फ्लॉवर, सर विल्यम हेन्री : (३० नोव्हेंबर १८३१-१ जुलै १८९९). ब्रिटिश प्राणिवैज्ञानिक. यांचा जन्म स्ट्रॅटफर्ड-ऑन-ॲव्हन येथे झाला. १८५१ मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठाची वैद्यकशास्त्रातील पदवी घेतली. १८५४ मध्ये ते रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स या संस्थेचे अधिछात्र झाले. यानंतर ते साहाय्यक शस्त्रक्रियाविशारद म्हणून क्रिमियन युद्धावर गेले. तेथून परतल्यावर त्यांची नेमणूक लंडन येथील मिडलसेक्स रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागात झाली. तेथे असताना त्यांचे बरेच संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले. १८६१ मध्ये रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सच्या इंटेरियन संग्रहालयाचे अभिरक्षक म्हणून ते काम पाहू लागले. ब्रिटिश म्युझियमच्या नॅचरल हिस्टरी डिपार्टमेंटचे संचालकपद त्यांना १८८४ साली मिळाले. या पदावर ते १८९८ पर्यंत होते. ते अनेक शास्त्रीय संस्थांमध्ये निरनिराळ्या पदांवर होते. रॉयल सोसायटीचे उपाध्यक्ष, झूलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष, अँथ्रोपोलॉजिकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, हंटेरियन कलेक्शनचे विश्वस्त आणि ब्रिटिश ॲसोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अध्यक्ष ही त्यांनी भूषविलेली काही महत्त्वाची पदे आहेत. १८९२ साली त्यांना के. सी. बी. हा किताब मिळाला.
प्रकृतिविज्ञान संग्रहालयांचे महत्त्व त्यांना पटले होते. सर्वसाधारण मनुष्यास संग्रहालयातील नमुने पाहून ज्ञान होते व संग्रहालयातील सर्व नमुन्यांचा संदर्भ ग्रंथांच्या आधारे अभ्यास करून विशेषज्ञास आपले ज्ञान वाढविता येते, असे त्यांना वाटत असे. या दृष्टीनेच त्यांनी ब्रिटिश म्युझियमचा विकास केला.
इ. स. १८६१ च्या अगोदर फ्लॉवर यांचे प्रसिद्ध झालेले निबंध प्राणिविज्ञानावरील होते. त्यांनी सिटॅसिया या देवमाशांच्या गणाच्या वर्गीकरणाचा, तसेच सस्तन प्राण्यांच्या मार्सुपिएलिया व मोनोट्रिमॅटा या उपवर्गांच्या वर्गीकरणाचाही अभ्यास केला. ब्रिटिश म्युझियममध्ये त्यांनी सिटॅसियाकरिता एक स्वतंत्र विभाग निर्माण केला. त्यांनी मानववंशशास्त्राचाही अभ्यास केला. सर रिचर्ड ओएन व चार्ल्स डार्विन यांचा क्रमविकासासंबंधी (उत्क्रांतीसंबंधी) जो वाद झाला त्यात डार्विन यांचा सिद्धांत बरोबर आहे. हे टी. एच्. हक्सली यांनी दाखवून दिले व यात फ्लॉवर यांनी जमविलेल्या नरवानर गणातील प्राण्यांच्या कवटीचे नमुने बरेच आधारभूत ठरले. फ्लॉवर यांनी आपल्या संशोधनावर आधारित असे मानवजातीचे तीन गट (वंश) निर्माण केले. कॉकेशियन, मंगोलियन व इथिओपियन हे ते तीन गट होत. त्याआधी साठ वर्षांपूर्वी क्युव्ह्ये यांनी हेच गट ठरविले होते.
फ्लॉवर हे खऱ्या अर्थाने शिक्षक नव्हते कारण त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्यास मार्गदर्शन केले नाही पण त्यांनी तुलनात्मक शारीर व शरीरक्रियाविज्ञान या विषयांवर व्याख्याने दिली. त्यांनी ग्रंथलेखनही केले. त्यात घोडे व सस्तन प्राणी यांवरील त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ते लंडन येथे मरण पावले.
जमदाडे, ज. वि.
“