आडनौअर, कोनराड : (५ जानेवारी १८७६–१९ एप्रिल १९६७). दुसऱ्या महायुद्धानंतरच्या पश्चिम जर्मन प्रजासत्ताकाचा पहिला चान्सलर. प. जर्मनीतील कोलोन या शहरी ह्याचा जन्म झाला. फ्रायबर्ग, म्यूनिक आणि बॉन ह्या विद्यापीठांतून त्याने कायद्याचे शिक्षण घेऊन, कोलोन येथे वकिली सुरू केली. हळूहळू तो स्थानिक राजकारणात भाग घेऊ लागला. कॅथलिक सेंटर पक्षाचा तो सभासद झाला. १९०६ मध्ये तो कोलोनचा उपमहापौर झाला. पुढे १९१७ ते ३३ ह्यादरम्यान तो कोलोनचा महापौर व ऱ्हाईनलँड विधानसभेचा सभासद होता. ह्या काळात त्याने कोलोन शहरात अनेक
सुधारणा केल्या. त्यांतील कोलोन विद्यापीठाची स्थापना व बंदराची पुनर्रचना ह्या प्रमुख होत. पुढे नाझी राजवटीत त्याचे महापौरपद गेले आणि त्यास १९३४ व ४४ मध्ये दोनदा कैद झाली. १९३३ पासून ४५ पर्यंत तो राजकारणापासून अलिप्त राहिला, परंतु दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर १९४५ मध्ये त्यास पुन्हा कोलोनचे महापौरपद मिळाले. कॅथलिक सेंटर पक्षाचे त्याने ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पक्षात रूपांतर केले आणि त्याचा तो अध्यक्ष झाला. त्या पक्षातून तो नव्या विधिमंडळावर निवडून आला. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने प. जर्मनीसाठी नव्या संविधानेचा मसुदा त्याने तयार केला. नव्या संविधानेनुसार १९४९ मध्ये वयाच्या ७३ व्या वर्षी तो जर्मनीचा पहिला चान्सलर झाला. १९६३ पर्यंत तो त्या पदावर होता.
आपल्या चौदा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने जर्मनीत सर्व क्षेत्रांत आमूलाग्र बदल केले विसकटलेली आर्थिक घडी बसविली, प. जर्मनीला राष्ट्र म्हणून मान्यता मिळवून दिली. यूरोपीय राष्ट्रे आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने ह्यांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापिले फ्रान्सबरोबर सहकार्याचा तह करून पूर्वापार चालत आलेले वैर नष्ट केले आणि पश्चिम यूरोपीय संघटनेसाठी अविश्रांत प्रयत्न करून प. जर्मनीस नाटो, यूरोपीय सामायिक बाजारपेठ आदी संस्थांचे सभासदत्व मिळवून दिले. जागतिक राजकारणात त्याने प. जर्मनीस एक विशिष्ट स्थान प्राप्त करून दिले.
आपल्या कारकीर्दीच्या अखेरच्या दिवसांत त्यास संयुक्त आघाडीचे सरकार बनवावे लागले तथापि त्याने आपले धोरण वा कार्यक्रम फारसा बदलला नाही. १९६३ मध्ये त्याने चान्सलरपदाचा राजीनामा दिला मात्र १९६६ पर्यंत तो पक्षाचा अध्यक्ष राहिला. प. जर्मनीचा शिल्पकार म्हणून त्यास इतिहासात फार महत्त्वाचे स्थान आहे. सर विस्टन चर्चिल ह्या मुत्सद्दयाने “बिस्मार्कनंतर असा मुत्सद्दी जर्मनीत झाला नाही” ह्या शब्दांत केलेले त्याचे वर्णन सार्थ वाटते.
संदर्भ : Hiscocks, Richard, The Adenaure Era, New York, 1966.
देशपांडे, सु. र.
“