आइन्स्टाइन, ॲल्बर्ट : (१४ मार्च १८७९–१८ एप्रिल१९५५). जर्मन-स्विस-अमेरिकन भौतिकीविज्ञ. ⇨सापेक्षता सिद्धांताचे जनक म्हणून सुप्रसिद्ध. १९२१ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते.
त्यांचा जन्म जर्मनीतील उल्म येथे झाला. जर्मनी व स्वित्झर्लंड येथील तांत्रिक शाळांत शिक्षण घेतल्यानंतर १९०५ मध्ये त्यांनी झुरिक विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी मिळविली. १९०२–१९०९ या कालात त्यांनी बर्न येथील पेटंट ऑफिसात तपासनिसाचे काम केले. याच कालात त्यांनी प्रसिद्ध केलेल्या चार शास्त्रीय निबंधांमुळे झुरिक विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली (१९०९). १९१३ मध्ये ते बर्लिन येथील ‘कैसर विल्हेल्म इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स’ या प्रख्यात संस्थेचे संचालक झाले व १९१४ मध्ये प्रशियन ॲकॅडेमी आफ सायन्सेसचे सदस्य झाले. जर्मनीत हिटलरचा अंमल सुरू झाल्यानंतर १९३३ मध्ये आइन्स्टाइन यांनी अमेरिकेस प्रयाण केले. तेथेच प्रिन्स्टन, न्यू जर्सी येथील ‘इन्स्टिट्यूट फॉर अडव्हान्स्ड
स्टडी’ या संस्थेत त्यांना कायमची नेमणूक मिळाली व अखेरपर्यंत त्यांनी तेथेच संशोधन केले. १९४० मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.
आइन्स्टाइन यांनी १९०५ मध्ये मर्यादित सापेक्षता सिद्धांत, वस्तुमान व ऊर्जा यांचे समानत्व (E=mc2) ब्राउनीय गतीसंबंधीचा (विद्रावात लोंबकळणाऱ्या कणांच्या सतत होणाऱ्या हालचालींसंबंधीचा) सिद्धांत व प्रकाशासंबंधीचा फोटॉन (प्रकाशपुंज) सिद्धांत या विषयांवरील भौतिकीत अत्यंत क्रांतिकारक ठरलेले निबंध प्रसिद्ध केले. त्यांचे बरेचसे शास्त्रीय कार्य सापेक्षता सिद्धांत, सांख्यिकीय यामिकी (अनेक घटक असलेल्या व्यूहातील, मोठ्या कक्षेत पण लहान टप्प्यांत, होणाऱ्या गतीचा अभ्यास करण्यासाठी संख्याशास्त्रातील पद्धतींचा उपयोग करणारी भौतिकीची शाखा) आणि प्रकाश प्रारण व शोषण सिद्धांत यांसंबंधी आहे. काही वर्षे संशोधन केल्यानंतर त्यांनी असा निष्कर्ष काढला की, सापेक्षता सिद्धांताचे जर यथायोग्य व्यापकीकरण केले तर त्यापासून गुरुत्वाकर्षण सिद्धांत मिळावयास पाहिजे. त्यानंतर बऱ्याच प्रयत्नांनी १९१६ मध्ये त्यांनी आपला विख्यात व्यापक सापेक्षता सिद्धांतावरील निबंध प्रसिद्ध केला. पुढील वर्षीच विश्वरचनाशास्त्रातील (विश्वाची संरचना, आकार इत्यादींसंबंधीच्या शास्त्रातील) प्रश्नांसंबंधी एक महत्त्वाचा निबंध प्रसिद्ध केला. अवकाश-काल भूमितीच्या साहाय्याने गुरुत्त्वाकर्षणीय व विद्युत् चुंबकीय या दोन्ही क्षेत्रांना लागू पडणारा सिद्धांत म्हणजे एकीकृत क्षेत्र सिद्धांत तयार करण्याचा त्यांनी १९२९ मध्ये पहिला प्रयत्न केला. मार्च १९५३ मध्ये गुरुत्वाकर्षण, विद्युत् चुंबकत्व व सापेक्षता यांसंबंधीचे नियम एकाच गणिती सूत्रात गोवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. द मीनिंग ऑफ रिलेटिव्हिटी या त्यांच्या ग्रंथाच्या चवथ्या आवृत्तीच्या (१९५३) पुरवणीत हे सूत्र त्यांनी मांडलेले आहे. परंतु पुंज (क्वांटम) व आणवीय घटना यांचा समावेश करणारे याहूनही जास्त उपयुक्त सूत्र तयार करणे त्यांना शक्य नसल्याची त्यांनी कबुली दिली.
प्रकाशविद्युत् संबंधीचा (प्रकाशाच्या क्रियेमुळे निर्माण होणाऱ्या विजेसंबंधीचा) सिद्धांत व भौतिकीतील त्यांच्या इतर सैद्धांतिक काऱ्याकरिता आइन्स्टाइन यांना १९२१ मध्ये भौतिकी विषयाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
त्यांनी १९३९ मध्ये त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांना एका पत्राद्वारे अणुऊर्जा उपयोगात आणणारी शस्त्रास्त्रे तयार करणे शक्य असून जर्मनीला अशा प्रकारची शस्त्रास्त्रे तयार करण्यात यश आल्यास होणाऱ्या संभाव्य जागतिक धोक्याचीही सूचना दिली होती व त्यामुळेच अमेरिकन सरकारने अणुबाँब तयार करण्यासाठी ‘मॅनहॅट योजना’ तातडीने हाती घेतली.
दुसऱ्या महायुद्धानंतर आइन्स्टाइन यांनी जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये अग्रस्थानी भाग घेतला. जागतिक सरकार प्रस्थापित करण्याच्या कल्पनेचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला. नाझी जर्मनीतून अमेरिकेत आलेल्या अनेक निर्वासितांना मदत करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो व अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. त्यांचे ३०० हून अधिक शास्त्रीय निबंध व इतर विषयांवरील ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्यांपैकी पुढील ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत (पहिले चार मूळ जर्मन भाषेत आहेत) : (१) द मीनिंग ऑफ रिलेटिव्हिटी (१९२३), (२)अबाउट झिओनिझम (१९३१) (३) व्हाय वॉर (सिग्मंड फ्रॉइड समवेत, १९३३), (४) द वर्ल्ड ॲज आय सी इट (१९३४), (५) बिल्डर्स ऑफ द युनिव्हर्स (१९३२), (६) द इव्होल्यूशन ऑफ फिजिक्स (लेओपोल्ट इनफेल्ट समावेत, (१९३८) (७) आउट ऑफ माय लॅटर इयर्स (१९५०). ते प्रिन्स्टन येथे मृत्यू पावले.
संदर्भ : 1. Frank, P. Trans. Rosen, G. Einstein, His Life and Times, New York, 1947.
2. Schilpp, P. A., Ed, Albert Einstein Philosopher-Scientist, New York, 1949.
भदे, व. ग.
“