आंध्र विद्यापीठ : आंध्र प्रदेश राज्यातील वॉल्टेअर येथे १९२६ मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ. मद्रास विधान परिषद-कायद्यानुसार तेलुगू भाषिकांकरिता स्थापण्यात आलेल्या या विद्यापीठाचे पूर्वीचे नाव वॉल्टेअर विद्यापीठहोते. राज्यपुनर्रचनेनंतर विद्यापीठासआंध्र विद्यापीठ असे नाव देण्यात आले. उस्मानिया आणि श्री वेंकटेश्वर ह्या विद्यापीठांच्या कक्षेत येणारा भाग सोडून आंध्र राज्यातील श्रीकाकुलम्, विशाखापटनम्, पूर्व गोदावरी, प. गोदावरी, कृष्णा व गुंतूर हे जिल्हे विद्यापीठाच्या कक्षेत येतात. विद्यापीठात प्रत्यक्ष अध्यापनाची व्यवस्था नाही. मात्र सर्व विषयांच्या विद्यापीठीय शाखा वॉल्टेअर येथील सहा विद्यापीठीय महाविद्यालयांत विखुरलेल्या आहेत व तेथेच विद्यापीठीय अध्ययन चालते. ह्या सहा विद्यापीठीय महाविद्यालयांव्यतिरिक्त १९७१ पर्यंत आणखी ७१ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न असून प्राच्यविद्या शिकविणार्‍या २७ महाविद्यालयांस विद्यापीठाने मान्यता दिली होती. या सर्व महाविद्यालयांमधून १९७०-७१ मध्ये ७६,४८९ विद्यार्थी शिकत होते. विद्यापीठीय महाविद्यालयांत पदवी व पदव्युत्तर परीक्षांसाठी अध्यापन होते. महासागर-विज्ञान, हवामानशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, आण्विक संशोधन, वर्णपटविज्ञान, तेलुगू व इतिहास या विषयांचे येथे विशेष अध्ययन चालते. सर्व महाविद्यालयांतून इंग्रजी हे माध्यम आहे. विद्यापीठाचा अर्थसंकल्प १९७१-७२ मध्ये रु. १२९.१० लाख होता.

घाणेकर, मु. ना.