प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे कलाकाम : एखाद्या पदार्थाचा वा वस्तूचा साचा वा प्रतिकृती तयार करण्यासाठी माती, रेती, कागद यांसारखी जी अनेक माध्यमे वापरतात, त्यापैकी सर्वांत म्हत्त्वाचे माध्यम म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे होय. इतर सर्व माध्यमे साचा बांधल्यानंतर अगर त्यातून प्रतिकृती काढल्यानंतर काही प्रमाणात आकसतात, भेगाळतात किंवा कमजोर होतात परंतु प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मात्र तसे होत नाही. उलट प्लॅस्टर ओतल्यानंतर ते अगदी थोड्या प्रमाणात प्रसरण पावते त्यामुळे त्याच्या साच्यातून काढलेल्या प्रतिकृतीत मूळ नमुन्यातील सर्व बारकावे येऊ शकतात. प्लॅस्टर दुसरा गुणधर्म म्हणजे त्याला कोणत्याही तऱ्हेचे पोत नसल्याने त्यावर कोरीवकाम फार जपून करावे लागते. जलरंग, मेण, व्हॉर्निश यांचा उपयोग करून त्यावर रंगकाम करता येते.
प्लॅस्टर चा पहिला उपयोग केल्याची नोंद रोमन ग्रंथकार प्लिनी (इ. स. २३-७९) याने आपल्या विज्ञान खंडात (खंड ३५ वा) केलेली आहे. लायसिस्ट्राटस या शिल्पकाराने मेणाचे पुतळे ओतण्याकरिता प्लॅस्टर मानवी चेहऱ्याचा ऋण (निगेटिव्ह) स्वरूपाचा साचा केलेला होता, असे त्याने त्यात नमूद केले आहे. हा शिल्पकार अलेक्झांडरचा समकालीन होता.
प्लॅस्टर शुद्ध स्वरूपात टणक, परंतु ठिसूळ असते. त्यात सरसासारखी इतर बंधक द्रव्ये वापरल्यास त्यास अधिक बळकटी येते. अर्थात त्यामुळे त्याचा घट्ट होण्याचा कालावधीही वाढतो. शिल्पकार, धातूची वा पाषाणाची मूर्ती घडविण्यापूर्वी पुष्कळदा आधी प्लॅस्टरची मूर्ती बनवितात आणि तिच्यावरून मोजमाप घेऊन काम करतात.
प्लॅस्टरमध्ये सु. तीस टक्के पाणी मिसळल्यास त्याची दाट लापशी तयार होते. ही लापशी ओतूनच साचा किंवा प्रतिकृती बनवितात. लापशी तयार करताना प्लॅस्टरमध्ये पाणी न मिसळता पाण्यात प्लॅस्टर मिसळतात. त्यावेळी ते सारखे ढवळावे लागते. ही तयार लापशी लवकरच घट्ट होते, म्हणून ती त्वरीत ओतावी लागते. लापशीत पाणी जास्त झाल्यास प्लॅस्टर ठिसूळ होते व कमी झाल्यास ते फार कठीण होते.
ज्या कलाकृतीचा साचा वा प्रतिकृती करावयाची असते तिची मूळ प्रतिमा माती, लाकूड, प्लॅस्टिसिन अगर अन्य कोणत्याही माध्यमातून करतात. त्यानंतर तिच्यावर पाणी, साबण व खोबरेल यांचे मिश्रण लावतात. मिश्रण लावताना मूळ नमुन्याभोवती संरक्षक पट्टी अगर मातीची भिंत उभारून त्यावर प्लॅस्टरची लापशी ओततात. ती ओतताना मध्ये हवेच बुडबुडे राहू नयेत याची काळजी लागते. सु. आठ ते दहा मिनिटानी प्लॅस्टर घट्ट होऊन हातास कोमट लागते. प्लॅस्टरचे प्रमाण योग्य जमल्याची ही खूण होय. ओतलेला भाग मूळ नमुन्यापासून सु. आठ ते दहा तासांनी वेगळा करता येतो.
साचे बांधण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. त्या पुढीलप्रमाणे होत : (१) उठावशिल्पांचे साचे-ज्यात थोडेच उंचवटे आहेत, अशा कला वस्तूंसाठी एकच साचा तयार करतात (२) त्रिमितीय साचे-याला संयुक्त साचे (पीस मोल्ड्स) म्हणतात. मूळ नमुन्यातील निरनिराळ्या भागांकरिता वेगवेगळे साचे बांधून त्या सर्वांना धरून ठेवण्यास मोठा कवचाचा भाग, अशा तऱ्हेचे हे साचे असतात. यातील बारीक, सुट्या भागांना ‘मादी’ (फिमेल) म्हणतात व हे सुटे भाग घरून ठेवणारा जो मोठा भाग अगर कवच असते, त्याला ‘नर’ (मेल) असे म्हणतात. हे साचे बनविताना हे सर्व भाग एकत्रित राहवे, मागेपुढे सरकू नयेत, त्यांत प्रत्येक ठिकाणी अटकावाच्या खाचा व त्यात बसणारे उठावाचे भाग ठेवलेले असतात व (३) सूक्ष्म तपशील दाखविणारे साचे-या प्रकारचे साचे तयार करताना मूळ नमुन्यावर द्रवरूप रबराचे अनेक थर देतात आणि त्यांना संरक्षण व बळकटी देण्याकरिता मोठे कवच तयार करतात. अशा साच्यातून निघणाऱ्या प्रतिकृतीत सूक्ष्म तपशील यथातथ्य स्वरूपात येऊ शकतात.
फार मोठ्या चित्रपट्ट्या अगर त्यांचे साचे बोजड न होता हलके, परंतु बळकट व्हावेत, म्हणून प्लॅस्टर ओतताना मध्ये काथ्या, तारेचे व कापडाचे तुकडे इ. वस्तू बसवितात. त्यामुळे साचा जरी पातळ ओतला गेला, तरी त्याला पुरेशी बळकटी येते व तो हाताळण्यास सोईचा ठरतो.
भिंती व छत यांचे सौंदर्यवर्धन करण्याच्या दृष्टीने प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा उपयोग करण्याची पद्धत रूढ आहे. ही कला प्राचीन काळी ईजिप्तमधून रोमनांच्याद्वारे ब्रिटनमध्ये गेली. मध्ययुगात ब्रिटनमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर प्रामुख्याने भिंती व छत यांचे आगीपासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने करण्यात येई. आधुनिक चित्रपटगृहे, रंगमंदिरे, सभागृहे, उपहारगृहे व इतर सार्वजनिक इमारती इत्यादींतून भिंती किंवा छत सजविण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रामुख्याने उपयोग होतो. त्याचप्रमाणे चित्रपटनिर्मितीसाठी लागणारी भव्य दृश्ये (सेट) उभारण्यासाठी व मूल्यवान प्राचीन कलाकृती आणि महत्त्वाचे पुरावशेष यांच्या प्रतिकृती तयार करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. आधुनिक वैद्यक क्षेत्रात दातांच्या कवळ्या, शरीरातील विविध अवयवांच्या प्रतिकृती बनविण्यासाठी तसेच अस्थिभंगावर बंधक म्हणून प्लॅस्टर उपयोग होतो.
प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे (पेंटिंग) वा मोठमोठे आरसे यांच्या चौकटींवरील ⇨ गेसोकामात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करण्याची प्रथा प्राचीन काळापासून रूढ आहे. अलीकडे एखाद्या चित्रातील वस्तुघटकांमध्ये त्रिमितीय आभासनिर्मितीसाठीही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा उपयोग करण्याची पद्धत रूढ होत आहे. तसेच प्राचीन लेण्यांतील मानवी शिल्पांत विद्रूपता निर्माण झाल्यास प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करून मूळ दगडी रंगच्छटेतील तो भाग पूर्ण करण्यात येतो व त्या शिल्पाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यात येते. ⇨ चिक्कणितचित्रणा (कोलाज) मध्येही बंधक म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर रूढ झाला आहे.
छंद म्हणून खेळण्यांतील वस्तू तयार करण्याकडे लहान मुलेही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करतात. त्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिस, मक्याचे पीठ व पाणी हे अनुक्रमे ३ : १ या प्रमाणात घेऊन त्वरेने ढवळावे म्हणजे त्या मिश्रणाचा एक लिबलिबित गोळा तयार होतो. हे मिश्रण तयार करताना ते चांगले तिंबून ध्यावे. मिश्रण पातळ झाल्यास त्यात पीठ न घालता प्लॅस्टर ऑफ पॅरिस घालावे. या मिश्रणात मक्याचे पीठ असल्यामुळे ते मिश्रण नरम असतानाच त्याला हवा तो आकार देता येतो. तसेच प्रतिकृती तयार झाल्यावर तिच्यावर भेगा अथवा चिरा न पडता ती प्रदीर्घ काळापर्यंत चांगली राहू शकते. यापासून मोठमोठ्या प्रतिकृती तयार होत नसल्या, तरी हत्ती, घोडे यांसारख्या प्राण्यांच्या तसेच पक्ष्यांच्या लहान लहान खेळण्यांतील प्रतिकृती तयार करता येतात. या प्रतिकृती प्रारंभी ओबडधोबड असल्या, तरी त्यांवर हत्याराने हवी ती कलाकुसर सहजतेने करता येते. मध्येच मिश्रण घट्ट झाल्यास त्यावर ओले फडके टाकून वा स्पंजच्या साहाय्याने पुन्हा ते लवचिक बनविता येते. तयार केलेली शिल्पे चोवीस तास वाळवून नंतरच त्यावर हवी ती कलाकुसर करावी लागते. त्यांवर रंग दिल्यास त्यांचे सौंदर्य खुलून दिसते. किल्ले, झोपड्या, होड्या, उत्थित नकाशे, विविध प्रकारचे पशुपक्षी इत्यादींच्या प्रतिकृती यांसारखी चित्रशिल्पे बनविण्यासाठी या मिश्रणाचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो.
आपटे, ज. पां. जोशी, चंद्रहास
“