कालेवाला : फिनिश लोकमहाकाव्य. ‘कालेवाला’ हे फिनलंडचे प्राचीन नाव आहे. ह्या महाकाव्यास त्याचे आजचे स्वरूप एकोणिसाव्या शतकात प्राप्त झाले.  ⇨एल्यास लनरॉट (१८०२—१८८४) ह्या नावाच्या डॉक्टराने अनेक फिनिश लोकगीते जमवून आणि त्यांचे संकलन करून कालेवालाची पहिली आवृत्ती संपादित केली (१८३५ – ३६). ह्या आवृत्तीत ३२ सर्ग आणि १२,०७८ गीते आहेत. १८४९ मध्ये लनरॉटने दुसरी सुधारित आवृत्ती काढली. तीत ५० सर्ग आणि २२,७९५ गीते आहेत. आज हीच आवृत्ती अधिकृत मानली जाते.

कालेवाला ही पाच प्राचीन वीरांची शौर्यगाथा आहे. त्यांपैकी एक शिकारी आणि दुसरा साहसी भटक्या असून इतर तिघांत भूदास, घिसाडी व चारण यांचा समावेश आहे. हे सर्व वीर समाजाच्या विविध थरांतले आहेत, ही बाबा वैशिष्टयपूर्ण आहे. ह्या महाकाव्याला फिनलंड व लॅपलॅंड यांच्या युद्धाचा ऐतिहासिक संदर्भही आहे. भावगेय (लिरिकल) शैलीने संपन्न असलेल्या हया महाकाव्यातून जड आणि चेतन, मानव आणि निसर्ग यांतील सनातन संघर्षांचे प्रभावी दर्शन घडते. द साँग ऑफ हायावाथा (१८५५) ह्या रेड इंडियनांवरील आपल्या कथाकाव्यात लाँगफेलोने कालेवालाचा आदर्श अनुसरला आहे. अनेक यूरोपीय भाषांत त्याची भाषांतरे झाली आहेत. फिनलंडमध्ये त्यास राष्ट्रीय महाकाव्याचा दर्जा आहे. साहित्यिक, चित्रकार आणि संगीतकार यांचे ते स्फूर्तिस्थान आहे.

जगताप, दिलीप