मरुभूमि युद्धतंत्र : मरूभूमी म्हणजे वाळवंटी प्रदेश. अशा प्रदेशाच्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीला अनुसरून युद्ध लढविण्याचे जे तंत्र, ते मरूभूमी किंवा वाळवंटी युद्धतंत्र होय. मरूभूमी प्रदेशात नित्य अनुभवास येणाऱ्याबाबी उदा., हवापाणी, दैनंदिन तपमान, ऋतुचक्रांतील बदल, वातप्रवाह, भूपृष्ठात होणारे परिवर्तन इ. प्रभावी घटकांचा अभ्यास करून सैनिकी शिक्षण व प्रशिक्षण, सराव, शस्त्रास्त्रे, वाहने, पुरावठापद्धती, आरोग्य, दळणवळण, आधिपत्य, युद्धनियंत्रण वगैरे बाबींत योग्य असे फेरफार करावे लागतात. भारताचा वायव्येकडील प्रदेश ( सौराष्ट्र – राजस्थान ) म्हणजे थर मरूभूमी ही ⇨पाकिस्तानच्या सिंध व पंजाब या राज्यांना लागून आहे, म्हणून भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने मरूभूमी युद्धतंत्र महत्त्वाचे ठरते.
भौगोलिक परिस्थिती : पृथ्वीवर आफ्रिकेतील सहारा ते भारतातील थर वाळवंट एवढा मोठा भूभाग वाळंवटी आहे. या वेगवेगळ्या ठिकाणाच्या मरूभूमीत एवढेच नव्हे, तर एकाच मरूभूमीच्या वेगवेगळ्या भागांतील भूपृष्ठात विविधता असते सतेच तेथील जमिनीचे प्रकृतिमानही ( क्षारयुक्त, निव्वळ रेती इ. ) एकाच प्रकारचे नसते. उजाड, खडकाळ भूपृष्ठभागावर हालचाल करणे कठीण नसते परंतु ज्या भागातील वाळू फिरत राहते, तेथे हालचालींवर कडक निर्बध येतो. त्यावेळी कित्येक जागी पायी हालचाल करणेसुद्धा अशक्यप्राय वाटते. समुद्रालगतच्या मरूभूमीत उदा., कच्छचे रण. ऋतुचक्राप्रमाणे येथे खारे पाणी शिरते. जमिनीवरील हालचाल तसेच दळणवळणही बंद पडते आणि विमान व हेलिकॉप्टरद्वारेच फक्त हालचाल शक्य होते. सपाट भूपृष्ठावर नैसर्गिक अडथळे नसल्यामुळे व पृष्ठभूमी हालचालीस अनुकूल असल्यास हल्ला करणे सुलभ जाते. वाळूचे ढिगारे व टेकड्या यांवर रणगाडे तसेच सैनिकी मोटारगाड्या नेणे शक्य असते. वाळूच्या ढिगार्या – टेकड्यांच्या बाजूने वाहने जाऊ शकतात कोरडे नदी – नाल्यांसारखे अडथळे सहज ओलांडणे कठीण जाते. टेकड्यांवर पावसाळ्यांखेरीज कसलीही वनस्पती उगवत नाही. होकायंत्र व तार्यांचा वेध घेऊनच प्रवास करावा लागतो. दृष्टीक्षेप क्षितिज मोठे असते. उंच जागांना अत्यंत महत्तव असते. उन्हाळ्यात दुपारचे तपमान ३४ ते ५० से. पर्यत चढते. रात्रीचे तपमान उणे २. ८ से. पर्यत घसरते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यतचा काल प्राणिमात्राला सुसह्य असतो. बारमेर, जैसलमीर, बिकानेर व नागौर येथील थर मरूभूमीची वाळू क्षारयुक्त आहे. मरूवप व वाळवंटी विहिरी ( अरबी भाषेत बीर ) खेरीज पाणी मिळत नाही. विहिरी अतिशय खोल असतात. पाणी कोमट –कढत, मचूळ आणि खारट लागते. पाण्यामुळे पोटाचे विकार लवकर जडतात. धुळीची वादळे दोन ते पाच तासांपर्यत टिकतात व युद्धकार्यात खंड पडतो. खुरट्या झाडाझुडपाखाली लपून राहणे शक्य नसते. नैसर्गिक आवरणाच्या अभावामुळे मायावरण [ ® मायावरण, सैनिकी ] वा फसवणूक यांसारख्या युक्त्यांना आगळे महत्त्व असते. सैनिकी गणवेश आणि सांग्रामिक साहित्याची रंगभूषा मरूभूमीच्या पार्श्वरंगाला साजेशी करावी लागते. हालचाली व सैनिकी एकत्रीकरण यांचा सुगावा जमिनीवरून तसेच आकाशातून लागतो. बहुतेक हालचाली सूर्यास्तानंतर कराव्या लागतात. नैसर्गिक साधने संपत्तीची वानवा असल्यामुळे सर्व सामग्री बाहेरून आणावी लागते. रस्ते, रेल्वे वगैरे दळणवळणाची साधने तुटपुंजी असतात. त्यामुळे सैनिकसंख्या व युद्धोपयोगी सामान यांच्या पुरवठ्यावर मर्यादा पडते. आघाडीवर विमानतळ मोठ्या संख्येने बांधणे शक्य नसते. मरूभूमीच्या परिस्थितीमुळे पोटदुखी, गळवे, वाळवंटी ताप तसेच माशा यांमुळे सैनिक त्रस्त होतो. त्याला नकाशावाचन, मार्गदर्शन व लक्ष्यनिर्देशन बिनचूक करता येत नाही. धूसर वातावरण व मृगजळ यांमुळे बाँबफेक आणि गोळामार यांत व्यत्यय येतो. मरूभूमी व समुद्रपृष्ठ यांमध्ये बरेचसे साम्य आहे. मरूभूमीयुद्धात इतर युद्धआघाड्यांसारख्या आघाड्यांना बगला नसतात, त्यामुळे शत्रूच्या बाजूस कोठूनही घुसणे शक्य असते. मरूभूमीचा हा आगळेपणा लक्षात ठेवून बचाव व हल्ला – कारवाया – तंत्र सिद्ध होते. आधुनिक मरूभूमी युद्धतंत्राची पुढील सूत्रे सर्व कारवाया तंत्रांना लागू पडतात. मरूभूमीची पूर्वसवय होणे व तेथील परिस्थितीशी तादात्म्यपावणे, अशा तर्हेने सैनिकाचे प्रशिक्षण झाले पाहिजे. रसदपुरवठा खंडित होता कामा नये.
सामग्रीची झीज कमी करणे व दुरूस्ती त्वरेने व्हावी लागते. मोठ्या प्रमाणावर क्षेत्र काबीज केल्याने अखंडित रसदपुरवठा व निर्विचन दळवळणाची समस्या अधिक गंभीर होते. शत्रूच्या हालचाली आणि रसदपुरवठा यांना पायबंद बसेल अशी क्षेत्रे तसेच मोक्याच्या जागा काबीज करणे फायदेशीर ठरते. पायदळ व रणगाडे यांच्या सर्व कारवायांना वायुसेनेचे साहाय्य देणे अत्यंत आवश्यक असते.
बचावात्मक तंत्रदृष्ट्या पाणी पुरवठ्याच्या जागा व विहीरी, दळणवळणणाची केंद्रे, विमानतळ यांच्या रक्षणास शेकडो किमी. उजाड भूभागापेक्षा येथे अधिक महत्त्व असते. आगामी चढायांसाठी, उंचवटे ताब्यात ठेवल्याने शत्रूच्या हालचालींवर वचक बसवून आपले टेहळणी व गस्तीकार्य अवाधित ठेवता येते. नैसर्गिक अडथळे नसल्यास खंदक व सुरूगांचा उपयोग करून शत्रूच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येते. भुसभुशीत मरूभूमीत व सुरूगक्षेत्रात शत्रूचे रणगाडे आणि पायदळ यांना आणणे महत्त्वाचे असते. कारण अशा अवघड जागी त्यांचा नाश करणे सोपे जाते. स्वबाजूला वगला नसल्यामुळे शत्रू कोठूनही आत घुसू शकतो म्हणून सर्वच मोर्चे चहुबाजूंनी संरक्षणक्षम असले पाहिजेत. मोर्च्यामधील भूभागात सुरूंग पेरतात. घुसखोरीला आळा घालण्यासाठी गीतशील राखीव दले तयार ठेवावी लागतात. आकस्मिक हल्ले टाळण्यासाठी गस्त, टेहळणी व आघाडीवर आवश्यक सैन्य – दलांची ( कव्हरिंग ट्रुप ) व्यवस्था करावी लागते. मायावरणाने शत्रूला चकविता आले पाहिजे. बचावासाठी शत्रूच्या मोर्च्यावर वायुहल्ले करणे लाभदायक असते. फार काळ बचावात्मक धोरण चालू ठेवणे धोक्याचे ठरते. बचावात्मक धोरणाबरोबर पुढील आक्रमक चढायांची पूर्वतयारी करणे अगत्याचे असते.
आक्रमक हल्ले करण्यापूर्वी शत्रूची फसवणूक करण्याकडे लक्ष द्यावे लागते. नेमक्या कोठल्या जागी व केव्हा हल्ला होईल, तसेच हल्ला करणाऱ्यासैन्याचे बळ व हल्लापद्धती यांचाही मागमूस शत्रूला लागता कामा नये. त्यामुळे शत्रू गोंधळतो व त्याच्या बचावात्मक योजना अपूर्ण राहू शकतात. शुल्कपक्षात हल्ला करणे सोयीस्कर असते तथापि हल्ली कृत्रिम चंद्रप्रकाश निर्माण करता येतो. शत्रूच्या सुरूंगक्षेत्रांचे ज्ञान असणे आवश्यक असते त्यांच्यातून रणगाडे आणि पायदळ यांसाठी मार्ग तयार करावे लागतात. हल्ल्यात रणगाडे व पायदळ यांची फारकत होता कामा नये. फसवणुकीच्या कार्यक्रमात शत्रूवर वायुहल्ले, तोफगोळामार, गस्ती सैन्याच्या खऱ्याएकत्रीकरस्थांनाची इतरत्र नक्कल करणे, रेडिओ-प्रक्षेपणनिर्बध व संदेशसंख्येला चढउतार नेहमीप्रमाणे राखणे, नकली ( डमी ) मोर्चे, विमानतळ, पुरवठाभांडारे, मिथ्या एकत्रीकरणाचे प्रदर्शन व हालचाली इत्यादींवर भर दिला जातो. रणगाडे आणि पायदळी कारवायांना त्वरित सहाय्य देण्यासाठी खोल आघाती व झुंज विमाने ( डीप पेनिट्रेशन स्ट्राईक व फायटर ) रणांगणावरील आकाशात तयार ठेवावी लागतात. शत्रु – विमानांना आकाशक्षेपातून पिटाळून लावता आले पाहिजे. स्वयंचलित रणगाडा व विमानविरोधी तोफा पायदळाबरोबर कूच करीत, शत्रूचे अडथळे व मोर्चे यांचा समाचार घेतात. दुय्यम अधिकारी धडाडीचे तसेच येणाऱ्यासंधीचा फायदा उठविण्याच्या स्वभावाचेही असावे. सैनिकांबरोबर किंवा त्यांच्यापुढे राहून अधिकार्यांनी आधिपत्य व नियंत्रण करणे आवश्यक असते.
उत्कृष्ट सेनापतित्वाइतकेच उत्कृष्ट आयुधे, सामग्री व रसदपुरवठा यांना मरूभूमियुद्धात महत्त्व आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी : मरूभूमी युद्धतंत्राची ऐतिहासिक उदाहरणे पुढीलप्रमाणे देता येतील : हिंदुस्थानावर प्राचीन काली, इ. स. पू. सहाव्या – सतराव्या शतकात इराणी व चोथ्या शतकात ग्रीक आक्रमणे वायव्येकडून झाली. ही आक्रमणे फारतर बिआस नदीपर्यत पोहोचली. त्यांच्या पुढील आक्रमणास एक तर पंजाब व आर्यावर्तातील गणराज्यांनी किंवा थरच्या मरूभूमीचे पायबंद घातला असावा. कुशाण व शकांची आक्रमणे पंजाबातून गंगा-यमुना दुआबच्या पश्चिम बाजूने व अरवलीपर्वतच्या पूर्वेकडील झाली. पंजाबकडून त्यांना सरळ थरच्या वाळवंटातून मध्यदेशावर हल्ले करणे शक्य झाले नाही. सौराष्ट्र, लाट ( गुजरात ) यांवरील आक्रमणे आग्रा –उज्जैन म्हणजे माळव्यातून झाली. ऐतिहासिक निर्णायक लढाया कुरूक्षेत्रातच झाल्या. ८ व्या शतकात मुहंमद कासीमने बलुचिस्तानच्या मकरान किनारा प्रदेशातून सिंधवर हल्ला केला परंतु हे अरबी आक्रमण मुलतान ते सिंधपुरतेच मर्यादित होते. पुढे अरबांनी समुद्रमार्गाने सैराष्ट्रावर नाविक आक्रमणे केली तथापि ता अपयशी ठरली. मुहम्मद गझनी याने अकराव्या शतकात मुलतान काबीज केल्यानंतर थर मरूभूमीतून सरळ चौहानांची राजधानी सांभर ( अजमीर ) पादाक्रांत केली. सांभर घेतल्यानंतर परत वाळवंटातून त्याने अनाहिलवाढ घेऊन सोरटी सोमनाथ मंदिर लुटले. या आक्रमणाकरिता त्याने पाणी व रसदपुरवठ्यासाठी ३०, ००० उंट वापरले होते परंतु तत्कालीन परिस्थितीत दाणावैराणपाणी यांची दररोजची गरज हिशेबात घेतल्यास हे खरे वाटत नाही. मुहम्मद गझनीने सोरटी सोमनाथ वर स्वारी करणे वकच्छच्या रणातून परत मुलतानकडे जाणे ही माहिती एकांगी वाटते. मराठ्यांच्या पुणे ते अटकपर्यतच्या चढाया थरचे वाळवंट टाळून दक्षिण माळवा, आग्रा, लहोर या पारंपारिक मार्गानेच झाल्या. १९६५ च्या ⇨भारत – पाकिस्तान संघर्षात कच्छ रणात किरकोळ लढाया झाल्या. कच्छ रणावरील पाकिस्तानचे आक्रमण ही एक फसवणूक होती. त्यावेळी जर कच्छच्या रणातील सैन्याला मदत करण्यासाठी भारतीय नेत्यांनी काश्मीरमधील सैन्य काढले असते, तर पाकिस्तानच्या काश्मीरवरील खऱ्यालढाईस पायबंद घालण्यासाठी भारताला सैन्याचा मोठा तुटवडा पडला असता परंतु तसे न केल्यामुळे परिणामत : पाकिस्तानला १९६५ साली हार खावी लागली. १९७१ च्या भारत – पाकिस्तान युद्धात राजस्थानच्या बारमेर व जैसलमीर रणात लढाया झाल्या. वाळूच्या उंच ढिगार्यावर लोंगेवाला, तनोट इ. ठिकाणी भारताने मोर्चेउभारले होते. पाकिस्तानी रणगाडा –हल्ले भारतीय पायदळाने लढाऊ विमानांच्या साहाय्याने मोडून काढले व पुढे सिंध प्रांतात इस्लामकोट, चार्चो, गद्रा व उत्तरेकडील इस्लामगढ पर्यत प्रदेश काबीज केला.
ग्रीक राजा अलेक्झांडरने आरबीला इ. ठिकाणी वाळवंटी प्रदेशात लढाया करून इराणी साम्राज्याचा नाश केला. प्राचीन इराणी साम्राज्याचे रक्षण शेकडो वर्षे वाळवंटामुळे करता आले. पार्थियनांनी रोमन सेनांना भूल दाखवून वाळवंटी प्रदेशात आणले व त्यांचा पुरा पराभव केला. क्रँसस ( इ. स. पू. ५३ )अँटोनी ( इ. स. ३६ ) व अलेक्झांडर सिव्हीरस ( इ. स. २३२ ) हे रोमन, तसेच बायझंटिन सेनापती पराभूत झाले. मध्ययुगीन इस्लाम धर्मियांची आक्रमणे व क्रुसेड्स यांचाही अभ्यास यासंबंधात करणे उचित आहे. पहिल्या महायुद्धात जनरल अँल्नेबीने पॅलेस्टाइन व सिरिया प्रदेशात तुर्काचा पराभव केला. हिंदुस्थानी ⇨घोडदळाने तेथील मरूभूमियुद्धात बहादुरी गाजविली.
दुसऱ्या महायुद्धात उत्तर आफ्रिकेच्या मोरोक्को ते ईजिप्तमधील सहारा वाळवंटाच्या उत्तर विभागात लढाया झाल्या ( १९४० ते १९४३ ). भूमध्य समुद्राच्या दक्षिण किनार्यापासून साधारणपणे दक्षिणेकडील १०० किमी. अंतरापर्यतच्या भूपट्टीत इटली – जर्मनीच्या सेना व ब्रिटिशसाम्राज्य सेना यांच्यात या लढाया घडल्या. किनार्याला जवळ जवळ समांतर अशा खडकाळ टेकड्या आहेत. टेकड्यांची रांग व किनारा यांमुळे बगला, मोर्चे व त्यांच्या सहाय्याने रणक्षेत्रीय तटबंद्या तात्पुरत्या रचता येत तथापि तटबंद्यांना उजव्या किंवा डाव्या बाजूने ( हल्ल्याच्या दिशेप्रमाणे ) वळसा घालून, तटबंद्याच्या पिछाडीस जाता येत असे. दळणवळण व पुरवठा किनार्याच्या लगतच्या पक्क्या रस्त्यावरूनच करता येई. टेकड्यांवरून दळणवळण, पुरवठा तसेच माघार घेत असलेल्या सैन्यावर मारा करणे सोपे जाई. पुरवठा – केंद्रे तुटपुंज्या बंदरांवर ( बेंगाझी, टोब्रुक, अँलेक्झांड्रिया ) आधारित होती. पाणीपुरवठ्याचे नळ सेनेच्या मागोमाग टाकावे लागत. वाळवंटातील बीर समूहाजवळ उंट वाहनांच्या पायवाटा मिळत. अशाच ठिकाणी आघाडीचे विमानतळ असत परंतु साधारणत: बंदरे आणि किनार्याजवळच विमानतळे स्थापले जात. बचावात्मक मोर्चे अंतराअंतरावर बांधण्यात येत. मोर्चे वा किल्ले यांमधील प्रदेशावर जर हुकमत ठेवता आली नाही, तर हे किल्ले बगल किंवा पिछाडीहल्ले करून जिंकता येत ( उदा., इटलीचे लिबियातील किल्ले व त्यांवरील जनरल वेव्हेलचे हल्ले ). रणगाडे, रणगाडाविरोधी तोफा, सुरूंग व बाँबफेकी विमाने यांना जुलै १९४२ पर्यत फार महत्त्व होते. सतत हालचाल व गतिमान युद्धतंत्रावर जर्मन सेनापती रोमेल, ब्रिटिश सेनापती वेव्हेल, ओकॉनर व ऑकिन्लेक यांनी भर दिला.
ब्रिटिश सेनापतींना तोपर्यत सामग्री व सैन्यबळाच्या तुटवड्यामुळे रणगाडे, तोफखाना व पायदळ यांचा समन्वीत व सुसूत्र असा वापर करणे अशक्य होते. तरीही ऑकिन्लेकने रोमेलला पायबंद घातला. जुलै १९४२ नंतर ब्रिटिशांची बाजू सर्व दृष्टीने जर्मनांपेक्षा भक्कम झाली व जर्मनांना एल् अँलामेनच्या लढाईत [⟶ एल् अँलामेनची लढाई ] हार खावी लागून त्यांची एकसारखी पिछेहाट झाली. रोमेलने हॅल्फाया, फुका, मॅर्स मत्रू, एल्आगेला, बुएरात, मॅरेथ इ. ठिकाणी तात्पुरता तटबंद्या उभ्या करून ब्रिटिश सेनेच्या आगेकूचीचा वेग सावकाश करण्याचे प्रयत्न केले परंतु ट्युनिशियात अमेरिकी आणि ब्रिटिश सैन्यांनी जर्मनांची कोंडी केली. अशा प्रकारे हे युद्ध समाप्त झाले. या युध्दात हिंदुस्थानच्या चौथ्या व पाचव्या डिव्हिजनने आणि मराठा चपळ पलटणींनी [⟶ मराठा रेजिमेंट ] शौर्य गाजविले.
पहा : तडित् युद्धतंत्र महायुद्ध, दुसरे.
संदर्भ : 1. Butler, Sir James. Ed., History of SeconEorl War : Unite Kingdom Milliary Series, Volums III, IV an V of various years.
2. Lewin, Ronald. Rommel as Militray Commander, London, 1968 .
3. Mujumdar, R. C. Ed. History an Culure of the Indian people, Vols, Iv an V. Bombay, 1964 an 1957.
4. Montgomery, Sir Bernard, A History of Earfare, London, 1968.
5. Patil, D. K. General, The Lightning Campaign, New Delhi, 1972.
6. Strawson, John, The Battle for North Africa, London, 1969.
7. Wavel, Sir Archibald, Allendy, Oxford, 1941.
दीक्षित, हे. वि.
“