असिपुच्छ मासा : या माशाच्या नराच्या शेपटीवर तरवारीच्या पात्यासारखा एक लांब भाग असतो म्हणून याला ‘असिपुच्छ’ हे नाव दिले आहे. मेक्सिको व मध्य अमेरिकेत गोड्या पाण्यात राहणारा हा

असिपुच्छ मासा (झिफोफोरस हेलरी) नर.

एक लहान मासा आहे. याचे शास्त्रीय नाव झिफोफोरस हेलरी  असून तो ⇨ गपी माशाचा नातेवाईक आहे. याची पाठ हिरव्या रंगाची व दोन्ही बाजू पिवळसर हिरव्या असतात. नराच्या पुच्छपक्षाचा अधर भाग तरवारीच्या पात्यासारखा लांब असतो. त्याचा रंग शेंदरी पिवळा असून कडा काळ्या असतात. थोड्या शेवाळ्यावर हा जगू शकतो. म्हणून हौशी लोक हा घरगुती जलजीवालयात (मासे व इतर जलचर प्राणी बाळगण्याकरिता असलेल्या काचेच्या भांड्यात) बागळतात. नर भांडकुदळ असल्यामुळे एका जलजीवालयात बरेच नर ठेवता येत नाहीत. कृत्रिम निवडीने यांचे अनेक रंगीबेरंगी प्रकार तयार केलेले आहेत. हा मासा जरायुज (पिल्लांना जन्म देणारा) आहे. मादीबरोबर एका वेळी १००-२०० पिल्ले असतात. या माशांत लिंगविपर्यय (लिंगाचा पालट) आढळतो. जवळजवळ ३० टक्के माद्यांचे क्रमाक्रमाने नरांत रूपांतर होते.

जोशी, मीनाक्षी