अनुराधा : भारतीय नक्षत्रमालिकेतील सतरावे नक्षत्र. विशाखा नक्षत्राचे दुसरे नाव राधा असून हे त्यामागून येणारे म्हणून याला अनुराधा नाव पडले. याचा वृश्चिक राशीत अंतर्भाव होतो. यात पाश्चात्य नक्षत्र-पद्धतीच्या ‘स्कॉर्पियस’ मधील बीटा, डेल्टा, पाय व ऱ्हो हे तारे आहेत. हे साधारण सरळ रेषेत दिसतात. पाश्चात्य पद्धतीत हे वेगळे नक्षत्र मानीत नाहीत. उत्तरेस न्यू हे एक तारका-चतुष्क व डेल्टाच्या पूर्वेस असणारा एम ८० हा गोलाकार तारकापुंज हे विशेष उल्लेखनीय आहेत. अनुराधा नक्षत्र मे महिन्यात सायंकाळी उगवते व रात्रभर आकाशात दिसते. याची देवता मित्र व आकृती पूजा किंवा बली मानली आहे.
फडके, ना.ह.