फिशर, सर रॉनल्ड एल्मर : (१७ फेब्रुवारी १८९०- २९ जुलै १९६२). इंग्‍लिश सांख्यिकीविज्ञ व आनुवंशिकीविज्ञ. त्यांनी परिमाणात्मक जीववैज्ञानिक प्रयोगांच्या अभिकल्पांसंबधी (आराखड्यांसंबंधी) व त्यांच्या अर्थबोधनासंबंधी महत्त्वाच्या नव्या संकल्पना मांडल्या आणि ⇨ जीवनसांख्यिकी ही अनुप्रयुक्त सांख्यिकीची शाखा प्रस्थापित करण्यात बहुमोल कामगिरी केली. आनुवंशिकीशास्त्राच्या गणितीय सिद्धांताचा पाया घालणाऱ्या शास्त्रज्ञांत ते एक अग्रेसर शास्त्रज्ञ होते.

सरत्यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांनी १९०९ मध्ये केंब्रिज विद्यापीठातील गॉनॅव्हिले अँड कायस कॉलेजात प्रवेश करून १९१२ मध्ये पदवी संपादन केली. १९१३-१५ मध्ये त्यांनी मर्कंटाइल अँड जनरल इन्व्हेस्टमेंट कंपनीत सांख्यिकीविज्ञ म्हणून काम केले आणि १९१५-१९ या काळात माध्यमिक शाळांत अध्यापन केले. १९१९ मध्ये हार्पडन (हर्टफर्डशर) येथील रोथम्पस्टेड एक्सपिरिमेंटल स्टेशन येथे सांख्यिकीविज्ञ म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथे प्रामुख्याने ६६ वर्षांच्या अखंड कृषी प्रयोगांच्या व संबंधित हवामानविषयक नोंदींचे विश्लेषण व अर्थबोधन करण्याचे काम फिशर यांच्याकडे होते. हे काम करीत असताना त्यांनी तत्कालीन सांख्यिकीय तंत्रात क्रांतिकारक ठरलेल्या नवीन कल्पना मांडल्या आणि त्या त्यांनी स्टॅटिस्टिकल मेथड्‌स फॉर रिसर्च वर्कर्स (१९२५ तेरावी आवृत्ती १९५८) या ग्रंथरूपाने प्रसिद्ध केल्या. हा ग्रंथ अद्यापही बहुशः अनुप्रयुक्त सांख्यिकीवरील प्रमाणभूत ग्रंथ म्हणून मानला जातो. रोथम्पस्टेड येथील १५ वर्षांच्या त्यांच्या कार्यामुळे त्यांची जगप्रसिद्ध सांख्यिकीविज्ञांत गणना होऊ लागली. याच सुमारास उच्च दर्जाचे आनुवंशिकीविज्ञ म्हणूनही त्यांनी नाव मिळविले. १९३३ मध्ये लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजामध्ये सुप्रजाजननशास्त्राचे (मानवजातीची आनुवंशिकी सुधारण्याच्या दृष्टीने पुढील पिढ्यांच्या आनुवंशिक लक्षणांवर प्रभावी परिणाम घडवून आणणाऱ्या प्रक्रियांचा उपयोग करण्यासंबंधीच्या शास्त्राचे) प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले. दहा वर्षांनी केंब्रिज विद्यापीठात आनुवंशिकीचे आर्थर बॅल्फुर प्राध्यापक म्हणून त्यांची निवड झाली. १९५९ मध्ये निवृत्त झाल्यावर शेवटची तीन वर्षे ऑस्ट्रलियामध्ये ॲडिलेड येथील कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या गणितीय सांख्यिकी विभागात त्यांनी संशोधक म्हणून काम केले.

फिशर यांनी सांख्यिकीय गृहीतकांच्या कसोट्यांसंबंधी [→ सांख्यिकीय अनुमानशास्त्र] महत्त्वाचे सिद्धांत मांडले. कार्ल पीअर्सन (१८५७-१९३०) यांनी शोधून काढलेली काय-वर्ग (X2) कसोटी ही मोठ्या आकारमानाच्या (म्हणजे ज्यातील निरीक्षणांची संख्या मोठी आहे अशा) प्रतिदर्शाच्या (नमुन्याच्या) बाबतीत उपयुक्त आहे. तथापि जीववैज्ञानिक सामग्री लहान आकारमानाच्या प्रतिदर्शाच्या रूपांतच उपलब्ध होत असल्याने व अशा सामग्रीत स्वाभाविक चलनशीलता अंतर्भूत असल्याने तीवरून काढलेल्या निष्कर्षात बरीच अनिश्चितता असे. यामुळे प्रयोगांच्या अभिकल्पात यदृच्छेच्या तत्वाचा [→ प्रयोगांचा अभिकल्प ] उपयोग केल्यास सांख्यिकीय तंत्राने अचूकतेचे परिमाणात्मक निर्धारण करणे शक्य होईल, असे फिशर यांनी प्रतिपादन केले. समष्टीतून (विविध वैज्ञानिक निरीक्षणांच्या समूहातून) घेतलेल्या लहान प्रतिदर्शाच्या विचरणाची कसोटी घेण्यासाठी त्यांनी मांडलेली F गुणोत्तर कसोटी ही प्रयोगाची संपूर्ण समष्टी उपयोगात आणत असल्याने व्यापक प्रमाणावरील उपयुक्ततेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली . F गुणोत्तर कसोटीवर आधारित असलेल्या ⇨ विचरणाचे विश्लेषण व सहविचरणाचे विश्लेषण या पद्धती प्रयोगांच्या अभिकल्पाच्या सिद्धांतात अतिशय महत्त्वाच्या आहेत.

गणितीय सांख्यिकीमध्ये फिशर यांनी सहसंबंधांकाचे सम्यक प्रतिदर्शी वंटन तसेच समाश्रयणांक, आंशिक व बहुचर सहसंबंधांक यांसारख्या फलनांची वंटने [→ वंटन सिद्धांत] मिळविली. सांख्यिकीय अनुमानशास्त्रातील सुसंगत, कार्यक्षम आणि पर्याप्त संख्यानकांच्या संकल्पना आणि हे संख्यानक मिळविण्याचे सूत्र देणारा महत्तम शक्यता निर्वाह (उत्तर) ही फिशर यांची महत्त्वाची कामगिरी आहे. त्यांनी सांख्यिकीय प्रदत्तापासून (माहितीपासून) विगमनात्मक अनुमान काढण्यासंबंधी केलेले सैद्धांतिक कार्य आणि त्यांनी स्वतःचे व इतर सांख्यिकीविज्ञांचे (उदा., स्टूडंट म्हणजे डब्ल्यू. एस्.गॉसेट) कार्य लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्‍न यांमुळे सांख्यिकीच्या पुढील प्रगतीचा पाया घातला गेला.

फिशर यांच्या कार्याचे दुसरे महत्त्वाचे क्षेत्र आनुवंशिकी हे होते. काही विशिष्ट उदाहरणांत (उदा., मानवजातीचे आप्त) होणारे अखंड अनुहरण (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढ्यांत नेली जाण्याची क्रिया) हे ग्रेगोर मेंडेल यांच्या अनुहरण सिद्धांताप्रमाणे [→आनुवंशिकी] होत नाही, असा समज होता. तथापि या उदाहरणांतील अनुहरण मेंडेल सिद्धांताप्रमाणेच होते, असे फिशर यांनी दाखवून दिले. त्यांच्या प्रभावितेच्या क्रमविकासाचा (उत्क्रांतीचा) सिद्धांत हा ‘उत्परिवर्तन (आनुवंशिक लक्षणांत होणारे आकस्मिक बदल) ही क्रमविकासातील दिशादर्शक प्रेरणा नसून ⇨ नैसर्गिक निवड ही आहे’ या सिद्धांताला आधारभूत ठरला आहे. चार्ल्‌स डार्विन यांचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत व मेंडेल सिद्धांत यांत सुसंगतता आणण्याच्या दृष्टीने फिशर यांनी महत्त्वाचा पुढाकार घेतला. या संदर्भात १९३० मध्ये त्यांनी जेनेटिकल थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हा ग्रंथ लिहिला. मेंडेल यांच्या आनुवंशिकीसंबंधीच्या प्रायोगिक पुराव्याचा १९०० साली पुनर्शोध लागल्यापासून व त्यानंतर त्यावरून जनुकांसंबंधीचा [आनुवंशिक लक्षणे निदर्शित करणाऱ्या एककांसंबंधीचा → जीन] सिद्धांत विकसित करण्यात आल्यापासून शास्त्रज्ञांना असे वाटत होते की, या कल्पना व डार्विन यांचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत यांत परस्परसंबंध असल्याचे स्पष्टपणे दिसून येत नाही. यासंबंधी गुंतागुंतीचे गणितीय प्रश्न व संकल्पनात्मक अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न करणाऱ्या पहिल्या शास्त्रज्ञांमध्ये फिशर यांची गणना होते. नैसर्गिक निवडीच्या प्रभावाखाली एखाद्या दिलेल्या जीवसमुदायामध्ये विशिष्ट जनुकांची वारंवारता कशी बदलते याचा त्यांनी शोध लावला. वरील ग्रंथातच त्यांनी सुप्रजाजननशास्त्रावरील आपले विचार मांडले होते व ते सामूहिक आनुवंशिकीतील अभिजात विचार म्हणून गणले गेले आहेत [→ सुप्रजाजननशास्त्र सामूहिक आनुवंशिकी].

मानवी रक्तगटांच्या वर्गीकरणासंबंधी फिशर यांना अगत्य असल्यामुळे त्यांनी १९३५ मध्ये लंडन येथील गॉल्टन लॅबोरेटरीत रक्ताचे वर्गीकरण करणारा एक विभाग स्थापन केला. मानवी रक्ताच्या ⇨ऱ्हीसस घटकानुसार करण्यात येणाऱ्या वर्गीकरणाच्या आनुवंशिकीय दृष्टीने देण्यात आलेल्या स्पष्टीकरणात फिशर यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

वर उल्लेखिलेल्या ग्रंथांखेरीज डिझाइन ऑफ एक्सपिरिमेंट्‌स (१९३५), द थिअरी ऑफ इनब्रिडिंग (१९४९) , स्टॅटिस्टिकल मेथड्‌स अँड सायंटिफिक इन्फरन्स (१९५६) आणि फ्रँक येट्स यांच्याबरोबर स्टॅटिस्टिकल टेबल्स फॉर बायॉलॉजिकल, ॲग्रिकल्चरल अँड मेडिकल रिसर्च (१९३८) हे त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. त्यांचे सुरूवातीचे अतिशय महत्त्वाचे ४३ निबंध काँट्रिब्यूशन्स टू मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स या शीर्षकाखाली १९५० मध्ये प्रसिद्ध करण्यात आले.

रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १९२९ मध्ये त्यांची निवड झाली. रॉयल सोसायटीने त्यांना १९५५ मध्ये कॉप्ली पदकाचा बहुमान दिला. १९५२ मध्ये त्यांना ‘नाईट’ हा किताब मिळाला. ते ॲडिलेड येथे मृत्यू पावले.

ओक, स. ज. भद्रे, व. ग.