मंदी : कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा प्रतिमाणशी उत्पादन पूर्ण क्षमतेच्या तुलनेने नीचतम पातळी गाठते, तेव्हा त्या स्थितीला ‘मंदी’ असे संबोधण्यात येते. ज्यावेळी उत्पादनसाधने, विशेषतः श्रम हा उत्पादनघटक, उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरली जात नाहीत, ती पडून असतात, त्यावेळी अशा प्रकारची मंदीची वा सौम्य मंदीची अवस्था उद्भवते, असे म्हटले जाते. व्यापारचक्रांच्या सिद्धांतांमध्ये मंदी ही संज्ञा व्यापारचक्राच्या त्या मंदीच्या अवस्थेकरिता वापरण्यात येते, जेव्हा समग्र उत्पादन, रोजगार दर आणि आर्थिक घडामोडीचे इतर घटक हे घसरणीच्या मार्गाला लागलेले असतात. ’डिप्रेशन’ म्हणजेच ‘मंदी’ ही संज्ञा सामान्यतः उत्पादन व रोजगार यांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या घसरणीला लावली जाते, तर ‘रिसेशन’ म्हणजेच ‘सौम्य मंदी’ ही संज्ञा कमी प्रमाणातील घसरणीसाठी वापरतात.
मंदी वा सौम्य मंदी या व्यापारचक्र प्रक्रियेच्या अंगभूत अवस्था असून ही प्रक्रिया औद्योगिक, भांडवलशाही समाजांमध्ये प्रकर्षाने उत्पादन, रोजगार इत्यादींच्या रूपाने प्रकट होत असते. मंदीच्या काळात औद्योगिक देशामध्ये आर्थिक व औद्योगिक घडामोडींनी सर्वांत खालची पातळी गाठलेली असते. कमी उत्पादन, कमी किरकोळ विक्री, प्रचंड बेकारी, अनेक उद्योगधंद्यांच्या वाट्याला आलेले अपयश, ही मंदीची प्रमुख लक्षणे वा वैशिष्ट्ये होत.
दुसऱ्या महायुद्धापूर्वी आर्थिक घडामोडींच्या सर्वसाधारण पातळीमध्ये वारंवार चढउतार-म्हणजेच तेजी व मंदी-साधारणतः सात ते दहा वर्षांनी होत असत. अर्थशास्त्रज्ञांनी या चढउतारांचा अभ्यास करण्यास सुरूवात केली, तथापि त्या काळा रोजगार वा उत्पादन यांसंबंधीच्या अधिकृत आकडेवारीच्या अभावी भावनिर्देशांकांच्या साहाय्याने व्यापारचक्रांचे विश्लेषण करण्याची प्रथा पडली.
मंदीच्या काळात उत्पादनाच्या प्रमाणात समग्र मागणी कमी होते. मंदीचे निरसन करण्याकरिता खाजगी सेवन प्रमाणामध्ये वाढ करून (म्हणजेच प्राप्तिकरांचे प्रमाण कमी करून) समग्र मागणीमध्ये वाढ करणे, खाजगी गुंतवणुकीस चालना देणे (म्हणजेच व्याज दर कमी करणे) किंवा करांमध्ये वाढ न करता सरकारी खर्चात वाढ करणे, यांसारखे उपाय योजण्यात येतात.
मंदी ही संज्ञा शेअरबाजारातील व कृषिउत्पादन विनिमय केंद्रांमधील सर्वांत खालच्या पातळीवर केल्या जाणाऱ्या व्यवहारांनाही संबोधण्यात येते. पुढे भाव उतरातील या अपेक्षेने करारकाळाच्या अखेरीच्या दिवसाआधी माल वा शेअर परत खरेदी करून नफा मिळविण्याच्या उद्देशाने, जो सट्टेबाज आजच्या किंमतीला वायदेबाजारात व शेअरबाजारात विक्री करतो, त्याला ’मंदीवाला’ (बेअर) आणि या स्थितीला ’मंदी’ असे संबोधिले जाते.
पहा : कृषिउत्पादन विनिमय केंद्रे तेजी व्यापारचक्र.
गद्रे, वि. रा.