आठल्ये, कृष्णाजी नारायण : (? १८५२– २९ नोव्हेंबर १९२६). एक मराठी ग्रंथकार व संपादक. जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी. त्यांचे वडील दशग्रंथी असल्यामुळे संहिता, शिक्षा, ज्योतिष, छंद इ. विषयांचे ज्ञान त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच प्राप्त झाले. याशिवाय कराड येथे त्यांचे थोडेसे इंग्रजी शिक्षण झाले. त्यानंतर पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजात राहून त्यांनी तेथील अभ्यासक्रम पूर्ण केला व शिक्षकाचा पेशा पतकरला. तथापि त्यांना चित्रकलेची आवड असल्यामुळे पाच वर्षानंतर शिक्षकाचा पेशा सोडून देऊन ते सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये आले व तेथे त्यांनी तैलचित्रकलेचे विशेष ज्ञान संपादन केले. पुढे बडोद्यास असताना बडोदे संस्थानचे दिवाण सर टी. माधवराव यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी अनेक तैलचित्रे तयार केली. त्यानंतर कोचीन येथे ते जवळजवळ २० वर्षे होते. तेथील वास्तव्यात त्यांनी केरळकोकिळ हे मासिक काढले (१८८६) व सु. २५ वर्षे ते चालवून तत्कालीन मराठी वाचकांत वाङ्मयाची आवड निर्माण केली. पहिली पाच वर्षे हे मासिक कोचीनहून निघत असे. त्यातील पुस्तक-परीक्षणे, लोकोत्तर चमत्कारांचे कथन, कविता, कलमबहादुरांना शेला-पागोटे, कूटप्रश्न इ. आकर्षक सदरांमुळे ते त्या काळात फार लोकप्रिय होते. गीते वर विविध वृत्तांत लिहिले गीतापद्यमुक्ताहार (१८८४) हे आठल्यांचे पहिले पुस्तक. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर तिसांहून अधिक पुस्तके लिहिली. त्यांचे बरेचसे लेखन अनुवादात्मक आहे. त्यात स्वामी विवेकानंदांच्या ‘राजयोग’, ‘भक्तियोग’ आणि ‘कर्मयोग’ या विषयांवरील लेखनाचे अनुवाद विशेष प्रसिद्ध आहेत. ते काव्यरचनाही करीत. सासरचीपाठवणी (१९२३) आणि माहेरचे मूळ (१९२३) ही त्यांची काव्ये त्यांच्या काळात त्यातील प्रासंदिक रचनेमुळे लोकप्रिय झाली होती. त्यांची भाषाशैली आकर्षक व आलंकारिक होती. ‘महाराष्ट्रभाषा-चित्र-मयूर’ ही पदवी त्यांना शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडून मिळाली होती.
इनामदार, श्री. दे.