फिनिश साहित्य : फिनिश भाषेतील लिखित साहित्याचा आरंभ सोळाव्या शतकात झालेला असला, तरी फिनिश लोकांनी पिढ्यान्पिढ्या मौखिक परंपरेने जतन केलेले विपुल आणि समृद्ध लोकसाहित्य होतेच. लोकसाहित्याच्या ह्या संचितात फिनलंडच्या ⇨ कालेवालासारख्या राष्ट्रीय महाकाव्याचाही समावेश होतो. विविध फिनिश लोकगीतांचा संचय आणि संकलन करून ⇨ एल्यास लनरॉट (१८०२-८४) ह्याने कालेवालाची पहिली आवृत्ती संपादिली (१८३५-३६). ह्या महाकाव्याचे नायकत्व कोणा राजा-महाराजाकडे नाही, तर समाजाच्या वेगवेगळ्या थरांतील पाच वीरांची ही शौर्यगाथा आहे. १८४९ मध्ये ह्या महाकाव्याची लनरॉटने जी दुसरी विस्तृत आवृत्ती काढली, तीच आज अधिकृत मानली जाते. ‘कालेवाला’ हे फिनलंडचेच प्राचीन नाव होय. ‘वीरभूमी’ असा त्याचा अर्थ आहे. ह्या महाकाव्यातील वातावरण आणि त्यातून प्रतीत होणाऱ्या कल्पना मुख्यतः पेगन असल्या, तरी त्याच्या अखेरच्या सर्गातून ख्रिस्ती धर्माच्या प्रभावाची चाहूल लागते.
सोळाव्या शतकात फिनिश भाषा लेखनिविष्ट होऊ लागली. मीकाएल आग्रिकोला (सु. १५१०-५७) ह्याने वर्णमालेचे एक पुस्तक सु. १५४२ मध्ये प्रकाशित केले. बायबलचा ‘नवा करार’ त्याने फिनिश भाषेत अनुवादिला (१५४८).
चौदाव्या शतकापासून फिनलंड हे स्वीडिश राज्याचा एक भाग झाले. स्वीडिश सत्तेच्या जोखडाखाली फिनिश साहित्याचा फारसा विकास होऊ शकला नाही. फिनलंडमधील सुशिक्षितांचा आपल्या मातृभाषेकडे पाहण्याचा दृष्टीकोन अनास्थेचा असल्यामुळे एकोणिसाव्या शतकापर्यंत फिनिश साहित्यनिर्मिती जवळजवळ नव्हतीच, असे म्हटले तरी चालेल. तथापि १८०९ मध्ये फिनलंड रशियाला जोडला गेल्यानंतर आणि रशियन सत्तेने फिनलंडला स्वायत्तता दिल्यानंतर राष्ट्रीय साहित्याच्या निर्मितीची जाणीव मूळ धरू लागली. १८३१ मध्ये फिनिश लिटररी सोसायटीची स्थापना करण्यात आली. लनरॉटने प्रकाशात आणलेल्या कालेवालाने जागतिक साहित्यात प्रतिष्ठेचे स्थान मिळविल्यामुळे फिनिश साहित्यिकांचे ते एक स्फूर्तिस्थान ठरले. एकोणिसाव्या शतकातील श्रेष्ठ फिनिश नाटककार, कवी आणि कादंबरीकार ⇨ अलेक्सिस किव्ही (१८३४-७२) ह्याची Kullervo (१८५९) ही शोकात्म नाट्यकृती कालेवालावर आधारलेली आहे. ‘शूमेकर्स ऑफ द मूर’ (१८६४, इं. शी.) आणि ‘बिट्रोदल’ (१८६६, इं. शी.) ह्या त्याच्या दोन सुखात्मिकाही यशस्वी ठरल्या. बायबलमधील एका कथेवर आधारलेले Lea (१८६९) हे नाटक रंगभूमीवर आल्यानंतर फिनलंडच्या राष्ट्रीय रंगभूमीच्या विचाराला चालना मिळून १८७२ मध्ये तिची स्थापना झाली. सेव्हन ब्रदर्स (१९२९, इं. भा.) ही फिनिश भाषेतील पहिली कादंबरी लिहिण्याचा मानही किव्हिकडेच जातो. काव्यविषयक तत्कालीन संकेतांपलीकडे जाणाऱ्या कविताही किव्हीने लिहिल्या. ⇨ मिन्ना कांट (१८४४-९७) ही एकोणिसाव्या शतकातील एक उल्लेखनीय लेखिका. फिनिश साहित्यातील वास्तववादाच्या विकासाला तिच्या कथाकादंबऱ्यांनी आणि नाट्यकृतींनी महत्त्वाचा हातभार लावला. किव्हीनंतर ⇨ युहानी आहॉ (१८६१-१९२१) ह्या कथा-कादंबरीकाराचे कर्तृत्व विशेष नजरेत भरते. शेतकऱ्यांचे जीवन, मासेमारी आणि फिनलंडमधील वन्य जीवन हे आहॉच्या साहित्यकृतींचे प्रमुख विषय होत. दोदे आणि मोपासां ह्या फ्रेंच साहित्यिकांचे आदर्श त्याच्या समोर होते. फिनिश साहित्यातील वास्तववादाच्या विकासातील आहॉ हा एक महत्त्वाचा टप्पा होय.
आयनो लेइनो (१८७८-१९२६), ओट्टो माननिनेन (१८७२-१९५०) आणि व्ही. ए. कोस्केन्निएमी (१८८५-१९६२) हे एकोणिसाव्या-विसाव्या शतकांतील तीन महत्त्वाचे कवी. तिघांनीही आपल्या कवितांतून फिनिश लोकसाहित्यातील ज्ञापकांचा (मोटिफ्स) वापर केला. स्कँडिनेव्हियन कविता आणि फिनलंडमधील प्राचीन सांस्कृतिक वारसा ह्यांची सखोल जाण लेइनोपाशी होती. त्याची कविता वैविध्यपूर्ण आणि जोमदार आहे. आपल्या अनुभवांना बोलके करण्यासाठी फिनिश मिथ्यकथांचा अर्थपूर्ण उपयोग त्याने करून घेतला. ‘साँग्ज ऑफ मार्च’ (१८९६, इं. शी.) हा त्याचा काव्यसंग्रह उल्लेखनीय आहे. ओट्टो माननिनेन आणि कोस्केन्नएमी ह्यांच्या रचनांतून भाषेची काटेकोर जाणीव दिसून येते. माननिनेन ह्याने उत्तम भावकवितेच्या रचनेबरोबरच होमर, गटे, रूनेबॅर्य (स्वीडिश भाषेत लेखन करणारा फिनिश कवी ) ह्यांच्या साहित्याचा फिनिश भाषेत अनुवाद केला. कोस्केन्निएमी हा तात्विक, चिंतनात्मक कविता लिहिणारा फिलंडनचा पहिला कवी. माइला ताल्व्हिओ (१८७१-१९५१) आणि आर्व्हिड यार्नेफेल्ट (१८६१-१९३२) हे कादंबरीकार. ताल्व्हिओच्या सामाजिक कादंबऱ्यांतून नैतिक उद्बोधनाचा सूर प्रकर्षाने प्रत्ययास येतो. यार्नेफेल्टच्या कादंबऱ्यांवर टॉलस्टॉयचा प्रभाव आहे. ⇨ फ्रान्स एअमिल सिल्लांपॅ (१८८८-१९६४) ह्या फिनिश कादंबरीकाराला १९३९ मध्ये साहित्याचे नोबल पारितोषिक मिळाले. वास्तववाद आणि आदर्शवाद ह्यांचा कलात्मक समतोल त्याच्या कादंबऱ्यांत साधलेला आढळतो. ‘लाइफ अँड सन’ (१९१६, इं.शी.), मीक हेरिटेज (१९१९, इं.भा. १९३८) आणि फॉलन अस्लीप व्हाइल यंग (१९३१, इं.भा. १९३३) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या. मिका वाल्तारी (१९०६ – ) हा आणखी एक उल्लेखनीय कादंबरीकार. त्याच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांना फिनलंडबाहेरही कीर्ती मिळाली. द टंग ऑफ फायर (१९५८, इं.भा. १९५९) सारख्या कादंबऱ्यांत त्याची धर्मविषयक आस्थाही दिसून येते. टोइव्हो पेक्कानेन (१९०२-५७) हा कामगार वर्गातून उदयाला आलेला लेखक. तो फिनिश अकादमीचा सदस्यही होता. राष्ट्रीय आणि सामाजिक समस्या त्याने आपल्या लेखनातून मांडल्या.
स्वीडिश-फिनिश साहित्य : फिनलंडवर दीर्घकाळ स्वीडनची सत्ता असल्यामुळे स्वीडिश भाषेचे शिक्षण तिथे दिले जाई. काही फिनिश साहित्यिकांनी स्वीडिश भाषेत साहित्यनिर्मितीही केलेली आहे. ⇨ यूहान लड्व्हिग रूनेबॅर्य (१८०४-७७) हा फिनलंडचा राष्ट्रकवी समजला जातो. त्याने आपली काव्यरचना स्वीडिश भाषेत केलेली असली, तरी तिचा आत्मा मात्र फिनिश आहे. साक्रिस टुपेलिअस (१८१८-९८) हा कवी, नाटककार आणि कादंबरीकार. त्याच्या लेखनाचाही फिनिश साहित्यावर लक्षणीय प्रभाव पडला. कार्ल आउगुस्ट टाव्हास्टशेअर्ना (१८६०-९८) हा आणखी एक कवी, कादंबरीकार आणि नाटककार. त्याच्या साहित्यातून एक प्रकारची रोखठोक वास्तववादी दृष्टी प्रत्ययास येते.
पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात ‘स्वीडिश- फिनिश मॉडर्निस्ट ’(इं. अर्थ) नावाची एक चळवळ कवितेच्या क्षेत्रात सुरू झाली. इडिथ सडरग्रान (१८९२-१९२३), एल्मर डिक्टोनिअस (१८९६-१९६१) व गनर ब्यार्लिंग (१८८७-१९६०) हे ह्या चळवळीचे काही प्रमुख. अभिव्यक्तिवादी तसेच नवकालवादी (फ्यूचरिस्ट), चित्रकला आणि संगीत ह्यांच्यापासून त्यांनी मुख्य प्रेरणा घेतली होता. एक नवे सौंदर्यशास्त्र आणि काव्यतंत्र निर्माण करण्याबरोबरच सामाजिक जीवनात कवीने काही सक्रिय भूमिका बजावण्यावर ह्या चळवळीने भर दिला होता.
स्वीडिश भाषेत जोमदार लेखन करणारे कवी, नाटककार, निबंधकार, कादंबरीकार आजही आहेत.
कुलकर्णी, अ. र.