प्यंगयांग : उ. कोरियाची राजधानी. लोकसंख्या १५,००,००० (१९७६ अंदाज). हे सेऊलच्या वायव्येस २०० किमी. व कोरियन उपसागराच्या पूर्वेस ४८ किमी. तॅदाँग नदीकाठी वसले आहे. हे रस्ते व लोहमार्ग यांचे केंद्र असून येथून जवळच सूनान येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. जलवाहतुकीच्या दृष्टीनेही या शहरास महत्त्व आहे.
कोरियातील हे एक इतिहासप्रसिद्ध शहर होय. गूढ दंतकथेनुसार तानगन राजघराण्याची राजधानी जेथे होती, त्या ठिकाणी इ. स. पू. ११२२ च्या सुमारास हे वसविले गेले. इ. स. पू. १०८ च्या सुमारास येथून जवळच असलेल्या लोलांग येथे चिनी लोकांनी व्यापारी ठाणे उघडले. तेव्हापासून प्यंगयांगसंबंधी ऐतिहासिक पुरावे मिळतात. चीन आणि जपान यांच्यामध्ये हे वसलेले असल्याने यास युद्धांना वारंवार तोंड द्यावे लागे. प्यंगयांग ही कोगुर्यो राजघराण्याची (इ. स. पू. ३७ — इ. स. ६६८) इ. स. ४२७ पासून राजधानी होती. कोर्यो राजघराण्याच्या (९१८—१३९२) काळातही हे राजधानीचे ठिकाण होते. १५९२ मध्ये जपान्यांनी हे जिंकले. १८६६ मध्ये अमेरिकेच्या जहाजावार येथील लोकांनी हल्ला करून ते नष्ट केले आणि जनरल शर्मन यास ठार मारले. चीन-जपान युद्धात (१८९४—९५) या शहराचे अतोनात नुकसान झाले. जपानी अंमलात (१९१०—४५) याची औद्योगिक क्षेत्रात भरभराट झाली. कोरियन युद्धात (१९५०—५३) संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याचा त्यावर अल्पकाळ ताबा होता. पुढे ते चिनी आणि कोरियन कम्युनिस्ट सैन्यांनी काबीज केले. मात्र या युद्धातही शहराची फार हानी झाली. या युद्धानंतर शहराचा योजनाबद्ध विकास करण्यात आला असून रुंद रस्ते, झाडे, उद्याने, इमारती यांनी ते सुशोभित झाले आहे.
या शहरास समुद्रसान्निध्य लाभले असले, तरी येथील हवामानावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. जानेवारीतील सरासरी तपमान –८° से. असून ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत तपमान जास्त असते. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ९४ सेंमी. आहे. कोळसा आणि लोहखनिज यांनी समृद्ध असा परिसर लाभल्याने हे औद्योगिक केंद्र बनले आहे. लोखंड-पोलाद उद्योग, कापड उद्योग, साखर, रसायने, विमाने, अन्नप्रक्रिया इ. उद्योगांचा येथे विकास झालेला आढळतो. कोरियाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून हे प्रसिद्ध असून येथे किम इल सुंग विद्यापीठ (१९४६), वैद्यकीय विद्यालय, कम्युनिस्ट विद्यापीठ इ. उच्च शैक्षणिक संस्था आहेत. देशातील दहा प्रमुख वृत्तपत्रे येथून प्रसिद्ध होत असून त्यांमध्ये कोरियन पीपल्स आर्मी, लेबर डेली, द पीपल्स कोरिया ही वृत्तपत्रे महत्त्वाची आहेत, फादरलँड लिबरेशन वॉर मिमॉरियल हॉल, स्टेट सेंट्रल फाइन आर्ट्स म्यूझीयम, कोरियन नॅशनल फोक म्यूझीयम, ग्रँड थिएटर, मोरॅन्बाँग प्रेक्षागृह, बोल्शॉय थिएटर इ. प्रेक्षणीय आहेत.
ओक, द. ह. गाडे, ना. स.