बधेका, गिजुभाई :(१५ नोव्हेंबर १८८५ – २३ जून १९३९). आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील एक आद्य भारतीय कार्यकर्ते. जन्म चितळ (सौराष्ट्र) येथे. वडिलांचे नाव भगवानजी व आईचे नाव काशीबा. गिरिजाशंकर ऊर्फ गिजुभाई यांचे प्राथमिक शिक्षण वेळा येथे व त्यानंतरचे शिक्षण भावनगर येथे झाले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर (१९०५) ते भावनगर येथे त्यांचे मामा हरगोविंद पंड्या यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी गेले. त्यांनी सामळदास महाविद्यालयामध्ये नाव दाखल केले परंतु तेथील अभ्यासक्रम पुरा न करताच त्यांनी महाविद्यालय सोडले व उपजीविकेसाठी आफ्रिकेस प्रयाण केले. तेथील तीन वर्षांच्या वास्तव्यानंतर ते भारतात परत आले (१९१०). आफ्रिकेतील अनुभवांवर आधारित अशी प्रवासवर्णने त्यांनी लिहिली. भारतात परतल्यावर त्यांनी वकिलीचा अभ्यास केला व १९११ पासून वकिलीचा व्यवसाय सुरू केला. पुढे हा व्यवसाय सोडून भावनगर येथील दक्षिणामूर्ती या संस्थेत त्यांनी साहाय्यक अधीक्षक म्हणून नोकरी पतकरली. कालांतराने ते त्या संस्थेत प्राचार्य झाले. १९०२ साली ते हरिबेन यांच्याशी विवाहबद्ध झाले. हरिबेन यांच्या निधनानंतर १९०६ साली जदिबेन यांच्याशी त्यांच्या विवाह झाला. नरेंद्रभाई हा त्यांचा एकुलता एक मुलगा.

वकिलीचा व्यवसाय करीत गिजुभाई स्वतःच्या कचेरीत बसले असता एका लहान मुलाला हातपाय बांधून शाळेत नेत असल्याचे त्यांनी पाहिले. लहान मुलांना अशा तऱ्हेने शाळेत न्यावे लागते, याचे त्यांना फार वाईट वाटले. त्या सुमारास त्यांनी इटलीतील मारिया माँटेसरी यांचे नाव ऐकले होते. माँटेसरी बाईंच्या शाळेत मुले हसत-खेळत जातात, आनंदाने बागडतात हे त्यांनी वाचले होते. भारतातील परिस्थिती त्यापेक्षा वेगळी होती, हे पाहून त्यांनी भारतामध्ये माँटेसरी पद्धतीची बालशिक्षणाची शाळा सुरू करावयाचे ठरविले. ऑगस्ट १९२० मध्ये त्यांनी दक्षिणामूर्ती संस्थेच्या बालमंदिराची स्थापना केली.

गिजुभाईंनी बालशिक्षणाच्या सर्वच अंगांकडे लक्ष दिले. १९२५ साली भारतातील पहिले पूर्वप्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालय (अध्यापक मंदिर) सुरू झाले. श्रीमती ताराबाई मोडक यांच्या सहकार्याने शिक्षण पत्रिका हे शिक्षणविषयक गुजराती मासिक त्यांनी सुरू केले. जुगतराम या सहकाऱ्याबरोबर बालकांसाठी त्यांनी ‘वाचनमाला’ लिहिली. या प्रकारची त्यांची एकूण शंभरांवर पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांत बालनाटके, कथा, लोकगीते इत्यादींचा समावेश होता. त्यांनी पालकांसाठी पुस्तकेही लिहिली आणि प्रौढांसाठी साक्षरतावर्ग चालविले.

गिजुभाईंच्या कार्याने पश्चिम भारतात बालशिक्षणाचा पाया घातला गेला. त्यांच्या कार्यावर ⇨माँटेसरी,फ्रयेल आणि ⇨पेस्टालोत्सी यांच्या विचारांची छाप होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून गुजरात साहित्यसभेने त्यांना रणजितराम सुवर्णपदक आणि दहा हजार रुपयांची थैली अर्पण केली. गिजुभाई बालकांसाठी आईसारखे काम करीत. त्यामुळे त्यांना ‘बालमित्र’ ही पदवी तर मिळालीच पण गमतीने ‘मूछिवाली माँ’(मिशावाली आई) असे नामाभिधान प्राप्त झाले.

गिजुभाईंनी १९३६ साली मतभेदांमुळे दक्षिणामूर्ती ही संस्था सोडली आणि राजकोट येथे अध्यापक मंदिर स्थापन केले. अतिश्रमाने त्यांची तब्येत बिघडली आणि अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : 1. Naik, Chitra, Growing up at Kosbad Hill, Kosbad,1978.

           २. भावसार, सीमाभाई अनु. काशिनाथ त्रिवेदी, बालमित्र गिजुभाई, हिंदी शिक्षण-पत्रिका,कोसबाड, १९५०.

गोगटे, श्री. व.