प्राणिमाणसाळविणे : स्वभावाने गरीब, मानवाच्या वसतिस्थानाजवळ अगर वसतिस्थानातच राहणारे, मानवाला अन्न, संरक्षण व इतर मानसिक समाधान देणारे, प्रजोत्पादनावर मानवास नियंत्रण करू देणारे आणि ज्यांचे मानसिक गुणधर्म त्यांच्या पूर्वजांपेक्षा भिन्न आहेत, अशा प्राण्यांना माणसाळविलेले प्राणी म्हणतात. सर्व माणसाळविलेल्या प्राण्यांत वरील सर्व गुणधर्म असतीलच असे नाही. मांजर व कुत्रा यांसारखे माणसाच्या अतिनिकट राहणारे प्राणी जरी पूर्णपणे माणसाळविले गेले असले, तरीदेखील प्रजोत्पादनाच्या वेळी हे माणसास जवळ येऊ देत नाहीत. माणसाळविलेली गरीब गायसुद्धा आपल्या नुकत्याच जन्मलेल्या वासरास कोणाला हात लावू देत नाही.
पुरातन कालापासून मानवाने कित्येक पशुपक्ष्यांचे उपयुक्त गुण, त्यांची आकर्षकता आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या उपयोगी वस्तूंचे महत्त्व ओळखून त्यांना आपल्या सान्निध्यात अथवा वस्तीच्या नजीक राहण्याची सवय केली आहे. अशा तऱ्हेने अनेक पशुपक्षी उत्तम रीतीने माणसाळविले गेले आहेत. त्यांच्या कित्येक पिढ्यांच्या हालचालीवर व प्रजोत्पादनावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक जोपासना केल्याने त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वभावधर्मांत इष्ट बदल घडून आले आहेत आणि असे पशुपक्षी त्यांच्या पूर्वजांपेक्षा फारच निराळे वाटतात.
वाघ, सिंह, अस्वले इ. हिंस्र प्राणी प्राणिसंग्रहालयात ठेवले जातात. सर्कशीतही त्यांच्याकडून निरनिराळी कामे करून घेतली जातात पण हे सर्व त्यांना अर्धपोटी ठेवून अगर धाक दाखवून करून घेतले जाते. ह्या पशूंचा हिंस्रपणा केव्हा प्रगट होईल याचा नियम नसतो म्हणून या प्राण्यांना खऱ्या अर्थाने माणसाळविलेले प्राणी म्हणता येत नाही. [⟶ पशुपक्षिशिक्षण].
इतिहास: प्राणी माणसाळविण्याचे प्रयत्न मानवाने प्रागैतिहासिक (इतिहासपूर्व) काळात केले त्यामुळे या प्रयत्नांचे निश्चित स्वरूप सांगणे कठीण आहे. काही अप्रत्यक्ष पुराव्यांवरून (उदा., आदिमानावाच्या सवयी व त्याचे प्राण्यांबरोबरचे संबंध, आदिमानवाच्या गुहांत सापडलेली चित्रे अगर कोरीवकाम यांवरून) काही अनुमान करता येते. सर्वप्रथम प्राणी कोणत्या देशात माणसाळविले गेले, हेही सांगणे कठीण आहे. पुराणाश्मयुगात कुत्रा हा बहुतेक पहिला माणसाळविलेला प्राणी असावा. गोऱ्या लोकांनी जेव्हा ऑस्ट्रेलियातील आदिमानवास प्रथम पाहिले त्या वेळी कुत्रा हाच माणसाळविलेला प्राणी त्यांच्याजवळ होता. गुरे (गाई-बैल) व शेळ्या-मेंढ्या हे नवाश्मयुगात माणसाळविले असावेत. हे प्रथम आशिया खंडात व तेथून नंतर यूरोप खंडात मानवाबरोबर गेले असावेत. यांचा माणसाळविण्याचा काळ ख्रि. पू. सु. ७००० वर्षे असावा.
घोडे ख्रि. पू. सु. ३००० वर्षे या काळात माणसाळविले गेले असावेत. यापूर्वी घोड्याची शिकार आपल्या अन्नाकरिता मानव करीत असावा. मानवाने घोड्यावर स्वार होऊन ख्रि. पू. सु. २००० वर्षांपूर्वी नैर्ऋत्य आशियातील टायग्रिस व युफ्रेटीस या नद्यांच्या खोऱ्यांत उत्तरेकडून प्रवेश केला असावा. पुढे ख्रि. पू. १५०० वर्षे या सुमारास घोडे चीनमध्ये गेले असावेत. ख्रि. पू. १५०० वर्षांपूर्वी माणूस घोड्याचे मांस अन्न म्हणून खात असावा. तसेच त्या काळी स्वार होण्याकरिता, गाडी ओढण्याकरिता वा शेतातही घोड्यांचा उपयोग केला जात असे. गाढवे ईजिप्तमध्ये ख्रि. पू. सु. ३००० वर्षांपूर्वी माणसाळविली गेली. मांजरेही ईजिप्तमध्येच ख्रि. पू. सु. २००० वर्षांपूर्वी माणसाळविली गेली.
सुरुवातीस जे वन्य पशुपक्षी माणसाळविले गेले त्यांपैकी बहुतेकांच्या मूळ जाती नष्ट झाल्या आहेत. कुत्र्याचे पूर्वज कोण याविषयीची प्रचलित मते लक्षात घेता मनुष्याने लांडगे व कोल्हे प्रथम माणसाळविले व कुत्र्यांची उत्पत्ती कॅनिसल्युपस ह्या लांडग्याच्या जातीपासून झाली. काही शास्त्रज्ञांच्या मते कोल्ह्याचाही संबंध कुत्र्याच्या उत्पत्तीत येतो. निरनिराळ्या ठिकाणी मनुष्याच्या अनेक रानटी टोळ्यांकडून कुत्रा माणसाळविण्यात आला. जेरिको या इझ्राएलमधील नवाश्मयुगीन अवशेषांकरिता प्रसिद्ध असलेल्या स्थळी मानवाच्या सांगाड्यांच्या सान्निध्यात कुत्र्यांचे सांगाडेही आढळले आहेत व ते हल्लीच्या टेरिअर जातीच्या कुत्र्याच्या सांगाड्यासारखे आहेत, तर ईजिप्तमध्ये सापडलेले कुत्र्याचे सांगाडे ग्रेहाऊंड जातीच्या कुत्र्याशी मिळते जुळते आहेत.
हल्लीच्या घोड्यांचे (ईक्वसकॅबॅलस) पूर्वज आशियामध्ये होते व तेथून ते उत्तर अमेरिकेत गेले आणि तेथे त्यांपैकी बरेचसे नष्ट झाले. नष्ट होण्यापूर्वी त्यांतील काही यूरेशियात, तर काही आफ्रिकेत गेले. सध्याचे घोडे पोलंड ते मंगोलिया या भागात राहणाऱ्या परझेव्हाल्यस्की या जातीपासून निर्माण झाले आणि वर उल्लेखिल्याप्रमाणे ते ख्रि. पू. सु. ३००० वर्षांपूर्वी माणसाळविले गेले असावेत. वेदकालीन भारतीय वाङ्मयामध्ये, युद्धाच्या वेळी रथाला घोडे जुंपत होते आणि स्वार होण्याकरिता व शर्यतीकरिताही त्यांचा उपयोग केला जात होता, असा उल्लेख आहे. वेदकाल ख्रि. पू. २००० वर्षे धरला, तर घोड्याच्या माणसाळविण्याचा वर उल्लेख केलेला कालखंड सुसंगत वाटतो. याच काळात गाढव हा प्राणी नाईल नदीच्या खोऱ्यात माणसाळविला गेला.
ओव्हीसॲमॉन या रानटी मेंढ्यांपासून आजच्या मेंढ्यांची उत्पत्ती झाली आहे व त्या मध्य आशिया व मध्य पूर्वेकडील भागांत माणसाळविल्या असाव्यात.
कॅप्राहिरकस या रानटी जातीतील एका उपजातीपासून शेळ्यांची उत्पत्ती झाली आहे. आशिया मायनरमधील डोंगराळ प्रदेशात त्या माणसाळविण्यात आल्या. मेंढ्यांचा व शेळ्यांचा माणसाळविण्याचा काळ एकच असावा.
गाईगुरे यूरेशिया व उत्तर आफ्रिकेतील त्यांच्या रानटी पूर्वजांपासून (बॉसप्रिमिजेनियस) उत्पन्न झाली व ती ख्रि. पू. सु. ४००० वर्षांपूर्वी माणसाळविण्यात आली असावी. गायीचे दूध काढीत असतानाची ख्रि. पू. सु. ३००० वर्षांपूर्वीची चित्रे उपलब्ध झाली आहेत. वशिंडधारी गुरे ख्रि. पू. सु. ३००० वर्षे या काळी बलुचिस्तान व सिंधू नदीच्या खोऱ्यात माणसाळविली गेली. असाही एक समज आहे की, भारत हा वशिंडधारी गुरांचे वसतिस्थान असावे व तेथून ती यूरेशिया व उत्तर आफ्रिकेत गेली असावीत. गाईगुरांच्या पूर्वजांशी सदृश अशा काही प्राण्यांपासून याक (पीफॅगसग्रुनिएन्स) हा प्राणी पैदा झाला व तिबेटचा डोंगराळ भाग, पामीर व मध्य आशियातील काही भाग या ठिकाणी तो माणसाळविण्यात आला. तसेच इंडोनेशिया व मलेशिया या ठिकाणी बॉस वंशातील बॅटिंग (बाली बेटातील गाईगुरे) आणि भारत व ब्रह्मदेश या ठिकाणी गयाळ (बॉसफ्राँटॅलिस) हे गाईगुरांच्या जातीचे प्राणी माणसाळविण्यात आले.
आजच्या घरगुती मांजराचे (फेलिसकॅटस) पूर्वज आफ्रिकेतील रानमांजर (फे. लायबिका) असून ते कॉर्सिका, सार्डिनिया, अरेबिया व भारत या देशांतही अस्तित्वात होते.
सुसस्क्रोफा या जातीची रानटी डुकरे आजच्या माणसाळविलेल्या डुकरांचे पूर्वज आहेत. यूरेशियात, विशेषतः दक्षिण तुर्कस्तानात हा प्राणी ख्रि. पू. सु. ५५०० वर्षे या काळी माणसाळविण्यात आला असावा. रशियन तुर्कस्तानात ख्रि. पू. सु. ४००० वर्षांपूर्वी ही माणसाळविलेली डुकरे असावीत, असे उपलब्ध पुराव्यावरून वाटते.
उंट हा ख्रि. पू. सु. २००० वर्षे या काळी माणसाळविण्यात आला. दोन मदारींचा उंट मध्यपूर्वेत, तर एका मदारीचा उंट मध्य आशियात माणसाळविण्यात आला.
गॅलसगॅलस ही रान कोंबड्यांची भारतातील जात आधुनिक कोंबड्यांचे पूर्वज असून भारत व नैर्ऋत्य आशियामध्ये ख्रि. पू. सु. ३००० वर्षे त्या माणसाळविण्यात आल्या. बदके व कबूतरे चीनमध्ये, लामा, गिनीपिग व अल्पाका अमेरिकेमध्ये व टर्की पक्षी मेक्सिकोमध्ये माणसाळविले गेले.
एपिसमेलिफेरा ही मधमाश्यांची जाती आफ्रिका, यूरोप व मध्यपूर्व भागात व एपिससेराना ही दुसरी मधमाश्यांची जाती भारत, इंडोचायना व जपान या भागांत माणसाळविली गेली. रेशमाच्या किड्यांच्या जातींपैकी बाँबिक्समोरी ही जातीही माणसाळविलेली आहे. कार्प व सोनेरी मासे हेही प्रथम चीनमध्ये माणसाळविले गेले.
उद्देश : पशुपक्षी माणसाळविण्याचे मुख्य उद्देश म्हणजे त्या प्राण्यांतील हिंस्रपणा नाहीसा करणे, त्यांना मानवाच्या अतिनिकट राहण्याची सवय करणे, त्यांच्यापासून खाद्योपयोगी, तसेच व्यापाराच्या व पैसा मिळविण्याच्या दृष्टीने उपयुक्त वस्तू मिळविणे, या प्राण्यांचा प्रवासासाठी, वाहतुकीसाठी, शेतीसाठी अगर युद्धांत उपयोग करणे, सुंदर व आकर्षक पशुपक्षी हौसेखातर प्राणिसंग्रहालयात ठेवणे आणि कित्येकांच्या शर्यती किंवा झुंजी लावून मनोरंजन करणे हे होत.
दूध, मांस, अंडी इ. खाण्याचे पदार्थ देणाऱ्या प्राण्यांत गायी, म्हशी, याक, शेळ्या, मेंढ्या, लामा, अल्पाका, ससे, डुकरे, कोंबड्या व बदके हे मुख्य प्राणी होत. काही माणसाळविलेल्या प्राण्यांपासून व्यापाराला उपयुक्त अशा चामडी, शिंगे हस्तिदंत, लोकर, फर, लाख, मध, मेण व रेशीम ह्या वस्तू मिळतात.
बैल, घोडे व हत्ती मुख्यतः शेतीच्या कामासाठी, वाहतुकीसाठी किंवा सामानाची ने-आण करण्यासाठी राबविले जातात. वाळवंटातून प्रवास करण्यास उंट हा फार उपयुक्त प्राणी आहे. काही पक्षी (उदा., कबूतरे) संदेश पोहोचविण्यासाठी उपयोगी पडतात.
हरणे, ससे, पोपट, कबूतरे, मोर व कित्येक रंगीत पक्षी जरी माणसाने पाळले असले, तरी ते खऱ्या अर्थाने माणसाळविलेले प्राणी नव्हेत. घोड्याची बुद्धिमत्ता व आपल्या धन्याविषयीची ममता, तसेच कुत्र्याचा इमानदारीपणा हे गुण सर्वांना परिचित आहेतच. हत्ती हा प्राणी घोड्यापेक्षाही बुद्धिमान आहे. तो उदार व दिलदार स्वभावाचा असतो. तो निष्कारण कोणावरही सूड घेत नाही पण खऱ्या अर्थाने तो माणसाळविता येत नाही. लहान हत्ती जंगलातून पकडून मग त्याला माणसाळवितात. हत्तीचा उपयोग दाट जंगलात जड ओंडक्यांची वाहतूक करण्याकरिता केला जातो. तसेच राज्याभिषेक अगर मंगलकार्यास एक शोभेचे वाहन म्हणून त्याचा उपयोग केला जातो. हस्तिदंत ही फार मौल्यवान वस्तू आहे. त्यापासून शोभेच्या कोरीवकाम केलेल्या अनेक वस्तू बनविल्या जातात.
संदर्भ : 1. Crow, W. B. Synopsis of Biology, Bristol, 1960.
2. Zeuner, F. E. A History of Domesticated Animals, New York, 1964.
रानडे, द. र. इनामदार, ना. भा.
“