बंदोबस्त : विशिष्ट प्रसंगी सार्वजनिक शांतता आणि शिस्त राखण्यासाठी पोलीस जी विशिष्ट प्रकारची ‘व्यवस्था’ करतात, तिला सामान्यतः बंदोबस्त अशी संज्ञा आहे. व्यवस्था या अर्थाच्या ‘बंद-ओ-बस्त’ या फार्सी शब्दावरून बंदोबस्त हा शब्द आलेला आहे. बंदोबस्त म्हणजे पोलीस खात्यातर्फे करण्यात येणारा बंदोबस्त. सार्वजनिक स्वरूपाचे धार्मिक सण व उत्सव, राजकीय व शासकीय उच्चपदस्थ व नेते यांचे गमनागमन व जाहीर कार्यक्रम, अशाच दर्जाच्या परदेशी पाहुण्यांचे कार्यक्रम, त्याच्यप्रमाणे राजकीय आंदोलने, मोर्चे, निदर्शने, हरताळ यांसारख्या सार्वजनिक स्वरूपाच्या व महत्त्वाच्या प्रसंगीपोलीस बंदोबस्त राखण्यात येतो. त्याचा हेतू सार्वजनिक शांततेचा भंग होऊन नये आणि नियोजित कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडावेत हा असतो. मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ नुसार बंदोबस्तासाठी पोलीस महानिरीक्षक तसेच जिल्ह्यापुरते जिल्हा न्यायाधीश व पोलीस अधीक्षक यांना प्रत्येक प्रसंगाला व परिस्थितीला अनुरूप विशिष्ट असे आदेश काढण्याचे अधिकार असतात. बंदोबस्त कसा ठेवावा यासंबंधी काही विशिष्ट स्थायी आदेशही आहे. उदा., राज्यपालांच्या कार्यक्रमांच्या वेळी स्थायी आदेश क्र. ५४, दंग्यांच्या वेळी आदेश क्र. ७०, मोर्चा, मिरवणुका इ. प्रसंगी आदेश क्र. १०७, संप, टाळेबंदी या संदर्भात क्र.२ (ड) भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या भेटीच्या वेळी बंदोबस्त करण्याबाबत खास नियमावली असते. भारत सरकारचा गुन्हा अन्वेषण विभाग, राज्यपोलीसांची विशेष शाखा आणि स्थानिक पोलीसदल यांच्याकडे विशिष्ट जबाबदाऱ्यास सोपवलेल्या असतात.
पहा : दंगा,पोलीस, प्रतिबंधक स्थानबध्दता, बेकायदा जमाव, शांतताभंग,
कवळेकर, सुशील