फरुखाबाद : (फर्रुखाबाद). उत्तर प्रदेश राज्याच्या फरुखाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख शहर. लोकसंख्या फतेगढ मुख्यालयासह १,०२,७६८ (१९७१). कानपूरच्या वायव्येस सु. १३९ किमी. अंतरावर हे गंगेकाठी वसले असून दिल्ली-अलाहाबाद लोहमार्गावरील प्रस्थानक आहे. तसेच ग्रँड ट्रंक रोडलाही हे सडकेने जोडलेले आहे.

मुहंमदखान हा मोगल सुभेदाराने या शहराची स्थापना केली (१७१४). यानंतर मोगल बादशहा फरुखसियर याचे नाव या शहरास मिळाले. प्रथम मोगल आणि नंतर मराठी अंमल असलेले हे शहर जेरार्ड लेक या ब्रिटिश सेनाधिकाऱ्याने जिंकले (१८०४). तेव्हापासून १९४७ पर्यंत हे ब्रिटिश अंमलाखाली होते. १८५७ च्या उठावात येथील ब्रिटिश सेनेने फतेगढ किल्ल्याचा आश्रय घेतला होता. किल्ला पडल्यानंतर जलमार्गाने निसटून जाण्याच्या प्रयत्नात सर्व ब्रिटिश सेनेची कत्तल झाली. त्याच वर्षी ब्रिटिश सेनेने हे शहर व किल्ला पुन्हा काबीज केला.

फरुखाबाद ही आसमंतातील अन्नधान्य, फळफळावळ आणि बटाटे यांची प्रमुख बाजारपेठ असून पितळी भांडी व कातडी वस्तू यांसाठी प्रख्यात आहे. सतराव्या-अठराव्या शतकांत नदीबंदर म्हणून या शहराची प्रसिद्धी असली, तरी आधुनिक दळणवळणाच्या सोयींमुळे फरुखाबादचे ते महत्त्व आता कमी झाले आहे. अनेक जुन्या वास्तू पूर्वीच्या समृद्ध काळाची साक्ष देत आजही येथे उभ्या आहेत.

कापडी, सुलभा.