फराक्का प्रकल्प : कलकत्ता बंदर सुरक्षित करावे आणि हुगळी नदी जलवाहतुकीस उपयोगी पडावी म्हणून भारत सरकारने कार्यवाहीत आणलेला बहुउद्देशीय प्रकल्प. भारतातील प्रमुख ⇨नदी खोरे योजनांपैकी ही एक योजना आहे.
कलकत्ता बंदर हे हुगळी नदीवर वसले असून प्रतिवर्षी समुद्रातून येणाऱ्या भरतीच्या लाटांमुळे १०० लक्ष टन गाळ या नदीत आणला जातो. परंतु मोसमी ऋतूत हुगळीला येणाऱ्या पुरामुळे ६० लक्ष टन गाळ पुन्हा समुद्रात फेकला जातो. उर्वरित ४० लक्ष टन गाळ मात्र प्रतिवर्षी साठत जाऊन हुगळी नदीची वाहतूक क्षमता कमी होत जाते. नदीमुखाशी साठलेला गाळ काढण्यासाठी कलकत्ता बंदर प्राधिकरणाने १९६०-७० या काळात प्रतिवर्षी ७५ लक्ष रु. खर्च केले. १९७२ मध्ये तर यासाठी १० कोटी रु. खर्च झाले. हुगळी नदीतून कलकत्ता बंदर ते नदीमुखापर्यंतचे २०० किमी. अंतर काटावयास जहाजांना ३६ तास लागत, कारण त्या जहाजांना भरतीच्या लाटांकरिता तीन ठिकाणी थांबावे लागे. कलकत्ता बंदरातून १९६४-६५ सालापर्यंत देशाचा सु. ५० टक्के व्यापार चाले. त्यावेळी या बंदरातून प्रतिवर्षी ८० लक्ष ते १०० लक्ष टन मालाचा व्यापार चालत असे, पुढेपुढे तो प्रतिवर्षी ६० ते ७० लक्ष टनांपर्यंत घसरला.
भारत सरकार व कलकत्ता बंदर प्राधिकरण यांच्या वतीने कलकत्ता बंदराचा ऱ्हास व हुगळीसारख्या महत्त्वाच्या नदीला गाळामुळे बसलेली खीळ या गंभरी समस्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करण्यात आला. त्यातून हुगळीमध्ये आणखी गाळ साठू नये आणि जलवाहतूक सुलभ व्हावी म्हणून प्रतिसेकंदास ४०,००० घ.मी. पाणी नदीत जादा सोडावे लागेल, असे निदर्शनास आले. यासाठी फराक्का बंधारा उभारावयाची योजना कार्यवाहीत आणावयाचे ठरले. गंगेतून प्रतिसेकंदास ४०,००० घ.मी. पाणी काढून घेऊन ते एका पूरक कालव्यावाटे भागीरथी –हुगळी नदीसंहतीमध्ये सोडावयाची कार्यवाही या प्रकल्पामुळे शक्य होणार होती. कलकत्ता बंदराची सुधारणा हे जरी फराक्का प्रकल्पाचे प्रधान उद्दिष्ट असले, तरीही त्यामुळे कलकत्ता महानगर व औद्योगिक परिसर यांना हुगळीतून गोडे पाणी पुरविले जाण्याचे उद्दिष्टही साधले जाणार होते.
फराक्का प्रकल्पात (१) गंगेवर प. बंगाल राज्यातील फराक्का या ठिकाणी बंधारा वा धरण उभारावयाचे, (२) फराक्का ते जंगीपूर हा ३८·३ किमी. लांबीचा कालवा बांधणे आणि (३) जंगीपूर येथेही एक बंधारा उभारणे या प्रमुख गोष्टींचा अंतर्भाव होता.
भागीरथी-हुगळी नदीसंहतीमध्ये सुधारणा करण्याबाबत यापूर्वी अनेक योजना सादर करण्यात आल्या होत्या. गंगेचे पाणी हुगळी नदीच्या पात्रात सोडण्याकरिता गंगेवर राजमहाल येथे मोठे धरण बांधण्याची कल्पना सर आर्थर कॉटन (१८०३-९९) या प्रसिद्ध ब्रिटिश जलसिंचन अभियंत्याने १८५८ मध्ये मांडली होती. त्यानंतर निरनिराळ्या तज्ञांनी या समस्येचा सांगोपांग विचार करून नदीच्या पात्रात आवश्यक ती पाण्याची उंची बाराही महिने स्थिर ठेवण्याकरिता बंधारा वा धरण बांधून गंगेचे पाणी हुगळी नदीत सोडणे आवश्यक असल्याचे सुचविले. भारत सरकारच्या वाहतूक महामंडळाने १९६० साली कलकत्ता बंदराचा विकास साधण्यासाठी प्रकल्पास मान्यता दिली. १९६३-६४ मध्ये प्रत्यक्ष बांधकामास प्रारंभ झाला.
फराक्का बंधाऱ्याची एकूण लांबी २,२४४·४ मी. असून त्यामध्ये १०९गाळे (बे) आहेत. प्रत्येक गाळ्याची रुंदी १८·३ मी. असून पाणी वळविण्याची क्षमता प्रतिसेकंद ७६,४०० घ.मी. आहे. पूरक कालव्याची लांबी ३८·३ किमी. असून तो सुएझ कालव्यापेक्षाही मोठा आहे. त्याची रुंदी १५१ मी., तर पाण्याची खोली ६ मी. आहे. जगामधील सर्वांत मोठ्या मानवनिर्मिती कालव्यांमध्ये या कालव्याची गणना होते. या कालव्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता प्रतिसेकंद १,१३५ घ.मी. आहे. याशिवाय जंगीपूर येथे २१२·८ मी. लांबीचा बंधारा उभारण्यात आला असून त्यामध्ये १२·१९ मी. रुंदीचे १५ गाळे आहे
ज्या ठिकाणी धरण बांधावयाचे होते तेथे बाराही महिने गंगेस भरपूर पाणी होते. धरणाचा पाया बारीक रेतीवर भूकंप पट्ट्यात खोदावयाचा होता. प्रतिसेकंद ७६,४०० घ.मी. एवढी प्रचंड जलसंपत्ती हुगळी नदीत सोडण्याच्या दृष्टीने धरणाची आखणी करण्यात आली. ह्या धरणावरून दोन रुंदमापी लोहमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले व दळणवळणाची सुविधा करण्यात आली. धरणाचे बांधकाम वेगाने चालू असताना बांधकाम विभागातर्फे ४,००० वर कुशल कामगार नेमण्यात आले होते. यांशिवाय विविध कंत्राटदारांचे हजारो मजूर काम करीत होतेच. प्रकल्पाचा एकूण खर्च १५६ कोटी रु. असून त्यापैकी १३० कोटी रु. खर्ची पडले. त्याचप्रमाणे भारतीय स्थापत्य अभियंत्यांनी मुदतीपूर्वी एक वर्ष अगोदरच फराक्का धरण पूर्ण करून प्रशंसनीय कामगिरी बजावली.
फराक्का प्रकल्पामुळे पुढील फायदे घडून आले आहेत : (१) कलकत्ता बंदर बाराही महिने वाहतुकीसाठी खुले ठेवणे शक्य झाले आहे. (२) हुगळी नदीच्या पात्रात साठणारा गाळ नव्या मुबलक जलप्रवाहामुळे परत समुद्रात फेकणे. (३) पूरक कालव्यामुळे कलकत्त्यापासून अलाहाबादपर्यंत अंतर्गत नौवहन करणे शक्य. (४) कलकत्ता बंदर हे उत्तर बंगाल व आसाम यांच्याशी रस्त्याने व लोहमार्गाने जोडण्यात आले. (५) पूरनियंत्रण व पुरापासून संरक्षण. (६) कलकत्ता महानगर व औद्योगिक परिसर यांना गोडे पाणी उपलब्ध करून देणे. (७) जमिनीची धूप थांबवून धान्योत्पादन वाढविणे आणि (८) वीजउत्पादन.
फराक्का महाऔष्णिक वीजनिर्मितिकेंद्राला (सुपर थर्मल पॉवर स्टेशनला) जागतिक बँकेने २,५०० लक्ष डॉ. कर्ज देऊ केले असून तशा प्रकारचा करार जागतिक बँक, भारत सरकार आणि राष्ट्रीय औष्णिक वीज निगम यांमध्ये नुकताच करण्यात आला. फराक्का औष्णिक वीज निर्मितीकेंद्र हे प. बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद जिल्ह्यात उभारण्यात येत असून त्या केंद्रातून एकूण २,१०० मेवॉ. वीजउत्पादनाची योजना आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी २०० मेवॉ. वीजनिर्मितीची तीन केंद्रे उभारली आहेत. पहिले २०० मेवॉ. क्षमतेचे वीज निर्मितिकेंद्र १९८४ च्या अखेरपर्यंत कार्यवाहीत येईल, त्यापुढची २०० मेवॉ. क्षमतेची केंद्रे दर सहा महिन्यांनी वीजउत्पादनास प्रारंभ करतील, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर १९८८-८९ च्या सुमारास पहिले ५०० मेवॉ. क्षमतेचे वीजउत्पादनकेंद्र कार्यवाहीत येईल आणि त्यानंतर प्रत्येकी ५०० मेवॉ. क्षमतेची उर्वरित दोन वीजकेंद्रे वर्षावर्षाच्या अंतराने कार्यवाहीत येतील, असा अंदाज आहे.
डाक्का येथे १८ एप्रिल १९७५ रोजी नवोदित बांगला देश व भारत यांच्यामध्ये गंगानदीच्या पाणीवाटपासंबंधी झालेल्या करारानुसार २१ मे १९७५ रोजी गंगेचे पाणी समारंभपूर्वक हुगळी नदीत सोडण्यात आले. गंगा पाणीवाटप करार व फराक्का प्रकल्पपूर्तता यांमुळे भारत व बांगला देश या दोन राष्ट्रांमध्ये पारस्परिक सहकार्य, समझोता व सामंजस्य घडून येण्याची शक्यता आहे.
गद्रे, वि. रा.