फॉक्नर, विल्यम : (२५ सप्टेंबर १८९७ – ६ जुलै १९६२). जागतिक कीर्तीचा अमेरिकन कादंबरीकार. अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील न्यू ऑल्बनी येथे जन्मला. विल्यम लहान असतानाच फॉक्नर कुटुंब ऑक्सफर्ड (मिसिसिपी राज्य) तेथे गेले. विल्यमचे शालेय शिक्षण तेथेच झाले. तथापि शाळेत जाणे आवडत नसल्यामुळे माध्यमिक शिक्षण त्याने मध्येच सोडून दिले. पहिल्या महायुद्धाच्या काळात – १९१८ मध्ये –कॅनडातील शाही वायुसेनेत छात्र म्हणून त्याने प्रवेश घेतला परंतु त्याचे प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच पहिले महायुद्ध समाप्त झाले. युद्धानंतर काही खास प्रवेश-नियमांच्या आधारे तो मिसिसिपी विद्यापीठात दाखल झाला. तेथे तो वर्षभर होता. या काळात स्पॅनिश आणि फ्रेंच भाषांचा त्याने अभ्यास केला. १९२० मध्ये तो न्यूयॉर्क शहरी आला व तेथील वाङ्मयीन वर्तुळात त्याला प्रवेश मिळाला. आरंभीच्या काळात त्याने काव्यलेखन केले. मार्बल हा त्याचा काव्यसंग्रह १९२४ मध्ये प्रसिद्ध झाला. मार्बलला वाचकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पुढे प्रसिद्ध अमेरिकन कथाकादंबरीकार शेरवुड अँडरसन ह्यांच्या उत्तेजनाने तो कादंबरीलेखनाकडे वळला. सोल्जर्स पे ही त्याची पहिली कादंबरी १९२६ मध्ये प्रसिद्ध झाली. ह्या कादंबरीलाही यश लाभले नाही परंतु सार्टोरिस (१९२५) ही कादंबरी लिहीत असताना त्याला जाणवले, की आपली जन्मभूमी, तीत राहणारे लोक, त्यांची संस्कृती, त्यांच्या वृत्तिप्रवृती हाच आपल्या कादंबरीलेखनाचा खराखुरा विषय होऊ शकतो. ‘पोस्टाच्या तिकिटाच्या आकाराचा माझा हा प्रदेश माझ्या प्रतिभेला पुरून उरेल. वास्तवाचे सृजनशील कल्पितात उन्नयन करण्यासाठी माझी सर्व शक्ती मी उपयोगात आणत राहीन’ अशा आशयाचे उद्गार त्याने ह्या संदर्भात काढले होते. ही दृष्टी ठेवून त्याने योकनापाटॉफा ह्या नावाचा एक काल्पनिक प्रदेश निर्माण करून त्याच्या भोवती सार्टोरिस खेरीज द साउंड अंड द फ्यूरी (१९२९), ॲज आय ले डाइंग (१९३०), लाइट इन ऑगस्ट (१९३२), ॲब्सॅलॉम, ॲब्सॅलॉम! (१९३६) आणि इंट्रूडर इन द डस्ट (१९४८) ह्यांसारख्या कादंबऱ्या लिहिल्या. ह्यांखेरीज ‘द बेअर’ ही त्याची एक कथाही योकनापाटॉफाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे. द साउंड अँड द फ्यूरी, ॲज आय ले डाइंग आणि लाइट इन ऑगस्ट ह्या फॉक्नरच्या कादंबऱ्या विख्यात आयरिश कादंबरीकार जेम्स जॉइस ह्याच्या प्रभावातून लिहिल्या गेल्या असून त्यांत संज्ञाप्रवाहतंत्राचा वापर करण्यात आलेला आहे. ॲब्सॅलॉम, ॲब्सॅलॉम ! ही एक अत्यंत संकुल घाटाची कादंबरी आहे. वंशभेदाच्या जाणिवेतून मानवी संबंधांवर होणारे परिणाम व त्यांतून घडून येणारी शोकात्मिका फॉक्नरने ह्या कादंबरीच्या रूपाने उभी केलेली आहे. एका गोऱ्याच्या खुनाचा आरोप आलेल्या एका निग्रोची कहाणी इंट्रूडर इन द डस्ट मध्ये आहे.
फॉक्नर हा अमेरिकेच्या दक्षिण भागातला. तेथील खानदानी घराण्यांचा नैतिक, आर्थिक आणि मानसिक अधःपात आपल्या कादंबऱ्यांतून त्याने चित्रित केलेला आहे. तसेच त्या वेळी नव्याने उदयास आलेल्या श्रद्धाहीन व्यापारी वर्गातील स्वार्थी आणि संधीसाधू प्रवृत्तीचे दर्शनही त्याने घडविले आहे. फॉक्नरची लेखनशैली असांकेतिक, वळणावळणाची आणि स्थूल कालप्रवाह अनपेक्षितपणे खंडित करून वाचकांना अकस्मात बुचकाळ्यात टाकणारी अशी आहे. तथापि त्याच्या कल्पनेची झेप आणि दृष्टीची भेदकता ह्या गुणांमुळे चिकित्सक वाचकांवर त्याचा अधिकाधिक प्रभाव पडत गेला.
फॉक्नरचे साहित्य हे एका विशिष्ट प्रदेशाशी निगडित असले, तरी केवळ एक प्रादेशिक कादंबरीकार म्हणून त्याच्याकडे पाहणे पुरेसे होणार नाही. त्याचप्रमाणे निग्रो व गौरवर्णीय अमेरिकन ह्यांच्यातील संबंधांचे संतुलित आकलन असलेला आणि कादंबरीलेखनात प्रयोगशील दृष्टी ठेवणारा साहित्यिक एवढेच त्याचे श्रेय नाही. आधुनिक यांत्रिकतेशी नैसर्गिक जीवनप्रेरणा सन्मुख झाल्या, की त्यांच्या संघर्षातून निर्माण होणाऱ्या संतापाचे आणि निराशेचे प्रतीकात्मक दर्शन घडविण्याचा त्याचा प्रयत्न आहे. ह्या संघर्षातून आधुनिक मानवाचा जो ऱ्हास झाला, त्याचे चित्रण त्याने कोणतीही तडजोड न करता केलेले असले, तरी माणसावरचा त्याचा विश्वास अबाधित होता. १९४९ साली साहित्यांचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले. मिसिसिपी राज्यातील ऑक्सफर्ड येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ : 1. Brooks, Cleanth, William Faulkner : The Yoknapatawpha Country, New Haven, Conn., 1963.
2. Hoffman, Frederick J. Vickery, Olga, W. Ed. William Faulkner : Three Decades of Criticism,
East Lancing, Mich., 1960.
3. Howe, Irving, Williams Faulkner : A Critical Study, New York, 1962.
4. Meriwether, James B. The Literary Career of William Faulkner, Ithaca, New York, 1960.
5. Millgate Michael, Faulkner, London, 1966.
6. Slatoff, Walter J. Quest for Failure : A Study of William Faulkner, Ithaca, New York, 1960.
7. Vickery, Olga, W. The Novels of William Faulkner, New York, 1964.
हातकणंगलेकर, म. द.
“