महजूर : (१८८५-१९५२). प्रख्यात काश्मीरी कवी. संपूर्ण नाव गुलाम अहमद महजूर. जन्म काश्मीरमध्ये पुलावाम तालुक्यातील मात्रीगाम नावाच्या खेड्यात. फार्सी व उर्दू ह्या दोन्ही भाषांचे त्यांनी घरीच अध्ययन केले. नंतर पटवारी (तलाठी) म्हणून सेवानिवृत्त होईपर्यंत नोकरी केली. पटवारी म्हणून लागण्यापूर्वी दोन वर्षे ते हाजिन येथे होते. ह्या दोन वर्षांच्या काळात त्यांनी दीवान-ए-वह्हाबचा सखोल अभ्यास केला आणि ⇨वह्हाब परे याची शैली व शब्दकळा बऱ्याच प्रमाणात आत्मसात केली. वह्हाबप्रमाणेच ⇨रसूल मीर याच्या रचनेतील भावगीतात्मकता आणि अल्लाम इक्बाल याच्या रचनेतील ऐहिक जीवनातील समस्यांकडे निखळ वास्तववादी दृष्टिकोनातून पाहण्याच्या वृत्तीचा खूपच प्रभाव महजूरवर पडला.
महजूर यांनी आपले सुरुवातीचे लेखन उर्दू व फार्सीत केले तथापि नंतर ते काश्मीरीकडे वळले. पटवारी म्हणून त्यांचा शेतकऱ्यांशी व सामान्य माणसांशी नेहमी व जवळून संबंध येत असे. त्यामुळे त्यांना लोक मानसाचा उत्कृष्ट परिचय घडला. त्यांच्या गीतांतून म्हणूनच लोकमानसाचे प्रतिध्वनि ऐकू येतात. काश्मीरी लोकजीवनाच्या दर्शनाने त्यांच्या संवेदनशील अंतःकरणाच्या तारा झंकृत झाल्या आणि त्यातून त्यांची नितांतसुंदर गीते उत्स्फूर्तपणे बाहेर पडली. त्यांच्या ह्या गीतांतून काश्मीरच्या आशाआकांक्षाच काव्यरूप घेताना दिसतात. परकीय सत्तेचे जोखड झुगारुन देऊन स्वतंत्र होण्याची समाजाची आकांक्षा अत्यंत प्रभावीपणे त्यांच्या रचनेतून व्यक्त होताना दिसते. बुलबुल आणि उद्यान या प्रतिमा−प्रतीकांचा वापर करताना अनेक वेळा त्यांतून काश्मीरी लोक आणि काश्मीर-प्रदेश यांचेच ते संसूचन करतात. राष्ट्रीय भावनेने ओतप्रोत अशी काही गीतेही त्यांनी रचली आहेत. त्यांच्या गीतांतील अवीट गोडवा बहुतांशपणे त्यांच्या मातृभाषेतील म्हणजे काश्मीरीतीलच आहे तथापि पूर्वसूरी काश्मीरी मस्नवी कवींच्या रेख्ता-शैलीची (फार्सीमिश्रित शैली) अंगीकार करून महजूर यांनी तीत आणखीच खुमारी आणली आहे तसेच त्यांनी आपल्या काव्यात नवे विषयही आणले आहेत. ह्या नव्या विषयांत आधुनिकतेचे स्पष्ट प्रतिबिंब पडलेले दिसते. त्यांच्या गीतांतील अवीट गोडवा आणि मधुर संगीत यांनी काश्मीरी भाषिकांना १९४० पासून अक्षरक्षः वेड लावले. कोणाही समकालीन कवीला महजूरइतकी व्यापक व चिरस्थायी स्वरुपाची लोकप्रियता लाभली नाही. राष्ट्रीय आशा-आकांक्षांशी व काश्मीरच्या संस्कृतीशी महजूर एकरूप झाले होते. त्याचे पडसादही त्यांच्या गीतांतून उत्स्फूर्तपणे उमटले. त्यामुळेच ‘शायर-ए-काश्मीर’ असा त्यांचा गौरवपूर्ण निर्देश केला जातो.
स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय पुढारी आणि त्यांचे वर्तन पाहून महजूर यांचा पुरता भ्रमनिरास झाला. अत्यंत व्यथित अशा मानसिक अवस्थेत त्यांचे निधन झाले. त्यांचे दफन त्यांच्या मूळ मात्रीगाम येथे प्रथम केले गेले तथापि शासनाने त्यांचे कफन अथवाजन नावाच्या खेड्यात नेऊन तेथे दफन केले. अथवाजन येथे स्वतंत्र काश्मीरची शेवटची साहित्यसम्राज्ञी ⇨हब्बा खातून (सु. १५५०−सु. १६०७) हिची कबर असल्याचे परंपरेने मानले जाते. म्हणूनच काश्मीरच्या ह्या लाडक्या कवीचेही दफन तेथेच केले गेले.
कलाम-ए-महजूर हे महजूरच्या सर्वच काव्यरचनांच्या संग्रहांना उद्देशून वापरले जाणारे सामान्य नाव होय. पी. एन्. पुष्प यांनी महजूरच्या जीवनावर व ग्रंथरचनेवर १९५६ मध्ये एक पुस्तिका प्रसिद्ध केली. तमीर (१९५६) ह्या एस्. ए. शमीम संपादित वार्षिकात महजूर यांच्या जीवनाच्या सर्वच अंगांची माहिती आली आहे. काश्मीरी भावगीतात्मक काव्यातील महजूर यांचा वारसा नंतरच्या सर्वच काश्मीरी कवींनी चालविला. त्यांच्या काव्यातील प्रतीकात्मक आवाहान आणि प्रभावी विचारप्रबोधन यांचा प्रभाव इतर सांस्कृतिक क्षेत्रांवर पडल्याचे दिसते. यामुळे केवळ काश्मीरी साहित्यातच नव्हे, तर काश्मीरच्या इतर सांस्कृतिक क्षेत्रांतही अनेक नवे प्रवाह निर्माण केले.
हाजिनी, मोही-इद्दीन (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)
“