन सैन्य हूल दाखवून ॲल्सेस-लॉरेनमध्ये फ्रेंच सैन्याशी मुकाबला करील.(३) फ्रेंच सैन्य ॲल्सेस-लॉरेनमध्ये गुंतत असताना, जर्मन सैन्याचा बहुतांश भाग (पाच सेना) हॉलंड व बेल्जियममधून फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेला, वळसा घालून पॅरिसच्या पश्चिमेला पिछाडीकडे मुसंडीमारील. त्या मुसंडीमुळे फ्रेंच सेना पिछाडीकडून व ॲल्सेस-लॉरेनच्या तटबंदी प्रदेशामध्ये गुंडाळली जाईल आणि तिचा नाश केला जाईल (४) वरील कारवाया चालू असताना पूर्व आघाडीवर पूर्व प्रशियात, रशियाच्या चढाईपुढे जर्मन सेना हळूहळू माघार घेत राहील. व्हिश्चल नदीजवळ ही माघार पोहोचेपर्यंत, पश्चिम आघाडीवर फ्रेंचांचा पराभव होईल, असे श्लीफेनला वाटत असे. फ्रेंचांचा पराभव झाल्याबरोबर, त्या आघाडीवरील जर्मन सेना पूर्व आघाडीवर त्वरेने पोहोचवून, रशियाचा धुव्वा करावयाचा, ही श्लीफेनची दोन-आघाडी युद्धयोजना होती. श्लीफेनच्या योजनेबरहुकूम जर प्रत्यक्ष कारवाई झाली असती, तर जर्मनी कदाचित विजय प्राप्त करू शकले असते तथापि तसे घडले नाही.


श्लीफेननंतर आलेल्या कनिष्ठ हेल्मूट मोल्तके (१८४८−१९१६) याने श्लीफेन योजनेत पुढीलप्रमाणे फेरफार केले. हॉलंडची तटस्थता भंग न करता, बेल्जियममधून जर्मनीच्या दोन सेनांनी फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेवर हल्ला करणे. ॲल्सेस-लॉरेन प्रदेशात मर्यादित माघार घेणे, पूर्व आघाडीवर माघार न घेता, पूर्व प्रशियाच्या पूर्व सीमेवरच रशियाच्या चढाईला विरोध करणे.

या फेरफाराचे परिणाम पुढीलप्रमाणे झाले : (१) बेल्जियमच्या ल्येझच्या दुर्गसमूहापुढे जर्मनांची आगेकूच मंदावली व तेथे दोन जर्मन सेना गुंतून पडल्या. (२) ॲल्सेस-लॉरेन येथे सु. ५ लक्ष जर्मन सेना गुंतून पडली. (३) पूर्व प्रशियात दोन लक्ष आणि इतरत्र दोन लक्ष जर्मन सैन्य संरक्षणात्मक युद्धात गुंतून पडले. श्लीफेन आणि कनिष्ठ मोल्तके या दोघांनीही युद्ध-योजना राजकीय अंगाला डावलून निव्वळ सैनिकी दृष्टीने आखल्या. तेच जर्मनीच्या पराभवाचे मूळ ठरले.

फ्रान्सची युद्धयोजना : जनरल व्हिक्टर मीशेलची योजना (सोळावी योजना) ती अशी : जर्मन चढाई ही ॲल्सेस-लॉरेन या दुर्गम प्रदेशातून असंभवनीय वाटल्यामुळे तटस्थ बेल्जियमच्या प्रदेशातूनच जर्मनी आक्रमण करील या गृहीतकृत्यावर आधारभूत होती. म्हणून जर्मनीची चढाई होण्यापूर्वीच बेल्जियमची तटस्थता भंग करूनही जर्मनीवर हल्ला चढवावा, अशी ही मीशेल योजना होती. मीशेलची योजना जर्मनीच्या पथ्यावर पडणारी होती. कारण त्यामुळे फ्रान्स आक्रमण ठरून जर्मनीला संरक्षणासाठी युद्ध करावे लागेल, असे जगाने म्हटले असते. मिशेलची योजना नामंजूर झाली. मीशेलला पदच्युत करण्यात आले. त्याच्या जागी आलेल्या जनरल झॉफ्रने एक मध्यममार्गी योजना (सतरावी योजना) आखली. ती पुढीलप्रमाणे होती : त्योंव्हिल−मेट्‌स या प्रदेशाच्या उत्तर व दक्षिण बाजूंनी ॲल्सेस-लॉरेनच्या प्रांतावर द्विमुखी हल्ला चढविणे. त्याबरोबरच जर्मनीने बेल्जियममधून जर आक्रमण केलेच, तर तिकडे दोन फ्रेंच सेना प्रतिकारासाठी पाठविणे, अशी ही झॉफ्र योजना होती.

झॉफ्र योजनेत पुढील दोष होते : (१) रशियायी सेना जर्मन सेनेला विरोध करण्यास समर्थ असल्याचा विश्वास (२) ब्रिटिश अभियान सेना फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेवरील फ्रेंच सेनेला यथातथ्य साहाय्य करील ही अपेक्षा आणि (३) युद्ध आघाड्यांवर जर्मन किती सेना खड्या करील व जर्मनीची युद्धक्षमता किती असेल याविषयीचे अंदाज चुकीचे ठरणे. प्रारंभीच्या लढ्यांत फ्रान्सकडे १३ लक्ष, तर जर्मनीकडे जवळजवळ २० लक्ष सैनिक (खडे आणि राखीव) होते.

रशियाची योजना : ऑस्ट्रिया व जर्मनी यांच्या युद्धघोषणेमुळे रशियाला एकाच वेळी दोन आघाड्यांवर चढाया करणे भाग पडले. यासाठी त्वरेने सक्तीसैनिक भरती करण्यास रशिया अक्षम होते त्यामुळे पूर्व प्रशियात मार खावा लागला. भरीला भर रशियायी उच्च युद्धनेते आपआपसांत भांडणारे व युद्धनेतृत्वात निकृष्ट होते. ऑस्ट्रियाच्या ढिलेपणामुळे गॅलिशियात थोडेफार विजय रशियास मिळाले.

रशियाच्या सेनेत धैर्यवान, पण मवाळ व काटक शेतकरी सैनिक बहुसंख्येने होते. सेनेत शस्त्रास्त्रे व दारूगोळा यांचा तुटवडा होता. उच्च सैनिकी नेतृत्व बेफिकीर व अकार्यक्षम होते.

ऑस्ट्रियाची योजना : जनरल ह्यटसेनडोर्फ याने (१) सर्बीयाविरूद्ध आणि (२) सर्बीया व रशिया या दोघांविरूद्ध अशा दोन योजना तयार केल्या होत्या तथापि युद्धघोषणा करताच पहिली योजना अमलात आणली त्यामुळे कोणत्याच आघाडीवर पुरेसे सैन्य उभे करणे शक्य झाले नाही. ती जरी दोस्त राष्ट्रे होती, तरी ऑस्ट्रिया व जर्मनी यांमध्ये युद्ध लढण्यासाठी त्यांच्यात समन्वय वा एकसूत्रता नव्हती. परिणामी ऑस्ट्रिया हे जर्मनीच्या गळ्यातील लोढणे ठरले.

युद्धहेतू : या महायुद्धात भाग घेण्याचे युद्धहेतू कोणत्याही युद्धमान राष्ट्राने सुस्पष्टपणे जाहीर केले नव्हते. स्वराष्ट्र संरक्षणासाठी आपण युद्धात पडलो म्हणून युद्धात सैनिकी विजय मिळविणे हे उद्दिष्ट असल्याचे प्रत्येकाचे म्हणणे होते. युद्धाच्या अखेरपर्यंत व्यावहारिक युद्धहेतू पुढीलप्रमाणे होते : (१) फ्रान्स−स्वराष्ट्रीय प्रदेशातून (१८७० साली जर्मनीने बळकाविलेला ॲल्सेस−लॉरेन प्रांतधरून) जर्मनीला हाकलून लावणे (२) ब्रिटन−बेल्जियमची जर्मनपाशातून मुक्तता करणे (३) रशिया−एक प्रमुख सैनिकबलयुक्त राष्ट्र म्हणून जगणे (४) जर्मनी−ऑक्टोबर १९१८ पर्यंत, पादाक्रांत प्रदेश ताब्यात ठेवणे व बेल्जियम आणि ईशान्य फ्रान्सवर नियंत्रण ठेवणे (५) बाल्कन प्रदेशावर जर्मन प्रभुत्वाची छाया घालणे. किंबहूना संपूर्ण यूरोपवर जर्मनीचे प्रभूत्व मिळविणे. पुढे या हेतू उद्दिष्टांमध्ये जर्मनीला किरकोळ फेरफार करावे लागेल.

युद्धहेतूमध्ये जर्मनीला युद्धपरिस्थितिप्रमाणे बदल करावे लागेल. पराभव अटळ आहे हे दिसल्यावर अपमानस्पद व कडक अटींचा तह टाळण्याकडे जर्मन नेत्यांची दृष्टी वळली. दोस्त राष्ट्रांना, अमेरिका वगळता, जसजसी जयाची खात्री होत गेली, तसतसे त्यांच्याही युद्धहेतूत बदल होत गेल्याचे दिसते. व्हर्साय तह व युध्यमान राष्ट्रांनी केलेले आपापसांतील वेगवेगळे तह तसेच त्यांतील गुप्त व उघड तरतुदी यांवरून पाश्चात्त्य राष्ट्रांनी स्वहितासाठीच युद्धाचा उपयोग करून घेतला. उदा., तुर्की साम्राज्याची वाटणी, वसाहती व पाश्चात्त्य राष्ट्राच्या साम्राज्यातील परतंत्र राष्ट्रांना स्वयंनिर्णयाचे तत्त्व लागू न करणे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बुड्रो विल्सन यांच्या चौदा कलमी राजकीय तरतुदींकडे दुर्लक्ष करणे वगैरे.

युद्धघटना : युद्धाचा आरंभ १ ऑगस्ट १९१४ रोजी झाला. या महायुद्धातील युद्यमान राष्ट्रांचे दोन तट होते, ते असे. मध्यवर्ती राष्ट्रीय तट : जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी, या तटात नोव्हेंबर १९१४ मध्ये तुर्कस्थान व ऑक्टोबर १९१५ मध्ये बल्गेरिया सामील झाले. दोस्त राष्ट्रीय तट : रशिया, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, या तटात मे १९१५ मध्ये इटली, ऑगस्ट १९१६ मध्ये रूमानिया व एप्रिल १९१७ मध्ये अमेरिका सामील झाले. यांच्याशिवाय बेल्जियम, सर्बीया, जपान, इटली, ग्रीस, पोर्तुगाल, माँटनीग्रो ही राष्ट्रे या तटात होती. हिंदुस्थान ब्रिटिशांकित असल्याने ब्रिटनबरोबरच त्याला युद्ध लढावे लागले. हे युद्ध मर्यादित राहील व काही आठवड्यांतच आटोपेल हा होरा साफ चुकून ते चार वर्षे चालले व ११ नोव्हेंबर १९१८ रोजी युद्धविराम करण्यात आला. मध्यवर्ती तटाचा पराभव झाला.


या महायुद्धात एकंदर ३३ राष्ट्रे सामील होती व ३८ राष्ट्रांनी तह व शांततास्थापनेच्या कार्यात भाग घेतला.

फ्रान्समधील दू नॉर्द कालवा ओलांडणारा ब्रिटिश तोफखानामहायुद्धाच्या प्रमुख घटनांचा सालवार आढावा पुढीलप्रमाणे आहे. पश्चिम आघाडी : (१९१४) फेरफार केलेल्या श्लीफेन योजनेप्रमाणे जर्मन सैन्याने बेल्जियमवर चढाई केली तथापि अनपेक्षित असा प्रतिकार बेल्जियम सैन्याने केल्याने, श्लीफेन योजना ढासळली. दोन आठवड्यांच्या लढायानंतर ब्रूसेल्स ही बेल्जियमची राजधानी जर्मनांनी काबीज केली. ल्येझची तटबंदी व किल्ले जर्मनांनी ४२ सेंमी. व्यासाच्या प्रचंड तोफांनी निकामी केले व २० ऑगस्ट रोजी जर्मनांनी बेल्जियम पादाक्रांत केले. या दोन आठवड्यांत, ब्रिटिश अभियान सेनेला फ्रान्समध्ये उतरणे शक्य झाल्याने सों नदीच्या उत्तरेला व कॅलेच्या पूर्वेला तिने आपले ठाण मांडले. श्लीफेन योजनेप्रमाणे, जर्मनीची आगेकूच फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेला वळसा घालून पॅरिसच्या पश्चिमेला पिछाडीकडे होण्याएवजी सरळ पॅरिसच्या पूर्वेकडे होत असल्याचे जर्मनांच्या लक्षात आले. पॅरिसपासून ३० किमी. अंतरावर जर्मन सेनेची बीनी पोहोचल्यावर, फ्रान्स सरकारने बॉर्दो या गावी स्थलांतर केले. जसजसा चढाईचा वेग मंदावला तसतसे जर्मन सेनेला रसद व दारूगोळा-पुरवठा वेळच्यावेळी करणे कठीण झाले. ऑगस्टच्या उन्हाळ्यातील पायपिटीने जर्मन पायदळ थकून गेले. सप्टेंबरमध्ये (दि. ५ ते १०) सुप्रसिद्ध मार्न नदीची लढाई झाली. फ्रान्सच्या जनरल झॉफ्रनेही प्रतिहल्ल्याची लढाई लढविली. या प्रतिहल्ल्यात, जर्मनीच्या आगेकूच करणाऱ्या सेनांमध्ये फूट पडून, त्यांच्या बगला व पिछाड्या उघड्या पडल्या. जर्मन चढाईची मंद गती आणि फ्रेंच व बेल्जियम सैन्याचा विरोध तसेच त्यांमुळे श्लीफेन योजनेचा उडालेला बोजवारा यांमुळे त्रस्त झालेला मोल्तके याने जर्मन सैन्याला माघारीचा हुकूम दिला. १० सप्टेंबर रोजी मार्नची प्रतिहल्ला लढाई आटोपली. मार्नची लढाई जरी रणतंत्राच्या दृष्टीने निर्णायक झाली नाही, तरी दूरपरिणामाच्या दृष्टीने दोस्त राष्ट्रे विजयी झाली. मार्नच्या लढाईत जर जर्मन विजयी झाले असते, तर विसाव्या शतकाच्या इतिहासात मूलगामी बदल घडून आले असते. वॉटर्लूच्या लढाईनंतर (१८१५) मार्नची ही निर्णायक म्हणून प्रसिद्ध झाली व फ्रान्सचा त्राता म्हणून झॉफ्र मान्यता पावला. १४ सप्टेंबर रोजी मोल्तकेला पदच्युत करण्यात आले, त्याच्या जागी जनरल  ⇨एरिख फोन फाल्केनहाइन याची नियुक्ती झाली.

वरील १४ सप्टेंबरपर्यंतच्या लढायांचा आढावा घेतल्यावर पुढील निष्कर्ष काढण्यात आले : (१) फ्रान्सची आरंभीची चढाईयोजना ही युद्धसंकल्पना व तिची अंमलबजावणी या दृष्टिकोनांतून अवास्तववादी ठरली (२) जर्मन योजना निर्दोश असूनही मोल्तकेच्या अकार्यक्षमतेमुळे फसली (३) प्रारंभीच्या अपयशानंतर झॉफ्रने जर्मन सेनापतींच्या चुकांचा लाभ घेऊन मार्नच्या प्रतिहल्ला चढाईत यश मिळविले (४) प्रारंभीच्या लढायांत फ्रान्सचे २ १/२ लक्ष व जर्मनीचे सु. ३ लक्ष सैनिक मारले गेले वा निकामी झाले (५) गतिमान लढायांचा काल संपून खंदकी युद्धतंत्राचा पाया घातला गेला.

पूर्व आघाडी : रशियाने अनपेक्षितपणे व त्वरेने सेना सज्ज केली, तथापि पूर्व प्रशिया व ऑस्ट्रिया या दोघांवर एकाच वेळी चढाई करण्याची चूक त्याच्या हातून घडली. ऑस्ट्रियावरील चढाईत ऑस्ट्रियावर मात करून त्याचा गॅलिशिया हा प्रांत रशियाने काबीज केला. मोल्तकेने निवृत्त झालेल्या फील्ड मार्शल हिंडनबुर्खला परत कामावर बोलावून त्यावर पूर्व प्रशियाच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविली. हिंडेनबुर्ख व त्याचा चीफ ऑफ स्टाफ लूडेन्डोर्फ यांनी टॅननबर्ग (ऑगस्ट) [⟶ टॅननबर्गची लढाई] आणि मझुरीअन सरोवर (सप्टेंबर) येथील लढायांत रशियाच्या सैन्याचा जबरदस्त पराभव केला. रशियाला अमाप रणसामग्रीला मुकावे लागले. १९१४ अखेरीपर्यंत रशियाने ६३ लक्ष सैनिक सज्ज  केले होते, तरी त्यांपैकी २१ लक्ष सैनिकांपाशी शस्त्रे नव्हती. या लढायांच्या धक्क्यातून रशियाला वर मान काढणे शक्य झाले नाही. जर्मन सैन्याचा आत्मविश्वास वाढला. अशावेळी रशियाविरूद्ध तुर्कस्थान युद्धात उतरले. दार्दानेल्सच्या खाडीतून होणाऱ्या  रशियाच्या दळणवळण व पुरवठा मार्गाच्या नाड्या आवळणे तुर्कस्थानला शक्य झाले. १९१४ च्या अखेरीस सर्बीयाने ऑस्ट्रियाचे आक्रमण कौशल्याने हाणून पाडले.

 

जखमी जर्मन सैनिकाची तहान भागविणारा ब्रिटिश सैनिकब्रिटिश अभियान सेनेत २३ ऑक्टोबरपासून हिंदुस्थानी दुसरे कोअर होते. यात तिसरी लाहोर व सातवी मीरत अशा दोन डिव्हिजन व त्यांचा सेनापती जनरल अल्नेबी हा होता. या हिंदी कोअरमध्ये सर्व धर्मीय सैनिक होते. ब्रिटिश हिंदुस्थानच्या इतिहासात ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचे हे पहिलेच उदाहरण होय. अद्वितीय पराक्रम करून आणि प्राणहानी सोसून आपण प्रथम श्रेणीतील लढवय्ये आहोत, हे जर्मनांना व सर्व जगाला त्यांनी पटवून दिले. पहिल्या ईप्रच्या लढाईत बेल्जियममध्ये नव्ह शांपेल व ला ब्यासे येथील लढायांत त्यांनी भाग घेतला. सैनिक खुदादाद (बलुच पलटन) याला पहिले व्हिक्टोरिया क्रॉस पदक मिळाले. पुढे १८ ऑक्टोबर ते ३० नोव्हेबर १९१४ या कालात पश्चिम आघाडीवर, बेल्जियममध्ये ईझेर नदीवरील लढाई आणि ईप्रची पहिली लढाई यांत दोस्त व जर्मन या दोन्ही सैन्यांची भयंकर हानी (१० लक्ष सैनिक) झाली. ⇨खंदक युद्धतंत्रामुळे युद्धाची गती खुंटली.


महायुद्ध, पहिले. पूर्व आघाडी

त्यानंतर इ. स. १९१५ वर्षारंभी युद्धपरिस्थिती पुढीलप्रमाणे होती : तुर्कस्थानच्या प्रवेशामुळे रशियाला सामग्री पुरविणे बंद झाले. १९१४ सालातील पराजयामुळे रशिया हादरून गेला. रशियाच्या युक्रेन प्रांतातील धान्यपुरवठा परत मिळविण्यासाठी फ्रान्स व ब्रिटनला ध्यास लागला. त्यातूनच प्रथम पूर्व आघाडी की पश्चिम आघाडी ? असा वाद दोस्त नेत्यांत निर्माण झाला.


महायुद्ध, पहिले. गालिपलीची मोहीमविन्स्टन चर्चिलच्या मताप्रमाणे भूमध्य समुद्र व काळ्या समुद्रातून रशियाकडे पुरवठा-मार्ग खुला करण्यासाठी दार्दानेल्स खाडी ताब्यात घेण्याची मोहीम ताबडतोब सुरू करावी असे होते तर याउलट ब्रिटनचा युद्धमंत्री  ⇨किचेनर याच्या मताप्रमाणे पश्चिम आघाडीवर सर्वप्रथम विजय मिळविणे अनिवार्य आहे असे होते. फ्रेंच सेनापती किचेनरला अनुकूल होते. शेवटी दार्दानेल्सची मोहीम अगोदर करावी असे ठरले. मध्यवर्ती राष्ट्रगटातही पश्चिम आघाडीवर भर देण्यापेक्षा अगोदर हादरलेल्या रशियाचा निकाल लावावा, असे हिंडेनबुर्ख-लुडेन्डोर्फ या दुकलीचे मत होते. चालू युद्ध आता दमछाकी (संनिघर्षणात्मक) स्वरूपाचे झाल्याने पश्चिम आघाडीवरच प्रथम विजय मिळविणे अगत्याचे आहे, तसेच रशियाचा भौगोलिक विस्तार व त्याचे अमाप मनुष्यबळ लक्षात घेता पूर्व आघाडीवरील रणांगणीय विजय, दूरगामी परिणामाच्या दृष्टीने, निष्फळ ठरतील, असे फाल्केनहाइनचे मत होते. कैसर विल्यमने हिंडेनबुर्खला दुजोरा दिल्याने, पश्चिम आघाडीवर बचावात्मक युद्ध करण्याचे तसेच पूर्व आघाडीवर आक्रमक कार्यवाही करण्याचे जर्मनीने निश्चित केले.

पश्चिम आघाडी : १९१५. खंदकी आघाड्यांचा भेद करण्याचे प्रयत्न करूनही कोणताही पक्ष युद्धातील कुंठीत स्थितीत बदल करण्यात यशस्वी ठरला नाही. नव्ह शांपेल आणि ल्येझ येथे ब्रिटिशांनी, शँपेन येथे फ्रेंचांनी तर जर्मनांनी ईप्र येथे परत लढाया केल्या (२२ एप्रिल− २५ मे). हे हल्ले, अयशस्वी ठरले. १९१८ पर्यंतच्या लढायाही अशाच अयशस्वी झाल्या. याची कारणे अशी : पायदळ हल्ल्यासाठी परस्परांसमोर असलेल्या दोन खंदक फळ्यांमधील निर्मनुष्य भूभागातील काटेरी अडथळे नष्ट करण्यासाठी हल्ला होण्यापूर्वी तोफांचा भडीमार करावा लागे त्यामुळे शत्रूला हल्ल्याची पूर्वसूचना मिळे व हल्ला निष्फळ करण्याची तयारी त्याला करता येई. शिवाय हल्ल्यासाठी पायदळाची जमवाजमव करून विमान व फुगा यांद्वारे टेहळणी करता येई. शिवाय रणांगणावर झालेल्या खाच खळग्यामुळे आगेकूच करणे कठीण होई. जिंकलेला भूभाग ताब्यात ठेवणेही अशक्य ठरे. ईप्रच्या लढाईत जर्मनांनी प्रथमच विषारी वायू वापरला. जेव्हा वाऱ्याची दिशी बदलली, तेव्हा जर्मन सैन्याची हानी दोस्तांपेक्षा ज्यादा झाली. दोस्तांनीही प्रत्युत्तर म्हणून विषारी वायू वापरला.

जानेवारीत जर्मनांनी प्रथमच त्सेपेलीन वायुयानातून इंग्लंडवर बाँबहल्ले केले. यात जरी फारशी हानी झाली नाही, तरी ब्रिटिश जनतेत मोठा क्रोध निर्माण झाला. १३ ऑक्टोबर रोजी जर्मनांनी मोठ्या प्रमाणावर इंग्लंडवर वायुहल्ले केले. इ. स. १९१५ या वर्षात पुढील लढाया झाल्या. पश्चिम आघाडी : यात लढाया आर्तंवा आणि शँपेन-ईप्रची दुसरी लढाई, फेस्तूबेर, व्हीमी व लोस या लढायांचा अंतर्भाव होतो. फेस्तूबेर ईप्र व लोस येथील लढायांत हिंदी सैन्य लढलं. ईप्रच्या लढाईत प्रथम जर्मनांनी व प्रत्युत्तर म्हणून दोस्तांनी विषारी वायू वापरला. या लढायांत ६ लक्षांवर जर्मन, १३ लक्ष फ्रेंच आणि २ लक्ष ८० हजार ब्रिटिश व हिंदी सैनिक निकामी झाले. लोसच्या लढायांत ब्रिटिश फील्ड मार्शल फ्रेंच अपयशी झाल्याबद्दल त्याची पदच्युती होऊन जनरल डग्लस हेग हा ब्रिटिश सेनेचा नवा सेनापती झाला. लोसच्या लढाईत गुरखा सैनिक कुलवीर थापा यास व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला.

पश्चिम आघाडीवरील लढायांवरून रणतंत्रावर झालेले परिणाम असे : (१) मशीनगन व तोफखाना यांच्या भयंकर माऱ्यामुळे आक्रमण चढायांपेक्षा बचावात्मक तंत्र प्रभावी ठरले (२) रणांगणीय   आघाडीचा विस्तार झाल्यामुळे बंगलांवर हल्ला करून शत्रूची आघाडी गुंडाळणे अशक्य झाले व समोरून केलेल्या हल्ल्यात प्रचंड हानी सोसावी लागली (३) खंदक युद्धतंत्राचा अवलंब करण्यात आला. दुसऱ्या ईप्रच्या लढाईत जमादार मिर दोस्त (चव्वेचाळीसावी कुक्स पलटण) याला आठ जखमी अधिकाऱ्यांना वाचवल्याबद्दल व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला.


महायुद्ध, पहिले. मध्यपूर्व आघाडी उर्फ मेसोपोटेमियाची मोहीमइटली आघाडी : २३ मे १९१५ रोजी इटली दोस्त राष्ट्राला येऊन मिळाले. इटलीने ट्रीएस्टच्या उत्तरेकडे ईझॉनत्सॉ नदीपाशी गोरित्स्या व कापोरेतो ही ऑस्ट्रियाची गावे घेण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला.

पूर्व आघाडी : हिंडेनबुर्खने रशियायी सैन्यावर कार्पेथियन डोंगरी मुलुखाकडून उत्तरेकडे आणि मझुरीअन सरोवराच्या पूर्वेकडे असे दुहेरी हल्ले केले आणि डिसेंबरअखेर−रीगा ते कॉर्पेथियन डोंगराच्या पूर्व-टोकापर्यंतचा मुलूख काबीज केला : यांत व्हिल्ना, वॉर्सा व पीन्स्क इ. मोठी शहरे समाविष्ट होती.

बाल्कन आघाडी : रशियाला त्याच्या दोस्तांपासून एकाकी ठेवण्यासाठी तुर्कस्थानशी थेट दळणवळण प्रस्थापित करणे आवश्यक होते. रूमानियाने रस्ता बंद केल्याने बल्गेरियातून मार्ग काढणे प्राप्त ठरले. गलिपली व दार्दानेल्सवरील दोस्तांचा हल्ला तुर्की सैन्याने केमालपाशाच्या नेतृत्वाखाली [⟶ केमाल आतातुर्क] हटविल्याचे (१५ ऑगस्ट) पाहून बल्गेरिया मध्यवर्ती राष्ट्रतटाला जाऊन मिळाले.सर्बीयाची परिस्थिती बिकट झाली. ग्रीक पंतप्रधान व्हेन्यिझेलॉस याने बल्गेरियाविरूद्ध सेनासज्जता जाहीर केली व सर्बीयाच्या मदतीला जाण्याचे ठरविले. एक फेंच व ब्रिटिश छोटी अभियान सेना सलॉ निकात उतरली (९ ऑक्टोबर). जर्मनीधार्जिणा ग्रीक राजा कॉन्स्टंटीन याने व्हेन्यिझेलॉसला बडतर्फ केले आणि सेनासज्जता रद्द करून ग्रीस राष्ट्राची तटस्थता जाहीर केली. जर्मन−ऑस्ट्रिया व बल्गेरिया यांच्या चढाईपुढे सर्बीयाने पळ काढला. फ्रेंच−ब्रिटिश अभियान सेना बल्गेरियाच्या हद्दीवर ठप्प झाली. 

तुर्कस्थान आघाडी : गलिपली−दार्दानेल्सची फ्रेंच−ब्रिटिश यांची संयुक्त जल-स्थल मोहीम फेब्रुवारीत सुरू होऊन ९ जानेवारी १९१६ रोजी ती संपली. फ्रेंच−ब्रिटिश यांना गलिपली−दार्दानेल्स जिंकता आले नाही. दोस्तांना हे अपयश आपला मूर्खपणा, घाबरटपणा व अकार्यक्षम नेतृत्व यांमुळे घ्यावे लागते. उदा., नोव्हेंबर १९१४ मध्ये दोस्त युद्धनौकांनी दार्दानेल्सवर अवेळी व अप्रायोजिक भडिमार केल्यामुळे  नेल्स−गलिपलीची तटबंदी केमालपाशा व जर्मन सेनापती झान्डर्स यांनी भक्कम केली. याशिवाय दोस्त नाविक ॲड्मिरल रोबेक याने घाबरून जाऊन यश दिसत असताना नाविक कार्यवाही रद्द करून माघार घेणे, किचेनरची दोषास्पद मोहीम−योजना तसेच ब्रिटिश सेनापती हॅमिल्टनचे अकार्यक्षम नेतृत्व अशी याची काही उदाहरणे देता येतील. या मोहीमेत दोस्तांना अडीच लक्षांवर, तर तुर्कांना तेवढीच सैनिकी हानी सोसावी लागली, यापैकी तुर्कांचे २१.००० सैनिक रोगराईने मेले. केमालपाशा तुर्कांचा महावीर म्हणून प्रसिद्ध झाला.

मध्यपूर्व आघाडी : १९१५. तुर्कस्तानने मध्यवर्ती राष्ट्रतटाशी मैत्री केल्यापासून, हिंदुस्थानचे साम्राज्य व त्याच्याकडून पुरवठा होणारी युद्धोपयोगी सामग्री आणि मेसोपोटेमिया व इराणी आखातातून होणारा तेलपुरवठा यांच्या संरक्षणाची व्यवस्था करणे, ब्रिटिश आणि हिंदुस्थान सरकारला भाग पडले. या दृष्टीने पुढील वर्मस्थाने व प्रदेशांचे संरक्षण महत्त्वाचे होते. पूर्व भूमध्य समुद्र, ईजिप्त, सुएझ कालवा, पॅलेस्टाइन, अरबस्तान, तांबडा समुद्र, इराणी आखात व मेसोपोटेमिया यांतील ईजिप्त सोडता, बाकीचे तुर्की साम्राज्याचे प्रांत होते. सुएझ कालवा, तांबडा समुद्र आणि इराणी आखात यांतील दळणवळणाला तुर्कांचा धोका होता.

तुर्की सम्राट सर्व इस्लाम धर्मियांचा खलिफा होता. [⟶ खिलाफत चळवळ, भारतातील]. हिंदी सैन्यात मुस्लिम सैनिक मोठ्या प्रमाणावर होते. यदाकदाचित खलिफाने ‘जिहाद’ पुकारलाच तर मुस्लिम सैनिकांवर हिंदुस्थान सरकारच्या दृष्टीने, विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती.

मध्य आघाडीवरील युद्धकार्याची जबाबदारी हिंदुस्थान सरकारवर सोपविण्यात आली. त्यावेळी व्हॉईसरॉय लॉर्ड हार्डिंग आणि सरसेनापती बोशॅम्फ डफ हे होते. 

ऑक्टोबर १९१४ मध्ये जनरल टाऊनझेंडच्या सहाव्या पुणे डिव्हिजनला मेसोपोटेमियामधील तेलपुरवठा केंद्रांचे संरक्षणकार्य देण्यात आले. त्याप्रमाणे आबादान व बहारीन येथील तेलकेंद्रे तिने ताब्यात घेतली होती.

१९१५ सालापासून आवाझ−आबा−दानमधील तेलनळाच्या संरक्षणाचे मर्यादित काम टाऊनझेंडला देण्यात आले. यूरोपातील बहुतांश हिंदी सैन्य ईजिप्तमध्ये पाठविण्यात आले. हिंदी सेनेत वाढ करण्यात आली. यातूनचब्रिटिश अभियान सेवा सज्ज झाली. कूट अल् अमाराचा वेढा आणि हिंदी सैन्याची शरणागती (जानेवारी १९९५−२९ एप्रिल १९१६). वास्तविक भेसोपोटेमियातील मोहिमेचे उद्दिष्ट केवळ तेलकेंद्रे व नळांचे संरक्षण करणे इतपतच मर्यांदित होते तथापि हार्डिंग, डफ, आघाडी सेनापती निक्सन व अभियान सेनेचा सेनापती टाऊनझेंड यांनी आपल्या वैयक्तीक महत्त्वाकांक्षापूर्तीसाठी जे षडयंत्र रचले, त्यातून या मोहिमेचे विस्तारक्षेत्र वाढले. हिंदी सैन्याची भयंकर वाताहात झाली[⟶मराठा रेजिमेंट]. कूट अल् अमारापर्यंत कूच करण्यात ७,००० कूटच्या वेढाबंदीत १,६०० वेढाबंदी उठविण्यात २३,००० हिंदी व ब्रिटिश सैनिक ठार वा निकामी झाले. बंदी उठवण्यात अपयश आले आणि त्यामुळे १३,००० हिंदी व ब्रिटिश सैनिक तुर्कांचे बंदी झाले त्यांपैकी ७,००० मृत्यू पावले. एकंदर ६६ टक्के हिंदी सैनिक मृत्यू पावले वा निकामी झाले. एवढे घडल्यावरही टाऊनझेंडला कूट अल् अमारा काबीज करता आले नाही. त्याला तुर्कांना शरण जावे लागले.

कूट अल् अमारा मोहिमेतील पुढील लढाया प्रसिध्द आहे : (१)बसरा, कूर्ना, आवाझ व शाइबा (जानेवारी−जून १९१५) (२) अमरा, नासिरिया, टेसिफॉन आणि कूट अल् अमारा (जुलै १९१५−२४ डिसेंबर १९१५). या कार्यवाहित ⇨पूना हॉर्सं, मराठा रेजिमेंट व जयपूर वाहतूक दल या हिंदी दलांनी लक्षणीय कार्य केले.


मध्यपूर्व आघाडीच्या कूट अल् अमाराच्या चढाईतील अपयशाची कारणे अशी आहेत : (१) टाऊनझेंडने आघाडीवर न राहता अनुपरिस्थितीचे नेतृत्व केले. (२) हिंदुस्थानवर युध्दकार्य सोपविले होते, तरी लंडन येथील युध्दकार्यालयाने लुडबुड केली या दोघांनाही युध्दपरिस्थिचे आकलन नीट झाले नाही. (३) मर्यादित युध्दउद्दिष्ट असताना बगदाद काबीज करण्याच्या महत्त्वाकांक्षापूर्तीसाठी अपुरे सैनिकबळ, अपुरा व अनियमित रसद पुरवठा आणि वाहतूक साधने पुरे व अकार्यक्षम वैद्यकी साहाय्य.

कुट अल् अमाराच्या पतनाची तुलना दुसऱ्या महायुध्दातील सिंगापूरच्या पतनाशी होऊ शकते. [⟶महायुध्द, दुसरे].

इराण आघाडी : १९१५. महायुध्द सुरू झाल्याबरोबर इराण तटस्थ राष्ट्रे होते तरी, उत्तर इराणचा बहुतांश प्रदेश रशियाने व्यापला होता. जेव्हा तुर्कस्तान वैरी राष्ट्र झाले तेव्हा तेलपुरवठा निर्विघ्न ठेवण्यासाठी आणि आगामी मेसोपोटेमियातील चढाईसाठी, इराणी आखाताचा वायव्य किनारा ब्रिटनने व्यापून टाकला. तुर्की सैन्यानेही इराणी कुर्दिस्तान व्यापले. सारि-कामिशच्या लढाईत रशियाकडून ताब्रीझ शहर तुर्कांनी घेतले, तथापि तेथून तुर्कांना माघार घ्यावी लागली (जानेवारी १९१५). पश्चिम इराण, कॉकेशस प्रदेश व मेसोपोटेमियात तुर्कांविरूध्द लढाया चालू होत्या.

सागरी युध्द : १९१५. जानेवारीमध्ये जर्मन ॲड्मिरल हिपर याच्या आरमाराने इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावर आणि ब्रिटिश मच्छिमाऱ्यांवर  हल्ला करण्यासाठी कूच केले. ब्रिटिश ॲड्मिरल बीटीचे आरमार मुकाबला करण्यास निघाल्याचे रेडिओ संदेश हिपरला मिळाले. २४ जानेवारी रोजी डोंगरबँक येथे दोन्ही आरमारांमध्ये मारामरी झाली. हिपरला माघार घ्यावी लागली. हेच ॲड्मिरल पुढे−जटलंड [⟶जटलंडची लढाई] आरमारी लढाईत होते.

जर्मनांनी ४ फेब्रुवारी रोजी ⇨पाणबुडी मोहिमेस प्रारंभ केला. व्यापारी नौका बुडविणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. यातून तटस्थ राष्ट्रांची जहाजेही सुटली नाहीत. तटस्थ अमेरिकेने जर्मनीला ताकीद दिली असताही अमेरिकेचे एक तेलवाहू जहाज जर्मन पाणबुडीने बुडविले (१ मे). ७ मे रोजी जर्मन पाणबुडीने लुसिटानिया ही ब्रिटिश प्रवासी नौका डुबविली. त्यामुळे १,१९८ प्रवासी (१२४ अमेरिकीधरून) मृत्यू पावले. आंतरराष्ट्रीय संकेताविरूध्द लुसिटानियात रणसामग्री होती. कोणीही सागरी प्रवासात थांबण्यास सांगितले तर थांबू नये, अशा सूचना जहाज कप्तानाला ब्रिटिशांनी दिल्या होत्या. जर्मन राजदूतानेही अमेरिकेला लुसिटानियातून अमेरिकी प्रवाशांना जाऊ न देण्याची जाहीर सूचना दिली होती. असे असूनही अमेरिकेने जर्मनीला तंबी दिली. पुढील युध्दघटनांच्या संदर्भात विस्टन चर्चिल ही दीर्घसूत्री व्यक्ती ब्रिटीश नाविकमंत्री होती, हे लक्षात घ्यावे. अमेरिकेतील सर्वसामान्यत जर्मनाविषयी त्वेष निर्माण झाला. १९ ऑगस्ट १९१५ रोजी जर्मन पाणबुडीने ब्रिटिशांचे आणखी एक जहाज−यातही अमेरिकी होते−बुडविले. अमेरिकेत जर्मनीविरूध्द लोकमत शिगेला पोहोचले. जर्मनिने अनिर्बंध पाणबुडी मोहिमा रद्द केल्या तथापि वर्षाच्या अखेरीस अनिर्बंध पाणबुडी मोहिमेने एकूण १० लक्ष टन वजनाच्या नौका बुडविल्या.

युध्दपरिस्थिती व मोहिमा : १९१६. वर्षारंभी दोस्तराष्ट्र तट व मध्यवर्ती राष्ट्र तट या दोघांचीही युध्दशक्ती तुल्यबळ होती, तथापी जर्मन सेनासंघटना त्यांच्या शत्रूपेक्षा कार्यक्षम होती. फ्रान्समध्ये मनुष्य बळाची चणचण गंभीर झाली होती. युद्धक्षेत्र-विस्तारामुळे नव्या सेना सज्ज करण्यासाठी सक्तीसैनिक भरती अंमलात आणण्याचा विचार ब्रिटिश राज्यकर्ते करू लागले होते. आयर्लंडमध्ये ब्रिटन विरोधक बंडाच्या मार्गावर होते. हिंदुस्थानात शिखांच्यातही असंतुष्टता प्रज्वलित झाल्याने सैनिक भरती मंदावली होती. अगणित मनुष्यबळ असल्याने रशिया त्यास शस्रे आणि युध्दसामग्री पुरविण्याकरिता वेळ मिळण्याची संधी पाहत होती.

मागील वर्षातील ‘आधी पूर्व आघाडी, मग पश्चिम आघाडी’ या युध्दनीतीचा जर्मनिने त्याग केला. पश्चिम आघाडीवर जरी जय मिळवता आला  नाही. तरी फ्रान्सला गलितगात्र करून पश्चिम आघाडीवर निर्णय मिळवण्याच्या फाल्केनहाइनच्या नीतीला कैसरने मान्यता दिली. तसेच सागरी युध्दाची (पाणबुडीधरून) आक्रमक गती वाढविण्याचे जर्मन नेत्यांनी ठरविले.

मागील वर्षातील अपशयाचे प्रमुख कारण दोस्तराष्ट्रांचा युध्दकार्यांत समन्वय व एकात्मतेविषयी अभाव आहे, हे झॉफ्रने दोस्त राष्ट्रप्रमुखांना पटविले, त्याचप्रमाणे त्याने पश्चिम, पूर्व आणि इतर आघाड्यांवर जून १९१६ च्या सुमारास समन्वयित चढाईला सर्वांचा होकार मिळविला.

ब्रिटिनमध्ये, खंदक युध्दतंत्राला कलाटणी देणारे एक क्रांतीकारक शस्र ⇨रणगाडा याचा विकास कर्नल स्विन्टन हा चर्चिलच्या पाठिंब्याने करीत होता. व्हर्डन व सों येथील १९१६ सालच्या दोन अतिभयप्रद लढायांमुळे पश्चिम आघाडी चिरंतन प्रसिध्द पावली. व्हर्डन लढाई (२१ फेब्रुवारी−१८ डिसेंबर १९१६): व्हर्डन गावाच्या आवती-भोवतीच्या पाच किमी. प्रदेशांतील टेकड्यांवर व सपाट भागावर भक्कम दुर्ग-बंदी होती. व्हर्डन गावामधून म्यूज नदी वाहते. दुर्गात फ्रेंच शिबंदी अपुरी होती. प्रचंडी तोफ-भडीमारानंतर जर्मन पाचव्या सेनेने व्हर्डन फळीवर हल्ला केला. व्हर्डनच्या रक्षणासाठी कडवी फ्रेंच कुमक झॉफ्र पाठवील आणि तसे घडले की व्हर्डन येथे फ्रेंचांचे कंबरडे मोडून इतरत्र पश्चिम आघाडीवर जोरदार चढाई करता येईल, अशी फाल्केनहाइनची रणयोजना होती. आरंभीच्या जर्मन धडाक्यापुढे फ्रेंचांनी किंचित माघार घेतली. व्हर्डन फळीचा फ्रेंच सेनापती जनरल पेतँ याच्या स्फूर्तिदायक नेतृत्वामुळे फ्रेंचांनी जर्मनांचे सर्व हल्ले परतवून लावले. पेतँने फ्रेंच सैनिकांना ‘शत्रू पुढे जाणारच नाही’ हा रणसंदेश दिला. जनरल नीव्हेल व मानझॅन या पेतँच्या दुय्यम सेनापतींनी उत्कृष्ट काम केले. व्हर्डनच्या लढाईच्या वेळीच सों नदाकाठच्या आघाडीवरील चढाईची योजना झॉफ्र पक्की करीत होता, म्हणून व्हर्डन येथे जर्मनांना गुंतवून ठेवणे आवश्यक होते. तिकडे पूर्व आघाडीवर रशियाचा जनरल ब्रुस्यीलॉव्हने ‘ब्रुस्यीलॉव्ह’ चढाई सुरू केल्याने (४ जून−२० सप्टेंबर) फाल्केनहाइनला व्हर्डन येथील पंधरा डिव्हीजन पूर्व आघाडीवर पाठवाव्या लागल्या. ऑक्टोबरपासून फ्रेंचांनी जोरदार प्रतिचढाई केली. ऑगस्टमध्ये व्हर्डन येथील अपयशावरून कैसरने फाल्केहाइनला पदच्युत केले व त्याच्या जागी हिंडेनबुर्खला जनरल स्टाफप्रमुख म्हणून नेमले. हिंडेनबुर्खरबरोबर लूडेन्डोर्फ याची त्याचा दुय्यम म्हणून नेमणूक झाली. फ्रेंचांच्या कडव्या विरोधापुढे हिंडेनबुर्खने चढाईचा नाद सोडला. फ्रेंचांची प्रतिचढाई यशस्वी झाली आणि व्हर्डन लढी संपली. या लढाईत फ्रेंचांचे ५ लक्ष ४२ हजार आणि जर्मनांचे ४ लक्ष ३४ हजार सैनिक ठार वा निकामी झाले. 

सों नदीची पहिली लढाई : (२४ जून−१३ नोव्हेंबर). वास्तविक सोंची लढाई व्हर्डन लढाईबरोबरच जुंपविण्याचे झॉफ्रचे वेळापत्रक होते तथापी व्हर्डन येथील घटनांमुळे ही लढाई २४ जूनला सुरू झाली. जनरल रॉलिन्सची चौथी सेना व ॲल्नेबीची तिसरी सेना या ब्रिटिश सैन्यावर चढाईची जबाबदारी होती. फ्रेंच जनरल ⇨फर्दीनां फॉश याची सेना त्यांना साहाय्यक म्हणून होती.


या लढाईचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे होते. व्हर्डन फळीवरील जर्मन दबाब कमी करणे आणि पूर्व आघाडीवर जर्मनांना कुमक पाठविण्यात अडथळा आणणे. 

ही लढाई म्हणजे ब्रिटिश हल्ल्यांची मालिका होती. पाच महिने असे हल्ले-प्रतिहल्ले चालू राहिले. या लढाईचे एक वैशिष्ट्य म्हणजे, जर्मनांची एक खंदक फळी फोडून तिच्या मागील दुसऱ्या खंदकाचाही ब्रिटिशांनी भेद केला आणि त्या फटीतून मोठ्या संख्येने बर्टिश घोडदळाने आगेकूच केली. या घोडदळातील ‘सिकंदराबाद’ आणि ‘सियालकोट’ रिसाल्याने महत्त्वाचे कार्य केले. या रिसाल्यांचेच चौथी व पाचवी घोडदळ डिव्हिजन म्हणून ऑक्टोबर १९१६ मध्ये पुनर्घटन करण्यात आले. ब्रिटिश घोडदळाच्या मुसंडीला योग्यवेळी कुमक मिळाली नाही व जर्मन मशीनगनच्या माऱ्यामुळे या घोडदळाची मोठी हानी झाली.

या लढाईची उद्दिष्टे थोडीफार सफल झाली. व्हर्डनवरील जर्मन दबाव कमी झाला. जर्मनांच्या युध्दोत्साहाला तडे गेले. जर्मन आघाडीचा फारच थोडा भाग ब्रिटिश काबीज करू शकले. ब्रिटिश इतिहासात प्रथमच सक्ती-सैनिक भरतीस प्रारंभ झाला. या लढाईत ब्रिटिश व फ्रेंच मिळून ६ लक्ष १५ हजार आणि जर्मन ६ लक्ष ५० हजार सैनिक ठार वा निकामी झाले.

या लढाईची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे होती : सैन्य कितीही शूर व सुशस्रयुक्त असले आणि त्यांचे नेते उत्तम असले, तरी मशीनगनच्या गोळीबाराच्या जाळ्यात त्यांचा निभाव लागत नाही, हे सिध्द झाले. वायुकारवाया मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या. ब्रिटिशांनी प्रथमच रणगाड्यांचा उपयोग केला परंतु त्याच्या सुप्त शक्तीचा उपयोग करून घेण्याचे तंत्र ब्रिटिश नेत्यांना उमजले नाही. जर्मनांचे संरक्षणतंत्र लक्षणीय होते तथापि त्यांनी केलेले पुनरावृत्ती प्रतिहल्ले निष्फळ तर ठरलेच, पण त्याबरोबरच त्यांचे अनुभवी कनिष्ठ अधिकारी व सैनिक ठार झाले.दोस्तांना गलितगात्र करण्याचे फाल्केनहाइनचे स्वप्नी भंग पावले. जर्मन सेना युध्दारंभी जशी होती, तशी राहिली नाही. सामोरी हल्ल्यांच्या तंत्रांचा वाईट अनुभव येत असतानाही,   हटवादीपणाने अवलंब केल्याबद्दल ब्रिटिश सरसेनापती हेगवर कठोर टीका झाली. सोंच्या लढाईतील अनावश्यक हानीच्या कारणावरून ब्रिटिश पंतप्रधान अस्क्विथ यास राजीनामा द्यावा लागला (डिसेंबर १९१६). त्याच्या जागी लॉइड जॉर्जची नेमणूक झाली तथापि हेगसारखी आप्पलपोटी, स्वार्थी व नेतृत्वगुणात क्षुद्र असलेली व्यक्ती सरसेनापती म्हणून राहू शकली, ही आश्चर्याची व खेदाची घटना होय. डेव्हिड लॉइड जॉर्जचे राजकीय तसेच राष्ट्रीय नेतृत्व आदर्श व फलदायी ठरले. किचेनसारख्या सनातनी युध्दमंत्र्याच्या सल्ल्याला झिडकारून जॉर्जने उखळी तोफा व रणगाडे या नवीन शस्रांच्या विकासाला आणि उत्पादनाला जोरदार चालना दिली. मशीनगन व दारूगोळा यांचे उत्पादन वाढविले. खाणी, रेल्वे व औद्योगिक कारखान्यांचे नियंत्रण सरकारने ताब्यात घेतले. पंतप्रधान झाल्यावर त्याने : (१) युध्द मंत्रिमंडळ स्थापले. त्यायोगे युध्दकार्यनिर्णय त्वरेने घेणे शक्य झाले (२) सागरी वाहतूक व वाहतूक साधने आणि शेतीउत्पादन यांवर सरकारी नियंत्रण बसविले (३) सेनासज्जता कार्यक्षम करण्यासाठी राष्ट्रीय सेवा मंत्रालय स्थापले (४) पाणबुड्यांच्या धोक्याला तोंड देण्यासाठी सागरी वाहतुकीत काफिला-तंत्र अंमलात आणण्याचे जॉर्जने ठरविले.

इटली आघाडी : (११ मार्च ते १४ नोव्हेंबर १९१६). या काळात इटली व जर्मन−ऑस्टिया यांच्यात पुढील लढाया झाल्या (१) ईझॉन्त्सॉ येथील पाचवी, सहावी, सातवी, आठवी व नववी लढाई, (२) ऑस्ट्रियाची ट्रेंटन चढाई.

एकंदरित, ऑस्ट्रिया−जर्मनीने इटलीवर मात केली. पूर्व आघाडीवरील बूस्यीलॉव्हच्या चढाईमुळे, जर्मनांना या आघाडीवरील काही जर्मन सैन्य पूर्व आघाडीवर पाठवावे लागल्यामुळे जिंकलेला इटलीचा प्रदेश अंकित करता आला नाही.

इटलीचे २ लक्ष ७३ हजार आणि ऑस्ट्रिया−जर्मनीचे १ लक्ष ४० हजार सैनिक ठार, निकामी व युध्दबंदी झाले.

बाल्कन आघाडी : (जून−३० नोव्हेंबर १९१६). या आघाडीवर अल्बेनियामध्ये इटलीविरूध्द ऑस्ट्रिया (जुलै−नोव्हेंबर), फ्लॉरिनची लढाई व मॉन्यस्टीर (बीटॉल) येथील दोस्तांची प्रतिचढाई, (ऑगस्ट−नोव्हेंबर) या लढाया दोस्त सैन्य व जर्मन−बल्गेरिया-ऑस्ट्रिया सैन्यांमध्ये झाल्या. 

मध्यपूर्व आघाडी : (१९१६). तुर्कांचा पाडाव करण्याच्या उद्दिष्टाने ब्रिटिशांनी पुढील कारवाया केल्या : (१) ईजिप्तच्या सुएझ कालव्याची संरक्षण फळी सिनाईच्या वाळवंटात स्थापली. येथे किरकोळ लढाया झाल्या पण विशेष प्रगती झाली नाही. (जानेवारी−जुलै १९१६). (२) टॉमस लॉरेन्स यांच्या नेतृत्वाखाली तुर्कांविरूध्द अरबांत असंतोष निर्माण करण्यात दोस्तांनी यश मिळवले. मक्केचा शरीफ हुसेन याने अरब स्वातंत्र्याची घोषणा केली. अरब व दोस्त सैन्यांनी मक्का व मदिना काबीज केले. सिनाई वाळवंट ते उत्तरेकडे सिरिया ते टॉरस पर्वतापर्यंत जाणाऱ्या तुर्कांचा दळणवळण व पुरवठा मार्ग धोक्यात आला. वर्षाअखेर ईशान्येकडील ॲल-अरिशपर्यंतचा सिनाई वाळवंटी प्रदेश दोस्तांनी काबीज केला. 

पूर्व आघाडी : १९१५-१६ मध्ये रशियाची पीछेहाट झाली होती. या पीछेहाटीमुळे रशियाच्या भौगोलीक विस्ताराच्या दृष्टीने, पीछेहाट हे विजयाचे एकमेव साधन आहे, याबाबत रशियायी युध्दनेत्यांची धारणा पक्की झाली. नेपोलियनच्या १८१२ सालातील पराजयाची आठवण त्यांना झाली. पूर्व आघाडीवर−पिन्स्क ते दक्षिणेकडे चिरनॉव्हत्सी या सु. ४०० किमी. ऑस्ट्रिया−जर्मन फळीवरील हल्लायोजना रशियाने आखण्यास प्ररंभ केला तथापि ट्रेंटन येथील इटलीची बिकट परिस्थिती पाहून, रशियायी द. आघाडी विभागाचा प्रमुख जनरल ब्रूस्यालॉव्हला ऑस्ट्रीया−जर्मन फळीवर हल्ला करण्याची आज्ञा झाली. हल्ला करण्याचे एक नविन तंत्र ब्रूस्यीलॉव्हने वापरले ते असे : (१) हल्ल्यापूर्वी राखीव सैन्याची जमवाजमव करावयाची नाही वा शत्रु-फळीवर तोफांचा भडीमार करावयाचा नाही. असे केल्याने शत्रूला हल्ल्याची पूर्वसूचना न मिळता तो बेसावध राहतो. ब्रूस्यीलॉव्हला या अपरिचित युध्दतंत्रामुळे ऑस्ट्रियाच्या सातव्या व चौथ्या सेनांचा पराभव झाला. हल्ल्यांच्या प्रगतीसाठी ब्रूस्यीलॉव्हने रशियाच्या इतर दोन सेनापतींनी साहाय्य केले नाही. असे असता २८ जुलै १९१६ रोजी त्याने परत चढाई सुरू करून २० सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रियाची फळी ५० ते १०० किमी. कार्पेथियन पर्वतरांगेपर्यंत मागे ढकलली. 


राखीव सैन्याची व दारूगोळ्याची कमतरता, व्हर्डन येथून पाठविलेली जर्मन कुमक ऑस्ट्रियाला मिळणे व रशियायी सैन्याची झालेली दमछाक, यामुळे ब्रूस्यीलॉव्हला युध्द थांबवावे लागले. जर जर्मन कुमक मिळाली नसती, तर १९१६ मध्येच ऑस्ट्रियाचा संपूर्ण निकाल लागला असता असे म्हटले जाते. ब्रूस्यीलॉव्हची कामगिरी पाहून २७ ऑगस्ट १९१६ रोजी रूमानिया दोस्त राष्ट्रतटाला मिळाले. रूमानियाने ट्रान्सिल्व्हेनिया या ऑस्ट्रियाच्या संपन्न प्रांतावर हल्ला केला तथापि फल्केनहाइन व माकेन्झेन या जर्मन सेनापतींनी आर्जेश नदीच्या काठावर रूमानिया सैन्याचा पराभव केला (१−४ डिसेंबर १९१६). रूमानियाचा अन्नधान्य−तेलखाणींचा समृध्द प्रदेश जर्मनांनी पादाक्रांत केला. रूमानियाचे ३ ते ४ लक्ष आणि ऑस्ट्रिया−जर्मनीचे ६० हजार सैनिक कामास आले. 

मेसोपोटेमिया मोहिम : (१९१६). कूट अल् अमाराच्या पतनानंतर डिसेंबर १९१६ मध्ये जनरल मॉडच्या ब्रिटिश व हिंदी सेनेने (एक लक्ष ६६ हजार यांपैकी १ लक्ष ११ हजार हिंदी सैनिक होते.) कूट अल् अमारा काबीज केले (२ फेब्रुवारी १९१७) व या सेनेची बगदादकडे आगेकूच सुरू झाली. 

कॉकेशस व इराणी आघाडी : (१९१६). रशियाचा कार्यक्षम सेनापती युद्येन्यिचने कार्स येथून चाल करून तुर्कांचे एर्झरूम काबीज केले. काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील तुर्कांचे त्रेबिझोंड काबीज करून रसदपुरवठामार्ग निर्विघ्न केला (१८ एप्रिल). जून−ऑगस्ट १९१६ मध्ये तुर्कांनी काळ्या समुद्राच्या किनाऱ्याकडे प्रतिहल्ला केला पण युद्यन्यिचने हा प्रतिहल्ला मोडून काढला. केमालपाशाने मुश व बिटलिस जिंकले (ऑगस्ट १९१६). यानंतर रशिया व तुर्क यांनी थंडीमुळे कारवाया बंद केल्या.

सागरी लढाया : (१९१६). सशस्र व्यापारी जहाजांवर, युध्दनौका समजून हल्ले केले जातील, असे जर्मनांनी जाहीर केले. अमेरिकन प्रवासी असलेले ‘ससेक्स’ जहाज जर्मनांनी बुडविले (२४ मार्च १९१६). अमेरिकेने आपला क्रोध व्यक्त केला. प्रवासी जहाजावर हल्ले करणार नाही, असे आश्वासन जर्मनांनी दिले. एप्रिल १९१६ मध्ये जर्मन युध्दनौकांनी यार्मथ व लोस्टॉफ्ट या इंग्लिश किनाऱ्यावरील गावांवर तोफांचा भडिमार केला. यानंतर ३१ मे−१ जूनची सुप्रसिध्द सागरी जटलंडची लढाई झाली. 

जर्मनीची नाकेबंदी : मध्यवर्ती राष्ट्रतटाच्या युध्दशक्तीचा नाश करण्यासाठी व त्यांच्या जनतेला भुके मारण्याचे काम बर्टिश नौसेना करीत होती. १९१६ अखेर जर्मनीच्या बहुतांश जलपृष्ठवाही सशस्र नौका बुडविण्यात आल्या होत्या. तटस्थ स्वीडन, नॉर्वे व हॉलंड यांच्या बंदरांतून जर्मनीला होणारा पुरवठा बंद पाडण्यासाठी तटस्थ राष्ट्रांच्या (अमेरिकाधरून) जहाजांची तपासणी ब्रिटिश युध्दनौका करू लागल्याने ब्रिटन व अमेरिका यांच्यात कुरबूर झाली. यास कारण की अमेरिका दोस्त राष्ट्रांना तसेच मध्यवर्ती राष्ट्रांच्या बरोबर व्यापार करीत असे. जर्मनीला नाकेबंदी तोडण्यासाठी सागरी मार्गात सुरूंग पेरणे व अनिर्बंध पाणबुडी-हल्ले करण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. परिणामतः ही घोडचूक ठरून अमेरिकाही जर्मनीच्या विरूध्द गेली.

युध्दपरिस्थिती व कारवाया : (१९१७). गेल्या वर्षांत दोस्तराष्ट्रतटाची युध्दशक्ती वाढली होती. पश्चिम आघाडीवर ब्रिटिश−फ्रेंचांच्या संयुक्त तसेच रशिया आणि इटली यांच्या पूर्व व तर आघाड्यांवरील कारवाया समन्वयित करण्यावर परत भर देण्यात आला होता. लॉइड जॉर्जने पॅलेस्टाइनमधील कारवायांना प्राधान्य दिले. १९१६ च्या अखेरिस झॉफ्रला निवृत्त अथवा बडतर्फ करण्यात आले. त्याच्या जागी आलेल्या जनरल नीव्हेलमुळे झॉफ्रच्या समन्वयित कारवाया करण्याचे तत्त्व मागे पडले. हेग व नीव्हेल यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. जॉर्जने नीव्हेलची बाजू घेतली. या संघर्षामुळे १९१७ सालातील दोस्त राष्ट्रांच्या कारवाया-योजना गुप्त राहिल्या नाहीत. लूडेन्डोर्फला दोस्त तटातील घटनांचा सुगावा लागला होता. त्याने पश्चिम आघाडीवर संरक्षणात्मक भूमिका अंगिकारण्याचे ठरविले तथापि इटलीचा संपूर्ण पराभव करण्यासाठी ऑस्ट्रियाला मदत करण्याचे त्याने ठरविले.दोस्त राष्ट्रांच्या विरूध्द अनिर्बंध पाणबुडी कारवाया जोराने करण्याची आज्ञा जर्मन नौसेनेला देण्यात आली.

पश्चिम आघाडी : (१९१७). या आघाडीवरील युध्दाला एकदम कलाटणी देण्याची एक घटना म्हणजे दोस्तराष्ट्र-तटाला अमेरिका मिळणे, ही होय. ३ फेब्रुवारी १९१७ रोजी अमेरिकेने व त्यानंतर ब्राझील, बोलिव्हिया, पेरू इ. दक्षिण अमेरिकी राष्ट्रांनी जर्मनीबरोबरचे संबंध तोडून टाकले.

जानेवारी−मार्च १९१७ मध्ये त्सिमरमान संदेश या प्रकणामुळे जर्मनीविरूध्द अमेरिकेत लोकमत प्रखर झाले. हा गुप्त संदेश त्सिमरमान या जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्याने मेक्सिकोला पाठविला होता. अमेरिका व जर्मनी यांमध्ये जर युध्द जुंपले तर, न्यू मेक्सिको, टेक्सस व अरिझोना हे प्रांत मेक्सिकोने परत जिंकून घ्यावे, मध्यवर्ती राष्ट्रतटाला मिळण्यासाठी जपानला उद्युक्त करण्याची खटपट मेक्सिकोने करावी, असा हा गुप्त संदेश होता. ब्रिटिश गुप्तवार्तासंकलन खात्याने हा जर्मन संदेश अमेरिकेला पुरविला (१ मार्च १९१७). अमेरिकी राष्ट्रपती वुड्रो विल्सनने सर्व अमेरिकी जहाजांना संरक्षणाच्या दृष्टीने सशस्र करण्याची आज्ञा दिली (१३ मार्च १९१७). अमेरिकेची काही जहाजे जर्मन पाणबुड्या व युध्दनौकांनी बुडविली. जर्मनीविरूध्द युध्दघोषणा विल्सनने केली (६ एप्रिल १९१७) तथापी त्याने ऑस्ट्रिया−हंगेरी विरूध्द युध्दघोषणा ७ डिसेंबर १९१७ रोजी केली. 

पश्चिम आघाडीवर १९१७ साल हे दोस्त राष्ट्रांच्या युध्द अपयशामुळे प्रसिध्द आहे. फ्रेंच सेनापती नीव्हेलने शँपेन येथे जर्मनीवर केलेला हल्ला तर फसलाच (एप्रिल-मे), शिवाय फ्रेंच सैन्याने बंड केले. पेतँने परिस्थिती ताळ्यावर आणली. जून ते नोव्हेंबर १९१७ मध्ये ईप्रची तिसरी लढाई ब्रिटिशांनी केली. ही लढाई ‘पॅशन्डील’म्हणून अजूनही प्रसिध्द आहे. ब्रिटिशांनी ३ लक्ष २४ हजार सैनिक गमावून केवळ ६ किमी. पर्यंत प्रगती केली. जर्मनांचे २ लक्ष सैनिक कामास आले. जर्मनांनी प्रथमच मोहरीचा विषारी वायू वापरला त्याचप्रमाणे त्यांनी विमानातील मशीनगनचा गोळीबार ब्रिटिश सैन्यावर केला.


सैनिकी इतिहास व विज्ञानदृष्ट्या कँब्रेची लढाई (२० नोव्हेंबर−३ डिसेंबर १९१७) प्रसिध्द आहे. रणगाड्यांचा जर सुसंघटितरित्या उपयोग केला गेला, तरच खंदक युध्दातील कुंठितावस्था निवारणे शक्य आहे से सिध्द झाले [⟶फुलर, जॉन फ्रेड्रिक चार्ल्स]. या लढाईत ब्रिटिशांच्या ३८१ रणगाडासमूहाने जर्मनफळीत विस्तृत खिंडार पाडले, तथापि राखीव रणगाडा दिले नसल्याने आरंभीच्या यशाचा पुरा त्यांना घेता आला नाही. रणगाड्यांच्या हल्ल्यापुढे माघार घेणाऱ्या जर्मनांचा पाठलाग ‘हडसन हॉर्स’ या हिंदी रिसाल्याने केला. जर्मनांच्या प्रतिहल्ल्याला चौथ्या व पाचव्या घोडदळ डिव्हिजनांनी तोंड दिले. त्यात ५०० हिंदी घोडेस्वार ठार झाले. पश्चिम आघाडीवरील १९१७ सालातील लढायांचा आढावा घेऊन पुढील निष्कर्ष काढले आहेत : आतापर्यंतच्या युद्धातील परागतीवरून १९१७ सालातही युद्धकार्य एकात्मतेने पार पाडण्याच्या दृष्टीने दोस्त अयशस्वी ठरले. हेग व नीव्हेल यांनी अलगपणे केलेल्या कारवायांत भयंकर हानी झाली. हेगच्या कारवायांमुळे (ईप्र व कँब्रे) फ्रेंचांवरील जर्मनीच्या चढाईची तीव्रता कमी झाली. ब्रिटिश तसेच फ्रेंच हे दोघेही थकत असल्याचे दिसून आले. अमेरिकेचे पदार्पण त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले.

पूर्व आघाडीवरील घटना दोस्तराष्ट्रांच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक होत्या. रशियन सैन्याने पेट्रोग्राड येथून १० मार्च १९१७ रोजी बंड केले आणि तात्पुरते लष्करी शासन प्रस्थापित झाले. झार दुसरा निकोलसने सिंहासनाचा त्याग केला. लष्करी शासन व पेट्रोग्राड येथील बोल्शेव्हिक (कामगार व सैनिकी शासन) यांच्यात वाद निर्माण झाला. दोस्त राष्ट्रांच्या विरुद्ध चालू ठेवण्याचा निर्धार लष्करी शासनाने जाहीर केला. लष्करी शासन क्रांतिविरोधी धोरण अंमलात आणील या भीतीने बोल्शेव्हिकांनी आज्ञा क्र. १ जाहीर करून रशियायी लष्करी अधिकाऱ्यांचे सैनिकी शिस्तसंबंधीचे अधिकार रद्दबातल केले. सर्व रशियायीसैन्यात गैरशिस्त माजली. बंडखोर सैनिकांनी अधिकाऱ्यांची कत्तल केली. अशा गंभीर प्रसंगी जर्मनीने ⇨ लेनिनव त्याचे साथीदार यांना रशियात गुप्तपणे घुसविले. ल्येव्ह ब्रनश्टाइन ऊर्फ ट्रॉटस्की हाही नंतर लेनिनला येऊन मिळाला. जर्मनीने रशिया विरूद्ध युद्ध बंद केले. युद्ध चालू ठेवल्यास सर्व रशियायी आपले मतभेद विसरून पितृभूमीच्या संरक्षणासाठी एकत्र उभे राहतील, अशी जर्मनीला भीती वाटली. पूर्व आघाडीवरील अस्थिरतेचा फायदा घेऊन जर्मनीने पश्चिम व इटली आघाडीकडे कुमक पाठविली. रशियाच्या लष्करी शासनाने (युद्धमंत्री अलेक्झांडर क्यिऱ्येन्स्की) ब्रूस्यीलॉव्हच्या नेतृत्वाखाली गॅलिशिया फळीवर चढाई केली (मे १९१७). आरंभीच्या यशानंतर ब्रूस्यीलॉव्हची चढाई ढासळली. सप्टेंबर १९१७ मध्ये जर्मन जनरल ऊत्ये याने घुसखोरीचे एक नवे रणतंत्र वापरून रीगापर्यंत मजल मारली. 

सप्टेंबर-ऑक्टोबर १९१७ मध्ये रशियात अत्यंत गोंधळ माजला. क्यिऱ्येन्स्कीच्या तात्पुरत्या शासनाने पेट्रोग्राडमधून पळ काढून मॉस्कोत आसरा घेतला. जनरल कर्न्यीलॉव्हचा प्रतिक्रांती उठाव शमविण्यात आला. 

नोव्हेंबर ७ (२५ ऑक्टोबर रशियायी पंचांग) रोजी लेनिन व ट्रॉटस्की यांनी राज्यसत्ताहरण केले आणि जर्मनीबरोबर शांततेची बोलणी सुरू केली. 

डिसेंबर १५ रोजी ब्रेस्त-लिटॉफ्स्क (ब्रेस्त) येथे जर्मनी व बोल्शेव्हिक रशिया यांनी युद्धविराम करारावर सह्या केल्या. दोस्तराष्ट्रांच्या युतीमधून रशिया कायमचे बाहेर पडले. 

बाल्कन आघाडी : (१९१७). महत्त्वाच्या घटना म्हणजे १२ जून १९१७ रोजी जर्मनधार्जिणा राजा कॉन्स्टंटीनला राजत्याग करावा लागून त्याची दोस्तधार्जिणा अलेक्झांडरने घेतली व मध्यवर्ती राष्ट्रतटाविरूद्ध त्याने युद्ध पुकारले (२७ जून १९१७).

डिसेंबरमध्ये झॉर्झ क्लेमांसो हा फ्रान्सचा नवा पंतप्रधान झाला. याशिवाय फारशा महत्त्वाच्या घडामोडी झाल्या नाहीत. 

पॅलेस्टाइन व मेसोपोटेमिया : (१९१७). जानेवारी ते डिसेंबर १९१७ या कालात ब्रिटिश सैन्याने ॲल-ॲरीश ते आलेप्पोपर्यंत मजलमारली (९ डिसेंबर). या मजलीत हिंदी घोडदळाने (२१,०००) व पायदळाने (५७,०००) मोठा पराक्रम गाजविला. लॉर्ड ॲल्नेबीच्या सैन्यात तिसरी लाहोर, सातवी मीरत व सातवी हिंदी डिव्हिजन अशा तीन डिव्हिजन होत्या. 

मेसोपोटेमियात ११ मार्च १९१७ रोजी ब्रिटिश हिंदी सैन्याने बगदाद काबीज केले. सप्टेंबरअखेर ते मोसूल तेलखाणींच्या गावापर्यंत पोहोचले. 

मेसोपोटेमिया आणि पॅलेस्टाइन येथील १९१७ च्या लढायांत मेजर व्हीलर (गुरखा), सैनिक करणबहाद्दूर राणा (गुरखा) यांना व्हिक्टोरिया कॉस मिळाले. रशियाच्या क्रंतीमुळे इराणमधील आघाडी थंडावली. 


सागरी आघाडी : (१९१७). जर्मनीने फेब्रुवारीमध्ये अनिर्बंध पाणबुडीहल्ला-तंत्रच सर्रास वापरण्याचे ठरविले. अमेरिकेचा हस्तक्षेप जरी झाला तरी अमेरिकेला युद्धावर प्रभाव पाडण्यास पुढील २-३ वर्षे लागतील आणि त्या अवधीत भूप्रदेशी व सागरी लढायांत (पाणबुडी) मध्यवर्ती राष्ट्रे नक्कीच विजय मिळवतील, असा जर्मन नेत्यांचा विश्वास होता. तसे घडण्याचा संभव दिसू लागला. ब्रिटिश व तटस्थ राष्ट्रांचे नाविक जहाजावर जाण्याचे टाळू लागले. पाणबुड्या बुडविण्यासाठी युद्धनौका उपलब्ध करून देणे ब्रिटिश नौसेनापतीला कठीण झाले. काफिला तंत्र फायदेशीर होणार नाही म्हणून ते अंमलात आणण्यास ब्रिटिश नाविक उच्चकार्यालयाने नकार दिला. जुलै १९१७ पर्यंत ब्रिटनमधील अन्नधान्य व इतर कच्चा माल संपुष्टात येईल असे अंदाज होते. एप्रिलपर्यंत दर महिन्याला एकूण ८३/४लक्ष टन वजनांची जहाजे जर्मन पाणबुड्यांनी बुडविली. 

शेवटी मे महिन्यापासून पंतप्रधान लॉइड जॉर्जचे काफिला-तंत्र वापरण्यास सुरूवात झाली. वर्षाअखेरपर्यंत नौकानाश जरी वाढला, तरी नवीन जहाजबांधणीमुळे नाशाची तीव्रता कमी झाली. जर्मन पाणबुड्यांचेही हानीचे प्रमाण वाढले. काफिला-तंत्रामुळेच ब्रिटन जिवंत राहिले हे सिद्ध झाले. 

इतरत्र इंग्लिश खाडी, एड्रिॲटिक समुद्र आणि हेल्गोलँड येथे जर्मन व ब्रिटिश यांमध्ये सागरी चकमकी उडाल्या. 

युद्धपरिस्थिती व कारवाया : (१९१८). मध्यपूर्व व मेसोपोटेमिया आघाडी वगळता १९१८ च्या आरंभी दोस्तराष्ट्रांची उद्दीष्टे साध्य झाली नव्हती. रशियाच्या क्रांतीमुळे व जर्मन−रशिया यांमधील युद्धविरामामुळे जर्मनीला तेथील सैन्य इतरत्र आणण्यास मोकळीक मिळाली. जर्मन पाणबुड्यांचे भय कमी झाले नव्हते. सेनासज्जता होऊन यूरोपात सैन्य पाठविण्यास अमेरिकेला आणखी काही महिने लागणार होते. म्हणून ब्रिटन व फ्रान्स यांना संरक्षणात्मक तंत्र वापरणे भाग पडले. हेगला आणखी कुमक पाठविण्यास लॉइड जॉर्जने मनाई केली. 

मध्यवर्ती राष्ट्रांचीही स्थिती समाधानकारक नव्हती. ब्रिटिश नाकेबंदीचे दुष्परिणाम त्यांना तीव्रतेने जाणवू लागले होते. ऑस्ट्रियाचीदमछाक झाली होती. तुर्कस्तान व बल्गेरिया पराभवाच्या मार्गावर होते त्यामुळे युद्ध लढण्याची बहुतांश जबाबदारी जर्मनीवर पडली होती.  

अमेरिकेचा राष्ट्रपती वुड्रो विल्सन याने ८ जानेवारी १९१८ रोजी जगात शांतता प्रस्थापित करण्यासंबंधी एक १४ कलमी कार्यक्रम जाहीर केला. 

पश्चिम आघाडी : (१९१८). या वर्षात जर्मनीला निर्विवाद विजय मिळविण्यासाठी पश्चिम आघाडीवर लढायांत दोस्तांवर मात करणे आवश्यक होते. विशेषतः अमेरिकन सैन्य रणांगणावर येण्यापूर्वी मात केली पाहिजे, अशी लूडेन्डोर्फची खात्री झाली. या दृष्टीनेलूडेन्डोर्फने जर्मन सैन्याला तयार केले. पॅरिसला वाचविण्यावर फ्रेंचांचा, तर इंग्लिश खाडीवरील बंदराकडे जाणारा मार्ग अबाधित ठेवण्यावर ब्रिटिशांचा भर होता. दोस्तांच्या या परस्परविरोधी उद्दिष्टांचा फायदा उठविण्याच्या दृष्टीने फ्रेंच व ब्रिटिश यांच्या सैन्य-आघाडीत पाचर मारून ब्रिटिशांचा निकाल लावण्याची संग्राम-योजना लूडेन्डोर्फने पक्की केली. हिंडेनबुर्खने त्यास होकार दिला. 

सों चढाई : (२१ मार्च−५ एप्रिल १९१८). जर्मनांनी २१ मार्च रोजी ६,००० तोफांच्या भडिमाराने ही चढाई सुरू केली. पॅरिसकडील सों नदीच्या पूर्वेला व मार्न नदीच्या उत्तरेला असलेल्या ब्रिटिश फळीच्या उजव्या बगलेवर ऊत्येंच्या अठराव्या जर्मन सेनेने जोरदार धडाका दिला. पाचव्या ब्रिटिश सेनेने माघार घेतली. या माघारीमुळे मार्न नदीवरील फ्रेंच सेना व पाचव्या सेनेच्या डाव्या बगलेवरील ब्रिटिश तिसरी सेना यांच्यामध्ये विस्तीर्ण फट पडून ब्रिटिशांची फळी फ्रेंचांपासून दूर गेली. ऊर्त्येने पॅरिसकडे मोर्चा वळविला. २३ मार्च−७ ऑगस्टपर्यंत जर्मनांच्या ‘बिग बर्था ऊर्फ पॅरिस तोफा’ या प्रचंड तोफांनी पॅरिसच्या उत्तरेकडून पॅरिसवर २५ किमी. पल्ल्यावरून भडिमार सुरू केला. त्यात ८७६ फ्रेंच नागरिक ठार झाले,तथापि युद्धावर काही परिणाम झाला नाही. जर्मनांच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे फ्रेंच नागरिकांचे मनोधैर्य खचले. फॉश किंवा दुसऱ्या कोणत्याही फ्रेंच सेनापतीला ब्रिटिश आणि फ्रेंच युद्धकार्यात समन्वय साधण्यासाठी उच्च सेनापती करण्याची विनंती ब्रिटिश युद्ध मंत्र्याला हेगने केली. २६ मार्च रोजी फॉशला दोस्त सैन्याचे उच्च सेनापतिपद देण्यात आले. दोस्तांच्या सुदैवाने आघाडीत ६५ किमी. खोल पाचर मारल्यानंतर जर्मनांची आगेकूच मंदावली. फॉशने भगदाडासमोर राखीव सैन्य उभे करून आघाडी एकसंघ केली. जर्मनांनी सोंची चढाई थांबविली. दोस्त व जर्मन यांची हानी समसमान झाली (एकूण ३ लक्ष ३ हजार सैनिक) तथापि लूडेन्डोर्फने मुद्दाम तयार केलेल्या ऊत्येंच्या ‘घुसखोर व धडाकेबाज’ सैन्याची हानी मात्र फारच झाली. 


जर्मन−खंदकाचे दृश्य, १९१८.या चढाईचे निष्कर्ष असे : (१) संपूर्ण दोस्त युद्धकार्याचा सुसूत्र समन्वय करण्यासाठी एकमेव अशा उच्च सेनापतीची नियुक्ती  जर युद्धारंभी घडली असती, तर कदाचित युद्ध यापूर्वीच आटोपले असते (२) चढाईचा आरंभ करणे सोपे असले तरी, चढाईचा वेग अखंडित ठेवण्यासाठी चढाई सैन्याला, रसदपुरवठा सारखा झाला पाहिजे तरच यश मिळते. ज्या प्रदेशावर पुन्हा चढाई करावयाची असेल, त्या प्रदेशाची माघार घेताना जाळपोळ करणे वा विध्वंस           करणे लाभदायक ठरत नाही. गतिमान सैन्याला अशा प्रदेशात वेगाने चढाई करता येत नाही. गतिमान सैन्याच्या आगेकूचीबरोबर त्याच्या साहाय्यासाठी, गतिमान तोफखाना, उखळी तोफा व मशीनगन पुरविणे अत्यावश्याक असते, हे धडे जर्मन व दोस्त सेनाधिकारी शिकले. 

लूडेन्डोर्फने ९ एप्रिल ते १७ जुलै १९१८ या चार महिन्यांत (१) लीस, (२) एन्, (३) कँटीन्यी, (४) शॅटो टीअरी व बेलोवुड, (५) न्वायों-मोंदीद्ये व (६) शँपेन-मार्न या नावांनी विख्यात असलेल्या सहा चढाया केल्या. त्या निष्फळ ठरल्या. पाच लक्षांवर जर्मनांचे व त्याहून थोडे अधिक दोस्तांचे सैनिक निकामी झाले. अमेरिकेने पश्चिम आघाडीवर दर महिन्याला ३ लक्ष सैनिक पाठविण्यास सुरूवात केली. त्यांचा प्रमुख जनरल ⇨पर्शि हा होता. दोस्त सैन्यांच्या लढाऊ विमानांनी बाँबवर्षाव करून जर्मन सैन्याचे दळणवळण मार्ग व रसदपुरवठा व्यवस्था विस्कळित केल्याने लूडेन्डोर्फला चढाई थांबवावी लागली. 

दोस्तराष्ट्रांच्या सैन्याची प्रतिचढाई : १८ जुलै−३१ ऑगस्ट १९१८ या काळात दोस्तांनी ‘एन्-मार्न’ नावाची प्रतिचढाई केली. ही प्रतिचढाई मार्नची दुसरी लढाई म्हणून गाजली. महायुद्धाचे हे अखेरचे पर्व जर्मनीच्या दृष्टीने कृष्णपर्व ठरले. या चढाईत रणगाडा हे निर्णयात्मक शस्त्र ठरले. रणगाड्यांचा तोफमारा जरी मर्यादित होता आणि जर्मन रणांगणीय तोफांच्या माऱ्यात त्यांची झटपट वाताहात झाली, तरी त्यांच्या अस्तित्वामुळे जर्मन सैनिकांचे मनोधैर्य ढासळले. मायदेशात कुटुंबाची उपासमार होत असल्याचे कळून व मागील सर्व चढाया, मोठे बलिदान देऊनही निष्फळ झाल्यामुळे जर्मन सैन्याचे मन युद्धांवरून उडू लागले. दोस्तांच्या या प्रतिचढाईत जर्मनांना हिंडेनबुर्ख संरक्षणफळीपर्यंत पीछेहाट करावी लागली. 

पश्चिम आघाडीवरील दोस्तांचा विजय : ऑगस्टच्या शेवटी युद्ध थांबवावे असे लूडेन्डोर्फ म्हणू लागला. फॉशने महायुद्धाची अंतिम द्विमुखी चढाई पुढीलप्रमाणे आखली : (१) फ्रेंच−अमेरिकी संयुक्त सेनांनी मेझ्येर या गावाकडे, व्हर्डनकडून हल्ला चढविणे (मेझ्येर येथे रेल्वेजंक्शन असून ते जर्मनांचे रसद पुरवठा केंद्र होते) व (२) ब्रिटिश सैन्याने पेरॉ व लांस यांमधून ओन्वाचे रेल्वेजंक्शन काबीज करणे. 

वरील दोन रेल्वेजंक्शन घेतल्यास पश्चिम आघाडीकडे जर्मन सैन्याला रसद व दारूगोळापुरवठा पोहोचविणे बंद पडणार होते. बेल्जियमच्या फ्लँडर्स प्रांतावर आक्रमण करण्याची जबाबदारी ब्रिटिश, बेल्जियम व फ्रेंच सैन्यावर टाकण्यात आली. अमेरिकी कर्नल विल्यम मीशेलच्या नेतृत्वाखाली दोस्त राष्ट्रांची वायुसेना (५०० विमाने) फॉशच्या अंतीम चढाईच्या दिमतीला देण्यात आली. [⟶वायुसेना]. द्विमुखी चढाईपुढे जर्मन सेनेचा टिकाव लागला नाही. ६ ऑक्टोबर १९१८ पासून जर्मनांनी वुड्रो विल्सनकडे युद्धविरामाची विनंती केली. युद्धविरामाच्या अटी वुड्रो विल्सनच्या १४ कलमांवर आधारभूत असाव्यात, असे जर्मनीच्या चान्सेलर राजपुत्र माक्सने सुचविले, अमेरिका व दोस्तराष्ट्रे जर्मनीच्या सैनिकी हुकूमशाहीशी बोलणी करणार नाही असे विल्सनने जाहीर केले. २९ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर १९१८ मध्ये जर्मन नौसेनेने बंड केले. जर्मनीत अंदाधुंदी पसरली. नव्या समाजवादी सरकारने राज्यसत्ता ताब्यात घेऊन जर्मनीचे प्रजासत्ताक राज्य जाहीर केले. १० नोव्हेंबर १९१८ रोजी कैसर विल्यम हॉलंडला पळून गेला. ७ ते ११ नोव्हेंबर युद्धविरामाची बोलणी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता संपून करारावर सह्या झाल्या. युद्धविरामाच्या तरतुदी म्हणजे जर्मनीची शरणागतीच होय. करारातील अटी पुढीलप्रमाणे होत्या : (१) ॲल्सेस−लॉरेन धरून जर्मनांनी व्यापलेल्या सर्व प्रदेशांतून ताबडतोब जर्मन सैन्य काढून घ्यावे (२) सर्व रणसामग्री दोस्तांच्या ताब्यात द्यावी (३) ऱ्हाईन नदीच्या पश्चिमेचा सर्व जर्मन प्रदेश आणि ऱ्हाईनवरील तीन पूल रिकामे करावे. हे संपूर्ण दोस्त राष्ट्रे व्यापतील (४) सर्व पाणबुड्या दोस्तांच्या हवाली कराव्या व जलपृष्ठ युद्धनौका दोस्तराष्ट्रे फर्मावतील त्याप्रमाणे बंदिस्त ठेवाव्या. ११ नोव्हेंबर १९१८ रोजी सकाळी युद्धशत्रुत्व स्थिती संपुष्टात येऊन तिची ताबडतोब अंमलबजावणी झाली. पुढे दोस्तराष्ट्रे व जर्मनी यांमध्ये शांतताप्रस्थापनाची बोलणी होऊन ⇨ व्हर्सायचा तह झाला. 

यूरोपातील इतर आघाड्या : (१९१८). इटलीच्या आघाडीवर इटली व ऑस्ट्रिया यांच्यात चढाया व प्रतिचढाया झाल्या (१५ जून−३ नोव्हेंबर १९१८). ऑस्ट्रियाच्या मदतीला असलेले जर्मन सैन्य रशियाच्या पाडावानंतर लूडेन्डोर्फने काढून घेऊन ते पश्चिम आघाडीवर पाठवून दिले होते. ऑस्ट्रियाच्या दोन प्रमुख सेनापतींमध्ये समन्वय नव्हता. परिणामतः ऑस्ट्रियाचा पराभव झाला. ४ नोव्हेंबर १९१८ रोजी युद्धविराम होऊन युद्धशत्रुत्व स्थिती प्रस्थापित झाली. 


बाल्कन आघाडी : (१९१८). फ्रेंच आणि ब्रिटिश चढायांमुळे बल्गेरियाला युद्ध पुढे चालवणे अशक्य झाले (१५−२८ सप्टेंबर). बल्गेरियाने युद्धविरामाची मागणी केली. जर्मनीबरोबरच्या युद्धविरामाबरोबरच बाल्कन आघाडीवर युद्धविराम झाला व शत्रुत्व स्थिती रद्द झाली. 

पूर्व आघाडी : (१९१८). रशिया व जर्मनी यांच्यातील युद्ध जरी बंद झाले, तरी ब्रेस्त-लिटॉफ्स्क (ब्रेस्त) येथील तहांची बोलणी रेंगाळत होती. युद्धापूर्वी रशियाच्या अंकित असलेल्या पोलंड, फिनलंड, लॅटव्हिया, लिथ्युएनिया व युक्रेन या राष्ट्रांना संपूर्ण स्वायत्तता देण्याची अट जर्मनीने घातली होती. ही सर्व राष्ट्रे रशियाच्या बोल्शेव्हिक सत्तेविरूद्ध होती. ट्रॉटस्कीने तहातील अटी झिडकारून तहावर शिक्कामोर्तब करण्याचे नाकारले. ट्रॉटस्कीच्या ‘शांतता नाही, युद्धही नाही’ या धोरणास लेनिनने नाईलाजाने होकार दिला. रशियाच्या या आडमुठ्या धोरणामुळे जर्मनीने परत रशियात सैन्य घुसविले (१८ फेब्रुवारी १९१८). जर्मनीच्या आक्रमणामुळे रशियाच्या स्वातंत्र्याला व क्रांतीला धोका निर्माण झाला. रशियाची लाल सेना लढण्यास असमर्थ होती. जर्मन सेनेने युक्रेन प्रांतात ठाण मांडले. शेवटी बोल्शेव्हिक रशियाने तहावर सह्या केल्या. या तहामुळे रशियाला ३४ टक्के लोकसंख्या, ३२ टक्के शेतजमीन, ५४ टक्के उद्योग-धंदे आणि ८९ टक्के कोळसाखाणी या संपत्तीला मुकावे लागले. रशियाला या मानहानीकारक अटी अमान्य करता आल्या नाहीत तथापि दोस्तराष्ट्रे व जर्मनी यांच्यामधील ११ नोव्हेंबर १९१८ च्या युद्धविराम करारामुळेत्या रद्द झाल्या. 

मध्यपूर्व आघाडी व तुर्कांची शरणागती : (१९१८). मेसोपोटेमियात ११ मार्च १९१७ रोजी बगदाद घेतल्यानंतर ब्रिटिश-हिंदी सैन्याने उत्तरेकडे चढाई चालू ठेवली. या सैन्याने ऑक्टोबर १९१८ मध्ये ‘टायग्रिस’नावाची चढाई मोसूल व त्याच्या जवळच्या तेलखाणी घेण्याच्या उद्देशाने सुरू केली आणि १ नोव्हेंबर रोजी मोसूल व तेलाच्या खाणी त्यांनी जिंकल्या. तुर्कांबरोबर ३० ऑक्टोंबर रोजी युद्धविराम झाला होता, तरीही युद्धविरामाच्या अटी मोडून ब्रिटिशांनी मोसूल व्यापले. मेसोपोटेमियाची मोहीम समाप्त झाली. या मोहिमेत सु. ८०,००० ब्रिटिश-हिंदी सैनिक कामास आले. त्यांपैकी १५,८१४ ठार व १२,८०७ रोगराईने मृत्यू पावले. त्यांत बहुसंख्य हिंदी सैनिक होते. याचे पडसाद इंडियन नॅशनल काँग्रेसच्या तत्कालीन अधिवेशनात उमटले. 

पॅलेस्टाइन मोहीम : (१९१०). २२ फेब्रुवारी १९१८ रोजी ॲल्नेबीचे ब्रिटिश सैनिक, हिंदी सैन्य व लॉरेन्सच्या अरबी फौजा यांनी जेरूसलेम व्यापले. सप्टेंबरच्या आरंभी पूर्ण तयारी झाल्यानंतरॲल्नेबी व लॉरेन्स यांच्या सैन्यांनी हायफा (२३ सप्टेंबर), अग्मान (२५ सप्टेंबर), डेरा (२७ सप्टेंबर) व दमास्कस (१ऑक्टोबर) ही महत्त्वाची गावे जिंकली. ७ ऑक्टोबर रोजी फ्रेंचांनी वेरूत जिंकले. याच सुमारास मेसोपोटेमियात तुर्कांची पीछेहाट चालू होती. अखेरीस २५ ऑक्टोबर रोजी ॲल्नेबीच्या सैन्याने आलेप्पो काबीज केले. ३० ऑक्टोबर १९१८ रोजी तुर्कानी युद्धविराम पतकरला. जर्मनांनी युद्धविराम मागण्यांच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे त्याचे मित्रराष्ट्र जे तुर्कस्तान याचा युद्धातील पराभव हे होते. 

जर्मनीच्या वसाहतीवरील मोहीम : (१९१४−१८). आफ्रिका आघाडी. मागील युद्धघटनांच्या वर्णनात आफ्रिकेतील मोहिमांचा उल्लेख केला नव्हता. १९१४ ते १९१८ या काळातील मोहिमांचा आढावा पुढीलप्रमाणे आहे. पार्श्वभूमी : १८८० पासून ते १९१४ सालापर्यंत यूरोपीय राष्ट्रांनी आफ्रिका लुबाडण्याचे काम पुरे केले व तेथे वसाहती स्थापन केल्या. ही यूरोपीय राष्ट्रे पुढीलप्रमाणे होती : (१) फ्रान्स, (२) इटली, (३) पोर्तुगाल, (४) बेल्जियम, (५) स्पेन आणि आफ्रिकेतील मुलूख. यातील सिंहाचा वाटा ब्रिटिशांनी पटकावला. लुबाडण्याच्या कामात जर्मनी उशिराने सामील झाले. १९१४ सालापर्यंत कॅमेरून, टोगोलँड, नैर्ऋत्य आफ्रिका (नामिबिया), टांगानिका, रूआंडा व उरूंडी या प्रदेशांत जर्मनांनी वसाहती स्थापल्या. फक्त लायबीरीया व ॲबिसिनिया स्वतंत्र राहिले. 

जर्मन पूर्व आफ्रिका (रूआंडा व ऊरूंडी) येथील मोहिमेचा आरंभ नोव्हेंबर १९१४ रोजी केलीमाने येथील हिंदी सैन्याच्या पदार्पणाने झाला. पूर्व आफ्रिका जर्मन वसाहतीच्या संरक्षणाचे काम जनरल पॉल फोन लेटो-फोरबेक व त्याच्या ४,००० जर्मन आणि १२,००० तद्देशीय लोकांच्या (अस्करी) सैन्याकडे होते. बाहेरून मदत येण्याचे मार्ग बंद असताही, फोरबेकने गमिनी युद्धतंत्र व मैदानी लढाया करून दोस्त सैन्याला १९१८ च्या युद्धविरामापर्यंत दाद दिली नाही. त्याच्याविरूद्ध जनरल स्मट्सला हार खावी लागली होती. व्हर्साय तहाच्या अटीमुळे जर्मनीला आफ्रिकेतील सर्व वसाहतींना मुकावे लागले. येथेही आफ्रिकी देशियांना स्वयंनिर्णयाचा हक्क दिला नाही. उलट तेथे ब्रिटिश व फ्रेंच साम्राज्यांचा विस्तार झाला. 

चीन व पॅसिफिक महासागर यांतील जर्मन वसाहती : (१९१४−१९). यूरोपमध्ये जर्मनी, ब्रिटिश व अमेरिका युद्धात गुंतल्यामुळे त्या संधीचा फायदा जपानने घेतला. ऑक्टोबर १९१४ मध्ये मध्यवर्ती राष्ट्रतटाविरूद्ध जपानने युद्ध पुकारले आणि चीन व दक्षिण पॅसिफिक महासागर येथील सर्व वसाहती बळकावण्यास प्रारंभ केला. चीनमधील जर्मनी-नियंत्रित त्सिंगटाव बंदर आणि कोळसा खाणीचा समृद्ध शँटुंग प्रांत जपानने चढाई करून बळकावला. जर्मनी व जपान यांच्यातील हे युद्ध म्हणजे इतिहासातील एकमेव उदाहरण होय. पॅसिफिक महासागरातील जर्मनीची मार्शल, मेअरीॲना, पालाऊ आणि कॅरोलाइन हे द्वीपसमूह जपानने काबीज केले. ऑस्ट्रेलियाने न्यू गिनी व न्यूझीलंडने सामोआ द्वीपसमूह बळकावले. 


पॅरीस येथील शांतता परिषदेत (१९१९) जपानने नव्याने बळकावलेल्या प्रदेशातून त्याला घालवून देण्याच्या प्रयत्न झाला. या परिषदेत (१) चिनी प्रदेशातील जर्मन हक्क जपानला देण्यात आले. मार्शल, मेअरीॲना व उत्तरेकडील कॅरोलाइन द्वीपसमूह जपानकडे, (२) विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील सर्व जर्मन द्विप-वसाहती ऑस्ट्रेलियाकडे, (३) फॉस्फेटसमृद्ध नाउरू ब्रिटनकडे, (४) पश्चिम सामोआ न्यूझीलंडकडे व (५) पूर्व सामोआ अमेरिकेकडे, अशी चीन व पॅसिफिक महासागरातील जर्मन मुलखाची वाटणी होऊन तिला राष्ट्रसंघाची मान्यता मिळाली. या वाटणीमुळे पॅसिफिक सागरी प्रदेशात एकप्रमुख सत्ता म्हणून जपान प्रस्थापित झाले. वाटणी करताना तद्दशियांच्या स्वयंनिर्णय हक्काकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

दोस्त राष्ट्रे व मध्यवर्ती-राष्ट्रांमधील तह : जर्मनी : जर्मनीबरोबर व्हर्साय तह करण्यात आला. या तहातील अतिकडक अटी पाहून ब्रिटनचे आर्थिक सल्लागार जॉन मेनार्ड केन्स हे शांतता समितीच्या बैठकीतून उठून गेले. तत्कालिक विजयाच्या गर्वाने शेफारुन फ्रान्स व इटली हे देश जर्मनी व ऑस्ट्रिया यांचा पूर्णपणे नाश करण्यास उद्युक्त झाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. जर्मनी व ऑस्ट्रिया यांच्या नाशाने फ्रान्स व इटली आपलाच नाश ओढवून घेत आहेत, असे त्यांचे ठाम मत होते आणि ते पुढे खरेही ठरले. 

ऑस्ट्रिया−हंगेरी : ऑस्ट्रियाचा युद्धात पाडाव होत असतानाच,ऑस्ट्रिया−हंगेरी साम्राज्यातील राष्ट्रांनी आपले स्वातंत्र्य जाहीर केले. ऑस्ट्रिया व हंगेरी ही राष्ट्रे वेगळी होऊन त्यांनी प्रजासत्ताक राज्ये म्हणून घोषणा केली. कायदेशीर मान्यता देऊन वरील घडामोडी पक्क्या करावयाचे काम शांतता परिषदेकडे आले. 

सें झेर्मेचा तह : (१९११). ऑस्ट्रियाची चिरफाड पुढीलप्रमाणे करण्यात आली : (१) बोहीमिया व मोरेव्हिया मुलूख नव्याने स्वतंत्र  झालेल्या चेकोस्लोव्हाकियाला देण्यात आला. (२) डाल्मेशिया, बॉझनिया, हेर्ट्सगोव्हीना, सर्बीया व माँटनीग्रो या सर्वांचे एक युगोस्लाव्हिया नावाचे नवे राष्ट्र बनविले गेले. (३) रुमानियाला बूकव्हीना देण्यात आला. (४) पुनर्घटित पोलंडला गॅलिशिया जोडून दिला. (५) दक्षिण टॉयरॉल, ट्रेंटन, एस्ट्रीआ आणि ट्रीएस्ट हे इटलीत सामील करण्यात आले. हंगेरीबरोबरचा त्रीआनों हा तह १९२० सालापर्यंत पक्का झाला नाही. कम्युनिस्टांनी बेलॉ कुनच्या नेतृत्वाखाली काही काळ कम्युनिस्ट शासन केल्यामुळे हंगेरीतील परिस्थिती काही काळ अस्थिर होती. हंगेरीची चिरफाड पुढीलप्रमाणे झाली व रुथीनीया मुलूख चेकोस्लोव्हाकियाला, क्रोशिया व स्लोव्हीनीया युगोस्लाव्हियाला आणि ट्रान्सिल्व्हेनिया व बनात रुमानियायाला याप्रमाणे हंगेरीचे मुलूख वाटण्यात आले. व्हर्साय, सेंझेर्मे व त्रीआनों तहांमुळे, सूडेटलँड हा बहुसंख्य जर्मन प्रदेश चेकोस्लोव्हाकियाला आणि जर्मनीच्या पूर्वेकडील जर्मन प्रदेश पोलंड यांना देण्यात आल्यामुळे असंगती (अनामली) निर्माण झाली. या असंगतीचा फायदा पुढे हिटरने घेतला. ऑस्ट्रिया आणि हंगेरीवर या तहांचे आर्थिक दृष्ट्या दुष्परिणाम झाले. ऑस्ट्रियाला दीड कोटी लोकसंख्येला तसेच औद्योगिक संपत्तीला मुकावे लागले. पुढे ऑस्ट्रियाला राष्ट्रसंघाकडून सतत आर्थिक साहाय्य घ्यावे लागले. हंगेरीची अवस्था ऑस्ट्रियाप्रमाणेच झाली. मध्य यूरोप व बाल्कन प्रदेशातील नव्या राष्ट्रांनी नव्याने अमलात आणलेल्या जकात (टॅरिफ) नीतीमुळे व्यापार करणे कठीण झाले. आर्थिक दृष्टिकोनातून−ऑस्ट्रिया आणि जर्मनी यांचे एक संयुक्त राष्ट्र करणे योग्य झाले असते पण राजकीय व सैनिकी दृष्ट्या फ्रान्सला ते पटले नसते. 

सेव्हराचा तह : (१९२०). दोस्त राष्ट्रे आणि तुर्कस्तान यांच्या मध्ये हा तह झाला. पूर्व थ्रेस, इजीअन समुद्रातील बरीच बेटे व स्मर्ना हे ग्रीसला आणि अडालीया व रोड्झ बेटे इटलीली देण्यात आली. दार्दानेल्सची सामुद्रधुनी सर्वांना खुली करण्यात आली. सिरिया प्रांत फ्रेंचांकडे आणि पॅलेस्टाइन, इराक आणि ट्रान्सजॉर्डन हा मुलूख ब्रिटनकडे महादेशकीय (मँडेटरी) तत्त्वावर ठेवण्यात आला. वरील मोठा मुलूख विशेषतः स्मर्ना यास मुकावे लागल्याबद्दल तुर्की जनमत क्षुब्ध झाले. स्मर्नाच्या बाबतीत स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाला डावलले होते. तुर्कांनी तहनामा झिडकारला. मुस्तफा केमालपाशाच्या नेतृत्वाखाली तुर्कांनी ग्रीकांना स्मर्नातून हाकलले. पुढे १९२२ सालच्या लोझॅन तहान्वये, कॉन्स्टँटिनोपल धरुन पूर्व-थ्रेस व स्मर्नातुर्कस्तानला परत देण्यात आले. पॅरिस शांतता परिषदेच्या निर्णयांना आव्हान देणारे तुर्कस्तान हे पहिलेच राष्ट्र होय. सिरिया, इराक, पॅलेस्टाइन व ट्रान्सजॉर्डन हे अरबी मुलूख तुर्कापासून मुक्त होण्यासाठी लढले पण त्यांना ब्रिटन व फ्रान्सच्या शासनाखाली ठेवले. दोस्त राष्ट्रे येवढे करूनही न थांबता, पॅलेस्टाइनमध्ये ज्यू लोकांचे ‘राष्ट्रीय घर’(नॅशनल होम) स्थापण्याची घोषणा ब्रिटनच्या बॅल्फुरने केली (नोव्हेंबर १९१७). यामुळे सर्व अरब लोक संतापले. १९१७ पासून पॅलेस्टाइन (इझ्राएलधरुन) ही एक मोठी राजकीय समस्या झाली. बल्गेरियाला नयीच्या तहामुळे (१९१९) पूर्व सलॉनिकचा प्रदेश व इजीअन समुद्रावरील किनारी प्रदेश ग्रीसला द्यावा लागला. या तहामुळे सुमारे दहा लक्ष बल्गार परकीय अंमलाखाली गेले. 

या वेगवेगळ्या तहांमुळे कोणीही संतुष्ट झाले नाही. तहांच्या बाजूची व तहांच्या विरुद्ध बाजूची राष्ट्रे अशी यूरोपात दुफळी निर्माण झाली. राष्ट्रसंघात सामील होण्याचे अमेरिकेने नाकारले. 

रशियायी यादवी युद्ध : (१९१८−२१). पहिल्या महायुद्धाचा परिपाक म्हणजे रशियातील यादवी युद्ध होय. मार्च १९१७ मध्ये झारशाही संपली व लेनिनच्या नेतृत्वाखाली रशियावर मार्क्सवादाधिष्ठित बोल्शेव्हिक क्रांतिवादी सत्ता आली तथापि तिला दृढ होण्यास आणखी काही काळ पाहिजे होता. बोल्शेव्हिकांनी युद्ध थांबविले. ब्रेस्त-लिटॉफ्स्क (ब्रेस्त)चा तह जर्मनीबरोबर करण्यात आला (मार्च १९१८). जर्मनीचा वरचष्मा असल्याने रशियावर अतिकडक अटी लादण्यात आल्या. स्वार्थ साधण्यासाठी जर्मनीने या अटी लादल्या होत्या. या अटींमुळे आपला २० टक्के कोळसा व लोखंडी खाणी असलेला भूप्रदेश आणि २५ टक्के लोकसंख्या रशियाला गमावणे भाग पडले. पूर्व यूरोपात जर्मनीचे धुरीणत्व प्रस्थापित होणार होते. याशिवाय ३०० कोटी रुबल इतकी युद्धखंडणी जर्मनीला द्यावयाची होती. लेनिनला असा शिक्षावजा तह नको होता.


व्हर्सायच्या तहाच्या कडक अटींविरुद्ध निषेध करताना जर्मनीला ब्रेस्त-लिटॉफ्स्क (ब्रेस्त) तहाच्या अटींचा लाभ मिळाला नाही. पॅरिसच्या शांतता परिषदेतही बोल्शेव्हिक रशियाला स्थान न मिळाल्याने, त्याला गेलेला भूप्रदेश परत मिळविणे अशक्य झाले. शांतता परिषद सुरू होण्यापूर्वीच फिनलंड, एस्टोनिया व लॅटव्हिया या बाल्टिक राष्ट्रांनी स्वातंत्याची घोषणा केली. शांतता परिषदेने वरील राष्ट्रांना स्वयंनिर्णयाचे तत्त्व लागू केले व त्यांना स्वतंत्र राष्ट्रे म्हणून, तसेच रुमानियातील बेसारेबीयाच्या अपहरणकृत्यालाही मान्यता दिली. हे सर्व पाहून ‘क्रांतीसाठी थोडा काळ मिळावा म्हणून रशियाला मोठा भूप्रदेश गमवावा लागला’, असे उद्गगार लेनिनने काढले. जर्मनीच्या पराभवानंतर रशियाने ब्रेस्त-लिटॉफ्स्क (ब्रेस्त) तह झिडकारला. या सर्व घटनांमुळे पूर्व यूरोपात सत्तापोकळी निर्माण झाली. बोल्शेव्हिकांनी सैनिकी संख्येत घट केल्याने रशियाची संरक्षणशक्ती दुर्बल झाली होती. रशियांतर्गत, झारशाहीवादी व समाजवादविरोधी यांनी वरील अस्थिरतेचा लाभ उठविण्याचे ठरविले. दोस्त राष्ट्रे व जर्मनी यांनीही त्यांना साहाय्य करण्याचे ठरविले. १९१८ च्या उन्हाळ्यात समारा, ऑम्स्क व आर्केजल येथे ‘श्वेत रशिया’ शासने स्थापल्याचे जाहीर करण्यात आले. कोसक जमातींनी उठाव केला. उरल पर्वताच्या पूर्वेकडील सायबीरियात श्वेत रशियायी व झारनिष्ठ ॲड्मिरल कॉलचाकने तेथील चेक युद्धबंद्यांच्या मदतीने बंड केले. त्यांनी जून १९१८ मध्ये पूर्व रशियावर आक्रमणास सुरूवात केली. ब्रिटन, फ्रान्स व जपान यांनी कॉलचाकला साहाय्य दिले. ट्रॉटस्कीच्या ‘लाल सैन्याने’ प्रतिहल्ले करून कॉलचाकचा बीमोड केला. चेक व बोहेमियांनी लाल सैन्याला दाद न देता, व्हलॅडिव्हस्टॉक बंदरापर्यंत माघार घेतली.तेथे या अगोदर ३० डिसेंबर १९१७ रोजी जपानी आरमाराने व्हलॅडिव्हस्टॉक काबीज केले होते त्यामुळे अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स हादरुन गेले. ऑगस्ट १९१८ मध्ये व्हलॅडिव्हस्टॉक येथे अमेरिकी सैन्य उतरले. या सैन्याने व्हलॅडिव्हस्टॉक ते बैकलसरोवरापर्यंतच्या रेल्वेवर पहारा प्रस्थापित केला. जपान तसेच, कॉलचाकचे सैन्य व लाल सैन्याविरूद्ध अमेरिकी सैन्याने संघर्ष टाळले. कॉलचाकचे सैन्य व लाल सैन्याविरूद्ध अमेरिकी सैन्याने संघर्ष टाळले. कॉलचाकचा बीमोड झाल्यावर अमेरिकेने चेक सैन्याची सुटका केली व अमेरिकी सैन्य मायदेशी परतले. २५ ऑक्टोबर १९२२ रोजी व्हलॅडिव्हस्टॉक जपानने सोडले असल्याचे सिद्ध झाले. रशियायींना (श्वेत रशियायींना) व कोसक जमातींना मदत देण्यासाठी ब्रिटिश व फ्रेंच आरमारांनी मुरमास्कआर्केजल या समुद्रांतील आणि ओडेसा, सींफ्यिरॉयल, नोव्होरोसिस्क, मायकॉप व बाटूम या काळ्या समुद्राच्या उत्तर व पूर्व किनाऱ्यावरील बंदरांवर हल्ले केले (२३ जून−३१ ऑगस्ट १९२८). १९२० च्या उन्हाळ्यापर्यंत ट्रॉटस्कीच्या नेतृत्वाखाली लाल सेनेने ही सर्व आक्रमणे व झारशाहीवादी उठाव यांचा पाडाव केला. लाल सेना ही एक ध्येयप्रेरित व करारी सेना असल्याचे सिद्ध झाले. 

रशियांतर्गत झालेले उठाव हे सरदार, जमीनदार व लोकसत्ताक सम्राजशाहीविरोधी वर्गाने केले होते. त्यांच्याविरुद्ध शेतकरी. कामगार आणि झारशाहीत पिळके गेलेल्या वर्गांनी तलवार उपसली. म्हणून रशियातील यादवी युद्धाचे वास्तविक स्वरूप वर्गयुक्त असे होते. युक्रेनियी व श्वेत रशियायी−बेलोरशिया हे वांशिकदृष्ट्या इतर रशियायी लोकांपेक्षा वेगळे समजले जातात. त्यांचा लढा राष्ट्रवादाधिष्ठित होता असे म्हटले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर युक्रेनिया व बेलोरशिया यांना राष्ट्रसंघात विशिष्ट स्थान देण्यात आले हे लक्षणीय आहे. 

फिनलंड व बाल्टिक राष्ट्रे : फिनलंडने ६ डिसेंबर १९१७ रोजी रशियाची सत्ता झुगारुन, स्वातंत्र्यघोषणा केली व जनरल ⇨कार्ल मानेरहेमला सेनापती केले. तेव्हा रशियाच्या लाल सैन्याशी मोठ्या पराकाष्ठेचा मुकाबला करून मानेरहेमने त्याचा अति दारुण पराभव केला. अखेरीस १४ ऑक्टोबर १९२० रोजी डॉपर्ट येथे तह होऊन, बोल्शेव्हिक रशियाने फिनलंडचे स्वातंत्र्य मान्य केले. 

एस्टोनिया : (१९१७ – १८). जर्मनी व बोल्शेव्हिक रशिया या दोघांनी एस्टोनिया व्यापला होता, पण ब्रेस्त-लिटॉफ्स्कच्या (ब्रेस्त) तहानंतर रशिया तेथून बाहेर पडले. जर्मनीने ११ नोव्हेंबर १९१८ रोजी एस्टोनिया सोडल्यानंतर रशियाने त्यावर आक्रमण केले. श्वेत रशियायी व बोल्शेव्हिक विरोधी जनरल न्यिकलाय युद्येन्यिच याचे आणि एस्टोनिया सैन्य यांनी पेट्रोग्राड (लेनिनग्राड) पर्यंत मजल मारली तथापि ट्रॉटस्कीने लाल सेना व कामगारसेना घेऊन, युद्येन्यिचला माघार घेण्यास भाग पाडले. डॉर्पाटच्या तहान्वये (२ फेब्रुवारी १९२०) रशियाने एस्टोनियाचे स्वातंत्र्य मान्य केले. 

लिथ्युएनिया : (१९१८−२३). झारशाहीत रशियाच्या अंकित असलेल्या लॅटव्हियाने १६ फेब्रुवारी १९१८ रोजी स्वातंत्र्यघोषणा केली होती. लगेच रशियाने त्यावर आक्रमण केले. जर्मनीने आक्रमण परतवून लावले. ११ नोव्हेंबरनंतर जर्मन सैन्य निघून गेल्यानंतर बोल्शेव्हिक रशियाने परत आक्रमण करून व्हिल्ना काबीज केले. पोलंडचा हस्तक्षेप आणि पोलंड-रशिया यांच्यातील युद्ध पेटल्यामुळे रशियाला मॉस्को तहान्वये (१२ जुलै १९२०) लिथ्युएनियाचे स्वातंत्र्य मान्य करावे लागले. 

पोलंड : (१९१४−२५), १६ ऑगस्ट १९१४ रोजी झारशाहीच्या विरुद्ध असलेला पोलिश देशभक्त मार्शल पिलसूतस्की याने मध्यवर्ती राष्ट्रगटातर्फे रशियाविरुद्ध लढा पुकारला. ३० मार्च १९१७ रोजी झारच्या रशियाने पोलंडचे स्वातंत्र्य मान्य केले. नोव्हेंबर १९१९ मध्ये पोलंडमधील युक्रेनियी अल्पसंख्याकांनी पश्चिम युक्रेनियालोकसत्ताक पुकारले व सहा महिने लढा दिला तथापि त्यांचा पराभव झाला व पोलंड अखंडित राहिला. डिसेंबर १९१८ ते फेब्रुवारी १९१९ या काळात पोलंडविरुद्ध जर्मनी आणि पोलंडविरुद्ध चेकोस्लोव्हाकिया असे संघर्ष झाले, तथापि दोस्तराष्ट्रांनी हस्तक्षेप करून ते मिटविले. जानेवारी १९१९ ते २४ जून १९२१ या कालात पोलंड व बोल्शेव्हिक रशिया यांच्यात लढाया झाल्या. दोस्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने संघर्ष मिटविला गेला. 


मध्यवर्ती राष्ट्रतटाच्या पराभवाची कारणे : (१) श्लीफेन योजना ढासळ्यानंतर दोन आघाड्यांवर एकाच वेळी युद्ध करणे कठीण झाले. काही आठवड्यांतच फ्रान्स आणि ब्रिटनवर झटपट मात करणे अशक्य होऊन जर्मनीला न परवडणारे व दमछाकीचे युद्ध करावे लागले. (२) अविरत सैनिकहानीचा ताण जर्मनीला असह्य झाला. (३) ब्रिटनने केलेल्या नाकेबंदीमुळे जर्मन जनतेची उपासमार व उपासमारीमुळे सैनिकांत उद्भवलेला असंतोष. (४) ब्रिटिशांच्या ⇨मानसशास्त्रीय युद्धतंत्रामुळे जर्मन जनतेचे तसेच सैनिकांचे मनोधैर्य टिकले नाही. (५) जर्मन पाणबुडीच्या अनिर्बंध हल्ल्याचा परिणाम काफिलातंत्रामुळे निष्फळ ठरला, उलट अमेरिकेसारखे सुसंपन्न व औद्योगिक दृष्ट्या पुढारलेले राष्ट्र जर्मनीचे शत्रू बनले. (६) जर्मनीच्या बाजूची राष्ट्रे कमजोर व अकार्यक्षम असल्याने त्यांना मदतीसाठी जर्मन सैन्य देणे भाग पडले. (७) ब्रिटनला हिंदुस्थानचे मनुष्यबळ व कच्चा माल (उदा., ज्यूट, धान्य इ.) उपलब्ध होता. भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील (पूर्व आफ्रिकाधरुन) कारवायात बहुतांश हिंदी सैनिक होते. (८) दोस्त राष्ट्रांचे राजकीय नेते-लॉइड जॉर्ज आणि क्लेमांसो मध्यवर्तीराष्ट्रांच्या राजकीय नेत्यांपेक्षा अधिक कर्तृत्ववान असावेत. मध्यवर्ती राष्ट्रांचे नेते हे बहुतेक सैनिकी परंपरेत वाढलेले असल्याने त्यांना युद्ध व राजकारण यांतील अद्वैत उमगले नाही, विशेषतः जर्मन सैनिकी नेत्यांना ⇨क्लाउझेव्हिट्सच्या युद्धाच्या तत्त्वज्ञानाचा विसर पडला किंवा त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी चुकीचा उपयोग केला. (९) युद्धासाठी जेव्हा अनेक राष्ट्रे युती करतात तेव्हा युद्धकार्यात समन्वय साधण्यासाठी एकच अत्युच्च सेनाधिपती असणे, हे तत्त्व दोस्तराष्ट्रे युद्धाच्या अखेरीस शिकले, तर मध्यवर्ती राष्ट्रांना ते माहीतही नव्हते असे वाटते. अत्युच्च युद्धसमितीबद्दलही तसेच म्हणता येईल. 

युद्धोत्तर शांतताप्रस्थानाच्या समस्या : जानेवारी १९१९ मध्ये शांतता समिती बैठक झाली आणि तेव्हाच शांतता प्रस्थापन कार्य कठीण असल्याचे दिसले. पराजित राष्ट्रांना कशा प्रकारची वागणूक द्यावयाची हा वादाचा सर्वात प्रमुख मुद्दा होता. (१) फ्रान्स : जर्मनीची आर्थिक व सैनिकी शक्ती संपूर्णपणे नष्ट करावी व भविष्यकाळात फ्रान्सला धोका देण्यात जर्मनी असमर्थ ठरेल अशा प्रकारची कडक शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, असा फ्रान्सचा आग्रह होता. (२) ग्रेट ब्रिटन : युद्धोत्तर कालात जर्मनीची त्वरेने प्रगती झाल्यास, ब्रिटिशांच्या मालाचे ते प्रमुख गिऱ्हाईक होईल, त्यामुळे ब्रिटिशांची आर्थिक स्थिती सुधारेल म्हणून कडक वागणूक जर्मनीला देऊ नये असे लॉइड जॉर्जचे प्रारंभीचे मत होते. ‘जर्मनीला पिळून काढण्यात येईल’, ही प्रचार घोषणा करून लॉइड जॉर्जने नोव्हेंबर १९१८ सालची पार्लमेंट निवडणूक जिंकली होती. ब्रिटिश लोकमत जर्मनीच्या पिळवणुकीलाच अनुकूल होते. 

पहिले महायुद्ध अटळ होते काय? : गेल्या पन्नाससाठ वर्षात उपलब्ध झालेले युद्धासी संबंधित राष्ट्रांचे अभिलेख व इतर सरकारी कागदपत्रे यांच्या परीक्षानंतर हे महायुद्ध टाळता आले असते, असाच निष्कर्ष निघतो. 

कोणत्याच राष्ट्राने जाणून-बुजून युद्धास चेतावणी दिली नाही. राष्ट्रांच्या नेत्यांचे राजकीय गणितच चुकले. धमकावणी व थापेबाजीही युद्धपूर्व कालात यशस्वी ठरलेली साधने वापरून युद्धाविना कार्यभाग होईल, ही त्यांची अटकल फोल ठरली. शांतता व सुरक्षा प्राप्त करण्यासाठी जो प्रचंड युद्धसंभार व ज्या प्रचंड सेना तैनात केल्या होत्या, त्यांच्याच ओझ्याने यूरोपीय राष्ट्रे युद्धजालात अडकली गेली. 

सर्बीयातील राष्ट्रीय चळवळीबाबत जे धोरण व कार्यवाही ऑस्ट्रीया अंमलाच आणील तिला जर्मनीचा जरी पाठिंबा होता, तरी त्याचा अर्थ रशिया किंवा त्याची दोस्त राष्ट्रे ब्रिटन व फ्रान्स यांच्याविरुद्ध युद्धाचा निर्णय घेणे असा नव्हता. सर्बीयाने ऑस्ट्रियाचा निर्वाण खलिता पूर्णपणे नव्हे पण अशंतः स्वीकारला तथापि ऑस्ट्रियाचा निर्वाण खलिता पूर्णपणे नव्हे पण अशंतः स्वीकारला तथापि ऑस्ट्रियाने सर्बीयाविरुद्ध युद्ध पुकारले. ते युद्ध म्हणजे खरे प्रत्यक्ष युद्ध नव्हते. कराण युद्ध लढण्यात ऑस्ट्रियाला आणखी वेळ लागला असता. रशियाचा दृष्टिकोन पुढीलप्रमाणे होता. सर्बीया या स्लॉव्ह राष्ट्राची मानहानी खपण्यासारखी नव्हती हे खरे, पण ऑस्ट्रिया व जर्मनी जर बाल्कनवर प्रभुत्व स्थापण्यात यशस्वी झाले असते, तर काळ्या समुद्रामार्गे बाह्य जगाशी होणारे रशियाचे दळणवळण, व्यापार इ. धोक्यात येण्याची भीती रशियाला वाटली. म्हणजे रशियालाही युद्धाची घाई नव्हती. बाल्कनमधील मुलूखही बळकावयाचा नव्हता केवळ संरक्षण आणि जगणे हाच रशियाचा अंतरिक हेतू होता. रशियाची सेनासज्जता म्हणजे ऑस्ट्रिया−हंगेरीच्या हिंसात्मक मुत्सद्देगिरीला प्रत्युत्तर होते. 

वास्तविक सेनासज्जता ही राजकीय डावपेचातील एक प्यादे होते तरी पण सेनासज्जतेची एकदा सुरू झालेली कार्यवाही तत्कालीन दळणवळण व परिवहनाची साधने लक्षात घेता, थांबविणे वा तिच्यात बदल करणे अशक्य होते. 

उच्च युद्धनीती व युद्धकार्यप्रक्रिया या दृष्टिकोनातून तत्कालीन युद्धनेत्यांनी युद्ध व लढाया या आक्रमणशीलच असतात, असे गृहीत धरले होते. रशिया−जपान युद्ध व बाल्कन युद्धे (१९१२-१३) यांच्या अनुभवावरून संरक्षणात्मक युद्ध व लढाया, आक्रमणात्मक कारवायांपेक्षा लाभदायक असल्याचा निष्कर्ष ते विसरले होते. विजय मिळवावयाचा असेल, तर आक्रमक भूमिकेचा अंगिकार केला पाहिजे अशी जर्मनी वगळता इतर सर्व युद्धखोर राष्ट्रांची धारणा होती. 


फ्रान्स व रशिया यांच्याविरुद्ध एकाच वेळी दोन आघाड्यांवर युद्ध लढल्यास, जर्मनीला निर्णायत विजय मिळणार नाही, याची खात्री जर्मन नेत्यांना १८७० सालापासूनच झाली होती तथापि जनरल श्लीफेनची युद्धनीती व योजना याप्रमाणे सेनासज्जता म्हणजेच प्रत्यक्ष युद्ध हा सिद्धांत जर्मन नेत्यांनी ग्राह्य धरला. शिवाय युद्ध म्हणजे राजकारणाची प्रक्रिया चालू ठेवण्याचे एक साधन, या फोन क्लाउझेव्हिट्सच्या सिद्धांताचा त्यांनी चुकीचा अर्थ केला. परिणामतः युद्धाची योजना व कार्यवाही केवळ सैनिकीदृष्ट्या करण्यात आली. जनरल श्लीफेनची श्लीफेन योजना हेच युद्धाचे मूळ कारण झाले. 

सेनासज्जता थांबवा, या जर्मनीच्या मागणीचा अव्हेर म्हणजेच रशियाने युद्ध सुरू केले, असे मानून जर्मनीने फ्रान्सवर आक्रमण सुरू केले व अटळ नसणारे महायुद्ध पेटले. 

हिंदुस्थान व पहिले महायुद्ध : पहिल्या महायुद्धाला ब्रिटिशांच्या अंकित असलेल्या हिंदुस्थानाने दोन प्रकारे सहाय्य दिले : एक आर्थिक (रोख पैसा, अन्नधान्य, कपडालत्ता व युद्धसामग्री) साहाय्य आणि दुसरे लढाऊ मनुष्यबळ (भूसेना, नौसेना व वायुसैनिक). 

आर्थिक साहाय्य : हिंदुस्थानचे आर्थिक साहाय्य दोन प्रकारचे होते : (१) शासकीय माध्यम आणि (२) खासगी द्रव्यसाहाय्य वगैरे. शासकीय माध्यम : हिंदी अभियान सेनेवर जो खर्च झाला तो ब्रिटनच्या शासनाने सोसावा, अशी हिंदुस्थान सरकारला कायदेशीरभूमिका घेता आली असती आणि त्यामुळे हिंदुस्थानच्या एकंदर खर्चात तेवढीच बचत झाली असती, तथापि हिंदुस्थानच्याच संरक्षणापोटी अभियान सेना खर्च करण्यात यावा ही हिंदुस्थानच्या ब्रिटिश शासनाची सूचना ब्रिटनने मान्य केली, त्याप्रमाणे हिंदुस्थानच्या वार्षिक उत्पन्नातून युद्धखर्च करण्यास ब्रिटनने मान्य केले. १९१९-२० अखेर हिंदुस्थान सरकारने सु. १९ अब्ज रूपयांचे साहाय्य युद्धकार्यास दिले. याशिवाय वाहनांवर सु. ३ कोटी १२ लक्ष रूपये व १ कोटी ४ लक्ष रूपये सीमेवरील रस्त्यांवर खर्च झाला. खासगी साहाय्य : जून १९२१ अखेर केंद्रीय साम्राज्य कल्याणनिधीला २५ कोटी २३ लक्ष रूपयांचे साहाय्य मिळाले. 

लढाऊ मनुष्यबळ : हिंदुस्थानाबाहेर पाठविलेल्या मनुष्यबळाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

अ. क्र.

देश

ब्रिटिश अधिकारी व सैनिक

हिंदी अधिकारी व सैनिक

फ्रान्स

२०,७४८

१,३८,६०८

पूर्व आफ्रिका

५,६०९

४७,७०४

मेसोपोटेमिया

१,८५,४९१

६,७५,३९१

ईजिप्त

२०,२५९

१,४४,०२६

गलिपलि

६०

४,९५०

सलॉनिक

१७१

९,९३१

एडन

९,२१९

२६,२०५

इराणी आखात

२,०५०

४९,१९८

 

एकूण

२,४२,६०७

१०,९६,०१३


ठार, जखमी वा युद्धबंदी झालेल्या हिंदी सैनिकांचा तपशील :

ठार व इतर कारणांनी मृत

५३,४८६

जखमी

६४,३५०

युद्धबंदी व बेपत्ता

३,७६२

 

एकूण

१,२१,५९८

व्हिक्टोरिया क्रॉस मिळविलेल्यांचा तपशील : (१) सैनिक खुदादात खान, बलुच पलटण, फ्रान्स, ऑक्टोबर १९१४. (२) नाईक धरवानसिंग नेग्री, गढवाल पलटण, फ्रान्स, नोव्हेंबर १९१४. (३) ले. द पास, पूना हॉर्स, फ्रान्स, नोव्हेंबर १९१४. (४) ले. मॅकब्रुस, शिंदे रायफल्स, फ्रान्स, डिसेंबर १९१४. (५) सैनिक गोबरसिंग (मरणोत्तर), गढवाल पलटण, फ्रान्स, मार्च १९१५. (६) मेजर व्हीलर (मरणोत्तर),अठरावा रिसाला, मेसोपोटेमिया, एप्रिल १९१५. (७) जमादार मिर दोस्त, कोक पलटण, बेल्जियम, एप्रिल १९१५. (८) ले. स्मिथ, शीख पलटण, फ्रान्स, मे १९१५. (९) सैनिक कुलवीर थापा, गुरखा पलटण, फ्रान्स, सप्टेंबर १९१५. (१०) सैनिक छट्टासिंग, भोपाळ पायदळ, मेसोपोटेमिया, जानेवारी १९१६. (११) लान्स नाईक लाला, डोग्रा पलटण, मेसोपोटेमिया, जानेवारी १९१६. (१२) कॅ. स्विन्टन, मेडिकल कोअर, मेसोपोटेमिया, जानेवारी १९१६. (१३) नाईक शाहामदखान, पंजाब पलटण, मेसोपोटेमिया, एप्रिल १९१६. (१४) मेजर व्हीलर, गुरखा पलटण, मेसोपोटेमिया, फेब्रुवारी १९१७. (१५) लान्स दफेदार गोविंदसिंग, दुसरा भाला रिसाला, फ्रान्स, डिसेंबर १९१७. (१६) सैनिक कर्णबहाद्दूरराणा, गुरखा पलटण, ईजिप्त, एप्रिल १९१८. (१७) रिसालदार बदलूसिंग (मरणोत्तर), डेक्कन रिसाला, पॅलेस्टाइन, सप्टेंबर, १९१८.

हिंदुस्थानचे साहाय्य : दोस्त राष्ट्रांच्या युद्धकार्याला हिंदुस्थानने पुढीलप्रमाणे भरीव औद्योगिक साहाय्य दिले : (१) विविध प्रकारचा दारुगोळा व हलकी-भारी शस्त्रास्त्रे, (२) कपडालत्ता, पादत्राणे व तंबू, (३) ताग व तागाचा पक्का माल, (४) लहान-मोठ्या नदीतील नौका, (५) इमारती लाकूड, (६) रेल्वे आणि वाहतूक−साधने. १ मार्च १९१७ रोजी हिंदी युद्धसामग्री समिती स्थापण्यात आली. समितींच्या कामांपैकी, हिंदुस्थानच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हिंदुस्थानात उद्योगधंदे व उत्पादन यांचा विकास साधण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य वरील समितीला देण्यात आले. सरकारी युद्धसामग्री कारखान्याव्यतिरिक्त खाजगी उद्योजकांना युद्धसामग्री-उत्पादनाचे काम देण्यात आले. १९१८ सालाअखेर १ अब्ज लक्ष रूपयांची युद्धसामग्री हिंदुस्थानाने बाहेरील आघाड्यांना पुरविली. या महायुद्धात हिंदुस्थानच्या औद्योगिक विकास कार्याचा पाया घातला गेला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. 

महायुद्धाचे हिंदुस्थानावरील परिणाम : या परिणामांचे स्वरूप पुढील दृष्टिकोनातून दाखविता येते : (१) युद्धसामग्री उत्पादन, (२) नागरी उद्योगधंदे व व्यापार, (३) शासकीय आर्थिक धोरण, (४) सागरी दळणवळण व वाहतुक, (५) भूप्रदेशी वाहतुक, (६) अन्नधान्यधोरण, (७) शेतकी उत्पादन व त्याची वाटणी, (८) इंधन व शक्तिपुरवठा, (९) युद्धकालीन सामाजिक सेवायंत्रणा, (१०) नागरी संरक्षण, (११) आर्थिक युद्धतंत्र, (१२) ब्रिटनचे वसाहती व साम्राज्यांतर्गत देशाबद्दलचे धोरण आणि (१३) संरक्षणव्यवस्था. 

वरील परिणामांचा येथे यथास्थित परामर्ष घेणे शक्य नाही तथापि काही मुद्यांचा आढावा पुढीलप्रमाणे आहे. युद्धपूर्वकालीन अनिर्बंध अर्थव्यवस्था धोरण व कार्यक्रम युद्धकालीन आर्थिक गरजा भागविण्याच्या दृष्टीने त्याज्य करावे लागले. महायुद्धामुळे वाढझालेल्या सैन्याला पुरवठा करणे, वाढत्या किंमती, अपुरी वाहतुकसाधने (रेल्वे, जहाजे, वित्तपुरवठा) या कारणांमुळे ब्रिटिश नोकरशाहीला वसाहतवादी अर्थव्यवस्थेचा पुनर्विचार करणे भाग पडले. परिणामतः तिने पुढीलप्रमाणे कार्यवाही केली : (१) बाजारभाव स्थिरतेसाठी व सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी बाजारमालांची (उदा., कापूस, चहा, तांदूळ, ताग वगैरे) सर्वाआधी आगाऊ खरेदी (२) कातडी, ताग, लोकर, कापूस, अन्नधान्य, तेल व तेलबियाणे आणि धातू यांची निर्यातबंदी (३) मीठ व कोळसा उत्पादन तसेच खरेदी-विक्रीवर प्रत्यक्ष नियंत्रण (४) यांशिवाय दोस्तराष्ट्रांच्या युद्धकार्याला हिंदुस्थानचे भरघोस आर्थिक साहाय्य, उदा., युद्धोपयोगी मालाचे सरकारी कारखान्यात उत्पादन आणि हिंदी कारखानदारांकडून कापड व चामड्याच्या वस्तू प्रत्यक्षपणे खरेदी करणे किंवा त्यांचे अधिग्रहण करणे. 

आधुनिक युद्धासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनासाठी हिंदुस्थानच्या अगदी प्राथमिक स्वरुपाच्या औद्योगिक अधःसंरचनेचा अपुरेपणा आणि आर्थिक विकास कार्यातील दोष नजरेस आले. जपानने जर जर्मनीशी हातमिळवणी केली असती, तर सागरी वाहतूक धोक्यात येऊन हिंदी कारखाने बंदच पडले असते. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड यांनी ब्रिटिश औद्योगिक धोरण व अनिर्बंध आर्थिक व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या कुपरिस्थितीची जाणीव ब्रिटनचा राजा पाचवा जॉर्ज याला करून दिली होती. लॉर्ड कर्झनने विज्ञान व कार्यक्षमता यांवर आधारभूत असे आर्थिक धोरण आखले होते. त्यामुळे युद्धपूर्व कालात लोखंड, पोलाद, कोळसा आणि इतर खाणी व जलविद्युत् योजना साकार झाल्या होत्या. युद्धामुळे औद्योगिकीकरणाला वेग मिळाला. प्रांताप्रांतांत उद्योग-खाती स्थापन झाली. भेदमूलक संरक्षण हे धोरण हिंदी उत्पादनकार्याला लागू करण्यात आले.रेल्वेचे अंदाजपत्रक सर्वसाधारण अंदाजपत्रकापासून वेगळे करण्यात आल्याने दळणवळण-व्यवस्थेच्या विकासाला गती मिळणे शक्य झाले. 


युद्धकाळात वैद्यकीय अधःसंरचना व सुविधा कमी करण्यात आल्या तसेच युद्धआघाडीवरील वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी त्यांचा उपयोग करण्यात आला. उदा., युद्धपूर्वकाळात ४,१०० दवाखाने-इस्पितळे होती, तर युद्धकाळात (१९१७) त्यांची संख्या २,९९१ झाली. १९१८-१९ सालात हिंदुस्थानात हिवतापाच्या रोगाची लाट येऊन हजारो माणसे मरण पावली. साथीपूर्वी मान्सूनने दगा दिला होता. १९१४ नंतर मोटरगाड्या व मोटर वाहतूक यांच्यात वाढ झाली. 

युद्धाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे शहरातील आरोग्यसेवा. नोकरी-मजुरीसाठी मुंबईसारख्या शहरात बाहेरून माणसे आल्याने गर्दी झाली तथापि त्यांच्या निवासाची योग्य सोय नव्हती. घरबांधणी व विकास योजना यांना चालना मिळाली. मुंबई शहरातील असाधारण मूल्यसंख्येमुळे ते कुप्रसिद्ध झाले. 

ब्रिटनमध्ये युद्धामुळे ज्या युद्धकालीन आर्थिक व इतर समस्या निर्माण झाल्या आणि त्यांच्या निराकरणासाठी जी धोरणे, योजना व कार्यवाही करण्यात आली, त्यांचे प्रतिबिंब हिंदुस्थानच्या राज्यकर्त्यांच्या आचारविचारांत दिसले. 

ध. रा. गाडगीळ व सोवनी तसेच व्हेरा ॲन्स्टी यांच्या ग्रंथांत युद्ध व आर्थिक व्यवस्थेचे खोल विचार आले आहेत. हिंदुस्थानात कोठेही हवाई हल्ले झाले नाहीत. सप्टेंबर १९१४ मध्ये जर्मनांचे क्रूझर एमडेनने बंगालच्या उपसागरात धुमाकूळ घालून त्याने बाग ब्रिटिश जहाजे बुडविली. सागरी वाहतूक दोन महिने बंद झाली. एमडेनने मद्रासवर तोफा डागून तेथील तेलाच्या टाक्या भस्मसात केल्या. हिंदी मानसात हिंदुस्थानवर जर्मनीचे आक्रमण सुरू झाले की काय, असा प्रश्न उभा राहिला. ब्रिटिशांच्या विजयाबद्दल हिंदी लोकांमध्ये आकांक्षा निर्माण झाली. जर्मनीकडून आयात होणाऱ्या उत्तम व स्वस्त वस्तू बाजारातून गडप झाल्या. साधारणपणे १९१४ पूर्वी सु. २६ कोटी रूपयांचा माल जर्मनीला दरवर्षी निर्यात केला जाई व ब्रिटनला सु. ५२ कोटी रूपयांची निर्यात होई. हिंदी व्यापारात सु. ३२ ते ३३ कोटींची निर्यातीत घट होऊ लागली. कपाशी, ज्यूट व तेलादाणा यांच्या किंमतींत मंदी आली. औद्योगिक मालाच्या किंमती वाढल्या. हिंदी अन्न धान्याकरिता ब्रिटनची मागणी वाढली. हिंदी लोक पोटाला चिमटा देऊन लाखो टन अन्नधान्य ब्रिटन व त्याच्या मित्रराष्ट्रांना निर्यात करू लागले. लोक अन्नधान्य वगैरेंचे गुप्तपणे साठे करू लागले. दुष्काळाप्रमाणे किंमती भडकल्या. अशीच परिस्थिती युद्धानंतर काही काळ टिकली. 

महायुद्धाचे हिंदुस्थान-संरक्षणव्यवस्थेवरील परिणाम : या महायुद्धामुळे हिंदुस्थानच्या संरक्षणव्यवस्थेबाबत पुढील अनुभव मिळाले : (१) हिंदी सैनिकांची शस्त्रास्त्रे निकृष्ट दर्जाची होती, त्यामुळे अनावश्यक हानी झाली (२) वायुसेना नव्हती (३) यांत्रिक वाहने नव्हती (४) तांत्रिक साधने जुनी-पुराणी होती (५) तोफखाना, मशीनगन व पायदळ साहाय्यक शस्त्रास्त्रे गतिमान लढायांना उपयोगी पडणारी नव्हती (६) रणांगणीय व भारी तोफखाना अपुरा तसेच कालबाह्य होता (७) वैद्यकीय सुविधा अपुऱ्याहोत्या (८) तांत्रिक व व्यवस्थापकीय राखीव मनुष्यबळ नसल्याने सेनाविस्तार त्वरेने होऊ शकला नाही (९) सैन्यभरती-यंत्रणा तुटपुंजी होती. केवळ लढाऊ जमातींतूनच सैनिकभरती करणे चुकीचे ठरले. नवीन भरती झालेल्यांना सैनिकी शिक्षण देण्याची व्यवस्था नव्हती (१०) युद्धोपयोगी सामग्रीचे साठे (रिझर्व्ह स्टॉक) नसल्याने नवीन दले सज्ज करण्यात दिरंगाई झाली. 

हिंदुस्थान सरकारने १९१९ साली ‘इशर समिती’ स्थापली. या समितीने १९२० साली हिंदी सेना सुधारण्याच्या सूचना केल्या. इशर समितीच्या सूचना संकुचित, केवळ ब्रिटिश साम्राज्य संरक्षणाच्या दृष्टीकोनातून असल्याबद्दल हिंदी पुढाऱ्यांनी असमाधान व्यक्त केले. तथाकथित लढाऊ जातींतून सैनिक भरती अपुरी होत असल्याने, अस्पृश्य जमाती आणि ब्राम्हण, तेलुगू, भिल्ल, भोपला, बंगाली इ. ७५ बिनलढाऊ जातींतून सैनिकभरती करण्यात आली. परिणामतः बिगर लढाऊ जमातीसुद्धा लढाऊ जातींसारख्याच लढवय्या असल्याचे दिसून आले. १९१७ साली हिंदुस्थानचा सेक्रेटरी माँटेग्यू याने पुढील आश्वासन दिले : (१) सैन्यात अधिक संख्येने योग्य हिंदी व्यक्तींना जात-धर्म-वंशनिरपेक्ष अधिकारपदे देण्यात येतील. (२) ब्रिटनच्या सँडहर्स्ट अकादेमीप्रमाणे हिंदुस्थानात अकादेमी स्थापण्यात येईल इत्यादी. १९१७ साली सँडहर्स्टच्या अकादेमीत १० जागा हिंदी तरूणांसाठी राखूण ठेवण्यास प्रारंभ झाला, याशिवाय इंदूर येथील डॅली कॉलेजातून सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्ज कमिशन देण्यास आरंभ झाला. जनरल ⇨करिअप्पाहे त्यांपैकी एक होत. घोडदळात कपात करण्यात आली. शिलेदारी बंद करून घोडदळात बारगिरी पद्धत कायम झाली [⟶घोडदळ]. पुढे १९२२ साली जनरल रॉलिन्सन समितीच्या सुधारणा-सूचना अमलात आणण्यात आल्या. ⇨प्रादेशिक सेनासज्ज करण्यास प्रारंभ झाला (१९२०). हिंदुस्थानात युद्धोपयोगी वस्तू व पुरवठा हे एक नवीन खाते उघडण्यात आले (१९२१). [⟶ भारत (संरक्षणव्यवस्था)]. भारतीय वायुसेनेचा पाया या महायुद्धातच घातला गेला. शाही हिंदी नौदल (रॉयल इंडियन मरीन) या नौदलाने इराणी आखातातील शस्त्रास्त्र चाचेगिरीविरूद्ध काम केले, तसेच ब्रिटनच्या शाही नौसेनेबरोबर हिंदी महासागरातील कारवायांतदेखील भाग घेतला. [⟶नौसेना]. 

लोकमान्य टिळकांनी हिंदुस्थानची संरक्षणव्यवस्था व हिंदी सेना यांबद्दल १८९८ ते १९०८ व १९१४ ते १९२० या काळात जी मते व विचार मांडले, त्यांचे प्रत्यंतर हिंदुस्थान सरकारने केलेल्या सेनासुधारणा कार्यात दिसून येते. वायुसेनेचे आधुनिक काळातील महत्त्व व जागतिक राष्ट्रमंडळातील हिंदुस्थानचे स्थान हे टिळकांनी बरोबर हेरले होते. या दृष्टीने काँग्रेस-लोकसत्तावादी पक्षाच्या वतीने, त्यांनी प्रसिद्ध केलेल्या फतव्याला फार महत्त्व आहे (एप्रिल १९२०). या फतव्यात त्यांनी सरकारबरोबरच्या संपूर्ण सैनिकी नियंत्रणावर भर दिला होता.


त्याचप्रमाणे जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सैनिकी खर्च कमी करावा लोकसेना निर्माण करून तिचे अधिकारी हिंदी असावेत, नाविक, वायुसैनिकी व सैनिकी शिक्षण देण्यात यावे व सैन्याच्या सर्व विभागांत कोणताही भेदभाव न करता हिंदी लोकांना अधिकारपदे मिळावीत याचीही मागणी त्यांनी केली होती. 

साम्राज्यांतर्गत देशांबद्दलचे ब्रिटनचे धोरण : हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंपादनाच्या इतिहासात पहिल्या महायुद्धाची घटना ही‘राजकीयोत्सारण’ (पोलिटिकल वॉटरशेड) स्वरूपाची होती. १९१४ पर्यंत पाश्र्चात्त्य पद्धतीचे स्वशासन हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे राजकीय धोरण असल्यामुळे राजकीय चळवळीचे स्वरूपही तसेच होते. जून १९१४ पासून मात्र लो. टिळकांनी काँग्रेसच्या या राजकीय धोरणाला व चळवळीच्या स्वरूपाला प्रथम आव्हान दिले. १९०७ सालापासूनच त्यांनी आपले जहाल राजकीय धोरण जाहीर केले होते. 

यूरोपात १९१४ सालच्या ऑगस्टमध्ये युद्ध सुरू झाल्याने इंग्लंडवर महासंकट आले. खुद्द इंग्लंडच जेथे बुडण्याच्या प्रसंग आला, तेथे हिंदुस्थानात एवढे मोठे खडे सैन्य ठेवून करावयाचे काय? असा प्रश्न उत्पन्न झाला. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी मोठेसाहस करून सारा हिंदुस्थान सेनिकशून्य केला. १९१४ साली काँग्रेसने पुन्हा एकदा आपली स्वराज्याची मागणी पुढील शब्दांत केली. ‘आजच्या आणीबाणीच्या प्रसंगी हिंदी जनतेने ब्रिटिश राज्य सत्तेबद्दल गाढ व निःसंदिग्ध राजनिष्ठा व्यक्त केली आहे. ……. हिंदुस्थानला साम्राज्यातील हिंदी व इतर प्रजा यांच्यातील चीड आणणारे भेदाभेद नष्ट करावे … प्रांतिक स्वायंत्ततेसंबंधाचे वचन पूर्ण करावे,….. एक स्वतंत्र घटक अशी हिंदुस्थानच्या बाबतीत मान्यता देण्यात यावी,….. व या दर्जाला शोभतील असे स्वातंत्र्याचे पूर्ण हक्कही त्याला यथेच्छ उपभोगू द्यावेत.’

लोकमान्य टिळक मंडाले येथे हद्दपारीची शिक्षा भोगीत (१९०८−१४) असता १९०८ सालापूर्वीपासून हिंदी स्वराज्याच्या मागणीबरोबर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी हिंदी जनतेचीच आहे, असे मत ते वारंवार मांडीत असत. १९१४ साली हिंदुस्थानात परतल्यानंतर त्यांनी सैन्यभरतीच्या सभांमध्ये वरील मागणीचा पुनरुच्चार करण्यास सुरूवात केली. एकट्या महाराष्ट्रात (तत्कालीन मुंबई इलाखा) १५,००० च्या वर मराठा सैनिकांची भरती करण्याचे आश्वासन त्यांनी जाहीर केले. रुसो−जपानी युद्धात जपान ह्या आशियायी नवोदित राष्ट्राने यूरोपातील रशिया या शक्तिमान राष्ट्राचा पराभव केल्यामुळे, आपली योग्यता व आपली शक्ती ह्यांच्याबद्दलचा नवा आत्मविश्वास हिंदुस्थानात निर्माण झाला होता. ब्रिटिश राजसत्तेला युद्धकार्यात सर्व प्रकारचा सहभाग देण्यास म. गांधी, जीना व लो. टिळकांनी तसेच इतर लहानमोठ्या पुढाऱ्यांनीही एकमत केले व त्याप्रमाणे त्यांनी कार्यही केले. काँग्रेसचे ठरावदेखील या सहभागाला अनुकूल होते. १९१४ च्या हिवाळ्यात फ्रान्स आणि फ्लँडर्स येथी रणांगणात हिंदू सैन्याने जी सहनशक्ती दाखविली व जर्मन सैन्याला जे धैर्याने तोंड दिले, त्यामुळे यूरोप व आशियायी राष्ट्रांना हिंदुस्थानासंबंधाने अधिकच आदर वाटू लागला हिंदुस्थानचे आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढले. डॉ. ॲनी बेझंट यांनी, ‘‘लहानसहान हक्कांकरिता किंवा सुधारणांकरिता मोबदल्यादाखल आपल्या सुपुत्रांचे रक्त व सुकन्यांचे अश्रू अर्पण करण्यास हिंदुस्थान तयार नाही. राष्ट्र या नात्याने आपल्या हक्कांची प्रस्थापना करण्याची हिंदुस्थानची इच्छा आहे, …… युद्धापूर्वी व युद्धकालातही हीच मागणी हिंदुस्थान करीत राहील,’’ असे जाहीर केले. यावरून युद्धानंतर हिंदुस्थानामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली व ब्रिटिशांनी जी दडपशाही केली, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेता येते. 

ब्रिटिशांचे युद्धमंत्री किचेनर यांच्याखेरीज इतरांना हे युद्ध काही महिन्यांत आटोपेल असे वाटत होते. १९१५ मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी जे वक्तव्य केले होते, त्यावरून हिंदुस्थानच्या पदरात स्वातंत्र्याचा मोठा अंश पडेल, असा समज हिंदुस्थानात निर्माण झाला. याच युद्धकाळात इंडियन नॅशनल काँग्रेसने आपल्या अधिवेशनांत संमत केलेल्या अनेक ठरावांपैकी लष्कर व आरमार यांतील कमिशनमध्ये हिंदी लोकांचा प्रवेश, लष्करी व आरमारी महाविद्यालये, हिंदी स्वयंसैनिक दलाची पुनर्घटना, हत्यारांचा कायदा आणि हिंदुस्थान संरक्षण कायदा व १८१८ सालची बंगालच्या तिसऱ्यारेग्युलेशची अंमलबजावणी यांबद्दलचा एक ठराव असे. १९१७ साली स्वराज्याची योजना तयार होत असताना सुदैवाने हिंदु व मुसलमान ह्यांच्यात आपखुषीने तडजोड घडून आली. होमरुललीगची चळवळ सर्वत्र पसरली. चळवळ्यांना स्थानबद्ध करण्याचा तडाखा सरकारने सुरू केला. काँग्रेसच्या प्रांतिक कमिट्या निःशस्त्र प्रतिकाराचा उपाय अंमलात आणावयाचा की नाही, याबद्दल गंभीरपणे विचार करु लागल्या. राजकीय परिस्थितीत बदल दिसू लागले. महायुद्ध चालू असतानामेसोपोटेमियातील स्वारीसंबंधाने इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये हिंदुस्थान सरकारवर माँटेग्यूने टीका केली. माँटेग्यू हे स्टेट सेक्रेटरी झाल्यावर त्यांनी कॅबिनेटतर्फे चढत्या श्रेणीने हिंदुस्थानला स्वराज्य देण्याची योजना जाहीर केली व लष्करांतील किंग कमिशन हिंदी लोकांना देण्याचे आश्वासन दिले. 

लखनौच्या काँग्रेसमध्ये १९१६ साली हिंदू-मुसलमानांचे ऐक्य साध्य झाले. अद्यापि खिलाफत प्रकरण उद्भवले नव्हते. ते पुढे १९१९ सालानंतर ऑटोमन साम्राज्याची चिरफाड झाल्याने निर्माण झाले. महायुद्धानंतर तुर्कस्तानची परिस्थिती अनिश्चित झाली व खिलाफतीवर जे संकट आले हे या ऐक्याचे निकटवर्ती कारण झाले होते. ६ एप्रिल १९१९ रोजी सर्व देशभर सभा-मिरवणुका झाल्या. पंजाबमध्ये (जेथे मोठ्या संख्येने सैनिक भरती होत असे) चळवळीला जोर चढला. सुशिक्षित लोक लष्करात जाऊ पाहात होते व लष्करी महाविद्यालये काढण्यासंबंधाने चळवळ करीत होते. तेव्हा या सुशिक्षितांचे व पंजाबातील क्षत्रीय जातींचे संगनमत झाले, त्यांच्यात राजकीय जागृती झाली आणि राजकीय आकांशा त्यांनी मनांत बाळगल्या, तर ब्रिटिश राज्य संपुष्टात येण्याची भीती ब्रिटिशांना वाटू लागली. महायुद्धावरून हिंदी सैन्य नुकतेच परत आले होते. जर्मन, तुर्क सैनिकांशी ते शौर्याने लढले होते व त्यास आपल्या सामर्थ्याची जाणीव झाली होती. पंजाब इलाख्याचे गव्हर्नर सर मायकेल ओड्वायर यांनी पंजाबमधील काँग्रेसी चळवळ चिरडून टाकण्याचा मनसुबा केला. त्यातूनच पुढे जालियनवाला बाग येथील कत्तल उद्भवली. खिलाफत चळवळ व पुढे म. गांधींनी असहकारिता चळवळ सुरू केली. तिचा शेवट १९४७ साली हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपासून संरक्षणकार्यात हिंदी लोकांच्या टप्प्याटप्प्याने शिरकाव झाला. अलाहाबाद येथे (१९१७) काँग्रेस अधिवेशनात निःशस्त्र प्रतिकाराचा प्रश्न गाळून टाकण्याचे ठरले. हिंदुस्थान सरकारने बिकानेरचे महाराज, सर मेस्टन व सत्येंद्र प्रसन्नसिंह यांना हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून साम्राज्य युद्धपरिषद व साम्राज्य युद्ध-मंत्रिमंडळामध्ये पाठविण्यात आले. १९१७ च्या अखेरीस नऊ हिंदी लोकांना किंग कमिशन बहाल करण्यात आले. 


लष्करभरती करणे व युद्ध-कर्ज उभारणे यांबाबतीत ‘वजन आणणे व मन वळविणे, असे साधे उपाय योजण्यात येतात’, असे मुंबईचे गव्हर्नर म्हणत होते. पण प्रत्यक्षात ठिकठिकाणी अतिरेक होऊ लागला. विशेषतः पंजाबमध्ये अतिरेकाला ऊतआला. अकोला (विदर्भ) येथील मामलेदाराच्या बंगल्याला लोकांनी वेढा घातला. त्याची बायकामुले बाहेर जाऊ दिली व बंगल्यात मामलेदाराला कोंडून बंगल्याला आग लावली आणि त्याला बंगल्यासकट जाळून टाकले. ११ नोव्हेंबर १९१८ रोजी महायुद्ध तहकूब झाले. दोस्तराष्ट्रांचा पूर्ण विजय झाला. अमेरिकेचे राष्ट्रपती, ब्रिटिश पंतप्रधान लॉइड जॉर्ज व इतर दोस्त राष्ट्रांच्या राजकीय नेत्यांनी स्वयंनिर्णयाची घोषणा केली. दिल्ली येथील (२६ डिसेंबर १९१८) काँग्रेसमध्ये वरील घोषणेवर विचार-विनिमय झाला तथापि स्वयंनिर्णयाचे तत्त्व हिंदुस्थानास लागू करण्यात आले नाही. 

पहिले महायुद्ध व युद्धकला : पहिल्या महायुद्धातील सैनिकी अनुभवावरून शस्त्रास्त्रे आणि शस्त्रास्त्रविकास व युद्धकलेवरील विज्ञानाचा परिणाम यांबद्दल पुढील निष्कर्ष काढण्यात आले आहेत : (१) शांततेच्या काळात प्रचंड खडी भूसेना सज्ज ठेवण्याएवजी, त्या काळात युद्धक्षमता असलेल्या व्यक्तींना सैनिकी शिक्षण देऊन, राखीव सैनिकांची दले उभारणे. अशा राखीव सैनिकांना युद्धकाळात भरती करून घेऊन सैनिकी बळाचा विस्तार करणे. हा परिणाम औद्योगिक क्रांतीचा होता. आधुनिक दळणवळणसाधने उदा., रेल्वे, रस्ते इ.यांमुळे सेनासज्जता त्वरेने करता येणे शक्य झाले. या फायद्याबरोबरच युद्धयोजना व प्रत्यक्ष लढाया करण्यावर त्यांचे नियंत्रण पडले कारण हल्ल्यासाठी रस्ते व रेल्वेनेच सैनिक मोठ्या संख्येने एका ठिकाणी गोळा करणे शक्य होते. मोटारगाड्या होत्या, पण त्याही आरंभी फारशा नव्हत्या शिवाय त्या कार्यक्षमही नव्हत्या (२) उद्योगधंदेसंपन्न अशा कोणत्याच आधुनिक राष्ट्राला दीर्घकाळ लढणे अशक्य आहे या पूर्वग्रहामुळे मोजक्या आठवड्यांत युद्ध आटोपण्यासाठी, प्रचंड सेना सज्ज करण्यावर भर होता. सेनासज्जता म्हणजेच युद्धारंभ हे गृहीत कृत्य ठरले (३) प्रचंड सेनांची पखरण करताना युद्धभूमीच्या आघाडीची लांबी व खोली वाढली त्यामुळे युद्धकौशल्याला वाव उरला नाही (४) मशीनगन, काटेरी तारांची तटबंदी व प्रचंड तोफांचा भडिमार यांमुळे आक्रमक कार्यवाहीला प्रचंड हानी सोसूनही वाव उरला नाही. संरक्षणात्मक रणतंत्राने आक्रमक रणतंत्रावर मात केली. रणगाड्यांच्या आगमनामुळे रणतंत्रात बदल होण्याची आशा दिसू लागली (५) मरुभूमीवरील रणांगणात घोडदळ उपयोगी पडले, पण त्याची जागा रणगाडा घेणे शक्य आहे हे दिसून आले तथापि १९१९ ते १९३९ या काळांत जर्मनी व रशिया वगळता इतरांना रणगाड्याचे महत्त्व उमगले नाही [⟶महायुद्ध, दुसरे, तडित् युद्धतंत्र रणगाडा चिलखत] (६) आन्तर्ज्वलन एंजिने आणि मोटारगाड्यांचे महत्त्व पटले (७) खंदक युद्धामुळे सेनापतीला कौशल्य दाखविण्यास वाव नव्हता. हल्ल्यासाठी शत्रुआघाडीवरील जागा निवडणे आणि तोफमारा व हल्ल्याचे वेळापत्रक निश्चित करणे एवढेच काम सेनापतीला उरले होते. जर्मनीचा जनरल ऊत्ये हा एकच त्याला अपवाद ठरला. त्याचे ‘घुसखोरीचे तंत्र’ नवीन होते मात्र त्याचा फारसा वापर झाला नाही. 

वायुसेना : १९०३ साली राइट बंधूंनी विमान उडविले तथापि त्याचा युद्धात उपयोग करण्याची कल्पना फ्रान्सशिवाय इतरांना आली नाही. या महायुद्धात टेहळणी, बाँबहल्ले आणि हवाई झुंज यांसाठी विमानांचा मर्यादित उपयोग करण्यात आला. वायुसेना सज्ज करण्याची आवश्यकता पटू लागली. [⟶वातयान]. 

नौसेना : वीस हजार टन वजनाच्या प्रचंड युद्धनौकांना महत्त्व आले. या ड्रेड-नॉट (निर्भय) नावाच्या नौकांवर सु. ३८ सेंमी. व्यासांच्या तोफा बसविण्यात येऊन, दुय्यम लहान व्यासांच्या तोफा काढून टाकण्यात आल्या. नौकांवर एकाच वर्गातील तोफा असल्याने गोळामार-नियंत्रण करणे सोपे झाले (२) पाणबुड्या, पाणसुरुंग व पाणतीर यांचे भय वाढले. सागरी वाहतूक निर्विघ्न करण्यासाठी काफिला तंत्र प्रस्थापित झाले (३) युद्धनौकांवरून विमाने सोडणे-उतरविणे व त्या विमानांतून पाणतीर सोडणे शक्य झाले. तसेच नौकांना हवाई संरक्षण देणे आवश्यक ठरले (४) युद्धनौकांचा आकार-वजन त्यांची जबरदस्त मारकशक्ती व वाढलेला प्रवास-वेग, पाणबुड्या व पाणतीरांचा उपद्रव यांमुळे आरमाराचे सागरी रणक्षेत्र विस्तारले. बिनतारी संदेश दळणवळण−उपकरणे उपलब्ध झाल्याने आरमाराचे नियंत्रण करणे नौसेनापतींना थोडे सुलभ झाले. सागरी रणकौशल्याला भरपूर वाव मिळू लागला. नेल्सनकालीन सागरी युद्धतंत्रात बदल झाले. 

या महायुद्धामुळे युद्धकार्यासाठी संपूर्ण राष्ट्राला जुंपणे अनिवार्य ठरले. औद्योगिक उत्पादन वाढविण्यासाठी कारखाने वाढवावे लागले. स्त्रियांनाही युद्धकार्यात पिछाडीवर−कारखाने वगैरे−काम करणे भाग पडले. त्यांचे सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्षेत्र वाढले. युद्धात बुद्धिमान, देशप्रेमी तरुणांची हत्या झाल्याने राष्ट्रांचे अगणित नुकसान झाले. ‘युद्ध हे सेनापतीचे काम नव्हे’, ‘शांतता टिकविणे हे राजकीय नेत्यांचे काम नव्हे’ या म्हणी प्रचलित झाल्या. 

प्राण व वित्त हानी : पहिल्या महायुद्धातील महत्त्वाच्या राष्ट्रांच्या प्राण-वित्त हानीचा अंदाज खालील कोष्टकात दिला आहे.


राष्ट्र 

१९१४-१८ एकूण सैनिक 

लढायांतील मृत्यू 

सैनिक जखमी 

नागरिक मृत्यू 

वित्तहानी दशलक्ष डॉलर 

१ 

२ 

३ 

४ 

५ 

६ 

दोस्तराष्ट्रे 

         

फ्रान्स 

८४,१०,००० 

१३,५७,८०० 

४२,६६,००० 

४०,००० 

४९,८७७ 

*ब्रिटिश 

साम्राज्य 

८९,०४,४६७ 

९,०८,३७१ 

२०,९०,२१२ 

३०,६३३ 

५१,९७५ 

रशिया 

१,२०,००,००० 

१७,००,००० 

४,९५,००,०० 

२०,००,००० 

२५,६०० 

अमेरिका 

४३,५५,००० 

५०,५८५ 

२,०५,६९० 

— 

३२,३२० 

बेल्जियम 

२,६७,००० 

१३,७१५ 

४४,६८६ 

३०,००० 

१०,१९५ 

सर्बीया

७,०७,३४३ 

४५,००० 

१,३३,१४८ 

६,५०,००० 

२४०० 

जपान

८,००,००० 

३०० 

९०७ 

— 

इटली

५३,१५,००० 

४,६२,३९१ 

९,५३,८८६ 

— 

१८,१४३ 

रूमानिया

७,५०,००० 

३,३५,७०६ 

१,२०,००० 

२,७५,००० 

२,६०१ 

ग्रीस

२,३०,००० 

५,००० 

२१,००० 

१,३२,००० 

५५६ 

पोर्तुगॉल

१,००,००० 

७,२२२ 

१३,७५१ 

— 

— 

माँटेनीग्रो

५,००० 

३,००० 

१०,००० 

— 

— 

एकूण

४,२१,८८,८१० 

४८,८८,८९१ 

१,२८,०९,२८० 

३१,५७,६३३ 

१,९३,८९९ 

मध्यवर्ती राष्ट्रे 

         

जर्मनी

१,१०,००,००० 

१८,०८,५४६ 

४२,४७,१४३ 

७,६०,००० 

५८,०७२ 

ऑस्ट्रिया- 

-हंगेरी

७८,००,००० 

९,२२,५०० 

३६,२०,००० 

३,००,००० 

२३,७०६ 

तुर्कस्तान

२८,५०,००० 

३,२५,००० 

४,००,००० 

२१,५०,००० 

३,४४५ 

बल्गेरिया

१२,००,००० 

७५,८४४ 

१,५२,३९० 

२,७५,००० 

१,०१५ 

एकूण …

२,२८,५०,००० 

३१,३१,८८९ 

८४,१९,५३३ 

३४,८५,००० 

८६,२३८ 

सर्व युद्धखोर 

राष्ट्रे मिळून

६,५०,३८,८१० 

८०,२०,७८० 

२,१२,२८,८१३ 

६६,४२,६३३ 

२,८१,८८७ 

टीप : (१) हिंदुस्थानची प्राण-वित्तहानी महायुद्ध व हिंदुस्थान या परिच्छेदात दिली आहे. (२) ¯ब्रिटीश  साम्राज्य एकूण हानीत हिंदुस्थानची हानी अंतर्भूत आहे. (३) –आकडेवारीउपलब्ध नाही. 


पहिले महायुद्ध आणि धर्म-धार्मिक चळवळी : पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान वगळता ख्रिश्चनधर्मीय राष्ट्रे आपापसांत लढली. ब्रिटन, जर्मनी आणि ऑस्ट्रिया ही ख्रिश्चन प्रॉटेस्टंट, फ्रान्स, इटली, पोलंड ही रोमन कॅथॉलिक, स्लॉव्हवंशीय राष्ट्रे ही ग्रीक सनातनी ख्रिश्चन इत्यादी. तसेच रशिया, बल्गेरिया वगैरेही त्यांत होती. ब्रिटन, फ्रान्स, इटली व रशिया एका तटाचे, तर त्याविरुद्ध जर्मनी, बल्गेरिया, ऑस्ट्रिया−हंगेरी आणि इस्लामधर्मीय तुर्कस्तान ही राष्ट्रे उभी राहिली यावरून युद्ध हे धर्माकरिता नव्हते, हे उघड दिसते. ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू हे सर्वच शांततावादी असताना कोणीही युद्धाविरुद्ध भूमिका घेतली नाही. उलट धार्मिक नेत्यांनी या युद्धासाठी आपपल्या धर्मियांना उत्तेजन देताना त्यांनी हे धर्मयुद्ध आहे, या संकल्पनेवरच भर दिला. राजकीय तसेच लष्करी नेते युद्ध व युद्ध लढणे या क्रियांना धार्मिक अधिष्ठान असल्याचे म्हणत. हिंदी सैन्यातील मुस्लिम व हिंदू सैनिक हे राजकीय हेतू साधण्यासाठी किंवा देशसंरक्षणासाठी अथवा धार्मिक कारणांवरून शत्रूशी लढले नाहीत तर आपल्या घराण्याच्या, परंपरेच्या व पलटणीच्या मानासाठी ते लढले. ब्रिटन व फ्रान्सचा विजय हा दैवी चमत्कारामुळे झाला असेही तेथील नागरिकांना वाटले.

पवित्र रशियात (होली रशिया) राजसिंहासन आणि धर्मपीठ व राज्य आणि धर्मसंस्था (चर्च) यांचा संगम किंवा अनुबंध, एकाचराजकीय संस्थेत या संस्थेशी परंपरेने झाला किंवा जोडला गेला होता. ती राजकीय संस्था म्हणजे झार. झारम्हणजे वैश्विक पिता (युनिव्हर्सलफादर) तसाच तो सामाजिकआदराचे लक्षण म्हणून मानलागेला होता. म्हणून रशियायीसाम्राज्य जेव्हा कोसळले, तेव्हा सत्तेवर आलेले बोल्शेव्हिक हे धर्मआणि त्याच्याशी एकात्म असलेलीझारशाही यांना क्रांतीचे शत्रू मानूलागले. रशियातील सनातन धर्म संस्थेचा (रशियन आर्थोडॉक्स चर्च)नाश त्यामुळेच झाला. धर्म हीअफूची गोळी ठरली. पारंपरिक धर्मचर्च व वैश्विक पिता झार जाऊनत्याऐवजी साम्यवाद, साम्यवादी पक्ष व साम्यवादी पक्षाचे आघाडीनेते स्थानापन्न झाले. त्यांनी साम्य वाद हाच वैश्विक धर्म ठरविला. 

फ्रान्समध्ये रशियाच्या उलटघडले. युद्धपूर्व कालातील निर्धर्मीफ्रेंच शासनाने रोमन कॅथॉलिक संप्रदायाला धारेवर धरले होते,तथापि कॅथॉलिकांनी फ्रेंच शासनालायुद्धकार्यात भरीव साहाय्य दिले,तसेच फ्रान्समध्ये धर्मभावना वउपासनेला युद्धकालात महत्त्वमिळाले तेव्हा फ्रान्सच्या राष्ट्रीयजीवनात कॅथॉलिक पंथाला मानाचेपान शासनाने दिले. पूर्व यूरोपातपोलंडमध्ये कॅथॉलिक पंथाला राष्ट्र धर्माचा मान मिळाला. जर्मनीच्यापराभवामुळे प्रॉटेस्टंट पंथाला वाईटदिवस आले. यूरोपातील बऱ्याच राष्ट्रांत कॅथॉलिक संप्रदायाला महत्त्व येऊन त्याचा विस्तारहीझाला. तुर्कीसाम्राज्याची चिरफाड होऊन केमाल आतातुर्कच्या नेतृत्वाखाली, तुर्की सम्राट पदच्युत झाला व त्याबरोबर इस्लाम धर्मियांची खलिफा ही संस्थाही नाहिशी झाली. इस्लामी अरब लोकांनी तुर्की साम्राज्यातून बंधमुक्त होऊन आपली स्वतंत्र राष्ट्रे स्थापल्यावरही खलिफा ही संस्था नष्ट झाल्याबद्दल त्यांनी कसलीही प्रतिकूलता व्यक्त केली नाही, किंवा खलिफा या संस्थेच्या पुनर्स्थापनेसाठी चळवळही केली नाही. कदाचित त्यामुळे अरब राष्ट्रांमध्ये संघर्ष होण्याची त्यांना भीती वाटत असावी. 

तुर्की साम्राज्याचे विघटन व खलिफा-संस्था नष्ट होण्यास ब्रिटिश कारणीभूत झाले, या समजुतीने भारुन जाऊन हिंदुस्थानात अली बंधूनी खिलाफत चळवळ सुरू केली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी व इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी खिलाफत चळवळीला भरघोस पाठिंबा दिला त्यामुळे खिलाफत चळवळीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले व परिणामी १९१६ मध्ये मुस्लिम आणि हिंदू यांच्यातील ऐक्याला बळकटी लाभली. 

पहिल्या हायुद्धात जाट, शीख यांचा सैन्यभरतीला विरोध होता. अकाली पक्षाची शीखधर्म−सुधारणा चळवळ तसेच स्वराज्य चळवळीतील पुढाऱ्यांचा प्रचार हा जाट-शिखांवर प्रभाव पाडीत होता. अशा परिस्थितीत कोटागा-मारु प्रकरण उद्भवले आणि पंजाबचे तत्कालीन गव्हर्नर मायकेल ओड्वायर यांनी दलित शीख (मझबी) यांची सैन्यात मोठ्या प्रमाणावर सैन्यभरती होत असल्याची भीती उच्च जाटशिखांना दाखविली. या भीतीने तरी जाट-शीख मोठ्या संख्येने सैन्यात भरती होतील अशी ओड्वायरला आशा वाटे. जातीजातींतील भेदाचा उपयोग कसा केला जाई याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. महार, मांग या महाराष्ट्रातील दलितांची भरती महायुद्धकाळात मोठ्या संख्येने झाली होती [⟶महार रेजिमेंट]. 

पहिले महायुद्ध आणि वाङ्मय कला : पहिले महायुद्ध हिंदुस्थानच्या भूमीवर किंवा त्याच्या परिसरातील सागरावरही झाले नाही. परिणामतः लढायांमुळे होणारी सैनिकी हानी वगळता प्राण-वित्त हानीची झळ हिंदी जनतेला लागली नाही. अन्नधान्यांचा तुटवडा-टंचाई, महागाई, अवर्षण, साथीचा रोग इत्यादींपुरतीच युद्धाची झळ हिंदी जनतेला पोहोचली. या प्रकारच्या हालअपेष्टा हिंदी लोकांना अपरिचीत नव्हत्या. तसेच हिंदी सैनिकांनी परदेशांत ज्या हालअपेष्टा भोगल्या व मृत्युघटना पाहिल्या, त्या त्यांना अशिक्षित असल्याने गद्यपद्यात व्यक्त करणे शक्य झाले नसावे. लढायात सुशिक्षित हिंदी व्यक्तींनी भाग घेतला नव्हता तेव्हा स्वानुभावाधिष्ठित किंवा ‘युद्धस्थ कथा   रम्या’ या उक्तीप्रमाणे सुशिक्षितांनी युद्धवाङ्मय निर्माण केले नसावे. मर्ढेकर यांना महायुद्धाचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता, तरी त्यांच्या काही कविता या काव्यसंग्रहात युद्धाचे दारुण परिणाम व त्यामुळे घडणारे उद्ध्वस्त जीवन प्रकर्षाने प्रकट झाले आहे. हिंदी सैनिक आणि त्यांचे ब्रिटिश अधिकारी यांच्या संबंधाबद्दल ब्रिगेडियर जॉन मास्टर याने राषी लान्सर ही कादंबरी प्रसिद्ध केली. 

यूरोपात ब्रिटिश, फ्रेंच व जर्मन सैनिकांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर अधिष्ठित कथा, कविता व कादंबऱ्यालिहिल्या, उदा., ब्रिटनचे खंदक कवी’ (ट्रेंच सोल्जर्स) रॉबर्ट ग्रेव्हज, सीगफ्रीड सासून, ओवेन, जर्मनीचा एरिख मारीआ रेमार्क यांची ऑल कॉएट ऑन वेस्टर्न फ्रंट ही कादंबरी तर जगप्रसिद्ध झाली, तसेच फ्रान्सचे झा पॉल सार्त्र इत्यादींनीही या दृष्टीने निर्मिती केली आहे. वरील राष्ट्रांचे वाङ्मय, कला, तत्त्वज्ञान व इतिहास या प्रकारांत तशी माहिती मिळते. 


आंतरराष्ट्रीय न्याय व संकेत : पहिल्या महायुद्धापूर्वी युद्ध, युद्धतंत्र, युद्धबंदी, नाकेबंदी, युद्ध व सैनिकेतर विषारी वायू युद्धतंत्र [⟶जैव व रासायनिक युद्धतंत्र ] इत्यादीविषयी आंतरराष्ट्रीय स्वरुपाचे कायदे व संकेत प्रस्थापित झाले होते, परंतु या महायुद्धातील अनुभवावरून युद्धपूर्वकालीन कायदे व संकेत यांच्यामध्ये फेरफार आणि सुधारणा करणे भाग पडले. काही नवे कायदे व संकेत स्थापण्याची आवश्यकता भासू लागली. त्यांपैकी महत्त्वाचे नियम व संकेत पुढील प्रमाणे आहेत : (१) हेगचे वायुयुद्ध नियम, (२) अनिर्बंध पाणबुडी युद्धतंत्र, (३) तटस्थता, (४) सुरुंग पेरणी, (५) राष्ट्रसंघचा युद्धविषयक संकेत, (६) युद्धगुन्हे व युद्धगुन्हेगारांना शिक्षा. 

महायुद्धोत्तर जग : महायुद्ध संपल्यानंतर, यूरोपातील स्थिरस्थावरता स्थापण्याची एकच समस्या असल्याचा विजयी राष्ट्रांचा ग्रह झाला. अमेरिकेने विल्सनच्या १४ कलमी शांतता मसुद्यावर भर दिला. त्याप्रमाणे कार्यवाही करणे ही विजेत्या राष्ट्रांची जबाबदारी म्हणून अमेरिकेने यूरोपीय राजकारणातून अंग काढून घेतले. महायुद्धात जरी जर्मनीचा पराभव झाला, तरी त्याची सुप्त शक्ती अबाधित राहिली. जर्मनीच्या अवतीभोवती दुर्बल राष्ट्रे निर्माण झाल्याने, मध्य यूरोपात   जर्मनीकडे धुरीणत्व जाणे अनिवार्य ठरले. रशिया किंवा फ्रान्स ही राष्ट्रे जर्मनीचे पारडे खाली करण्यास असमर्थ होती. 

महायुद्धामुळे ऑस्ट्रिया−हंगेरीचे व तुर्की साम्राज्याचे विघटन होऊन नवीन स्वतंत्र लहान लहान राष्ट्र−राज्ये जन्मास आली, त्यामुळे यूरोपात शांतता नांदेल ही आशा कालांतराने फोल ठरली. यूरोपचा १९१९ वर्षानंतरचा नकाशा अत्यंत गुंतागुंतीचाच झाला. भाषिक, वांशिक व धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रश्नअधिकाधिक गुंतागुंतीचे झाले. उदा., पोलंडमधील श्वेत रशियायी, रशियातील व चेकोस्लाव्हाकियातील नवीन जर्मन राष्ट्रे ‘लोकसत्ताक राज्ये’ म्हणून प्रस्थापित झाली, तरीही कालांतराने तेथे एकपक्षीय किंवा हुकूमशाही शासने आली. 

रशियात ‘समाजवादी किंवा साम्यवादी’ शासन आल्यापासून पारंपरिक पाश्चत्त्य राजकारण व राजकीय संस्था यांना प्रतिस्पर्धी अशी सामाजिक आणि राजकीय व्यवस्था रशियात व जगात स्थापण्याचे लेनिनचे ध्येय होते. रशियातील बोल्शेव्हिक शासन व बोल्शेव्हिक रशियाला पश्चिम यूरोपीय राष्ट्रांनी मनापासून कधीच मान्यता दिली नव्हती. राजकीय दृष्ट्या मात्र दिली होती. पाश्चात्त्य राष्ट्रांच्या दुराभावामुळे रशियाच दुसरे जग निर्माण झाले. लेनिनचे ध्येय साकार होण्यास पाश्चात्त्य राष्ट्रांनी अप्रत्यक्ष साहाय्य दिले. शांतता परिषदेत शस्त्रास्त्रकपात करण्याचे ठराव झाले तथापि ठरावाची अंमलबजावणी प्रत्येकाने आपापल्या राष्ट्रीय स्वार्थाच्या दृष्टीने केली किंवा केलीच नाही. 

स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाची अंमलबजावणी विजयी राष्ट्रांनी सोयीप्रमाणे केली. ब्रिटिश साम्राज्यातील हिंदुस्थानला, मागणी करूनही स्वयंनिर्णयाचे तत्त्व लागू केले नाही. १९१६ साली हिंदुस्थानातील विविध राजकीय गटांनी (उदा., काँग्रेस व मुस्लिम) एकी केली तथापि किमान स्वयंशासनाचे हक्कही हिंदुस्थानच्या पदरात पडले नाही. चीन सार्वभौम राष्ट्र असूनही पाश्चात्त्य राष्ट्रांनी तेथील प्रादेशिक हक्क शाबूत ठेवले, उदा. शांघाय, हाँगकाँग, माकाऊ इत्यादी. 

प्रस्थापित झालेल्या राष्ट्रसंघातून अमेरिकेने अंग काढून घेतले. रशियाला सदस्यत्व देण्यात आले नाही. तेव्हा ब्रिटन, फ्रान्स व इटली या साम्राज्यशाही व साम्राज्याची स्थापना करण्याची इच्छा बाळगणाऱ्या राष्ट्रांचे प्रभुत्व राष्ट्रसंघात स्थापन झाले. यातूनच पुढे दुर्बल राष्ट्रांवर उदा., ॲबिसिनिया, चीन इत्यादींवर आक्रमणे झाली. 

राष्ट्रसंघाची ‘सामूहिक सुरक्षा’ म्हणजे ‘चिरंतन शांततेसाठी चिरंतर युद्ध’ ही घोषणा दुसऱ्या महायुद्धाने खरी केली. 

संदर्भ :

1. Anstey. Vera, The Economic Development of India, London, 1957.  

2. Bainlon, R. H. Christian Aniwdes Toward War and Peace, London, 1961.

3. Bernal, J. D. Science in History, Vol. II. Harnsondworth, 1969.

4. Cohen, Stephen P. The Un-touchable Soldier : Caste, Politics and the Indian Army, Journal of Asian Studies, 28 May 1969, Cambridge.  

5. Dharma Kumar, Ed., The Cambridge Economic History of India, Vol. II, 1757-1970, Hyderabad, 1982.

6. Earle, E. M. Makers of Modern Strategy, Princeton, 1971.

7. Fuller, J. F. C. The Decisive Battles of the Western World. 1792-1944, London, 1972.  


8. Gadgil, D. R. Sovani, N. V. War and Indian Economic Policy, Pune, 1944.

9. Government of India (Publications Division). The Collected Works of Mahanna Gandhi, Vols. XII to XIX New Delhi, 1964-66.  

10. Leigh, M. S. Ed., The Punjab and the War, Lahore, 1922.  

11. Montgomery, Bernard Law, A History of Warfare, London, 1968.  

12. Oppenheim, L. International Law : Vol. II. Disputes, War and Neutrality, London, 1961.

13. Schumpeter, J. A. Capitalism, Socialism and Democracy, London, 1970.

14. Semmel, Bernard, Ed., Marxism and the Science of War, Oxford, 1981.

15. Taylor, A. J. P. The First World War, HarmondsWorth, 1976.

16. Thomson, David, Ed., The New Cambridge Modern History, Vol. XII, Cambridge, 1960.

17. Thomson, David, Europe Since Napoleon, Harmondsworth, 1966.

18. Yinger, J. M. Religion in the Struggle for Power, Cambridge, 1946.

१९. केसरी प्रकाशन, समग्र टिळक : खंड ३, , ६ व ७,पुणे, १९७५-७६.

दीक्षित, हे.वि.