ॲक्रोलीइन: (ॲक्रिल आल्डिहाइड). असंतृप्त (काही संयुजा मुक्त असलेले, → संयुजा). आल्डिहाइडी संयुग. सूत्र CH2 = CH·CHO.

 

गुणधर्म : स्वच्छ, वर्णहीन, बाष्पनशील (कमी तापमानास बाष्प होणारा), विषारी द्रव. याचा दर्प तिखट व डोळ्यास व नाकास झोंबतो. हे पाण्यात अल्प प्रमाणात विरघळते. हवेत किंवा उजेडात राहिल्यास वेगाने त्याचे पांढरे, अस्फटिकी बहुवारिक (एकाच पदार्थाचे अनेक रेणू संयोग पावून बनणारे संयुग) डिसॅक्रिल तयार होते. याचे ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडाभवन] सुलभतेने होते व अक्रिलिक अम्‍ल बनते.

 

कृती : सु. १००°से. तापमानाला उत्प्रेरकी (प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता तिचा वेग वाढविणाऱ्या) ॲल्युमिनावरून ग्‍लिसरीन व एखादा निर्जलकारी पदार्थ हे नेले असता ॲक्रोलीइन तयार होते. याच्या व्यापारी उत्पादनाच्या पुढील दोन पद्धती आहेत.

(१) एखाद्या उत्प्रेरकाच्या सान्निध्यात प्रोपिलिनाचे (CH2=CH·CH2) सरळ ऑक्सिडीकरण करून. (२) उत्प्रेरकाच्या सान्निध्यात बाष्परूप ॲसिटाल्डिहाइड (CH3CHO) व फॉर्माल्डिहाइड (H·CHO) यांची परस्परांवर विक्रिया होऊ देऊन :

CH3CHO + H·CHO → CH2 = CH·CHO + H2O ॲसिटाल्डिहाइड  फॉर्माल्डिहाइड   ॲक्रोलीइन

 

उपयोग : दहा लाखांत एक या प्रमाणात हवेत ॲक्रोलीइन असले तरी त्याचे अस्तित्व जाणवते. म्हणून प्रशीतक किंवा शीत कोठड्या (रेफ्रिजरेटर्स) यांच्या शीतन (थंड करण्याच्या) यंत्रणेतील वायू ज्या नळ्यांद्वारे नेलेले असतात त्यांना सूक्ष्म छिद्र पडले, तर ते कळावे म्हणून त्या वायूत थोडे ॲक्रोलीइन मिसळतात.

 

अल्कोहॉल पिण्यास निरुपयोगी करण्यासाठी त्याच्यात ॲक्रोलीइन मिसळतात. युद्धात विषारी वायू म्हणून त्याचा उपयोग होतो. प्लॅस्टिक पदार्थांच्या उत्पादनात कच्चा माल म्हणून त्याचा उपयोग होण्यासारखा आहे.

संदर्भ : Fieser, L. F. Fieser, M. Organic Chemistry, Bombay, 1962.

 

पटवर्धन, सरिता अ.