बलुची भाषा साहित्य : बलुची ही इंडो-यूरोपीय भाषाकुलातल्या इंडो-इराणी शाखेच्या इराणी उपशाखेची एक अर्वाचीन भाषा आहे. अर्वाचीन इराणी भाषांचे पूर्व-पश्र्चिम असे दोन गट मानण्यात येतात. त्यांतल्या पश्र्चिमी गटाची ही भाषा आहे.
बलुचींचा पहिला उल्लेख फिरदौसीच्या शाहनाम्यात आढळतो. ‘बलुची’ ह्या शब्दाच्या अर्थाविषयी अनेक मते आहेत. एका मताप्रमाणे तो शब्द ‘ग्लेच्छ’ शब्दाशी संबद्ध आहे.
बलुची ही मुख्यत्वे पाकिस्तानात बलुचिस्तान येथे बोलली जाते. पूर्व-पश्र्चिम सरहद्दीवर सिंध व इराणच्या काही भागांतही बलुची बोलणारे लोक आहेत. द्राविडी भाषाकुलातल्या ब्राहुई भाषेमुळे बलुचीच्या पूर्व-पश्र्चिम (कोणी यांना उत्तर-दक्षिण असेही संबोधतात) अशा दोन मुख्य बोली आहेत. त्या बोली बोलणारे लोक एकमेकांनी समजू शकत नाहीत, इतक्या त्या भिन्न आहेत.
ह्या भाषेची वर्णव्यवस्था – विशेषतः पूर्वेकडील बोलीची – पेहलवी – सारखी आहे. शब्दसंग्रहात फार्सी शब्दांचा फार मोठा भरणा आहे. फार्सीव्दारा काही अरबी शब्दही बलुचीत आलेले आहेत. ह्यांखेरीज आर्यभारतीय-मुख्यत्वे सिंधी – शब्द बलुचीत आढळतात. बलुची ही इंडो-इराणी शाखेची भाषा असल्याने संस्कृत शब्दांची चटकन आठवण करून देणारे शब्द तिच्यात आहेत – जसे पाद (पाद), ब्रात (भ्रातर्), आप (अप्), मुर्त (मृत), ग्वात (वात), झिदें (हृद्), पचग् (पच्), जनग (हत्).
बऱ्याचशा अर्वाचीन इराणी भाषांच्या व्याकरणात लिंगभेद आढळत नाही, तसा तो बलुचीत पण नाही. नामांच्या प्रथमा व सामान्य अशा दोन विभक्ती आढळतात.
ह्या भाषेत जुने लिखित वाङ्-मय उपलब्ध नाही. काही लोककथा, लोकगीते यांचे अलीकडे प्रकाशन झाले आहे.
संदर्भ : Gilbertson, Major G. W. The Bolachi Language (A Grammar And Manual), Hertferd, 1923.
मेहेंदळे, म. अ.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..