बॅनर्जी, इंदु भूषण : (? नोव्हेंबर १८९३–१३ नोव्हेंबर १९५६). आधुनिक बंगाली इतिहासकार. जन्म जुन्या कुचबिहार संस्थानातील (प. बंगाल) मेखलीगंज येथे. त्याचे वडील भगवतीचरण बॅनर्जी हे कुचबिहार संस्थानात शिक्षणाधिकारी होते. इंदुभूषणांचे प्राथमिक शिक्षण कुचबिहारमध्ये झाले. १९१६ साली डाक्का कॉलेजमधून ते एम्. ए. झाले. शिखांच्या इतिहासाचे संशोधन करण्यासाठी कलकत्ता विद्यापीठाची प्रेमचंद रायचंद शिष्यवृत्ती मिळवून (१९२१) हे काम त्यांनी १९३९ साली पूर्ण केले व पीएच्.डी पदवी मिळविली. तत्पूर्वीच आशुतोष मुकर्जींनी त्यांची कलकत्ता विद्यापीठात शिखांचा इतिहास शिकविण्यासाठी व्याख्याता म्हणून नियुक्ती केली होती (१९१७). पुढे ते कलकत्ता विद्यापीठातच मध्ययुगीन व आधुनिक इतिहास विभागाचे प्राध्यापक-प्रमुख झाले (१९४८). ते या पदावर निवृत्त होईपर्यंत होते (१९५५).
आपल्या अध्यापकीय कारकीर्दीत त्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिखांच्या इतिहासाशिवाय बंगालचा इतिहास व ईजिप्तविद्या हे विषयही शिकविले. त्यांचा स्वभाव धार्मिक व तत्त्वचिंतकाचा होता. त्यामुळे कोणताही इतिहास समजून घेताना व देताना ते त्यामागील धार्मिक कल्पना प्रथम विचारात घेत. त्यांनी द इव्होल्यूशन ऑफ द खालसा (दोन खंड – १९३६ व १९४७) या परिश्रमपूर्वक लिहिलेल्या संशोधनपर ग्रंथात शिखांच्या धार्मिक इतिहासाचे विवेचन आहे. या ग्रंथाशिवाय त्यांचे विपुल स्फुट लेखन बेंगॉल : पास्ट अँड प्रेझेंट व कलकत्ता रिव्ह्यू या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहे. द सुप्रीम कोर्ट इन कॉन्फ्लिक्ट हा त्यांचा संशोधनात्मक ग्रंथ. अन्नमलई येथील अखिल भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते (१९४५). गुरू नानकपासून गुरू गोविंदसिंगपर्यंतच्या शीख धर्माच्या विकासाचा समग्र व चिकित्सक इतिहास लिहिणारे इंदुभूषण हे पहिले आधुनिक इतिहासकार होत. त्यांचे कलकत्ता येथे आकस्मिक निधन झाले.
संदर्भ : Sen. S. P. Ed. Historians and HistorioGraphy in Modern
शेख, रुक्साना