अँटायओकस, तिसरा: (इ.स.पू. सु.२४२–१८७). इ.स.पू. २२३–१८७ या कालातील ⇨सिल्युसिडी वंशातील सिरियाचा प्रसिद्ध राजा व दुसऱ्या सेल्युकसचा मुलगा. तो अल्पवयात थोरल्या भावाच्या मृत्यूनंतर गादीवर आला. त्या वेळी सिल्युसिडी साम्राज्य मोडकळीस आले होते आणि राज्यात सर्वत्र बंडाळी माजली होती. त्याच्या चुलतभावांनीही बंडे पुकारली होती. त्यास हेर्मिअस हा मुख्यमंत्रीही जबाबदार होता. इ.स.पू. २२१ मध्ये त्याने आपल्या चुलतभावांचा बंदोबस्त करून हेर्मिअस ह्यास मारले आणि सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. ह्याच सुमारास बॅक्ट्रिया व पार्थिया (बाल्ख व खोरासान) येथील राज्यपालांनी बंडे पुकारून आपले स्वातंत्र्य जाहीर केले. तेव्हा प्रथम त्याने पार्थियात स्थैर्य आणून बॅक्ट्रिया काबीज करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि शेवटी आपली मुलगी तेथील राजपुत्रास देऊन मैत्रीचा तह केला. पुढे तो हिंदुकुश ओलांडून अफगाणिस्तानात (कंदाहारला) आला. त्याने तेथील सुभगसेन (सोफॅगेसेनस) बरोबर तह करून हत्ती व इतर संपत्ती घेतली आणि तातडीने मेसोपोटेमियात गेला. तिथे त्याने पॅलेस्टाइन, फिनिशिया वगैरे ईजिप्तच्या अंमलाखालील प्रदेश जिंकून प्रत्यक्ष ईजिप्तपर्यंत मजल मारली. रोमबरोबरच्या युद्धात त्याचा दोनदा पराभव झाला. त्याने सिल्युसिडी साम्राज्य पूर्ववत करून राज्यविस्तार केला, म्हणून त्याचा उल्लेख तत्कालीन इतिहासकार अँटायओकस द ग्रेट असा करतात.
देशपांडे, सु. र.
“