मश्रू : एक भारतीय कलापूर्ण वस्त्रप्रकार. कलात्मक विणीच्या दृष्टीने मश्रू व हिमरू यांत बरेच साम्य असते. इस्लाम धर्माप्रमाणे शुद्ध रेशमाचे हिमरू वस्त्र परिधान करणे निषिद्ध असल्याने त्याला पर्याय म्हणून मश्रू या मिश्र वस्त्रप्रकाराची निर्मिती झाली. मश्रू (मश्रू.अ) या अरबी शब्दाचा अर्थ ‘धर्मशास्त्राला अनुसरून केलेले’ असा आहे. त्यानुसार मश्रू हे वस्त्र गर्भरेशमी न करता रेशमी व सुती असा मिश्र धागा त्यात वापरतात. हे कापड अतिशय मुलायम, तलम आणि वजनाने हलके असते. इतिहासकालात मुसलमानी राजघराण्यातील पुरुष, सरदारदरकदार व वरिष्ठ अधिकारी व्यक्ती आपल्या वस्त्रप्रावरणांसाठी मश्रू कापडाचा वापर करीत. अलीकडे मात्र याचा वापर सर्रास सर्वत्र झाला आहे. तसेच संमिश्र धाग्यांऐवजी संपूर्ण रेशीम वापरूनही मश्रू कापडाची निर्मिती करण्यात येते.

काही ठिकाणी मश्रूला ‘गिरवी’ असेही म्हणतात. लांबी प्रायः ५.५ मी. व रुंदी ९१ सेंमी. असली, तरी काही वेळा लांबी ३६.६ मी. व रुंदी ०.९ मी. असल्याचे आढळते. या कापडाचा ताणा बांधणीपद्धतीने गाठी मारून रंगविण्यात येतो तर बाणा केवळ रंगवूनच तयार करतात उभे धागे विणल्यावर त्यातून नक्षीकाम दृग्गोचर होईल, अशाच रीतीने गाठी मारून बांधणी पद्धतीने ते तयार करण्यात येतात. मश्रूच्या विणीचा आणखीही एक प्रकार आहे. त्याला सॅटीन म्हणतात. या प्रकारात रेशमी सुताचा ताणा तयार केल्यावर प्रत्यक्ष वीण मात्र रेशमी वा सुती धाग्याने करतात त्यामुळे वस्त्राचे पोत एकदम मऊ व चकचकीत दिसते. या कापडाची लांबी हवी तेवढी ठेवता येते. मात्र रुंदी फक्त ५० सेंमी . एवढीच असते. सॅटीन मश्रूचा वापर स्त्रियांचा पायजमा, सलवार व घागरा यांसाठी करण्यात येतो.

आझमगढ व अलाहाबाद येथील ‘संगी’ हा आणखी एक लोकप्रिय प्रकार. यामध्ये मश्रूच्या विणीचीच नक्कल असून लहरींचे विणकाम हे याचे खास वैशिष्ट्य असते. त्याला ‘खंजिरी’ म्हणतात. सुमारे १९ सेंमी. पट्ट्यात प्रायः ३० ते ४० लहरी असतात. ४५ लहरींचे मश्रू विरळच आढळतात. या लहरी जेवढ्या बारीक आणि त्यांची संख्या जितकी जास्त, तितकी त्याला मागणी अधिक असते. त्यातून जललहरींची लय जाणवते. एक रंगीत लाट वरून खाली सरकत आहे, असे पाहणाराला वाटते. भडक तांबड्या पार्श्वभूमीवर फिकट पिवळ्या रंगाच्या लहरी उठविल्या असतील, तर त्याला ‘सुर्ख जर्द’ असे म्हणतात. कधी कधी फिकट गुलाबी पार्श्वभूमीवर पिवळ्या रंगाचे अथवा रंगीबेरंगी ठिपके देऊनही नक्षी चितारण्यात येते. हे ठिपके आळीपाळीने चार बारीक व त्यानंतर दोन मोठे अशा क्रमाने देण्यात येतात. निर्मितीच्या दृष्टीने संगी मश्रूचा हा सोपा पण लोकप्रिय प्रकार होय. ‘गुलबदन’ हाही एक मश्रूचा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार मानण्यात येतो.

पहा : किनखाबवस्त्रकला.

मोरालवार, वासुदेव जोशी, चंद्रहास