आंत्रपुच्छशोथ:(ॲपेंडिसायटीस). लघ्वांत्राच्या (लहान आतड्याच्या) उंडुकाशी (मोठ्या आतड्याच्या पहिल्या गोमुखाकार भागाशी) असलेल्या संधिस्थानापासून खाली एक शेपटासारखे प्रवर्ध (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाची म्हणजे ऊतकांची अत्याधिक वाढ) असते त्याला ‘आंत्रपुच्छ’असे म्हणतात, त्याला सूज आली तर ‘आंत्रपुच्छशोथ’ झाला असे म्हणतात. हे प्रवर्ध कृमीसारखे लांबट असल्यामुळे त्याला ‘कृमिरूप’आणि भ्रूणावस्थेतील आंत्राचा तो अवशेष असल्यामुळे त्याला ‘अवशिष्ट आंत्रपुच्छ’ अशीही नावे आहेत. त्यांची लांबी सरासरी १० ते ११ सेंमी. आणि व्यास ०·५० ते ०·७५ सेंमी. असतो. या अवशिष्ट भागाला एकाच म्हणजे उंडुकाच्या बाजूला तोंड असून दुसरी बाजू बंद असते. लघ्वांत्रातील द्रव पदार्थ या अवशिष्ट भागात प्रवेश करू शकतात, परंतु हे पदार्थ पुन्हा उंडुकात ढकलले जाण्यासाठी आंत्रपुच्छाच्या भित्तीतील स्नायूंच्या क्रमसंकोचाची (क्रमाक्रमाने संकोच पावण्याच्या व सैल होण्याच्या क्रियेची) आवश्यकता असते.
आंत्रपुच्छ हा शरीराला निरुपयोगी किंवा उपयोग असलाच तर त्यासंबंधी निश्चित माहिती नसलेला भाग आहे. आंत्रपुच्छ उदराच्या उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात लोंबल्यासारखे असते, कधीकधी ते उंडुकाच्या पश्च (मागील) वा पार्श्व (बाजूच्या) भागाशी संलग्न असते. क्वचित ते श्रोणिभागात (धडाच्या तळाशी असलेल्या खोलगट आकाराच्या हाडांच्या वलयांमुळे तयार झालेल्या पोकळ जागेत) गेल्यासारखे असते. आंत्रपुच्छाची लांबी, त्याला एकाच बाजूला असलेले तोंड आणि त्याचे स्थान या सर्वांमुळे त्याला शोथ येण्याचा संभव असतो. लघ्वांत्रातून येणार्या द्रव पदार्थातील फळांच्या बियांसारखे कठीण पदार्थ, पित्ताश्मरी (पित्ताशयात तयार होणारे खडे), कृमी इ. बाह्य आगंतुक पदार्थांमुळे आंत्रपुच्छाचे तोंड चोंदल्यामुळे शोथास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. चोथा असलेले अन्न खाणे, अतिशय त्वरेने वा अधाशीपणाने अन्न खाणे, यामुळे आंत्रपुच्छाच्या क्रमसंकोचात व्यत्यय आल्याने शोथ येण्यास मदत होते. आंत्रपुच्छाचे तोंड बंद पडले तर त्याच्या आत जंतूंची वाढ होण्याला अनुकूल परिस्थिती उत्पन्न होते व त्यांच्यामुळे आंत्रपुच्छशोथ होतो. गिलायूमध्ये (टॉन्सिलमध्ये) अथवा शरीरात इतरत्र असलेले जंतू हे रक्तातून अथवा लसीकामार्गे (ऊतकांकडून रक्तात जाणार्या व रक्तद्रवांशी साम्य असलेल्या द्रवपदार्थांमार्गे) आंत्रपुच्छात येऊ शकतात. आंत्रपुच्छाचे तोंड बंद झाल्यामुळे आतील जंतूंवर पाचकरसांचा परिणाम होऊ शकत नाही. स्ट्रेप्टोकॉकस, बॅसिलत कोलाय वगैरे जंतूंमुळे मुख्यतः आंत्रपुच्छशोथ होतो. शोथ आल्यामुळे भित्तीवरील दाब वाढून त्यातील रक्तपरिवहन बंद पडते. असे झाल्यामुळे आंत्रपुच्छाची श्लेष्मकला (आतील बाजूस आढळणारा बुळबुळीत ऊतकांचा थर) आणि स्नायू यांचा कोथ (रक्तपुरवठा थांबल्याने होणारा ऊतकांचा मृत्यू) होऊन आंत्रपुच्छाच्या भित्तीचा भेद होतो व आतील शोथजनित पदार्थ पर्युदर (उदरातील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पडद्यासारख्या थराच्या) गुहेत पसरतात, त्यामुळे सार्वत्रिक पर्युदरशोथ (पर्युदराची दाहयुक्त सूज) होतो. असा पर्युदरशोथ योग्य वेळी उपचार न झाल्यास मारक ठरतो.
आंत्रपुच्छशोथ कोणत्याही वयात होऊ शकतो परंतु दहा ते तीस वर्षांपर्यंत त्याचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसतो. दोन वर्षांच्या आतील मुलांत तो क्वचितच दिसतो. काही स्त्रियांच्या उजव्या अंडकोशामधून आंत्रपुच्छाशी लसीका-परिवहन चालू असणे शक्य असल्यामुळे स्त्रियांमध्ये आंत्रपुच्छशोथाचे प्रमाण कमी दिसत असावे.
लक्षणे व निदान :आंत्रपुच्छशोथाची तीन प्रमुख लक्षणे असतात (१) बेंबीच्या उजव्या बाजूला थोडे खाली तीव्र वेदना आणि तो भाग ताठर होणे, (२) मळमळ, ओकारी आणि (३) ज्वर. ज्वर हे लक्षण लहान मुलांत अधिक प्रमाणात आढळते. या तीन लक्षणसमुच्चयाला ‘मकबर्नी लक्षणसमुच्चय’ म्हणतात व तिन्ही लक्षणे असली, तर निदान सुलभ होते. कित्येक वेळा ही तिन्ही लक्षणे एकाच वेळी आढळत नसल्यामुळे निदान करणे कठीण होते. लहान मुलांमध्ये उजव्या बाजूच्या फुप्फुसशोथात (न्यूमोनियात), संधिज्वरात (सांध्यांच्या दाहयुक्त सुजेत येणाऱ्या तापात), पित्ताशयशूल (पित्ताशयाच्या वेदना) आणि वृक्कशूल (मूत्रपिंडाच्या वेदना) या विकारांतही अशीच लत्रणे दिसतात. स्त्रियांत उजव्या बाजूच्या अंडाशयाचे द्रवार्बुद (द्रवयुक्त गाठ) अथवा अंडनलिकेत (अंड वाहून नेणाऱ्या नलिकेत) झालेली विकृतगर्भधारणा (गर्भाशयाबाहेर झालेली गर्भधारणा) यांमध्येही अशी लक्षणे असल्यामुळे या सर्व विकारांमध्ये आणि आंत्रपुच्छशोथामध्ये व्यवच्छेदक निदान फार कठीण होते. रक्तातील पांढर्या पेशींचे प्रमाण आंत्रपुच्छशोथात सारखे वाढत जाऊन ते १२ ते २० हजार प्रती घ. मिमी. इतके वाढते या गोष्टीची निदानाला फार मदत होते.
सौम्य आंत्रपुच्छशोथ काही काळाने आपोआप बरा होतो. क्वचित असा सौम्य आंत्रपुच्छशोथ वारंवार होत राहिल्यास चिरकारी (जास्त काळ टिकणारा) आंत्रपुच्छशोथ झाल्यामुळे आंत्रपुच्छ आजूबाजूच्या अंतस्त्यांशी (उदरातील इंद्रियांशी) संलग्न होते.
रुग्णपरीक्षा करताना बेंबीच्या उजव्या बाजूला खाली दडसपणा (घट्टपणा), स्पर्शासहत्व (स्पर्श करू न देणे) आणि सौम्य प्रकारात गाठ हाताला लागते. आंत्रपुच्छ उंडुकाच्या पश्चभागी अथवा श्रोणि-भागात असल्यास वेदनांची जागा थोडी बदललेली असते. क्वचित गुदमार्ग परीक्षेने निदान होऊ शकते.
तीव्र आंत्रपुच्छशोथ ही एक गंभीर घटना आहे म्हणून तीव्र उदरशूल (पोटदुखी) असलेल्या व्यक्तीने खालील गोष्टीसंबंधी काळजी घेणे इष्ट असते : (१) पाय गुडघ्यात वाकवून पोटाशी घेऊन उताणे अथवा कुशीला स्वस्थ पडून राहावे. पोट चोळू नये. (२) हालचाल शक्य तेवढी कमी करावी. जरूर पडलीच तर रुग्णवाहक गाडीमधून (ॲम्ब्युलन्समधून) धक्के न बसतील अशा प्रकारे रुग्णाला रुग्णालयात न्यावे. (३) पोटात काहीही घेऊ नये. तोंडाला कोरड पडत असल्यास गरम पाण्याने चुळा भराव्या. (४) बस्ती (एनिमा) अथवा रेचके घेऊ नयेत. (५) निदान निश्चित होईपर्यंत वेदनाशामक औषधे घेऊ नयेत कारण त्यांच्यामुळे लक्षणे झाकली जातात. (६) तीव्र प्रकारात पोटावर बर्फाची पिशवी ठेवावी. चिरकारी प्रकारात पोट शेकल्यास बरे वाटते.
चिकित्सा: आंत्रपुच्छशोथावर एकच उपाय म्हणजे शस्त्रक्रियेने आंत्रपुच्छ काढून टाकणे हा होय. सार्वत्रिक पर्युदरशोथ वा आंत्रकोथ असल्यास शस्त्रक्रिया अवघड होऊन काही काळ तरी पर्युदरात रबरी नळी घालून आतील शोथजन्य द्रवाला वाट काढून द्यावी लागते. चिरकारी प्रकारामध्ये आजूबाजूच्या अंतस्त्यांना चिकटलेले आंत्रपुच्छ सोडवून घेण्याला कित्येक वेळा फार त्रास होतो. शस्त्रक्रियेपूर्वी व नंतरही काही काळपर्यंत प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा उपयोग होतो.
आपटे, ना. रा.
आयुर्वेदीय चिकित्सा : हा विकार नामिविद्रधी म्हणजे नामिप्रदेशातील विद्रधी होय. याला ‘क्षुद्रांत्राविद्रधी’ ही म्हणता येईल क्षुद्रांत्र अतिलहान असल्यामुळे व पोकळी फार निमुळती असल्यामुळे तो पोकळीत फुटण्यापेक्षा आतल्या भागात फुटतो व छिद्रोदर होतो. आतला विद्रधी बाहेर जाणाऱ्या मार्गात फुटला त उपचार दैवानेच सफल होतात म्हणून तो न पिकता बरा व्हावा अशी चिकित्सा करावी.
आंत्रपुच्छाच्या विद्रधीची अतितीव्र अवस्था असेल त्या वेळी प्रथम विद्रधीच्या वरील त्वचेवर यथाशक्ती ४ ते ८ जळवा लावाव्या म्हणजे तेथले दोष बाहेर काढले गेल्यामुळे ताबडतोब शूल थांबतो, आतली सूज कमी होते व पिकण्याची चालू प्रक्रिया थांबते. तुंबडी वा शिंग यांनी किंवा शिरावेध करून रक्त काढावे. लगेच नवायस लोह एक गुंज मोरावळ्याबरोबर, निम्मा आहार घेतल्यावर, तीन वेळा द्यावे. याने सूज कमी होऊ लागते व रक्तधातूचा क्षय भरून येऊ लागतो. अशक्तता फार नसेल मधूनमधून रेचक द्यावे, नाहीतर आरोग्यवर्धिनी (२ ते ४ गुंजा) गरम तुपात जेवणास बसताना द्यावी म्हणजे शौचास साफ होऊन ज्वर इ. कमी होतात. वेदनांकरिता महायोगराज गुग्गुळ आलेरसातून द्यावा. आंत्रपुच्छशोथाचे निदान होताच भोजन, पेय व लेप यांत गोड शेवग्याच्या शेंगा, त्याचा पाला व फुले यांचा उपयोग करावा म्हणजे तो पिकणार नाही. तसेच अपक्व, पक्व इ. अवस्थांमध्ये योगराज, स्वायंभुवास्थ सिंहनाद इ. निरनिराळे गुग्गुळ किंवा यथावस्था योग्य अनुपान वा काढा यातून शुद्ध गुग्गुल किंवा शिलाजतू द्यावा. चंद्रप्रभा इ. शिलाजतुयुक्त कल्प द्यावेत.
विद्रधी फुटला तर छिद्रोदर होईल, तेव्हा छिद्रोदराची चिकित्सा करावी. यालाच ‘परिस्त्रावी उदर’ म्हणतात. रोग्याला योग्य तितके महातिक्तक धृतासारखे धृत पाजून, थोडे शेकून व पोटावर त्याच तुपाचा अभ्यंग करून उजवीकडे छेद द्यावा व विद्रधी काढून स्त्राव पुसून तूपमध लावून मुंगळे घुसवून आत शिवावे व मग त्यांच्या डोक्याच्या खालचा भाग तोडून टाकावा. सर्व आंत्र मधतुपाने चोपडून नंतर पोट शिवावे नंतर ज्येष्ठमध काळ्या मातीत घालून ती पोटावर लेपून पोट बांधावे व निवांत अशा खोलीत ठेवावे आहारास केवळ गाईचे दूध द्यावे. पोट फुगल्यास जरूरीप्रमाणे तेलाच्या किंवा तुपाच्या डोणीत यथाविधी ठेवावे.
जोशी, वेणीमाधवशास्त्री
संदर्भ : 1. Bailey, H. Love, M. A Short Practice of Surgery, London, 1962.
2. Wakeley, C. Harmer, M. Taylor, S., Ed. Rose and Carless Manual of Surgery, London, 1960.
“