मणिकाम : विविध आकार – प्रकारांच्या व रंगांच्या मण्यांचा वापर करून केलेले सुशोमन. इंग्रजीत बीडवर्क म्हणून या उपयुक्त कलेचा निर्देश केला जातो. बीड हा शब्द मुळात प्रार्थनावाचक आहे. ईश्वरच्या आराधनेत मण्यांची माळ जपण्याची प्रथा असल्याने बीड म्हणजे मणी असा त्याचा अर्थ रूढ झाला.

शिरोभूषणे, वस्त्रप्रावरणे, पादत्राणे, शोभेच्या वस्तू इत्यादींच्या सुशोभनाकडे मण्यांचा कलात्मक वापर करण्याची प्रथा प्राचीन व सार्वत्रिक आहे. प्राचीन ईजिप्तमध्ये मण्याचे भरतकाम केले जाई. काही अमेरिकन इंडियन जमातींत तांबे, बिलोरी काच, वनस्पतींच्या बिया, शंख, शिंपले इत्यादींपासून मणी तयार करून ते कापडावर वा कातड्यावर ओवून किंवा शिवून भरतकाम केले जाई. पुष्कळदा साळूची पिसे व सांबराचे केस मणिकाम विशेष शोभिवंत करीत. तसेच प्रथम आखूड दोऱ्यात मणी ओवून व नंतर ते कातड्यावर शिवून त्यापासून अपेक्षित आकृतिबंध भरण्याची किंवा त्याद्वारे त्याची बाह्यकडा दाखविण्याची प्रथाही त्यांच्यात होती. या आकृतिबंधात एकसारखेपणा यावा म्हणून मण्यांचा क्रम त्यांच्या रंगानुसार लावण्यात येई अथवा एका विशिष्ट संख्येने वापरीत. त्यातून त्रिकोण वा अर्धवर्तुळ म्हणजे पाऊस, नागमोडी रेषा म्हणजे वीज आणि तबकडी म्हणजे सूर्य अशा प्रतीकात्मक स्वरूपाचे तसेच व्यवसायचिन्हनिदर्शक असे आकृतिबंध असत.

यूरोपीय देशांत प्राचीन काळापासूनच मणिकामाची सांगड भरतकामाशी घालण्यात आली होती. त्यासाठी लंबाकार काचमणी, काळी पोत, हिरवे, मणी, आतिशय बारीक मोती, जुनीपुराणी नाणी, अभ्रकाचे तुकडे, जरीची तार, विविध प्रकारचे गवत इत्यादींचा वापर करण्यात येई. मध्ययुगातील मणिकाम केलेले ख्रिस्ती धर्मगुरूंचे टोप उल्लेखनीय होत. प्रबोधन काळातही मणिकाम हे श्रीमंतांच्या वस्त्राभरणाचा एक घटक होता. लहानमोठ्या पिशव्या, मंजुषा, चंच्या – बटवे तसेच अन्य लहान लहान हौसेच्या वस्तू अलंकृत करण्यासाठी बारीक मोती, मणी व जरीची तार यांचा वापर केला जाई. अठराव्या शतकात इंग्लं डमधील मणिकामाला विशेषच चालना मिळाली व करंड्या, पिशव्या, चंच्या, बटवे, गुंड्या अशा नाना प्रकारच्या वस्तू आकर्षकरित्या तयार होऊ लागल्या.तत्कालीन उत्कृष्ट भरतकामाच्या तोडीचे हे मणिकाम मानले जाई.

अन्य यूरोपीय देशांतही मोठ्या आकाराचे दीपाधार, पुष्पपात्रे इ. वस्तू मणिकामाने सुशोभित केल्या जात. इटली आणि सिसिली येथे सोन्याचा मुलामा चढविलेल्या तारा वापरून मणिकाम करण्यात येई. पुढे अठराव्या शतकात यूरोपात व त्यातही इंग्लंडमध्ये मणिकामाला उतरती कळा लागली पण एकोणिसाव्या शतकात पुन्हा ते लोकप्रिय होऊ लागले. घरातील लहानमोठ्या वस्तूही मणिकामाने सजविण्यात येऊ लागल्या. त्यांपैकी रेशीम वापरून केलेल्या मणिकामाचे बटवे बरेच लोकप्रिय ठरले. त्याखेरीज हातमोजे, पायमोजे, छोट्या छत्र्या, स्त्रियांचे पोशाख व वस्तुंवरील आवरणे इत्यादींवर मणिकाम दिसू लागले.

फ्रान्समध्ये १६०० च्या दरम्यान ‘सेबल’ (कृष्णवर्णीय) मणिकाम अतिशय लोकप्रिय होते. हे मणिकाम करताना अतिशय बारीक मणी काळ्या केसात ओवून त्यांचे पेड घालीत. तेराव्या – चौदाव्या शतकात जर्मनीतही मणिकामात मणी आणि जाळी यांचा वापर बराच प्रचलित होता. पुढील काळात फ्रान्स व कॅनडा यांच्या प्रभावामुळे यूरोप – अमेरिकेत पिठूळ व पारदर्शक मण्यांचा वापर विशेष वाढला. शिवाय काळे – पांढरे व अन्य रंगांचे मणी वापरून केलेले वेलबुटीदार नक्षी कामही त्याकाळी रूढ होते. दक्षिण अमेरिकेतील कटिवस्त्रावरील मणिकाम वरच्या दर्जाचे मानण्यात येई.त्यावर भौमितिक आकृत्या असत. विशेषतः स्त्रिया मणिकामाची सांगड लोकरी विणकामाशी घालीत. शिवाय रंगीत मण्यांचे कामही चाले. हे काम जाड्याभरड्या विणीच्या मजबूत गोणपाटावर करण्यात येई. त्याकाळी हे काम सुईचे काम म्हणून प्रसिद्ध झाले. बुद्धिबळाचा पट, मेजपृष्ठाच्छादन, टाचणी – घर, करंडी, कंकणे, कानातील बाळ्या आणि पुरूषांची वस्त्रभूषणे इत्यादींतून वेधक मणिकाम केले जाई. स्त्रिया मखमली कापडावर मेणयुक्त रेशमी व सुती धाग्याच्या साहाय्याने पैलुदार मणी टाचून मनगटी पट्टे वा गळपट्टे बनवीत तसेच शुद्ध रेशीम, जॉजेंट, शिफॉन व तत्सम मुलायम कापडावरील मणिकामही करण्यात येई. त्यासाठी कधी कधी मण्यांबरोबरच भिंगे, काच, कृत्रिम मोती किंवा खडे यांचाही उपयोग होई. उत्तर अमेरिका व ग्रीनलंड येथील एस्किमो लोकांत मणिकामाने आपली पादत्राणे व झगे अलंकृत करण्याची प्रथा आढळते.

आफ्रिकेतील वेगवेगळ्या जातींत मणिकामाची दीर्घ परंपरा आढळते. नायजेरियातील योरूबा शिरोभूषणे, पादावरणे (लेगिंग), पिशव्या इ. वस्तू मणिकामाने अलंकृत करीत. कॅमेरून, झाईरे, काँगो प्रजासत्ताक येथील मुखवट्यावरील मणिकाम तसेच शाही राजमुकुट व झगे हे उल्लेखनीय आहेत. येथे लाल, पोवळे, गोमेद व इतर रत्ने् लावून त्यांना अलंकृत करण्याची प्रथा आढळते दक्षिण आफ्रिकेतील झूलू लोकांमध्ये मणिकामाद्वारे प्रियकराला संदेश देण्याची रीत आहे तर डेबेलमधील गळपट्टी (कॉलर) व झगा यांवरील मणिकाम म्हणजे परदेशी पर्यटकांचे आकर्षणच ठरले आहे. काळे, पिवळे, लाल, निळे मणी व वक्राकार आणि उभट रेषा हे बोर्निओतील मणिकामाचे विशेष होत.

भारतीय मणिकाम : भारतीय मणिकामाला प्राचीन परंपरा आहे. मण्यांचा वापर मुळात यातुविद्यात्मक होत असल्याचे अथर्ववेदातील ‘पर्णमणि’, ‘जंगिडमणि’, ‘शंखमणि’, ‘प्रतिसरमणि’ इत्यादींच्या उल्लेखावरून दिसते.‘मणिबंधन’ नामक सूक्तात मणिबंधनामुळे स्पर्श रोगनिवारण होऊन रोगनाश होतो व दीर्घजीवन तसेच बलप्राप्ती लाभत असल्याचे म्हटले आहे. मणिनिर्मितीच्या कलेचा प्रारंभ कश्यप ऋषीने केला असल्याचा उल्लेख अथर्ववेदात, तर मणी ओवण्याच्या सूत्राचा निर्देश पंचविंश ब्राह्मणात आढळतो. शांखायन आरण्यकातही ‘बिल्वमण्या’ चे वर्णन आले असून त्याचा उपयोग ⇨ ताईताप्रमाणे होत असल्याने तेथे म्हटले आहे. रत्नल या अर्थी मण्याचे उल्लेख ऋग्वेदात, तर रत्न कार म्हणजे मणिकाराचे निर्देश यजुर्वेदात आढळतात. ऋग्वेदात एके ठिकाणी सवितृदेवतेचा रथ सुशोभित करण्यासाठी त्याला जोडलेल्या आणि मण्यामोत्यांनी अलंकृत केलेल्या घोड्यांना ‘कृशनावतः’ म्हटले आहे, तर ‘शंखःकृशानः’ म्हणजे समुद्रोद्भव मोत्यांचे शिंपले ताईताप्रमाणे उपयोगात आणीत असल्याचा निर्देश अथर्ववेदात आणि लोहमणी तांब्याच्या ताईताप्रमाणे वापरीत असल्याचा उल्लेख छांदोग्य उपनिषदात आढळतो.


रामायण – महाभारतादी ग्रंथ आणि त्यानंतरचे अभिजात संस्कृत वाङ्माय यांतही मणिकामाच्या विविध प्रकारांची माहिती आढळते. वात्स्यायनाने आपल्या कामसूत्रात ‘मणिरागाकरज्ञान’ म्हणजे हिरेमाणकांना रंग देण्याचे वा त्यांच्या खनिकर्मांचे ज्ञान यांचा समावेश चौसष्ट कलांमध्ये केला आहे. मौर्य – सातवाहनकालीन मणी मातीचे असल्याचे आणि विविध रंगी खड्यांच्या व अकीकाच्या मण्यांवर रासायनिक प्रक्रिया करून त्यांवर नक्षी काढीत असल्याचे पुरावे सापडतात. मोहें – जो – दडो, हडप्पा, अहिच्छत्र, राजघाट, सांभर पाटणा, उज्ज यिनी, पैठण व कोल्हापूर इ. ठिकाणी सापडलेल्या मण्यांवरून भारतात मणिकाम बरेच प्रगत झाल्याचे दिसून येते.

कच्छ – सौराष्ट्र मणिकामाचे काही प्रकार : १. साख – तोरण (दारावरील तोरण), २. तकिया (उश्यांचे प्रकार), ३. चक्लाभ व गोलिया (चौकोनी व गोल पडदे), ४. खुर्चींवरील गादी, ५. पंखा, ६. गोल उशी, ७. पाछीपटी (कपाटावरील दर्शनी पट्टी), ८. खाटलो (पाळणा).


पुढे सोन्या – चांदीच्या तारा, पोवळे, लाल, पाचू व इतर मूल्यवान रत्ने वा खडे, मोती इत्यादींच्या साह्याने राजमुकुट, देवदेवतांचे पोशाख व अलंकार आणि इतर वस्त्राभरणे अलंकृत करण्याची प्रथा रूढ झाली. रूद्राक्षमाला, मणिमाला, मणिहार, कंठा वगैरे मणिकामाचे असंख्य प्रकार उदयास आले. मध्ययुगीन भारतातील मणिकामाची कीर्ती सर्व जगात पसरली होती.

खंबायतचा स्फटिक, रामपूरचा अकीक, रतनपूरचा राता व लसनी दगड, जयपूरचा याकूत, गारेचे मणी व नर्मदेतील दगडापासून तयार केलेले मणी यांचाही वापर भारतातील मणिकामात केला जाई. त्याला मणेरीकाम असेही म्हणत. चाकूसुऱ्यांच्या मुठी, कागदभारक, पदके, अंगठ्या, बुद्धिबळे, पेले, बशा, ताईत, तोफेच्या लघुकृती, दौती, लेखण्यांच्या दांड्या, पुष्पपात्रे, गळ्यातील माळा इ. वस्तूंवर मणेरीकाम करण्यात येई.

मणिकामाचा उपयोग भरतकामातही होत असे. बारीक पोत, काचेचे रंगीत व लहान – मोठे गोल, लांबट मणी व लांब नळ्या यांच्या साह्याने विविध प्रकारचे भरतकाम होऊ लागले. त्याच रंगाचा दोरा वापरून या कामात औचित्य साधण्यात येऊ लागले. भर घालून केलेले व भर न घालता केलेले असे दोन प्रकारचे मणिभरतकाम अस्तित्वात आले. काचेचे व प्लॅस्टिक मणी तसेच बारीक खोटे मोती वापरून बटवे, चंच्या, तोरणे. तबक, बुधल्या, बाहुल्या, टोप्या, पंखे, साड्यांचे काठ, झबल्यांच्या किनारी, पोलक्याच्या बाह्या, अभ्रे इ. विविध प्रकारच्या वस्तू सजविल्या जाऊ लागल्या.

मणिकामाच्या दृष्टीने भारतात कच्छ व सौराष्ट्र हे प्रदेश अग्रेसर आहेत. हे काम सामान्यतः स्त्रियाच करतात. मणिकाम हे भरतकामाचे एक अविभाज्य अंग मानले जाते, त्याची परंपराही फार जुनी आहे. एखाद्या मणिकामातील आकृतिबंध व त्यातील मण्यांचे आकार प्रकार यांवरून तिचा काळ ठरविणे शक्य होते. पूर्वी येथील मणिकामात ⇨ बांधणी व ⇨ पाटोळा यांतील आकृतिबंध व शैली दिसून येई. पुढे लाकडी वा मातीच्या खेळण्यातील पशुपक्ष्यांच्या प्रतिकृतींची आणि रंगसंगतीचीही त्यात भर पडली आणि शेवटी मणिकामाचे एक स्वतंत्र तंत्रच तयार झाले. येथील मणिकामाच्या तंत्राचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. पहिला एकमणिगुंफनाचा व दुसरा तीनमणिगुंफनाचा. पहिल्या प्रकारात सर्व मणी एकाच ओळीत जवळजवळ बसवितात व पांढऱ्या मण्याच्या पार्श्वभूमीवर आकृतिबंधासाठी विविध रंगी मण्यांचा वापर करतात तर दुसऱ्या प्रकारात आजूबाजूला मणी लावून व फुली टाक्याचा वापर करून एकप्रकारे जाळीकामाचा आभास निर्माण करण्यात येतो. यासाठी प्रायः पिवळ्या, हिरव्या, लाल, जांभळ्या, निळ्या व कचित पांढऱ्या रंगाचे मणी वापरतात. मात्र पांढरा रंग पर्याय म्हणूनच वापरण्यात येतो. दारावरील तोरणासाठी बारीक दुधाळ मणी (किडियु), पारदर्शक मणी (साकरियु), सोनेरी मणी (सोनुयु) उपयोगात आणण्याची प्रथा आहे तर अन्य वस्तूंवरील मणिकामासाठी उच्च प्रतीचे ‘जापला’ किंवा ‘फटकियु’ या सोनेरी मण्यांचा वापर करण्यात येतो. अशा मणिकामात एकप्रकारे रत्नमजडित उठावकामाची आभासनिर्मिती होते. तोरणे, पडदे, पडदी, घोड्यांचे खोगीर, बैलगाडीवरील पडदा हे या मणिकामाचे इतर प्रकार होत.

कच्छी व सौराष्ट्री मणिकामात मूलभूत स्वरूपाची काठी म्हणजे काठियावाडी हीच एकमेव व सर्वांगपरिपूर्ण शैली असून ती पूर्वपार चालत आलेली आहे. तिची निर्मिती भरतकामातील ‘मोची’ नामक शैलीतून झाल्याचे मानतात. ठळक, वेधक व औचित्यपूर्ण आकृतिबंध हे या शैलीचे खास वैशिष्ट्य आहे. तिलाच समकालीन असलेली दुसरी शैली म्हणजे महाजन शैली होय. हिची वाढ व वापर समुद्रकिनाऱ्यालगत झाला. पोरबंदर, मांगरोळ व वेरावळ (सौराष्ट्र) आणि मांडवी (कच्छ) ही या शैलीची केंद्रे होत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात आफ्रिका व अरबस्तान यांच्याशी आलेल्या संपर्कामुळे या ठिकाणी प्रथमच इटलीमधील मणी आले व त्यांचा वापर करून महाजन शैलीने आपले वेगळे स्वरूप प्रकट केले. दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास जैन व वैष्णव महाजन लोकांनी या शैलीतील मणिकामाचा वापर घरातील शोभेच्या वस्तू सजविण्याकडे केला. यातील कलाकृतींचा ढंग काठी शैलीतून उचललेला असला, तरी आविष्काराच्या बाबतीत फरक असल्यामुळे महाजन शैली ही एक मिश्र शैली बनली. पुढे महाजन शैलीतून ओंकार वा स्वस्तिकांसारखी प्रतिकेही वगळण्यात आली. मेमन शैलीचा उदयही विसाव्या शतकाच्या प्रारंभीच झाला. मेमन लोकांनी काठी शैलीतील मनुष्याकृती व सजीव प्राण्यांच्या प्रतिकृती वगळून विशेष भर भौमितिक आकृतिबंधांवरच दिला तथापि हलक्या दर्जाच्या रंगीत मण्यांच्या वापर व आकृतिबंधातील कलात्मकतेचा अभाव यांमुळे मेमन शैली फारशी प्रभावी ठरली नाही. कन्वी शैलीचा प्रारंभही दुसऱ्या महायुद्धाच्या वेळचाच असून तिला एक प्रकारे हातभागी शैलीच म्हणता येईल. यातील आकृतिबंधही काठी शैलीतूनच उचलले असले, तरी त्यातील गुणवत्तेच्या अभावामुळे ते आल्हाददायक वाटत नाहीत.

कच्छी व सौराष्ट्री मणिकामात व विशेषतः काठी शैलीमध्ये जानपद अभिरूचीचा व जनरीतींचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. सामान्यतः तीन प्रकारांत या वस्तूंची वर्गवारी करण्यात येते. (१) गृहशोभनार्थ केलेल्या वस्तु (२) शोभेच्या इतर वस्तू व (३) पाळीव प्राण्यांसाठी असलेल्या वस्तू. त्यांपैकी गृहशोभनार्थ केलेल्या वस्तूंत चौकोनी पडदा (चक्ला), पार्श्वपट्टी (पाछी पट्टी), पंखा (विंझण), चुंबळ (इंघोणी), बाळाच्या झोळीचे दोर (राश), झोपाळा (पराना), लहानशी खाट (खाटली), झुंबर (टाचकादुम), तोरण (साखतोरण) इ. वस्तूंवरील मणिकाम मोठे वेधक असते. त्यात प्रायः भौमितिक आकृत्या, वेल बुट्या, गणेश वा महालक्ष्मी यांच्या प्रतिकृती उठविण्यात येतात. दुसरा प्रकार दिखाऊ अर्थात शोभेच्या वस्तूंचा असून त्यांमध्ये घोडा, हातातील छडी (पोपटकाठी), वाकडा बेत (गेडी), चेंडू (डाडो), खुळखुळा (घूघरो), चोकणी (चुसनी), भिंगरी (चकरडी), बाहुली (पुतळी), लेखणी (कलम), कलमदान, दौत (खडियो), चाबूक (चाबखा), जाळीदार दिवा (झुमरखा दिवडो), कुंकवाचा करंडा (कंकवती), तिपई, खुर्ची, सुरमादाणी, गुलाबदाणी व टोपली, पक्ष्यांचे पिंजरे इ. वस्तूंचा अंतर्भाव होतो. यांवरील जाळीदार मणिकाम काठी व महाजन अशा दोन्ही शैलींत केले जाते.


तिसऱ्या प्रकारात पाळीव प्राण्यांच्या सुशोभनासाठी अनेक वस्तू करण्यात येतात. उदा., बैलांच्या पाठीवरील झूल, गळ्यातील पट्टे, घोड्याच्या मानेवरील पट्टी (घुघी) व मोठा पट्टा (खंडियु), रिकीब व लगाम, उंटाच्या मुखवट्यावरील पान (मोरो), मोरबंध, गळ्यातील कंठा इत्यादी. या वस्तूंतील मणिकामात शंख व विभिन्न आकारांचे रंगीबेरंगी मणी यांचा वापर करण्यात येतो.

कच्छी व सौराष्ट्री मणिकामात देवदेवता व मनुष्याकृती, प्राणी व पक्षी, वृक्षवेली व वेलबुटी, भौमितिक आकृती आणि संकीर्ण इ. प्रमुख आकृतिबंध आढळतात. देवदेवतांमध्ये गणेश आणि महालक्ष्मी यांचा वापर पूर्वापार केला जातो. यांखेरीज कृष्णाचीही प्रतिमा रूढ आहे. काठी शैलीतील गोपीनाथजी आणि महाजन आणि कन्बी शैलीतील श्रीनाथजी ही एकाच कृष्णाची एकसारखी दोन रूपे असली, तरी गोपगोपीसह दंडिया रास खेळणारा श्रीकृष्ण, नंदयशोदेसह झोपळ्यावर बागडणारा बाळकृष्ण आणि कुंजवनात राधेला भेटणारा राधाकृष्ण अशीही त्याची विविध रूपे मणिकामात पाहावयास मिळतात. अर्थात या प्रकाराचे मूळ पारंपारिक भरतकामात आढळते. रान्नदे वा रांदल आई ही दुसरी सूर्यदेवता, तर खोडियार किंवा व्याघ्रेश्वरी यांसारख्या अन्य देवदेवताही या मणिकामात दिसतात. 

मनुष्याकृती हे या मणिकामाचे एक वेगळेच आकर्षण आहे. त्यात मातापित्याची कावड वाहणारा श्रावणकुमार, रवी घुसळणारी गृहिणी, झोळीत डुलणारे बालक, बैलांसह परतणारा नांगरधारी कृषिवल, घोडेस्वार, रथारूढ योद्धा, गाडीवान, गोधनामागे जाणारा गुराखी, भालाईत, ढालधारी शिपाई, मृगया करणारा राजपुत्र, सांडणीस्वार इत्यांदींच्या प्रतिमा दिसून येतात.

पशूंपैकी सिंह, हत्ती, घोडा, सांडणी, हरिण, बैल यांच्या प्रतिमांबरोबरच आम्रवृक्षाच्या बुंध्याशी बागडणारी माकडे, वाकड्या शेपटीचे कुत्रे वा ठिपक्यांचा चित्ता अशा वैचित्र्यपूर्ण आकृतीही आढळतात. विविध प्राण्यांच्या रंगीबेरंगी प्रतिकृती उठवून मणिकामात एकप्रकारे गतिमानता व आकृतिबंधात जिवंतपणा आणण्यात येतो. विंचू, बकरा व उंदीर यांनाही या मणिकामात स्थान मिळाले असून बकरा आणि त्याची शिंगे हे सौराष्ट्र मणिकामातील एक खास वैशिष्ट्यच मानले जाते.

पशूंप्रमाणेच पक्षीही मणिकामात आढळतात. प्रायः मोर हा सर्वत्रच असतो. तो कधी पिसारा फुलविलेला तर कधी मान वळविलेला. ऐटदार मोराच्या चोचीत पुष्पमाला म्हणजे बारीक मणिकामाचा एक उत्कृष्ट नमुना होय. अशा प्रकारे सहा विविध तऱ्हांमधून मोराचे सौदर्य या मणिकामात प्रकट करण्यात येते. मोराच्या जोडीला लांडोरही असते. प्रायः मोराच्या जांभळ्या रंगाच्या मानेशी तिच्या पिवळ्या, हिरव्या, लाल रंगांच्या शरिराची व पिसाऱ्याची संगती उत्तम प्रकारे साधण्यात येते. काठावरील मोराकृतींना मोरवेल म्हणतात. मोराच्या खालोखाल पोपटाला महत्त्व असते. यातही विभिन्न प्रकार असतात. दोन्ही पंख पसरलेले व लांब शेपटी असलेले पोपट जणू काही उडण्याच्या बेतात असल्याचाच भास निर्माण करतात. याशिवाय गुलाबफांदीत बसलेला वा पिंजऱ्यात अडकलेला असाही पोपट त्यात असतो. या मणिकामातील मैना कधी एकटी, तर कधी त्यांच्या रांगा अशा स्वरूपात असते. पार्श्वपट्टीची काठकिनार यानेच शृंमगारतात. तिला मैनावेल म्हणतात. याशिवाय हंस, बदक, कोंबडा, कबूतर व चिमण्या इ. पक्ष्यांच्या प्रतिमाही चितारण्यात येतात. त्यांपैकी बदकाच्या मानेचे कडे आणि कोंबडीभोवतीच्या पिलांचा गराडा वैशिष्टपूर्ण वाटतो.

कच्छी व सौराष्ट्री मणिकामात वेलबुटीची नक्षी ही एक आवश्यक बाब मानली जाते. तिचा उपयोग विस्तृत जागेतील पशुपक्ष्यांच्या आकृत्यांचा सुमेळ साधण्याकडे होतो. तसेच तिच्यामुळे लहानमोठ्या मोकळ्या जागांतील पोकळीही भरून निघते. नेहमी वापरात असलेले वृक्ष म्हणजे नारळ, पोफळ, खजूर, आंबा हेच असतात. कधी त्यांच्या फांद्यांचा विस्तार आणि त्यांना लटकलेली फळे हे वैशिष्टपूर्ण रीतीने दाखविण्यात येते, तर कधी ताडामाडाची उंच झाडे व त्यांना लटकलेली पानेफळे भरण्यात येतात. फुलझाडांमध्ये सूर्यफूल, बटमोगरा, गुलाब इत्यादींना विशेष पसंत केले जाते तर वृंदावनातील तुळस ही काठी शैलीतील एक महत्त्वाचे अंग मानण्यात येते. फुलांमध्ये प्रायः चाफा, मालती ही पूर्णोत्फुल्ल फुले असून पानांचा वापर गुंडाळी कामासाठी करतात. त्यांना झारमरवेल म्हणजे कोवळ्या डहाळींची वेल म्हणतात. पानांच्या आकाराची नुसतीच धावदोऱ्याची वळणदार नागमोडी रेषा असेल तर तिला पानवेल व अधूनमधून फुले असल्यास तिला फुलवेल म्हणण्यात येते. जुन्या काळी ‘लिंबोडिनो सोटो’ पद्धतीचे मणिकाम प्रसिद्ध होते. असे वेलबुटीचे काम प्रायः चक्ला आणि पाछीपट्टीत असते. वेलबुटीचा प्रादुर्भाव मणिकामात मोची या भरतकामाच्या पद्धतीतून आला. वेलबुटीमुळे नक्षीकामाचा फैलाव करून रिकामी जागा भरून काढता येते. तोरण, पाछीपट्टी वगैरेंत त्याचा खूप वापर करतात.

संकीर्ण अशा अनेक वस्तूंचा वापर हे या मणिकामाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यामागे तेथील परंपरेने चालत आलेले रीतिरिवाज असतात. उंटगाडी, घोडागाडी, दमणे (बैलगाडी), मेणा, पालखी वैगेरे वाहनांच्या प्रतिकृतींनी मणिकाम सुशोभित करण्याची प्रथा काठी व महाजन या दोन्ही शैलींतून दिसते.

भौमितिक आकृतिबंध हे तर या मणिकामाचे एक अत्यावश्यक अंग आहे. यामध्ये पूर्वीपासूनच तीनमणिसंयोग पद्धतीने ‘अर्ध चंदल’ आणि पाचमणिसंयोग पद्धतीने ‘पूर्ण चंदल’ नामक भौमितिक आकृतिबंध भरण्यात येतात. जेव्हा रूंद काठ अशक्य असतो तेव्हा निरूंद काठावर ‘आकापाका’ नामक नक्षीचा वापर करण्यात येतो. दोन दोऱ्यांच्या मध्यात रंगीत चौकोनांची प्रदीर्घ रांग त्यात भरण्यात येते. यांखेरीज आठ मण्यांचा ‘टिका’, सात मण्यांचे फूल, पैलूयुक्त हिऱ्यांच्या मालिकेची ‘दोदवाडी’, रूंद पद्धतीचा ‘दोदल’ अशा नाना तऱ्हेच्या काठकिनारी मणिकामात भरण्याची चाल आहे. एकूण या कच्छी – सौराष्ट्री मणिकामाने आपले एक स्वतंत्र तंत्र निर्माण करून वेगळेच विश्व थाटलेले आढळते.


महाराष्ट्रामध्ये प्रागैतिहासिक काळातील लोक विविध प्रकारचे दगड, काच, शंख, हस्तिदंत, भुंजित मृद्रा (भाजलेली माती) व अस्थी यांपासून तयार केलेल्या मण्यांच्या माळा वापरीत असल्याचे विविध ठिकाणच्या उत्खननांतील अवशेषांवरून दिसून येते. विशेषतः सातवाहनकाळात लाल, गोमेद, अकीक, स्फटिक, गारगोटी, प्रवाळ, रत्नी इत्यादींचा वापर करून त्यांपासून चपटे, गोल, गोटीवजा, त्रिकोणी व द्विकोनी मणी तयार करण्यात येत. हे मणी तयार करताना त्यांना घासून घासून हवा तो आकार दिला जाई व नंतर त्यांच्या दोन्ही बाजूंनी भोके पाडण्यात येत. नीलाश्म अर्थात लाजवर्दी दगडाचे मणी प्रथमतः याच काळात भारतात आले. हे मणी चपटे वा काटकोनी असून त्यांना तीन किंवा त्यांहून अधिक आडवी छिद्रे पाडलेली असत. याच मण्यांच्या हारांचा उल्लेख पुढे कौटिल्याने ‘फलकहार’ असा केला आहे. काचेच्या मण्यांत हिरवे, काळे, लाल, निळे, पिवळे व पांढरे मणी असत. याशिवाय लाखेचेही मणी तयार करण्यात येत. त्यावर सोन्याचा मुलामा चढवीत अथवा वरून वर्ख लावीत. काही मण्यांमध्ये तर दोन थरांच्या आत वर्ख असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ते हुबेहूब सोन्याचेच वाटत. हा काचमण्याच्या उत्कृष्ट कारागिरीचा नमुना म्हणावा लागेल. अस्थींपासून तयार केलेल्या मण्यांच्या मालेमध्ये मध्यभागी लोलक व ताईत लावीत. हे ताईतही अस्थींचेच असत परंतु काही वेळा मातीपासूनही विशिष्ट प्रकारचे नंदी तयार करीत व ते या मालेच्या मध्यभागी ओवीत. या नंदीच्या गळ्यात आणि पाठीवर अलंकार कोरलेले असत. याशिवाय सिंह, खंजीर, कासव व वाघनख यांच्या आकारांचेही ताईत असत. याच काळात विविध प्रकारचे ‘दृष्टमणि’ ही प्रचलित होते.

सांप्रतही औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा – वेरूळ भागात अकीकाचा दगड विपुल प्रमाणात आढळतो. त्यापासून मणी आणि मण्यांच्या माळा पाचोड या गावी तयार होतात. त्यांचा वापर स्त्रिया व मुलींमध्ये प्रचलित आहे. तसेच हिंदु – मुसलमान स्त्रिया काळ्या पोतीचा वापर ⇨ मंगळसूत्र म्हणून करीत असल्याचीही प्रथा दिसून येते.

आंध्र प्रदेशातील पेम्बार्थी या खेड्यातही मणिकाम चालते. भरतकामातच मण्यांचा वापर करून येथे पूर्वी चोळ्यांवरील नक्षी उठविण्यात येई. अलीकडे मात्र चोळीबरोबरच साड्या, पडदे व चादरी यांसारख्या वस्त्रप्रकारांवरही मणिकाम करण्यात येते. हे मणिकाम तेथे घरोघरी चालत असून त्यावर अनेक स्त्रिया आपला चरितार्थ चालवितात, त्यामुळे तो गृहाद्योगच होऊन बसला आहे. त्यांच्या या वस्तूंना मोठ्या शहरांतून चांगली मागणी असते.

मध्य प्रदेशातील भोपाळ हे पूर्वीपासून जरीकामासाठी प्रसिद्ध आहे. पूर्वी या जरीकामात गुंजांसारख्या वृक्षबियांचा वापर करण्यात येई. अलीकडे त्याऐवजी मणी वापरतात आणि त्यापासून वेधक अशा साड्या व पिशव्या तयार करतात. कुशल कारागिरांनी तयार केलेल्या पिशव्या तर स्वदेशाप्रमाणेच परदेशांतही निर्यात करण्यात येतात.

भारतातील आदिवासी जमातीत मण्यांचा वापर परंपरागत स्वरूपाचा आहे. एक अलंकार म्हणून मध्य प्रदेशातील भिल्ल व मारिया गोंड त्यांचा उपयोग करतात, तर अरूणाचल प्रदेशातील (नेफा) स्त्रिया चोळीवजा हा मण्यांचा पट्टाच धारण करतात.[⟶ आदिवासी].

  

पहा : भरतकाम.

संदर्भ : 1. Dikshit, M.G. Etched Beads in India, Poona, 1949.

            2. Nanavati. J. M. Ed. The Embroidery and Bead Work of Kutch and Saurashtra, Gujarath, 1966.

           ३. देव, शांताराम भालचंद्र, महाराष्ट्र – एक पुरातत्त्वीय समालोचन, मुंबई, १९६८.

           ४. सांकलिया, हसमुख धीरजलाल माटे, मधुकर श्रीपाद, संपा., महाराष्ट्रातील पुरातत्त्व, मुंबई, १९७६. 

जोशी, चंद्रहास


दाया जमात-प्रमुखाच्या तलवारीच्या मुठीवरील मणिकाम, बोनिओ.

दाक्षिणात्य पद्धतीची मोत्यांची माळ व इतर कंठभूषणे, भारत.

केन्यातील मसाई स्त्रियांची पारंपरिक मणिभूषणे.

कापडावरील पाश्चात्त्य पद्धतीचे मणिकाम

सुवर्णमण्याची गळसरी,एटन (पेरू), सु.६ वे शतक.

पू.आफ्रिकेतील तुर्काना जमातीचे मण्यांचे आभूषण.