फरीदकोट : पंजाब राज्याच्या भतिंडा जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण व पूर्वीच्या फरीदकोट संस्थानाची राजधानी. लोकसंख्या २७,७२५ (१९७१). हे फिरोझपूरच्या दक्षिणेला ४५ किमी. व पतियाळाच्या वायव्येस १६० किमी.वर लोहमार्गावरील स्थानक आहे. राजपूत राजा मोकुलसीने सु. तेराव्या शतकात येथे एक किल्ला बांधला होता. बाबा फरीद या तत्कालीन मुस्लिम सत्पुरुषाच्या नावानेच तो ओळखला जातो.
हरबरा, गहू, मका, कापूस ही येथील महत्त्वाची पिके असून धान्यबाजारही फार मोठ्या प्रमाणावर भरतो. औषधे, रसायने व कातडी वस्तू यांचीही येथे निर्मिती होते.
सावंत, प्र. रा.