महदंबा : (सु. १२२८−सु. १३०३). आद्य मराठी कवयित्री. महदायिसा ह्या नावानेही ती ओळखली जाते. ही महानुभाव पंथीय होती. लीळाचरित्र, श्रीगोविंदप्रभुचरित्र, स्मृतिस्थळ आणि इतिहास ह्या महानुभावीय ग्रंथावरून तिचे काही चरित्रात्मक तपशील हाती येतात, ते असे : देवगिरीचा राजा महादेवराय यादव ह्याचे पुरोहित वामनचार्य ह्यांच्या कुळात महदंबेचा जन्म झाला. वामनाचार्याचा पुत्र महेश्वरपंडित ह्याला माधवभट आणि बायेनायेक असे दोन पुत्र होते. महदंबा ही बायेनायेक ह्याची कन्या. महानुभाव पंथीयांचे आद्य आचार्य नागदेवाचार्य माधवभटाचे पुत्र होत. म्हणजे नागदेवाचार्य व महदंबा ही चुलत भावंडे. महदंबेला बालपणीच वैधव्य आले. ती अत्यंत विरक्त आणि बुद्धिमान होती, असे महानुभाव पंथीय ग्रंथींतील तिच्यासंबंधीचे उल्लेख पाहून वाटते. लीळाचरित्ररचनेच्या कामी म्हइंभट्टांना तिची बरीच मदत झाली असावी. महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर ह्यांचे प्रयाण झाल्यानंतर ती ऋद्धिपुरास येऊन श्रीगोविंदप्रभूंची (श्रीचक्रधरांचे गुरु) सेवा करू लागली. त्यांच्या मृत्यूनंतर तिचे उर्वरित आयुष्य सामान्यतः निंवा येथे नागदेवाचार्यांच्या सानिध्यात गेले.
महदंबेची ख्याती तिने रचिलेल्या ‘धवळ्यां’वर (कृष्णरुक्मिणी-विवाहावर तिने रचिलेली गीते) मुख्यतः अधिष्ठित आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे ह्या धवळ्यांचे दोन भाग आहेत. साधी, सुंदर रचना हे ह्या धवळ्यांचे लक्षणीय वैशिष्ट्य. धवळ्यांचा पूर्वार्ध पूर्णतः महदंबेचा असून उत्तरार्धाच्या रचनेसाठी म्हाइंभट्ट आणि लक्ष्मीधरभट ह्या दोन महानुभाव पंडितांचे साहाय्य तिला झालेले दिसते. धवळ्यांचा पूर्वार्ध पूर्णतः महदंवेचा असून उत्तरार्धाच्या सचनेसाठी म्हाइंभट्ट आणि लक्ष्मीधरभट ह्या गोन महानुभाव पंडितांचे साहाय्य तिला झालेले दिसते. धवळ्यांचा पूर्वार्ध १२८७ च्या पूर्वी आणि उत्तरार्ध १३०३ च्या पूर्वी रचिला गेल असावा.
महदंबेच्या नावावर मातृकीरुक्मिणीस्वयंवर आणि गर्भकांड ओव्या अशा दोन रचनाही आहेत. कृष्णरुक्मिणीविवाह हाच मातृकीरुक्मिणीस्वयंवराचाही विषय. प्रत्येक ओवीच्या प्रारंभी एक अशा प्रकारे बावन्न मातृका ह्या काव्यात योजिलेल्या असल्यामुळे त्यास मातृकीरुक्मिणीस्वयंवर असे नाव देण्यात आलेले आहे. ह्या काव्यातूनही धवळ्यांचे प्रतिसाद अपिरहार्यपणे उमटलेले आहेत. गर्भकांड ओव्या हे एक आध्यात्मिक प्रकरण आहे.
महदंबेच्या मृत्यूच्या समयी नागदेवाचार्य तिच्या समीप होते, असे दिसते. महानुभव पंथीयांना महदंबेबद्दल फार आदर होता. ज्ञानेश्वर-मंडळात मुक्ताईचे जे स्थान तेच चक्रधर-मंडळात महदंबेचे होते, असे म्हणण्यास हरकत नाही.
संदर्भ : १. देशपांडे, वा. ना. संपा. आद्य मराठी कवयित्री, नागपूर, १९३५.
२. भावे, वि.ल. महाराष्ट्र सारस्वत (आवृ. ६ वी, खंड पहिला), मुंबई, १९८२.
३. भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत [आवृ. ६ वी, दुसरा (पुरवणी, तुळपुळे, शं.गो.)] मुंबई, १९८३.
सुर्वे, भा. ग.
“