प्रतीकवाद : (सिम्बलिझम). एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील कलासाहित्यविषयक चळवळ. फ्रान्समध्ये ‘ल पार्नास’ या वस्तुनिष्ठतेवर भर देणाऱ्या काव्यसंप्रदायाविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून १८८५ च्या सुमारास प्रतीकवादाचा उदय झाला. ‘ल सँबोलिस्म्’ही संज्ञा प्रथम झां मोरेआस (१८५६-१९१०) या फ्रेंच कवीने रुढ केली. तत्पूर्वी नव्या प्रणालीला वाहून घेतलेल्या कवींना ‘ले देकादां’ या नावाने संबोधण्यात येत असे. शार्ल बोदलेअर (१८२१-६७) या कवीला प्रतीकवादाचा जनक मानले जाते. गंध, स्वर व रंग यांचे परस्परसंबंध अगदी निकटचे आहेत, हा विचार त्यानेच प्रथम कॉरेस्पॉदांस (म. शी. परस्परसंबंध) या सुनीतात मांडला. पॉल व्हेर्लेअनच्या (१८४४-९६) रॉमांस सां पारॉल (१८७४) या भावकविता व स्टेफान मालार्मेचे (१८४२-९८) लाप्रेमिदी दँ फोन (१८७६, म. शी. एका वनचराची दुपार) हे दीर्घकाव्य यांतून
प्रतीकवादाचे मूर्त स्वरूप प्रकट झाले. पारंपरिक तात्त्विक व तांत्रिक निर्बंधांविरुद्ध प्रतीकवादाने बंडाचा झेंडा उभारला आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या स्वच्छंदतावादी संप्रदायाचा पाठपुरावा केला. प्रतीकवादाने पुढील साहित्यविषयक तत्त्वे स्वीकारली : काव्याने चित्रकलेपासून नव्हे, तर संगीतापासून स्फूर्ती घेतली पाहिजे. काव्यात व्यक्त होणाऱ्या प्रतिमा कवीच्या मनाचीच प्रतीके असली पाहिजेत. अशाश्वत बाह्य विश्व हे अंतिम सत्य नसून ते अदृश्य अंतिम सत्याचे नुसते प्रतिबिंब होय. वास्तववाद व निसर्गवाद हे संप्रदाय क्षणभंगुर बाह्य विश्वाचे चित्रण करण्यात गुंतल्यामुळे प्रतीकवाद्यांचा त्यांना सक्त विरोध होता. अंतःसत्याची व्याख्या करणे अशक्यप्राय असून ते फक्त सुचविता येते, अशी त्यांची धारणा होती.
व्हेर्लेअन, मालार्मे, रँबो (१८५४-९१), जूल लाफॉर्ग (१८६०-८७), आंरी द् रेग्निए (१८६४-१९३६), जां मोरेआस, त्रिस्तां कॉर्बिॲर (१८४५-७५), व्हिलिए द् लिल आदां (१८३८-८९) हे काही प्रमुख प्रतीकवादी कवी होत. व्हेर्लेअनची ‘आर पोएतीक’ (१८८२, म. शी. काव्य-कला) ही कविता प्रतीकवादाचा जाहीरनामा मानली जाते कारण प्रतीकवादाची मूलतत्त्वे तीतून ध्वनीत झाली आहेत. कवितेच्या संगीतात्मक गुणधर्माला तीत सर्वप्रथम स्थान दिलेले आहे. ही संगीतात्मकता कवितेत आणण्यासाठी समसंख्येतील अक्षरवृत्तांऐवजी विषम संख्येच्या अक्षरांच्या (उदा., सात किंवा नऊ किंवा अकरा) ओळींची रचना करावी, असे तो म्हणतो. तसेच रंगांपेक्षा रंगच्छटांवर अधिक भर हवा, असे त्याचे प्रतिपादन आहे. हे साधण्यासाठी शब्द संदिग्ध व धूसर अर्थाने वापरावेत व त्यांच्या वेगवेगळ्या अर्थच्छटा जागृत कराव्यात, ह्यावर त्याने भर दिला आहे. भाषिक आविष्कारातील नेमकेपणा व काटेकोरपणा यांचा पुरस्कार करणाऱ्या ‘पार्नॅसिअन’ व अभिजात काव्यसंप्रदायांविरुद्ध ही प्रतिक्रिया होय. प्रस्तुत कवितेते वक्तृत्वपूर्ण आलंकारिक शैलीवरही प्रखर हल्ला केलेला आहे. संगीतसदृश अशी विमुक्त व प्रवाही (व्हर्स लिब्रे) लय कवितेच्या शैलीतून साकारण्याचा प्रतीकवादी कवींचा प्रयत्न पुढील काळातही मार्गदर्शक ठरला.
प्रतीकवादाचा पुरस्कार करणारी काही नियतकालिकेही त्या काळात पुढे आली. ल मॅरक्यूर द् फ्रान्स, ला काँक, ल देकादां, ला प्ल्यूम, ला रव्ह्यू ब्लांश, ला रव्ह्यू अँदेपांदांत, ला रव्ह्यू वाग्नेरिॲन यांचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. साहित्याचा इतर प्रकारांतही प्रतीकवादाचा शिरकाव झाला. जे. के. यूईस्मांसची आ रबूर (१८८४, म. शी. उलट गती) ही कादंबरी प्रातिनिधिक मानली जाते. रमी द गुर्मों व मार्सेल श्वोब हे प्रतीकवादी टीकाकार होत. मॉरिस माटरलिंक (१८६२-१९४९) या नाटककाराची ‘तेयात्र देझार’ व ‘तेयात्र द् लव्ह्र’ या नाट्यसंस्थांनी सादर केलेली ला प्रँसस माललॅन (१८८९), पेलियासए मिलिसांद (१८९२) यांसारखी नाटके प्रतीकवादी होत. आल्फ्रॅद जारीचे उबू रॉय (१८९६) हे उपरोधनाट्यही याच पंथाचे मानले जाते.
प्रतीकवादाची चळवळ कलेच्या अन्य क्षेत्रांतही पसरत गेली. रिखार्ट व्हाग्नर (१८१३-८३) हा संगीतकार प्रतीकवाद्यांचे स्फूर्तीस्थान ठरला. क्लोद दब्यूसी (१८६२-१९१८) हा प्रमुख प्रतीकवादी संगीतकार होय. फ्रेंच प्रतीकवादी काव्याचा प्रभाव तत्कालीन चित्रकलेवरही पडला. पूर्वापार चालत आलेल्या निसर्गवादी, वास्तववादी कलाप्रणालींच्या विरोधी प्रतिक्रिया म्हणून प्रतिकवादी चित्रकला निर्माण झाली. या पंथाच्या चित्रकारांनी बाह्य निरीक्षणावर आधारलेल्या वस्तुनिष्ठ चित्रणाचा अव्हेर केला. सु. १८८५ ते १९०० या दरम्यानच्या चित्रकारांमध्ये वास्तवादाला विरोधी व व्यक्तिनिष्ठ आविष्काराला प्राधान्य देणाऱ्या समान प्रवृती आढळत असल्याने त्यांची गणना स्थूलपणे ‘प्रतीकवादी’ अशा सैल व व्यापक संज्ञेने केली जाते. ‘नाबीज’ पंथीय, संश्लेषणवादी (सिंथेटिस्ट), नव्यकलावादी अशा प्रणालींतील कलावंतांचा निर्देश त्यात येतो. व्यक्तिगत भावानुभूती, कल्पना वा विचार यांना अनुरूप व समर्पक असा आशय दृश्य आकृतिबंधाच्या माध्यमातून व्यक्त करता येतो, अशी प्रतीकवाद्यांची दृढ धारणा होती. सुरुवातीच्या प्रतीकवादी चित्रकारांत पॉल गोगँने (१८४८-१९०३) आपल्या चित्रांतून विचाराच्या गाभ्याशी जाऊन भिडणारी रंगसंगती तसेच ज्यातून निश्चित कल्पना दृश्य रूपात साकार होऊ शकतील असे रंगरेषांचे संश्लेषण साधण्याचा प्रयत्न केला. गोगँचा अनुयायी मॉरीस दनी (१८७०-१९४३) याच्या मतानुसार अलंकरणातील परिपूर्णत्व हे आध्यात्मिक सौंदर्याशी मिळतेजुळते असते ते अशा अर्थाने, की कलारूपातील सुसंवादित्व आणि धर्मतत्त्वातील तार्किक संगती ह्यांत एकप्रकारे सारखेपणा आढळून येतो. या अर्थाने गोगँच्या यलो ख्राइस्ट (१८८९) या चित्राचे आकारिक संयोजन हे आध्यात्मिक तार्किक रचना म्हणून मानले गेले. ह्याच पंथाच्या ऑदिलाँ रदाँच्या (१८४०-१९१६) सामर्थ्यवान, गूढरम्य ‘दृश्य काव्या’ची- चित्रांची तुलना शार्ल बोदलेअरच्या कवितांप्रमाणेच दब्यूसीच्या संगीताबरोबरही करण्यात आली. ग्यूस्ताव्ह फ्लोबेअरच्या टेम्प्टेशन ऑफ सेंट अँथनी या कादंबरीवरील त्याची शिलामुद्रित रेखनांची मालिका या दृष्टीने खास उल्लेखनीय आहे. अदृश्य विश्व दृश्यरूपात साकार करण्याचे सामर्थ्य व कल्पकता रदाँमध्ये आढळते. स्वप्नसदृश मनोवस्था व खास व्यक्तिविशिष्ट अनुभव यांची चित्ररूप अभिव्यक्ती ग्यूस्ताव्ह मॉरो (१८२६-९८) व प्यूव्ही द शाव्हान (१८२४-९८) यांनीही घडविली. मॉरोने साहित्यिक विषयांवर व तद्जन्य प्रतिमांवर आधारित गुंतागुंतीचे व संमिश्र अनुभव चित्रित केले. प्यूव्ही द शाव्हानने भव्य अशा भित्तिचित्रांच्या निर्मितीतून उदास व करुणगंभीर भावनांचे समर्थ दर्शन घडवले. स्वतःच्या व्यक्तिगत भावानुभूतीला चित्ररूप देणारे अनेक कलावंत पुढे उदयास आले. विशेषतः उत्तर दृक्प्रत्ययवादी चित्रकारांमध्ये ही प्रवृत्ती आढळते. व्हान गॉख (१८५३-९०), फर्डिनँड होड्लर (१८५३-१९१८), एडव्हार्ट मुंक (१८६३-१९४४), जेम्झ आँसॉर (१८६०-१९४९) इ. चित्रकार या संदर्भात खास उल्लेखनीय होत. अतिवास्तववाद व दादावाद हे संप्रदाय प्रतीकवादाचे पुढचे टप्पे होत. विसाव्या शतकातील कवी पॉल व्हालेरी, शार्ल पेगी, पॉल क्लोदेल यांच्यावर प्रतीकवादाचा प्रभाव जाणवतो. फ्रान्समधून प्रतीकवादाची चळवळ यूरोपात व अमेरिकेत पसरली. इंग्रज कवी येट्स, जर्मन कवी रिल्के व रशियन कवी आंद्रे बेली हे प्रतीकवादाच्या प्रभावाखाली आले.
संदर्भ : 1. Balakian, Anna, The Symbolist Movement, New York, 1967.
2. Cornell, Kenneth, The Symbolist Movement, New Haven, 1951.
3. Lovegreen, S. The Genesis of Modernism : Seurat, Gauguin, Van Gosh and French Symbolism in the 1880’s, Stockholm, 1959.
4. Mackintosh, Alastair, Symbolism and Art Nouveau, London, 1975.
5. Venturi, L. Impressionists and Symbolists, New York, 1950.
सरदेसाय, मनोहरराय; इनामदार, श्री. दे.