फुजुली : (१४८० ? – १५५६). श्रेष्ठ तुर्की कवी. खरे नाव मोहंम्मद इब्‍न सुलेमान ‘फुजुली’ ह्या टोपण नावाने काव्यरचना. त्याचा जन्म बहुधा करबला येथे झाला असावा. त्याचे वडील सुलेमान हेही एक श्रेष्ठ कवी होते. तो शिया पंथीय होता. त्याने गझला, कसीदे, मसनवी, रूबाया असे विविध काव्यप्रकार हाताळले. लैला मजनू ही त्याची मसनवी विख्यात आहे. भौतिक प्रेमाकडून दिव्य आध्यात्मिक प्रेमाकडे होणारी उत्क्रांती ह्या भावोत्कट काव्यात फुजुलीने प्रभावीपणे चित्रित केलेली आहे. श्रेष्ठ कवी म्हणून जरी त्याचा लौकिक होता, तरी राजाकडून सन्मान किंवा आर्थिक साहाय्य मिळविण्याच्या बाबतीत तो अपेशीच ठरला. शिकायतनामा ह्या आपल्या काव्यात त्याने आपली ही व्यथा व्यक्तविली आहे. स्वतःच्या देशात उपेक्षा झाल्यामुळे इराण, भारत ह्यांसारख्या एखाद्या परदेशात जाऊन राहावे, असेही त्याला वाटत होते परंतु हा विचार अमलात आणण्यापूर्वीच करबला येथे प्लेगने त्याचे निधन झाले.

फुजुलीच्या अन्य तुर्की रचनांमध्ये दीवान, बंगो-व बादा, किर्कहदिस, तर्जुमेसी, शाह-व-गदा, हदीका-तुस-सुदा व मुक्‌तुबात ह्यांचा समावेश होतो. माणसाचे एकाकीपण फुजुलीने आपल्या काव्यातून पुन्हा पुन्हा व्यक्तविले आहे. प्रेम आणि जीवन ह्या दोहोंच्याही मुळाशी दुःख आहे, असे तो मानतो. लौकिक प्रेमाकडून उदात्त, दैवी प्रेमाकडे प्रवास करण्यातच श्रेष्ठ आनंद मिळतो, असा भावोत्कट सूर त्याच्या काव्यात आढळतो. त्याच्या कवितेची ही सारी वैशिष्ट्ये त्याच्या गझलांमधून प्रकर्षाने प्रगटली आहेत. फार्सी आणि अरबी भाषांतही त्याने काव्यरचना केली आहे.

नईमुद्दीन, सैय्यद