बनावट चलन : (काउंटरफीट करन्सी). खोटे चलन. कोणत्याही खऱ्या चलनाऐवजी बनावट चलन तयार करणे, वापरणे किंवा जवळ बाळगणे हे सर्व गुन्हे होत. बनावट चलन करण्याबद्दल सात वर्षे कारावास व दंड अशी सजा आहे. लबाडीने खरे चलन दुसरेच आहे असे भासविणे हासुद्धा गुन्हा होय. भारतात बनावट चलन तयार करण्याबद्दल कमाल शिक्षा आजन्म कारावास व दंड आहे. बनावट चलन तयार करण्यासाठी उपकरणे विकणे, विकत घेणे, तयार करणे अगर जवळ बाळगणे हे सर्व गुन्ह्यांतच मोडते. लबाडीने बनावट चलन बाळगणे अथवा दुसऱ्यास देणे, हाही गुन्हा होय.

भारताच्या बाहेर बनावट चलन तयार करण्यासाठी भारतात राहून मदत करणे अगर अशा चलनाची आयात अगर निर्यात करणे हादेखील गुन्हा समजला जातो.

भारतीय टाकसाळेतील कर्मचाऱ्याने चलनात ठरवून दिलेले वजन अगर मिश्रण येऊ नये म्हणून केलेले कृत्य अगर चलननिर्मितीची उपकरणे विनाकारण बाहेर नेणे, चलनात अयोग्य वजन अगर मिश्रण येण्यासाठी लबाडी करणे, चलनाचे सहेतुक रूपांतर करणे, चलनाचे बदललेले स्वरूप, वजन अगर मिश्रण माहीत असूनही ते चलन दुसऱ्यास देणे अथवा लबाडीने जवळ बाळगणे, हे सर्व गुन्हेच होत.

भारतीय दंडसंहितेनुसार (कलम ४८९ ए ते ४८९ इ) वरील निरनिराळ्या गुन्ह्यांना निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षा आहेत. त्या किमान तीन वर्षे ते आजन्म कारावास व दंड अशा प्रकारच्या आहेत.

कवळेकर, सुशील