भुटिया : भारतातील एक आदिम निमभटकी जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे पश्चिम बंगाल व त्रिपुरा या राज्यांत आढळते. त्यांची लोकसंख्या १९७१ च्या शिरगणतीनुसार ३३,९१५ होती. हे लोक मंगोलियन वंशाचे असल्याने पिवळसर वर्णाचे, ठेंगणेच पण मजबूत बांध्याचे आहेत. उत्तम गिर्यारोहक म्हणून त्यांचा ख्याती आहे. भारत-तिबेट दरम्यान तंबाखू, डाळी, पितळ, तांबे, लोखंड आदी वस्तूंची देवाणघेवाण करून त्या पोहोचविण्याचा उद्योग करणे हाच यांचा मुख्य धंदा असून त्या वस्तूंच्या बदल्यात मीठ, बोरॅक्स, लोकर ते घेतात. लोकर कातणे व विणणे ही कामे अमुक्रमे पुरुष व स्त्रिया यांनीच करावयाची असतात. या कामांची अदलाबदल केल्यास निंदास्पद मानले जाते. लोकरीच्या शाली, रग, गालीचे इ. विणण्यात या जमातीतील स्त्रिया कुशल असतात. डोंगर-उतरणीवरची शेती (सोपान शेती) हा यांचा जोडधंदा.
यांच्यात अनेक बहिर्विवाही कुळी असून त्यांना रंथ म्हणतात. गावाबाहेरील मुलामुलींत लग्नसंबंध करतात. मुलगी लहान असतानाच मागणी घालून ती मोठी झाल्यावर लग्नसमारंभात होतो पण अशा विवाहासाठी वधूमूल्य द्यावे लागते. त्यामुळे मुलगी पळवून लग्न करण्याचे-अपहरण विवाहाचे-प्रमाण जास्त आढळते. स्त्री-पुरुषांचे एकत्रित युवागृह ‘रंग-भंग’ या नावाने ओळखले जाते.
या जमातीचा बद्रीनाथ, जोशीमठ इत्यादींसारख्या क्षेत्र ठिकाणांशी संबंध येत राहिल्याने हिंदू चालीरीतींचा पगडा त्यांच्यावर बसत चालला आहे. त्यामुळे धार्मिक आचार-विचारांतही बदल होत आहे.
हिंदूंप्रमाणे ते मृताचे दहन करतात आणि मृताशौच दहा दिवस पाळतात.
संदर्भ : 1. Majumdar, D. N. Races and Cultures of India, Bombay. 1961.
2. Shrivastava, R. P. Marriage and Divorce Among the Eastern Bhotias: The Anthropologist, Vol. IV, No. 1 & 2. March & August 1957, Delhi.
3. Shrivastava, R. P. Rang-Bhang in the Changing Bholia Life : The Eastern Anthropologist, Vol. VI, September 1952 to August 1953, Lucknow.
कीर्तने, सुमति