अतिभौतिक शक्तिवाद : आदिम स्थितीतल्या समाजांपासून तो आधुनिक सुधारलेल्या समाजांपर्यंत अतिभौतिक शक्तीची कल्पना निरनिराळ्या स्वरूपांत रूढ आहे. मानवशास्त्रज्ञांनी ‘अतिभौतिक शक्ती’ ही पारिभाषिक संज्ञा, आदिम समाजातील विशिष्ट आचारांचा उलगडा करण्याकरिता निर्माण केली. पाप व पुण्य, देवता, भूत-पिशाच, यक्ष, राक्षस, गंधर्व, अप्सरा, शाप व आशीर्वाद, ईशकृपा व ईश्वरकोप इ. अतिभौतिक शक्तींच्या कल्पना सुधारलेल्या प्रौढ संस्कृतीमध्येसुद्धा प्रसृत असतात. परंतु पाप व पुण्य, ईशकृपा व ईश्वराचा कोप, साधुसंतांचा वा ऋषिमुनींचा शाप व आशीर्वाद, देवता, पिशाच, यक्ष, राक्षस अशा स्पष्ट स्वरूपातल्या कल्पनांचे वाचक शब्द आदिम समाजांच्या भाषांमध्ये मिळत नाहीत. जादू व जादूसदृश प्राथमिक धर्माचार मात्र त्यांच्यात रूढ असतात. त्या धर्माचारांच्या मुळाशी अतिभौतिक अशा शक्तींची कल्पना आदिम समाजातील व्यक्तींच्या मनात वसत असते, असे मानवशास्त्रज्ञांनी गृहीत धरले आहे. ढग, समुद्र, जलाशय, अग्नी, पर्वत, वृक्ष, वनस्पती, विशिष्ट दगड, अनेक प्रकारचे विशिष्ट प्राणी, काही पक्षी व मासे, काही जनावरे व माणसे इत्यादिकांच्या ठिकाणी अदृश्य, विस्मयकारक अशा शुभकारक वा अशुभकारक शक्ती वसत असल्याचे आदिम समाज मानतो.
आदिम मनुष्यांना अकल्पितपणे जे यश येते व अचानकपणे जी संकटेही येतात, त्यांचा इंद्रियांच्या साहाय्याने साधा सरळ विचार करून उलगडा होत नाही, विस्मय उत्पन्न होतो, कल्पनाशक्ती चाळविली जाते. अतिभौतिक अदृश्य शक्तीची कल्पना केल्याशिवाय भागत नाही. त्याकरिता नित्याचे लौकिक वर्तन उपयोगी पडत नाही. अतिभौतिक शक्तींचा उपयोग करण्याकरिता व बाधा टाळण्याकरिता विशिष्ट प्रकारच्या अलौकिक क्रिया कराव्या लागतात. लौकिक (प्रोफेन) क्षेत्र व अलौकिक (सेक्रेड) क्षेत्र असे जीवनाचे व जगाचे एकमेकांत गुंतलेले भाग आदिम समाजात पडलेले असतात. आदिम समाजांच्या दृष्टीने काही वस्तूंत, व्यक्तींत वा क्रियांत शुभशक्ती व काहींमध्ये अशुभशक्ती असते.
जोशी, लक्ष्मणशास्त्री