अतिक्रमण : मूळच्या अतिविस्तृत अर्थानुसार दुसऱ्याच्या कुठल्याही न्याय्य हक्कावरील आक्रमण म्हणजे अतिक्रमण. बायबलच्या अधिकृत प्रतीमध्ये ह्याच अर्थाने अतिक्रमण हा शब्द वापरलेला आहे. कायद्याच्या परिभाषेप्रमाणे दुसऱ्यांच्या शरीरास वा स्थावर किंवा जंगम वस्तूस प्रत्यक्ष व बलपूर्वक इजा वा अपाय करणे म्हणजे अतिक्रमण. सामान्य जनांमध्ये मात्र ‘दुसऱ्याच्या स्थावरावरील अवैध आक्रमण’ या अर्थीच अतिक्रमण हा शब्द रूढ आहे.

अतिक्रमण हे प्रकरणाच्या तपशीलाप्रमाणे ⇨अपकृत्य किंवा गुन्हा वा दोहोंतही मोडू शकते. दिवाणी कायद्याप्रमाणे शरीरावरील, स्थावरावरील व जंगम वस्तूंवरील आक्रमण असे अतिक्रमणाचे तीन प्रकार आहेत. हमला, मारपीट, विकलांगीकरण व अवैध कैद ही शरीरविषयक अतिक्रमणाची अपकृत्ये होत. दुसऱ्याच्या कबजात असलेल्या स्थावरावर त्याच्या कबजास प्रत्यक्ष व ताबडतोब बाध येईल अशा रीतीने प्रवेश करणे म्हणजे स्थावरातिक्रमण. अवैध उद्देश असो वा नसो, प्रत्यक्ष नुकसान झालेले असो वा नसो, स्थावरातिक्रमण हे अपकृत्य ठरतेच. अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध दावा करणे, त्यास आपल्या स्थावरावरून बळाच्या उपयोगाने हाकलून लावणे वा बळाचा वापर करून आपल्या कबजाचे रक्षण करणे हे तीन मार्ग पीडितास उपलब्ध असतात. दावा करण्यासाठी पीडितास आपल्या स्थावरावरील मालकीहक्क दाखविण्याची गरज नसून, फक्त कबजा सिद्ध करणे जरूर आहे कारण अतिक्रमण हे मालकीहक्कास नसून कबजात बाध वा विरोध उत्पन्न होईल अशा प्रकारचे अपकृत्य आहे. वैधरीत्या प्रवेश करून आपले स्थावरावरील वास्तव्य अवैध झाल्यावरही तेथे राहिल्यास आदित: अतिक्रमण घडते. अतिक्रमण हे व्यक्तीकडूनच न घडता तिच्या जनावरांकडूनसुद्धा घडू शकते व त्याबद्दल ती मालक-व्यक्ती जबाबदार असते. दुसऱ्याच्या ताब्यातील वस्तूबाबत त्याच्या एकमेव ताब्यास बाध येईल किंवा वस्तूस अपाय होईल असे कृत्य म्हणजे जंगम वस्तूवरील अतिक्रमण. कॉमन लॉप्रमाणे अशा अतिक्रमणाच्या बाबतीत वादीला प्रतिवादीचा उद्देश किंवा हयगय सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. प्रत्यक्ष नुकसानीशिवाय अतिक्रमण सिद्ध होते. उदा., संग्रहालयामधील वस्तूस हात लावणे.

फौजदारी कायद्यामध्ये मात्र अतिक्रमणाचा स्थावरातिक्रमण हाच अर्थ अभिप्रेत असतो. भारतीय दंडसंहितेच्या कलम ४४१ प्रमाणे दुसऱ्याच्या कबजातील स्थावरामध्ये गुन्हा करण्याच्या हेतूने वा धमकी देण्यासाठी, अपमान करण्यासाठी किंवा चीड आणण्यासाठी प्रवेश केल्यास तसेच वैधरीत्या प्रवेश करून उपरोक्त उद्देशाने प्रेरित होऊन आपले दुसऱ्याच्या ताब्यातील स्थावरावरील वास्तव्य चालू ठेवल्यास सदरहू प्रवेश फौजदारी अतिक्रमण ठरतो. कबजा व त्यास बाधा हेच या गुन्ह्याचे मूलभूत स्वरुप असल्यामुळे प्रसंगविशेषी स्थावराचा खुद्द मालकही फौजदारी अतिक्रमणामुळे गुन्हेगार ठरु शकतो. फौजदारी कायद्यानुसार बळाचा वापर करूनही आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्याचा अधिकार कबजेदारास आहे.

संदर्भ : Thakore, Dhirajlal Keshavlal Manharlal Ratanlal, The English and Indian Law of Torts,Bombay,1960.

रेगे, प्र. वा.