मकाणा : (हिं.मखाणा गॉर्गोन नट, फॉक्स नट, लॅ. यूरिएल फेरोक्स कुल-निंफिएसी). फुलझाडांपैकी ही वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण होणारी), ओषधीय वनस्पती [⟶ ओषधि] काटेरी व गोड्या पाण्यात वाढणारी असून तिचा प्रसार आग्नेय आशियात झालेला आढळतो. शिवाय मध्य भारत, चीन व अमेरिकेतही ही आढळते. यूरिएल वंशात हीच एक जाती आहे. हिचे मूल झोड (मुळे धारण करणारे जमिनीतील खोड) आखूड व जाड असते. पाने साधी, पाण्यावर तरंगणारी, ०.३-१.२५ मी. व्यासाची, दीर्घवृत्ताकृती किंवा वर्तुळाकृती, वरून हिरवी, खालून लालसर वा जांभळट आणि लवदार असून त्यांच्या शिरांवर काटे असतात. फुले निळसर, जांभळट किंवा तांबडी, ५ सेंमी. रूंद, दिवसा उमलणारी व बाहेरून काटेरी असतात (काट्यामुळे हिला ओरिसात ‘कंटपद्म’ म्हणतात). संवर्त आत तांबूस, पाकळ्या गुलाबी, २०-३० व संदलांपेक्षा आखूड सर्व केसरदले जननक्षम असून किंजपुट अधःस्थ असतो [⟶ फूल]. मृदुफळ लहान, गोलसर, काटेरी व संत्र्याएवढे असून त्यात ८-२० वाटाण्याएवढ्या, काळ्या बिया असतात. हिची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨निंफिएसीत (कमळ कुलात) वर्णिल्यप्रमाणे असतात. हिची अभिवृद्धी (लागवड) बिया लावून करतात. बंगालमध्ये हिला जानेवारी-फेब्रुवारी मध्ये पाने व मे-जूनमध्ये फळे येऊ लागतात.
बिया स्तंभक (आकुंचन करणाऱ्या), शक्तिवर्धक, रेचक असून अनैच्छिक वीर्यपातावर गुणकारी त्या कच्च्या वा भाजून खातात (त्यांच्यासाठी चीनमध्ये फार पूर्वीपासून या वनस्पतीची लागवड केली जाते). बियांचे पीठ ⇨आरारूटाऐवजी वापरतात. ते पौष्टिक व पचनसुलभ असते.
पहा : निंफिएसी.
जमदाडे, ज. वि.