अभियांत्रिकी उद्योग : लोखंड व पोलाद यांच्या व तसेच लोहेतर धातूंच्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या वस्तूंसाठी, या धातूंचा कच्चा माल म्हणून वापर करून, निरनिराळ्या प्रकारची लहानमोठी यंत्रे बनविणारी यंत्रे व शिवणयंत्रे, विजेचे पंखे यांसारख्या उपभोग्य वस्तू तयार करणारे उद्योग. या उद्योगांची स्पष्ट व्याख्या करणे किंवा त्यांच्या परिसीमा ठरविणे जरा कठीणच आहे कारण लोखंड व पोलाद उद्योगच स्वतः लोहमार्गाचे रूळ, तसेच इमारती, पूल वगैरे संरचनांत लागणारी मोठाली पोलादी बहाले इ. माल तयार करतात व हे तर (यांत्रिक) अभियांत्रिकचेच एक अंग आहे. तरीपण त्याचा पोलाद उद्योगातच समावेश करतात. भारताच्या मानाने यूरोप-अमेरिकेत विज्ञान व तंत्रविज्ञा यांत खूपच प्रगती झालेली आहे. तेव्हा तेथे ओतकाम, रूळमार्गी गाड्यांच्या डब्यांची बांधणी, जहाज-बांधणी, विमान-बांधणी एवढेच काय पण सायकली, स्कूटर व मोटारगाडी-उद्योग या प्रत्येकाला अगदी स्वतंत्र स्थान देण्यात येते. पण भारताच्या दृष्टीने (यांत्रिक) अभियांत्रिकीय उद्योगातच या सर्व शाखांचा समावेश करणे इष्ट ठरेल. इंग्लंडादी देशांत जेव्हा यंत्रांचे संशोधन व विकास होत होता तेव्हा विद्युत् अभियांत्रिकी, वस्त्र अभियांत्रिकी, धातुविज्ञान, रसायन इ. क्षेत्रांतही प्रगती व संशोधन होत होते पण या शाखा या लेखाचा विषय नसल्यामुळे त्यांचा विचार येथे केलेला नाही.
इतिहास : भारत :अगदी अलीकडेपर्यंत तरी भारत हा शेतीप्रधान देश आहे असे जगभर मानले जात होते. वैदिक किंवा पौराणिक कालात कदाचित ग्रहवेधांची यंत्र अस्तित्वात असावी व त्यांच्या वर्णनावरून जयपूर व दिल्ली येथील वेधशाळा बांधल्या गेल्या असाव्या. पण ती आधुनिक अर्थाने यंत्रे नाहीत. पाटा-वरवंटा, खलबत्ता, जाते व रहाट ही मूळ भारतीय यंत्रांची उदाहरणे म्हणून सांगता येतीलपण आधुनिक यंत्रयुगाच्या दृष्टीने ती फारच प्राथमिक स्वरूपाची आहेत. स्थापत्य-अभियांत्रिकीचे थोडेफार ज्ञान पूर्वकाली भारतीयांना असावे कारण काही ठिकाणी उत्खननात जुन्या कालव्यांचे अवशेष सापडतात. पण या लेखाचा मूलाधार जे यंत्र त्याची मात्र माहिती कसल्याच वाङ्मयात सापडत नाही. रामायणात प्रभू रामचंद्र रावणवधातंतर पुष्पक नावाच्या विमानाने अयोध्येस यावयास निघाले किंवा शाकुंतलातील राजा दुष्यंताचा रथ इंद्राला मदत करण्यासाठी जाताना आकाशमार्गाने गेला वगैरे वर्णनांवरून विज्ञान व तंत्रविद्या यांची माहिती पुरातन भारतीयांस असावी अशी शंका घेण्यास जागा राहते. पण ज्ञात ऐतिहासिक कालात त्यासंबंधी काहीही तपशील उपलब्ध नसल्याने भारतात यंत्रे नव्हती व म्हणून यंत्रोद्योगही नव्हता असे म्हणणे प्राप्त आहे. पुरातन काली कापसाचे, लोकरीचे वा रेशमाचे सूत काढणे व त्याचे मागावर कापड विणणे या गोष्टी होत असत. पण ते गृहोद्योग म्हणूनच चालत. आधुनिक पद्धतीचे संघटित उद्योगधंदे असे त्यांचे स्वरूप नव्हते. थोडक्यात, सन १८५० पर्यंत कारखाने व संघटित उद्योग असे भारतात नव्हतेच.
सन १८५० पूर्वी दोन-अडीचशे वर्षांपासून भारतीयांचा यूरोपीय लोकांशी संबंध येत होता. इंग्लंडात अठराव्या शतकातच यंत्रयुगाला प्रारंभ झाला होता व यूरोपीय लोकांच्या संपर्कात भारतीयांनाही तेथील यंत्रविकासाची माहिती व्हावयास हवी होती. पण तसे झालेले दिसत नाही. भारतात धातू गाळण्याचे ज्ञान बऱ्याच कालापासून अवगत होते पण विज्ञान व तंत्रविद्येची त्याला जोड मिळून यंत्रविकासात त्याचे पर्यवसान झाले नाही. इंग्रजांशी १७५० नंतर जास्त संबंध आल्यावर व सु. १८१५ ते या १९१५ शंभर वर्षांच्या कालातही भारतात यंत्रयुगाला सुरुवात झाली नाही याला भारतीयांचे या बाबतीतले औदासीन्य जरी प्रामुख्याने जबाबदार असले, तरी येथे त्या कालात प्रस्थापित झालेली परकीय सत्ताही काही प्रमाणात जबाबदर होती, असे म्हणता येईल.
अभियांत्रिकीय उद्योग म्हणजे दुसरी यंत्रे बनविणाऱ्या यंत्रांचे उत्पादन असो किंवा उपभोग्य वस्तू बनविणाऱ्या यंत्राचे वा वस्तूचेच उत्पादन असो, या उद्योगाचे मूळ अधिष्ठान यांत्रिक हत्यार हेच आहे. यांत्रिक हत्यार म्हणजे दंडगोल, दांडे वा सपाट पृष्ठ तयार करणे, तसेच भोक, गाळा, खाच पाडणे वगैरे क्रिया यांत्रिक शक्तीने करणारे यंत्र, उदा., लेथ, सपाटक यंत्र, छिद्रणयंत्र, इ. या यांत्रिक हत्यारांचा व ती बनविताना लागणारी मापके व उकरणे यांचा यूरोपात जेव्हा विकास होऊ लागला तेव्हाच यंत्रोत्पादनास गती मिळू लागली. यासंबंधीचे वर्णन पुढे दिलेले आहे.
भारतात यंत्रांचा शोध व विकास मूळ स्वरूपात असा अद्यापपर्यंत (१९७१) तरी झालेला नाही. जे काही या क्षेत्रात कार्य झाले ते अनुकरणानेच. अशा तऱ्हेच्याही कार्याला १९०० च्या सुमारासच सुरुवात झाली. त्या कालातील महाराष्ट्रास नाव घेण्याजोगी व्यक्ती म्हणजे लक्ष्मण काशिनाथ किर्लोस्कर हे होत. यांचा मूळ अभ्यासविषय आरेखन व चित्रकला हा होता तरी त्यांचा तंत्रविद्येकडे जास्त कल होता व त्यामुळे ते यूरोप-अमेरिकेतील यंत्रे बनविणाऱ्या कंपन्यांच्या माहितीपुस्तिका मागवीत व त्यांतील चित्रे व वर्णने यांवरून आपल्याला कसले यंत्र बनविता येईल यावर विचार करीत. यातूनच त्यांनी कडबा कापण्याच्या यंत्राची नक्कल करून मुळाबरहुकूम एक यंत्र स्वतः तयार केले. पुढे त्यांनी लोखंडी नांगर तयार करण्याचा मोठा कारखानाच किर्लोस्करवाडी येथे स्थापन केला. हे करताना पोलादाची संरचना व बिडाचे ओतकाम याचे सर्व तांत्रिक ज्ञान त्यांनी स्वतः मिळविलेले होते, हे विशेष. त्याच काळात ओगलेवाडी येथे सुरू झालेला ओगले बंधूंचा काचेचा व कंदिलांचा उद्योग व भिवंडी येथील दांडेकरांचा भात सडण्याच्या गिरण्या तयार करण्याचा कारखाना हे त्या काळातील आणखी नाव घेण्याजोगे अभियांत्रिकीय उद्योग होत. वैज्ञानिक किंवा तांत्रिक दृष्ट्या यांना महत्त्व नसले, तरी भारतातील त्या काळातील राजकीय व सामाजिक परिस्थिती लक्षात घेता हे कारखाने काढण्यास व चालविण्यास अनेक यांत्रिक व तांत्रिक अडचणींवर मात करावी लागली होती, म्हणून त्यांना महत्त्व आहे.
त्या काळी देशात इतरत्रही लहानलहान कर्मशाला विलायती यंत्रे मागवून सुरू होत होत्या व एकंदरीत औद्योगिक वातावरण हळूहळू देशात पसरत होते. रूळमार्गाचे जाळे पसरत होते व त्याचबरोबर रूळमार्गी एंजिने व डबे यांची दुरुस्ती करण्यासाठी ठिकठिकाणी कर्मशाला व यंत्रशालाही उभारल्या जात होत्या. मुंबईची व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट व पुण्याचे त्या वेळचे सायन्स कॉलेज, बडोदे संस्थानातील कलाभवन व लाहोरची व्हिक्टोरिया डायमंड ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट या तांत्रिक शिक्षणाच्या संस्थांनीही अभियांत्रिकीय शिक्षणाचा
प्रसार करून देशात तंत्रज्ञानाची आवड उत्पन्न होण्यास हातभार लावला. पहिल्या महायुद्धाच्या काळात अभियांत्रिकीय उद्योगांच्या स्थापनेला फारसा वाव मिळाला नाही. भारतातून युद्धकार्यासाठी कच्चा माल व कापड यांचाच जास्त करून उपयोग केला गेला. दोन युद्धांमधील काल (१९२५-३९) हा जागतिक मंदीचा काल होता. देशात उद्योगीकरणाला पोषक अशी लोकांची मनःप्रवृत्ती तयार झालेली असली तरी प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे नवे उद्योग सुरू झाले नाहीत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील परिस्थिती जरा निराळी होती. देशात थोडे राजकीय अधिकार लोकांना मिळालेले होते व युद्धकार्यासाठी तांत्रिक मदतीचीही सरकारला जरूर भासत होती. जपानने हवाई येथील अमेरिकेच्या नाविक तळावर हल्ला करून (डिसेंबर १९४१) पॅसिफिक व हिंदी महासागरांत युद्ध आणल्यावर जपान व इंग्लंड-अमेरिकेतून सर्व प्रकारची, विशेषतः यंत्रांची व अभियांत्रिकी वस्तूंची, आयात जवळजवळ बंदच झाली. याचा परिणाम असा झाला, की काही दिवस भारतात कागदाला लावायच्या साध्या टाचण्याही मिळेनाशा झाल्या होत्या व त्याऐवजी बाभळीच्या काट्यांचा वापर सरकारी कचेऱ्यांसह सर्वत्र रूढ झाला होता. यावरून १९४१ अखेरपर्यंत भारत अभियांत्रिकीय उद्योगात किती मागे, कदाचित उदासीन, होता हे दिसून येते. युद्धाच्या उत्तरकालातही उद्योगांची फारशी वाढ झाली नाहीकारण ती यंत्रसामग्रीच्या आयातीवर अवलंबून होती. देशाच्या सर्वांगीण उद्योगीकरणास खरी सुरुवात स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यावर (१९४७) आखलेल्या योजनांमुळेच १९५० पासून झाली.
इंग्लंड : आधुनिक अभियांत्रिकीय उद्योगाचा पाय इंग्लंडात प्रथम १८ व्या शतकात घातला गेला. असे होण्याला निरनिराळ्या प्रकारची बरीच व संमिश्र कारणे आहेत. त्यात मुख्य जरी विज्ञान व तंत्रविद्या यांचा विकास हे असले, तरी अनुकूल राजकीय व आर्थिक परिस्थितीही या उद्योगाच्या विकासाशी निगडीत आहेत. पाश्चिमात्य जगात अठराव्या शतकात घडलेल्या औद्योगिक क्रांतीचे मूळ इंग्लंडात त्यावेळी अवतरलेल्या यंत्रयुगात आहे. तेथील कोळशाच्या खाणी खोल होत होत्या व तेथील खोलवरचे पाणी जुन्या पद्धतीने उपसणे कठीण जाऊ लागले होते. या अडचणींवर मात करण्यासाठीच वाफ एंजिनाचा विकास झाला. हेन्री कोर्ट यांनी लोखंड शुद्ध करण्यासाठी वळत्या ज्वालेच्या भट्टीची पद्धती १७८४ मध्ये शोधून काढली व त्यामुळे लोखंड एकदम मुबलक व स्वस्तही झाले. अर्थात मग लोक त्याचा वापरही जास्त करू लागले व वापर वाढताना त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नव्या यंत्रांच्या विकासालाही उत्तेजन मिळाले. देशात आर्थिक समृद्धी होत गेली व परिणामी लोकसंख्येत वाढ होऊ लागली. लोकांची प्राप्ती वाढल्याने वस्तूंची मागणी वाढली व ही पुरी करण्यासाठी वस्तूंच्या उत्पादन-पद्धतीत सुधारणा घडू लागल्या. या सुधारणा घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचा इतिहास मनोरंजक आहे.
टॉमस सेव्हरी यांनी सन १६९८ त पहिला बर्यापैकी वाफेचा पंप शोधून काढला [→ वाफ एंजिन] पण त्यानंतर थोड्याच वर्षांनी (१७०५) टॉमस न्यूकोमेन यांनी काढलेला पंप जास्त सरस ठरून त्याचा प्रसारही खूप झाला. सेव्हरी यांच्या पंपात जरी वाफेचा वापर केलेला होता तरी त्याला प्रत्यक्ष एंजिनाचे स्वरूप नव्हते. न्यूकोमेन यांच्या पंपात मात्र सिलिंडर व दट्ट्या ही एंजिनाची अभिलक्षणे होती. पण आधुनिक स्वरूपातील वाफ एंजिनाचा विकास होण्यास आणखी अर्धशतक जावे लागले. जेम्स वॅट यांनी वाफ एंजिन शोधून काढले असे म्हटले जाते पण त्या एंजनातही टप्प्याटप्प्यांनी सुधारणा होतच ते रूप घेत गेले. मोठी अडचण होती ती एंजिनाचे भाग चांगल्या गुळगुळीत पृष्ठांचे व बिनचूक मापांचे करण्यात होती. एक उदाहरण म्हणजे सिलिंडराचे. त्याचा छेद सर्व लांबीभर सारखा व गोलही नसे. त्यातील दट्ट्याची गळबंदी त्यावर पाण्याच थर ठेवून साधली जात असे. ही सिलिंडराच्या ओबडधोबडपणाची अडचण जॉन विल्किन्सन नावाच्या कारागिराने दूर केली.
त्यांनी १७७४त पेटंट घेतलेल्या आपल्या प्रच्छिद्रक (पाडलेले भोक नीट साफ करणाऱ्या) यंत्रावर वॉट यांच्या सिलिंडराचे अचूक प्रच्छिद्रण करून दिले. या प्रच्छिद्रक यंत्राचा शोध हा यांत्रिक उत्क्रांतीच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा गणला जातो. घड्याळे व शास्त्रीय उपकरणे यांच्या बाबतीत (अगदी लहान यंत्रभाग) जी परिशुद्धता (यांत्रिक तंतोतंतपणा) पूर्वी साधली जात असे ती मोठ्या यंत्रांच्या बाबतीतही साधणे शक्य आहे हे यामुळे सिद्ध झाले व त्यामुळे यांत्रिकांना एक नवा दृष्टिकोन मिळाला. जोसेफ व्हिटवर्थ यांनी तर १८५० पर्यंत आपल्या सर्व कामात ०.००१”परिशुद्धीची मजल गाठली इतकेच नव्हे तर इंचाच्या दशलक्षांशात मोजू शकणारे एक उपकरणही त्यांनी आपल्या कारखान्यात बनविले होते. वरील प्रच्छिद्रक यंत्र तयार होण्याच्या वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत प्रत्येक यंत्र, नव्हे त्याचा प्रत्येक स्क्रू, नट व बोल्ट स्वतंत्रपणे तयार करावा लागे व त्या भागांच्या अचूकतेच्या बाबतीत कारागिरांची दृष्टी व त्यांचे हस्तकौशल्य यांवरच यंत्र सुरळीत चालणे वा न चालणे अवलंबून असे.
कामातील परिशुद्धतेची जरूरी व त्याचबरोबर मोठमोठाले भाग हाताळण्याची आवश्यकता यांतूनच आधुनिक यांत्रिक हत्यारांचा जन्म झाला. या हत्यारांची सामान्य रचना पूर्वीच्या यंत्रांसारखीच आहे, पण जरूर तेवढी शक्ती व कर्तकाला घट्ट पकडून जरूर तसे बिनचूनक चालवणे या ज्या गोष्टी पूर्वीच्यात नव्हत्या त्या आताच्या यंत्रात चांगल्या तऱ्हेने साधल्या आहेत. लेथचे खोगीर (कर्तक हत्यार बसविण्याचा भाग) हे याचे उदाहरण म्हणून सांगता येईल. लटलटणारे खोगीर काय कामाचे? पुढे याच्या रचनेत सुधारणा होऊन कर्तकाला अगदी सुरळीत गती देता येऊ लागली. यांत्रिक हत्यारात सारख्या अंतरालाचे (दोन आट्यांमधील अंतराचे) आटे असलेला स्क्रू हा एक अती महत्त्वाचा घटक असतो. त्याचा विकास या सुधारून स्थिर बनविलेल्या खोगिरामुळेच शक्य झाला. याचे पर्यवसान जेसी रॅम्झडॅन यांनी १७७० त पहिले चांगले आटे पाडणारे लेथ तयार करण्यात झाले. (अशा लेथाला खोगीर सरकविण्यासाठी मुळात एक चांगला स्क्रू असावा लागतो.) जोझेफ ब्रामा नावाच्या एका यांत्रिकाची टम्लर कुलपे प्रसिद्ध होती. एकदा त्यांना बरीच कुलुपे बनविण्याचा प्रसंग आला तेव्हा प्रत्येक भाग स्वतंत्रपणे बनविण्याची पद्धती फार महाग पडू लागली. तेव्हा त्यांनी हेन्री मॉडस्ले यांची मदत घेऊन कुलपाचे भाग बनविण्यासाठी नवी हातयंत्रे अभिकल्पिली व त्यामुळे काम जलद होऊ लागले एवढेच नव्हे तर सर्व भाग एकसाच्याचेही होऊ लागले. या अनुभवाचा फायदा घेऊन मॉडस्ले यांनी १७९४ ते १८१० या कालात विविध प्रकारच्या कामांसाठी उपयोगी पडेल असे लेथचे अचूक कामाच्या यंत्रात रूपांतर केले. तसेच खरे सपाट पृष्ठ तयार करण्यासाठी तासणीचा वापर व तीन पृष्ठे एकमेकांशी जुळती करण्याचे तत्त्वही त्यांच्यात कारखान्यात प्रथम वापरले गेले.
याच सुमारास फ्रान्समधील एका कारागिराने यंत्रांवर पन्नास कुलपांचे भाग बनविले. ते असे होते की कुठलाही भाग कुठल्याही कुलपात बसत असे. तसेच अमेरिकेतही इली व्हिटनी यांनी बंदुका तयार करण्यासाठी या एकसाच्याच्या भागांचे तंत्र स्वतंत्रपणे शोधून वापरले. आधुनिक उत्पादन तत्त्वांच्या बाबतीत इंग्लंडमध्ये पहिले महत्त्वाचे पाऊल टाकले गेले ते मॉडस्ले यांच्याकडून. मार्क इ. ब्रूनेल व सॅम्युएल बेंथॅम यांनी पोर्ट्समथ गोदीसाठी बऱ्याचशा कप्पी संचांचा आदेश दिल्यावर ते बनविण्यासाठी मॉडस्ले यांनी नवी ४३ यंत्रे अभिकल्पन करून बनविली. या यंत्रांमुळे ते वर्षाला १,३०,००० संच तयार करू लागले व तेही ११० कुशल कारागिरांच्या ऐवजी १० अकुशल कामगारांकडून. या उत्पादनात मॉडस्ले यांचे लक्ष मुख्यतः मापांच्या अचूकतेवर होते. पण त्याच वेळी एकसाच्याच्या तत्त्वामुळे निरनिराळ्या भागांची अदलाबदल साधली जाऊन पुढे रूढ होणाऱ्या महोत्पादनाचा पाया घातला गेला, हेही तितकेच खरे आहे.
त्या कालातील यंत्रशालांच्या उत्पादनाचा दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे तेथे अनुभव मिळवून तयार होत असलेले प्रशिक्षित यांत्रिक अभियंते. खुद्द मॉडस्लेंच्या कारखान्यांतूनच, त्यांच्या व्यतिरिक्त जेम्स नेस्मिथ, रिचर्ड रॉबर्ट्स व जोझेफ व्हिटवर्थ असे प्रसिद्ध अभियंते बाहेर पडले. नेस्मिथ हे त्यांच्या वाफेच्या घणाच्या शोधासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या यंत्रात आघाताच्या जोरावर चांगलेच नियंत्रण ठेवता येई. या घणामुळे अर्थात मोठाल्या भागांची घडाई व्यवहारात आली. रेल्वे अभियांत्रिकीतील ते एक आद्य संशोधक असून त्यांनी सन १८३६ त रधित्र (शेपिंग यंत्र- लहान सपाट पृष्ठभाग, खाचा इ. तयार करणारे यंत्र) शोधून काढले व नटांच्या बाजूंचे यंत्रण करण्यासाठी मिलिंग यंत्रही (खाचा पाडणे, पृष्ठभाग एकसारखा करणे इ. कामे करणारे यंत्र) काढले. दंडगोल भागांचे शाणन (पृष्ठभाग घासून एकसारखा करण्याची क्रिया) करण्याच्या पद्धतीतही त्यांनी मोठ्या सुधारणा केल्या. इतर लोक आदेश आला की यंत्रे बनवित, तर हे विक्रीसाठीच यंत्रे बनवून ती साठवीत व त्यांच्या जाहिरातीही देत. रिचर्ड रॉबर्ट्स यांनी १८१७ साली बनविलेले, सर्वांत जुने असे सपाटक यंत्र (प्लेनिंग यंत्र-मोठे सपाट पृष्ठभाग एकसारखे करणारे यंत्र) अजूनही चालू आहे. यांत्रिक हत्यारांच्या उत्क्रांतीच्या इमारतीवर जोझेफ व्हिटवर्थ यांच्या कार्याचा कळस चढलेला आहे. त्यांनी आपल्या यंत्रात आणलेला दर्जा आणि कामातील व मापांतील परिशुद्धी व अचूकता यांतच त्यांच्या कार्याचे महत्त्व आहे. कॉक्स, रॉबर्ट्स वगैरेंच्या यंत्रांत स्वतः सुधारणा करून १८५० च्या सुमारास व्हिटवर्थ यांनी सरळ दातांची, शंक्वाकारी व मळसूत्री दंतचक्रे तयार करणारी यंत्रे विकावयासही सुरुवात केली होती. त्यांनी नेस्मिथ यांच्या रधित्रात सुधारणा करून त्यातील कर्तक हत्यार बसविण्याच्या वाशाच्या परतीच्या फेरीचा काल कमी केला. त्यामुळे प्रत्यक्ष कर्तनाचा काल वाढला व काम चांगले होऊ लागले. यंत्रांच्या चौकटी व बैठका यांच्यासाठी त्यांनी पेटीसारख्या पोकळ आकाराच्या छेदांची योजना केली. यामुळे त्या भागांची भार सहन करण्याची ताकद वाढली. त्या काळात यंत्रे तयार करणारे लोक आपल्या यंत्रांतील स्क्रू, बोल्ट, नट वगैरे बंधकांत आपल्या सोयीनुसार आगट्यांचे निरनिराळे प्रकार वापरीत असत. त्यामुळे एखादा बंधक खराब होऊन दुसरा घालायचा झाला तर ते काम फार त्रासाचे व खर्चाचेही होत असे. ही अडचण जाणून व्हिटवर्थ यांनी प्रमाण पद्धतीचे (त्रिकोणी) आटे सुरू केले व ते पुढे कायदेशीर मानले गेले. व्हिटवर्थ यांचे नाव या आट्यांमुळे अजरामर झाले आहे. त्यांनी मापनातील शुद्धीच्या मानातही क्रांती घडविली व एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बनविल्या गेलेल्या मापनयंत्रांची अचूकता व्हिटवर्थ यांच्या मर्यादेच्या बाहेर फारशी जाऊ शकली नाही. १८५१ त भरलेल्या भव्य प्रदर्शनात त्यांच्या सपाटक, रधित्र, गाळे व खाचांचे यंत्र, छिद्रण-यंत्र, पंचिग (भोके पाडण्याचे यंत्र) आणि कातर-यंत्र यांनी व्हिटवर्थ यांना त्या काळातील सर्वांत श्रेष्ठ यंत्रोत्पादक अशी कीर्ती मिळवून दिली.
अमेरिकेची संयुक्त संस्थाने : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यांत्रिक अभियांत्रिकीच्या विकासाच्या व प्रगतीच्या इतिहासातील घटना केवळ ब्रिटनमध्येच घडल्या नसून त्या अमेरिकेतही घडल्या आहेत. एकसाच्याच्या भागांना यंत्रोत्पादनात येणारे महत्त्व प्रथम अमेरिकनांनीच ओळखले व त्यांनी ते तत्त्व बंदुका, तोफा वगैरे शस्त्रसामग्री, शिवणयंत्रे शेतीची व विजेची यंत्रे यांत व मुख्य म्हणजे मोटारगाड्यांच्या उत्पादनात सरसहा वापरायला सुरुवात केली. १८५३ त नेस्मिथ यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत गेलेल्या ब्रिटिश आयोगावर या एकसाच्याच्या भागांमुळे होणाऱ्या फायद्यांचा इतका परिणाम झाला, की इंग्लंडात परतल्यावर त्यांनी ते तत्त्व लगेच तिकडे लागू करण्याची शिफारस केली. त्या वेळी इंग्लंडात तयार होत असलेली यांत्रिक हत्यारे थोडीशी कमी शक्तीची, काम करायला धोक्याची व फारशी परिशुद्धी नसलेली अशाच स्वरूपाची होती व हे एकसाचा-तत्त्व प्रसृत झाल्यापासून या यांत्रिक हत्यारांत डोळ्यात भरण्यासाठी सुधारणा होऊ लागली. टरेट लेथ बहुधा इंग्लंडातच प्रथम बनविले गेले असावे पण तिथून ते अमेरिकेत नेले गेल्यावर एकसाच्याच्या भागांच्या उत्पादनामुळे त्याचे तेथे महत्त्व वाढले. लेथमधील खोगीर ही पहिली महत्त्वाची सुधारणा म्हटली तर टरेटचा शोध ही दुसरी म्हणता येईल. अमेरिकेतील यादवी युद्धानंतर तेथे स्वयंचलित लेथचा उदय झाला. यात कर्तक हत्यार व टरेट यांच्या हालचाली कॅमच्या साहाय्याने नियमित केल्या गेलेल्या होत्या. यांचा मुख्यतः स्क्रू बनविण्यासाठी उपयोग केला जाऊ लागला. या कालात टरेट लेथ, मिलिंग व शाणनयंत्रे ही यांत्रिक हत्यारांतील महत्त्वाला चढलेली यंत्रे होती. यांत्रिक हत्यारांचा यानंतरचा विकास, मिलिंग यंत्रासकट, अमेरिकेत घडून आला. लिंकन मिलिंग यंत्र अमेरिकेत १८५५ त प्रथम बाजारात आले.
यापुढील यांत्रिक हत्यारांच्या विकासातील टप्पा म्हणजे शाणनयंत्रांचा विकास होय. १८७४ त ब्राउन सर्वकामी शाणन पुढे आली. या यंत्रात त्या वेळी ज्ञात असलेल्या परिशुद्धीच्या सर्व रचना अंतर्भूत केलेल्या होत्या. हे यंत्र पुष्कळशा यंत्रणक्रिया करू शकत असे, तरी पण त्यात त्या वेळी वापरात असलेली नैसर्गिक अपघर्षक द्रव्यांची (खरवडून व घासून पृष्ठभाग गुळगुळीत करणाऱ्या द्रव्यांची), उदा., कुरुविंद, एमरी यांची, चाके उपयुक्ततेच्या दृष्टीने कमी पडतात, असे दिसून आले. यावर तोड म्हणून कृत्रिम अपघर्षक अस्तित्वात आले. पहिले कृत्रिम अपघर्षक सिलिकॉन कार्बाइड (कार्बोरंडम) हे होय. त्याचे काठिण्य हिऱ्याच्या खालोखाल असून ते प्रथम १८९१ त बनविण्यात आले. काही वर्षांनी ॲल्युमिनियम ऑक्साइडापासून काही अपघर्षके तयार केली गेली तर लगेच पुन्हा काही दिवसांनी औद्योगिक हिरे व बोरॉन कार्बाइड अपघर्षके पुढे आली. योग्य असे बंधकद्रव्य वापरून या अपघर्षकांचे निरनिराळ्या आकारमानांचे कण त्यात घालीत व मग त्यांची जरूर त्या निरनिराळ्या आकारांची चाके बनवीत [àअपघर्षक]. आता शाणनयंत्र हे पूर्वी यंत्रण केलेल्या एखाद्या पृष्ठाचे केवळ सुंदर परिरूपण (पृष्ठभागाची अंतिम सफाई) करण्याचे साधन राहिले नसून ते स्वतःच एक महोत्पादनाचे साधन बनले आहे. मोटारगाड्यांच्या एंजिनाचे भुजादंड आता लेथ वगैरे यंत्रांवर यंत्रित न करता त्यांचे शाणनयंत्रावर एकदम शाणनच करतात. मोटार-व विमान-उद्योगांत सांप्रत शाणनयंत्रांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
निरनिराळ्या प्रकारच्या यांत्रिक हत्यारांच्या अभिकल्पात व रचनेत जसजशी सुधारणा होऊ लागली तसतशी त्यांच्याकडून व्हावयाच्या कामांतही वाढ अपेक्षिली गेली. यासाठी अर्थात त्यांना जास्त शक्ती पुरविली जाऊ लागली. तरीपण या यंत्रात एक उणीव जाणवू लागली व ती म्हणजे कर्तक हत्याराच्या प्रतीची. यंत्र चांगले, शक्ती हवी तेवढी, म्हणून कर्तक जास्त धातू काढील म्हणून सरकवला, तर त्याची धारच वरचेवर जाऊ लागली. या अडचणीवर मात करण्यासाठी साध्या कार्बन पोलादात सुधारणा इष्ट झाली. १८५० च्या सुमारास असे दिसून आले, की पूर्वीच्या हत्यारी पोलादातील मँगॅनीजाचे प्रमाण वाढविले व त्यात टंगस्टन व व्हॅनेडियम या धातू थोड्या प्रमाणात मिसळल्या तर तयार होणाऱ्या पोलादाच्या अंगी आपसुख कठीण होण्याचा गुण येतो. पूर्वीचे पोलाद १२ मी./मि. कापू शकत असे तर हे १८ मी./मि. वेगाने सहज कापू लागले. या शोधानंतर थोडे दिवस या नव्या पोलादाच्या हत्यारांच्या कर्तनक्षमतेच्या मानाने यंत्रांची शक्तीच कमी पडू लागली. पण मग पुढे यंत्रे व हत्यारी पोलाद यांचा विकास बरोबरच होऊ लागला व १८९० च्या सुमारास यंत्रातील नरम पोलादाचे कर्तन ४५ मी. /मि. ह्या वेगाने होऊ लागले. परत लवकरच (१९००) टेलर व व्हाइट यांनी उच्चवेगी पोलादाचा शोध लावला. त्यात कार्बनाव्यतिरिक्त टंगस्टन व क्रोमियम ही मुख्य व इतर काही द्रव्ये थोड्या प्रमाणात असतात. हे ९० ते १२० मी./मि. वेगाने कर्तन (फार खोल नसलेले) करू लागले.
यांत्रिक हत्यारांच्या विकासाच्या व प्रगतीच्या मार्गातील आणखी एक टप्पा म्हणजे वंगणातील सुधारणा. जसजसे यंत्रांचे वेग वाढत गेले तसतसे वंगण व वंगण-यंत्रणेचे महत्त्व जाणवू लागले. १८५० च्या सुमारास खनिज तेले व ग्रीज पुढे येऊन तो प्रश्नही सुटला. मग यंत्रशालेतील यंत्रे चालवणाऱ्या पट्ट्यांकडे लक्ष गेले व त्यांचा जंजाळ कामात अडथळे आणीत आहे असे आढळल्याने प्रत्येक यंत्राला स्वतंत्र विद्युत चलित्र(मोटार) लावणे रूढ होऊ लागले. पहिल्याने चलित्रालाही पायरीच्या कप्प्या लावीत पण लवकरच त्यांच्याऐवजी लहान व सुटसुटीत अशा दंतचक्र-पेट्या वापरात आल्या. दोन्ही महायुद्धांच्या मधल्या काळात जर काही महत्त्वाचे शोध लागले असतील तर ते कर्तक द्रव्यात. पहिल्या महायुद्धात कोबाल्ट-क्रोमियम-टंगस्टन यांची मिश्रधातू पुढे आली होती. पण १९२६ च्या सुमारास जर्मनीतील प्रसिद्ध क्रप पोलाद कारखान्यातून, एकजीवित कार्बाइडे पुढे आली. ही टंगस्टन, मॉलिब्डेनम, टँटॅलम व टिटॅनियम या धातूंचे अगदी बारीक कण कोबाल्ट हा बंधक म्हणून वापरून एकजीव केलेली होती. ही कार्बाइडे हिऱ्यापेक्षा फक्त १५% कमी कठीण होती व उच्चवेगी पोलादाच्या मानाने बऱ्याच जास्त तपमानातही त्यांचे काठिण्य कमी होत नसे. म्हणून त्यांचा कर्तनवेग, जास्त कठीण व अपघर्षन-गुणधर्म अंगी असलेले धातू कापतानाही उच्चवेगी पोलादाच्या पाचपट जास्त असे. पण त्यांना शाणनाशिवाय दुसऱ्या क्रियेने आकार देता येत नसे व ती यंत्रांच्या कंपनांनी सहज फुटत असत. यावर तोड म्हणून या कार्बाइडांच्या हत्यारांना ऋणकोन देण्यात आला, म्हणजे त्यांची धार कापल्या जाणाऱ्या पदार्थापासून दूर ठेवण्याऐवजी त्याच्याकडे वळवली गेली.
दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषतः यंत्रे बनविण्याच्या द्रव्यात व त्याच्या रचनेत, प्लॅस्टिकचा वेगाने प्रसार झाल्यामुळे, क्रांतिकारी सुधारणा झाल्या व तसेच स्वयंचलित यंत्रे जास्त प्रमाणात वापरली जाऊ लागली. गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रॉनीय व संगणक (गणकयंत्र) तंत्रावर वैज्ञानिकांनी प्रभुत्व मिळविल्यामुळे नुसती एकएकटी यंत्रेच नव्हे तर कारखान्यातील काही विभागही, उदा., यंत्रभागांना मुलामा देणे व त्यांचे परिरूपण करणे हे विभाग, स्वयंचलित करण्यात आले आहेत.
यूरोप : साधारण १७५० ते १८५० पर्यंत ब्रिटनने यांत्रिक अभियांत्रिकीय क्षेत्रात व त्यामुळे एकंदर औद्योगिक क्षेत्रात मारलेली आघाडी सबंध यूरोप खंडात अद्वितीय होती व या क्रांतीचा त्या देशाला आर्थिक लाभही भरपूर होऊ लागला होता. तेव्हा यूरोपातील इतर देशांत या यांत्रिक युगाला सुरुवातही झाली नव्हती. फ्रान्समध्ये क्रांती होऊन (१७८७-१८००) राजकीय उलथापालथी चालू होत्या. इतर देशांतील ज्या पैसेवाल्या वर्गाने संशोधनाला उत्तेजन द्यावयाचे त्यांच्याजवळ पुरेसा पैसा नव्हता व त्यांना ब्रिटिशांची तंत्रज्ञानातील परंपराही लाभलेली नव्हती. तसेच तेथील राजकीय परिस्थिती उद्योगांच्या चालनाला पोषक नव्हती. दुसऱ्या बाजूने ब्रिटिशांना मिळत असलेला हा आघाडीचा फायदा ते स्वतःसाठी राखून ठेवण्याची पराकाष्ठा करीत होते. त्यासाठी त्यांनी यंत्रे, कसवी कामगार व उत्पादन-तंत्रे यांच्या निर्यातीवर प्रतिबंध घातले होते. पण त्यांचा एकाधिकार फार काळ टिकला नाही. यूरोपातील धंदेवाले ब्रिटिश तांत्रिकांना आमिषे दाखवून आपल्याकडे आणण्याच्या खटपटीत होतेच व शेवटी दोघा ब्रिटिशांनी बेल्जियममधील लीज शहरी १८०७ च्या सुमारास यंत्रशाला स्थापण्यास मदत केली व अशा तऱ्हेने ब्रिटिश यांत्रिक गुह्यांची निर्यात होऊन बेल्जियममध्ये यंत्रयुगाची मुहूर्तमेढ सबंध यूरोपात प्रथम रोवली गेली. जर्मनीसारख्या कोळसा व लोखंड यांत समृद्ध असलेल्या देशातही यंत्रयुगास सुरुवात होण्यास १८७० साल उजाडावे लागले. त्या वर्षी राजपुत्र बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकीकरण झाले. त्यानंतर तेथे यंत्रयुगास सुरुवात होताच यंत्रांचा व उद्योगांचा विकास झपाट्याने झाला व ते शतक संपताना तेथील पोलादाचे उत्पादन ब्रिटनच्या पुढे गेले होते. या तीन देशांशिवाय इतर देश मात्र अविकसितचराहिले. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियात मात्र आश्चर्यकारक प्रगती होऊन आज ते राष्ट्र अमेरिकेच्या बरोबरीने झाले आहे.
आशिया : पहिल्या महायुद्धानंतर विज्ञान व तंत्रविद्येत पाश्चिमात्य देशांबरोबरची प्रगती करणारा जपान हा एकमेव आशियाई देश होता. ही प्रगती यंत्रांच्या प्रगतीशिवाय शक्य झालेली नाही. पण तेथे सुरुवातीच्या काळात तरी मूलभूत संशोधन व विकास अशी झाली नाहीत. त्या राष्ट्राचा भर जलद औद्योगिकीकरणावर होता व त्यासाठी त्याने शक्य तितकी पश्चिमी राष्ट्रांच्या यंत्रांची नक्कलच केली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात साम्यवादी बनलेले चीन हे राष्ट्रही आशिया खंडात यंत्रांच्या बाबतीत प्रथम श्रेणीचे राष्ट्र बनले आहे.
भारतातील आभियांत्रिकीय उद्योगाची स्थापना व विकास : अभियांत्रिकीय उद्योगाचा पाया म्हणजे कोळसा, लोखंड व पोलाद. पैकी भारतात कोळसा हा १८५५ पासून खाणीतून काढला जाऊ लागला होता. १९१० च्या सुमारास बिहारमधील जमशेटपूर येथे टाटांचा लोखंड व पोलाद कारखानाही सुरू झाला होता. टाटांच्या कारखान्यानंतर आसनसोल येथे इंडियन आयर्न अँड स्टील कंपनीचा १९१८ साली व त्या वेळच्या म्हैसूर संस्थानातील भद्रावती येथे १९२१ साली, असे दोन नवीन कारखानेही निघाले. भद्रावतीच्या कारखान्यात फक्त कच्चे लोखंडच सुरुवातीला तयार होत होते पण १९३४ पासून पोलादही तेथे होऊ लागले व कंपनीचे नाव ‘म्हैसूर आयर्न अँड स्टील वर्क्स’ असे करण्यात आले. हे कारखाने सुरू झाल्यावरही भारतात यंत्रोद्योग सुरू झाला नाही.
सन १९४७ मध्ये राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे चित्र एकदम पालटले. देशाच्या औद्योगिकीकरणाला चालना मिळावी म्हणून पद्धतशीर व योजनाबद्ध प्रयत्न करण्याचे ठरले. संरक्षणासाठी लागणारी शस्त्रे, दारूगोळा व संबंधित साहित्य अणुशक्ती, लोखंड व पोलाद आणि त्यांची मोठाली ओतिवे व घडिवे मोठाली यंत्रे व संयंत्रे, खाणकाम, यांत्रिक हत्यारे बनविणारी यंत्रसामग्री इ. मूलभूत स्वरूपाचे उद्योग मिश्र अर्थव्यवस्थेनुसार आखलेल्या औद्योगिक धोरणाप्रमाणे शासकीय क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात आले व उरलेले खासगी क्षेत्राला दिले गेले. पद्धतशीर प्रयत्नांनी पंचवार्षिक योजनांचे रूप घेतले. पहिल्या योजनेला १९५१-५२ मध्ये सुरुवात झाली. सर्व उद्योगांचे यंत्र हे मुख्य साधन व ‘यंत्र म्हणजे लोखंड व पोलाद’ असे समीकरण ठरलेले असल्यामुळे लोखंड व पोलाद कारखान्यांच्या स्थापनेला सर्वांत जास्त महत्त्व आले व पहिल्या योजनेतच त्यांच्या स्थापनेला सुरुवात झाली. आज देशाच सरकारी क्षेत्रात प्रत्येकी १० लक्ष टन क्षमतेचे तीन कारखाने भिलाई, रूरकेला व दुर्गापूर येथे चालू आहेत. चौथा दुर्गापूर येथेच असून त्यात कार्बन, उच्चवेगी, मिश्र हत्यारांचे, मुद्रांचे व निर्गंज इ. प्रकारचे पोलाद तयार होते. पाचवा बोकारो येथे उभारला जात आहे. परंतु या कारखान्यांतून अपेक्षेप्रमाणे उत्पादन होत नसल्यामुळे पोलाद आयात करावे लागते व विदेशी चलन पुरेसे हातात नसल्यामुळे पुरेशी आयात करता येत नाही. या सर्व गोष्टींचा अभियांत्रिकीय उत्पादनावर अनिष्ट परिणाम होत राहिला आहे. कोळसा व लोह पूर्व भारतात असल्यामुळे पोलाद कारखाने बिहार व प. बंगाल याच राज्यात स्थापले गेले. पण आता दक्षिण भारतातही विशाखापट्टम, सेलम व हॉस्पेट येथे एकएक कारखाना सुरू करण्याचे ठरले आहे.
योजना कालात वस्त्र, साखर, सिमेंट, मूलभूत रासायनिक द्रव्ये, सायकली, यांत्रिक हत्यारे इ. बनवण्याची यंत्रसामग्री तयार होऊ लागली. तसेच लहान व मध्यम आकाराची डीझेल एंजिने, रूळमार्गी वाफ एंजिने, विद्युत् एंजिने (चित्तरंजन कारखान्यात) व डीझेल एंजिने (वाराणसी कारखान्यात) तयार होत आहेत. रूळमार्गी गाड्यांची एंजिने, उतारू वा मालाचे डबे इ. रेल्वेसाहित्याच्या बाबतीत देश आता स्वयंपूर्ण बनला आहे इतकेच नव्हे, तर या डब्यांची निर्यातही होत आहे. देशात आगबोटी बऱ्याच वर्षांपासून विशाखापट्टम येथे तयार होत आहेत. पण
त्या देशाची गरज भागविण्याइतपत नाहीत. मुंबईतील माझगाव गोदीतही आता युद्धनौकांसहित आगबोटी बांधण्याचे काम सुरू झाले आहे. सायकली, स्कूटर, मोटारगाड्या याही आता संपूर्णपणे देशात तयार होऊ लागल्या आहेत. या कालात विद्युत् चलित्रे, शक्तिचलित पंप, हवा-व वायू-संपीडक (दाबून संकोचन करण्याचे साधन), दूरध्वनी सामग्री व दूरसंदेशवहन सामग्री यांतही देश स्वयंपूर्ण बनत आहे. रेडिओग्रहण्या गेल्या काही वर्षांपासून बनत आहेत व दूरचित्रवाणी ग्रहण्याही काही प्रमाणावर तयार होऊ लागल्या आहेत. संरक्षण-दलांच्या तिन्ही शाखांना लागणारी शस्त्रास्त्रे, दारूगोळा इ. विमानांसकट बहुतेक सर्व प्रकारची सामग्री देशातच बनू लागली आहे.
योजनांच्या सु. वीस (१९५०-७०) वर्षांत झालेली प्रगती ही काही देशात झालेले संशोधन वा विकास यांचेच फळ नव्हे. उद्योगांच्या आरंभीच्या काळात, नव्हे त्यांच्या स्थापनेपासून, त्या त्या बाबतीत प्रगती केलेल्या राष्ट्रांकडून, मुख्यतः रशिया, इंग्लंड, प. जर्मनी, अमेरिका व जपान या राष्ट्रांकडून, आर्थिक मदत व तांत्रिक सहकार्य मोठ्या प्रमाणात घेण्यात आले. अशा सहकार्यामुळे भारतीयांना तांत्रिक ज्ञान मिळविणे सोपे गेले व ते कमी वेळातही शक्य झाले. आजच्या घटकेला भारताची प्रगती इतकी झालेली आहे की रूळमार्ग, वस्त्रोद्योग, साखरकारखाने इ. क्षेत्रांत आशिया व आफ्रिका खंडांतील विकसनशील देशांना तांत्रिक सल्ला देऊन प्रकल्पांची आखणी व उभारणी करून देऊ शकण्यापर्यंत भारताने मजल मारली आहे.
योजना सुरू झाल्यापासून वीस वर्षांत अभियांत्रिकीय उत्पादनात झालेली वाढ कोष्टक क्र. १ व २ वरून दिसून येईल. पहिल्या कोष्टकात कोळसा व लोह यांच्या उत्पादनाचे आकडे दिले आहेत. या गोष्टींचा अभियांत्रिकीय उत्पादनात समावेश करीत नाहीत. पण यंत्रोत्पादन या गोष्टींवर अवलंबून असल्यामुळे हे आकडे येथे देणे इष्ट आहे.
कोष्टक क्र. १: दगडी कोळसा, लोह व पोलाद उत्पादन
वस्तू |
१९५०-५१ |
१९६०-६१ |
१९६८-६९ |
दगडी कोळसा |
३१.२८ |
५१.३६ |
७१.४५ |
(लक्ष टन) |
|||
लोह धातुक |
०.३० |
१.१० |
२.१२ |
(लक्ष टन) |
|||
कच्चे बीड |
१६.९ |
४३.१ |
७७.३ |
(लक्ष टन) |
|||
पोलादाचे ठोकळे |
१४.७ |
३४.८ |
५५.० |
(लक्ष टन) |
|||
तयार पोलाद |
१०.४ |
२३.९ |
४७.० |
(लक्ष टन) |
|||
पोलादाची ओतीवे |
– |
३४.० |
४९.० |
फाळणीनंतरचा शेष भारतही मोठा आहे. त्यातील सर्व राज्ये सारखीच विकसित झालेली नाहीत. ही परिस्थिती जाणून नवीन उद्योग सोयीच्या व म्हणून थोड्याच ठिकाणी केंद्रित न करता ते सर्व देशभर विखुरले जावे, असे सरकारी धोरण ठरले. त्यानुसार सरकारी उद्योग देशाच्या निरनिराळ्या भागांत स्थापण्यास सुरुवात झाली. काही उद्योग प्रत्यक्ष सरकारी देखरेखीखाली (संबंधित मंत्रालयांमार्फत) चालतात तर काहींच्या बाबतीत व्यवस्थापनाच्या सोयीसाठी प्रत्येक उद्योगाकरिता वा कारखान्यासाठी एकएक सरकारी मालकीची पण स्वायत्त कंपनी स्थापली गेली आहे. सर्व क्षेत्रांत मिळून ५७ औद्योगिक संस्था असून त्यांतील यांत्रिक अभियांत्रिकीशी संबंधित असा सु. ३० आहेत. त्यांतील मोठ्या व महत्त्वाच्या संस्थांची त्रोटक माहिती खाली दिली आहे. तसेच खासगी क्षेत्राचीही माहिती पुढे दिलेली आहे.
सरकारी क्षेत्र : संरक्षण मंत्रालयाच्या अाधिपत्याखाली रणगाडे व मोठी वाहने बनविण्यासाठी मद्रासजवळील आवडी येथे एक कारखाना १९६४ च्या सुमारास काढला गेला. तेथेच वैजयंता रणगाडा बनतो. मुंबईच्या माझगाव गोदीमध्ये जहाजांची बांधणी आणि दुरुस्ती व तसेच संबंधित इतर कामेही होतात. फ्रिगेट, उतारू बोटी, उतारू मालबोटी, चिखलबोटी, कर्षक नावा (तराफे वा इतर लहान नावा ओढण्यासाठी वा ढकलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नावा) वगैरे प्रकारच्या – १४५ मी. लांब, २४ मी. रुंद व १५,००० टन वजन या कमाल मर्यादा असलेल्या-नौकांच्या बांधणीची सोय आहे. गोदीत होणाऱ्या सामान्य प्रकारच्या कामाची उदाहरणे म्हणून प. जर्मनीच्या डेमाग कं. च्या सहकार्याने तेथे नुकत्याच बनविलेल्या ८० टनी स्थिर यारी व १५ टनी समपातळीतील लफिंग यारी ही सांगता येईल. हिंदुस्थान शिपयार्ड लि. चे काम आतापर्यंत विशाखापट्टम येथील गोदीत चालू आहे. सरकारने ही गोदी सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कं. कडून १९५२ मध्ये विकत घेतली. या गोदीत कंपनी कालात, बांधलेल्या पहिल्या जहाजाचे जलावतरण मार्च १९४८ मध्ये झाले. गोदीत जहाजबांधणीचे चार गाळे असून प्रत्येकात १५,००० टन वजनापर्यंतच्या बोटी बांधता येतात. लहान नौकांच्या बांधणीसाठी एक पाचवा गाळाही आहे. तेथे एक सुकी गोदी बांधली जात असून तीत ५७,००० टनांपर्यंतच्या बोटी मावू शकतील. चौथ्या योजनेच्या (१९६९-७३) अखेरपर्यंत येथे बांधणीच्या अधिक सोयी करून गोदीची क्षमता सध्याच्या वार्षिक २-३ बोटींवरून ६ बोटींवर नेण्याचे काम पुरे होईल अशी अपेक्षा आहे. पश्चिम किनाऱ्यावर कोचीन येथे आणखी एक जहाजबांधणी कारखाना उघडण्याचे ठरले आहे. त्यासाठी जपानंच्या मिटसूबिशी हेवी इंडस्ट्रीज या कंपनीचे सहकार्य घेण्यात येत आहे. या कारखान्यात ६६,००० टन वजनापर्यंतच्या बोटींची बांधणी व ८५,००० टनांपर्यंतच्या बोटींची दुरुस्ती होऊ शकेल. याच मंत्रालयातर्फे मुंबईजवळील अंबरनाथ येथे यांत्रिक हत्यारांचे सुरुवातीचे नमुने बनविले जातात.
दळणवळण खात्यातर्फे इंडियन टेलिफोन इंडस्ट्रिज लि. ही कंपनी चालविली जाते. तिचा कारखाना बंगलोर येथे असून त्यात दूरसंदेशवहनासंबंधित सर्व प्रकारचे साहित्य, सर्व तऱ्हेचे दूरध्वनि-प्रेषण- व परीक्षण-साहित्य, रस्त्यावरचे स्वयंचलित संकेत-दीप इ. गोष्टी तयार होतात. कंपनीचे मुंबई, कलकत्ता व जबलपूर येथेही कारखाने असून त्यांत निरनिराळे स्विच फलक, हस्तचलित दूरध्वनि-केंद्रातील सामग्री वगैरे बनतात. बंगलोरच्या कारखान्यात १९६९ सालात २,३४,००० दूरध्वनी तयार झाले. त्याच कालातील प्रगत व अप्रगत देशांना झालेली निर्यात रु. ७६.६६ लक्षांची होती. हिंदुस्थान टेलिप्रिंटर्स लि. मद्रास ही कं. १९६० त स्थापन झाली. ती इंग्रजी व हिंदी दूरमुद्रणाची यंत्र व सामग्री बनविते. अरबी लिपीची यंत्रे बनविण्यासही आता सुरुवात झाली आहे.
रेल्वे मंत्रालयातर्फे, चित्तरंजन (प. बंगाल) लोको कारखाना, डीझेल लोको कारखाना, वाराणसी (उ. प्रदेश) व उतारू डबे बनविण्याचा इंटिग्रल कोच फॅक्टरी, पेरांबूर (तामिळनाडू) हे कारखाने चालविले जातात. चित्तरंजनला रूळमार्गी वाफ एंजिने तयार करण्यास १९६० साली सुरुवात झाली. पण आता तेथे विजेची एंजिने व हलवाहलवीची डीझेल एंजिने तयार होतात. सुरुवातीपासून मार्च १९७० अखेरपर्यंत कारखान्यांतून २,२९९ वाफेची एंजिने बाहेर पडली. १९६१ पासून विजेची एंजिने तयार होऊ लागली व मार्च १९७० पर्यंत २२७ प्रत्यावर्ती प्रवाहाची आणि २१ एकदिश प्रवाहाची एंजिने पुरविली गेली. ही सर्व रुंद मापीची आहेत. वाराणसीच्या कारखान्यात डीझेल विद्युत् एंजिने तयार होतात व सुरुवातीपासून (१९६४) मार्च ७० पर्यंत निरनिराळ्या प्रकारची ३३४ एंजिने तयार झाली. मद्रासच्या उपनगरातील पेरांबूर येथील उतारू-डब्याच्या कारखान्यात दर वर्षी ६५० डबे तयार होतात. भारतातील रूळमार्ग-संस्था आता सर्वस्वी स्वयंपूर्ण झाली आहे, एवढेच नव्हें, तर २०० वर उतारू-डबे व मालाच्या शेकडो वाघिणी (डबे) निर्यातही करण्यात आली आहेत.
पोलाद व मोठ्या अभियांत्रिकीय वस्तू मंत्रालयातर्फे भारत हेवी प्लेट व व्हेसल्स लि. चा कारखाना विशाखापट्टम येथे चालविला जातो. हा जुलै १९६९ पासून सुरू झाला असून त्यात शोषण, ऊर्ध्वपातन वगैरेंसाठी लागणाऱ्या लहान, मध्यम व मोठे स्तंभ, टाक्या, दाबाची साठवण-भांडी, उष्णता-विनिमयक, नळ वगैरे गोष्टी तयार होतात.
उद्योग विकास मंत्रालयातर्फे हेवी इलेक्ट्रिकल्स, भोपाळ हिंदुस्थान मशीन टूल्स, बंगलोर व नॅशनल इन्स्ट्रुमेंटस, जादवपूर, कलकत्ता हे कारखाने चालतात. भोपाळचा कारखाना मोठा व महत्त्वाचा असून त्यात औष्णिक शक्तिसंयंत्रातील (यंत्रसामग्रीच्या व्यूहातील) वाफ-टरबाइने, जनित्रे, संघनक इ. सामग्री व जलविद्युत् शक्तिसंयंत्रातील जल-टरबाइने, जनित्रे, तबकडी झडपा, रोहित्रे, लहानमोठ्या स्विचयंत्रणा,विजेच्या रूळमार्गी एंजिनांची सामग्री, एकदिशकारक वगैरे यांत्रिक व विद्युत् साहित्यही तयार होते. हिंदुस्थान मशीन टूल्स कंपनीचे पाच कारखाने असून त्यांतील दोन बंगलोरला, तिसरा हरियाणातील पिंजोर येथे, चौथा केरळमधील कलमसरी व पाचवा हैदराबाद येथे आहे. यांशिवाय बंगलोर येथे एक घड्याळांचा कारखानाही आहे. कंपनीच्या कारखान्यात तयार होणाऱ्या यंत्रांचे प्रकार म्हणजे सामान्य कामाची लेथ, टरेट लेथ, अरीय छिद्रण-यंत्रे, मिलिंग यंत्रे, शाणन-यंत्रे, खास कामाची यंत्रे, पूर्वनियोजित क्रमाने काम करणारी मिलिंग यंत्रे,दंतचक्र-रधित्रे व हॉबर, एक तर्कूची स्वयंचलित यंत्रे, पृष्ठशाणन-यंत्रे, नक्कल करणारे लेथ, ढोल टरेट लेथ,मोठाली साधी लेथ, परिशुद्ध लेथ, बहुहत्यारी लेथ, ‘फे’ स्वयंचलित यंत्रे, पुष्कळ तर्कूंची गज व चकची स्वयंचलित यंत्रे, आडवी प्रच्छिद्रण-यंत्रे टरेट, पद्धतीची मिलिंग यंत्रे इ. होत.
बंगलोरच्या घड्याळांच्या कारखान्यात १९६९-७० साली ३,३०,००० घड्याळे तयार झाली. त्यात पुरुषांची ५ प्रकारची व स्त्रियांची २ प्रकारची असून एक विद्यार्थ्यांसाठी आहे. कंपनीच्या विस्तार-योजनेत बंगलोर येथे आणखी एक घड्याळ-कारखाना आहे. त्यात चालू जातीच्या ३,६०,००० घड्याळांची व स्वयंचलित २,००,००० मनगटी घड्याळांची वार्षिक क्षमता राहणार आहे. तसेच काश्मीरमध्येही एक घड्याळ-कारखाना उभारण्याचे घाटत आहे. यांत्रिक हत्यारांच्या कारखान्यांचाही विस्तार करून शेतीचे ट्रॅक्टर, छपाई यंत्रे इत्यादींच्या उत्पादनाचा कार्यक्रम आखला जात आहे. या कारखान्यात १९६९-७० साली एकूण २,३३४ यंत्रे तयार झाली व त्यांची किंमत १२.७६ कोटी रुपये होती. याच कालात कंपनीने १.१० कोटी रुपयांची यंत्रे निर्यात केली. तसेच रु. २१,४५० ची घड्याळेही निर्यात केली. लक्झेंबर्ग, लॉस अँजेलस, टोरँटो व मेलबोर्न येथे कंपनीची विक्री-सेवा-केंद्रे आहेत. जादवपूर येथील नॅशनल इन्स्ट्रुमेंट्स कंपनीच्या कारखान्यात सर्वेक्षण,आरेखन, प्रकाशकी व वैद्यक या शाखांत लागणारी उपकरणे बनविली व दुरुस्त केली जातात.
स्वायत्त कंपन्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे :
भारत अर्थ मूव्हर्स लि. बंगलोर मध्ये मोठाले, चाकांची माती वाहण्याचे ट्रॅक्टर व पोलादी पट्ट्यांचे ट्रॅक्टर आणि रुंद मापी रूळमार्गी एकसंघ उतारू-डबे बनविले जातात. भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. बंगलोर ही एक महत्त्वाची सरकारी संस्था आहे. तीत इलेक्ट्रॉनीय साहित्य व घटक बनविले जातात. साहित्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत : रेडिओ-प्रेषक, संदेश-ग्रहण्या, अत्याधुनिक प्रेष-ग्रहण-तंत्राचा उपयोग करणाऱ्या संयुक्त-प्रग्रहण्या, मापन- व परीक्षण-उपकरणे, वैद्यकीय ध्वनिमापके, ट्रँझिस्टरयुक्त कंप्रता (कंपनसंख्या)-गणक, विद्युत हृद्लेखक, हरात्मक जनित्रे, रेडिओ-कंप्रता-प्रदान-मापके.
तेथे बनविल्या जाणाऱ्या घटकांची उदाहरणे : रेडिओ-ग्रहणांच्या नलिका, सिलिकॉन व जर्मेनियमचे ट्रँझिस्टर व द्विप्रर्स्थे (डायोड), दाबविद्युत् स्फटिक [®दाबविद्युत्], अभ्रकाची व मृत्तिकेची धारित्रे (विद्युत् भाराचा संचय करणारी साधने), प्रेषकांच्या व क्ष-किरण-नलिका, संकलित मंडलाच्या सिलिकॉन-विटा, सूक्ष्म तरंग-नलिका व दूरचित्रवाणी-नलिका.
हेवी एंजिनिअरिंग कॉर्पोरेशनचे रांची येथे तीन कारखाने असून एकाची मोठाली यंत्रे (वार्षिक ८०,००० टन वजनाची) व संरचना-पोलादाच्या वस्तू (२५,००० टन) बनविण्याची क्षमता आहे. हा रशियाच्या सहकार्याने उभारला आहे. दुसऱ्यात ओतकाम व घडवण होतात. तो पुरा झाल्यावर तेथे बीड, पोलाद व लोहेतर धातूंची मिळून १,४०,००० टन वजनाची ओतिवे व घडिवे दर वर्षी होऊ शकतील. तिसरा कारखाना मोठाली यांत्रिक हत्यारे बनविण्याचा असून त्याची क्षमता १०,००० टन वजनाच्या यंत्रांची आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. बंगलोर ही कंपनी वालचंद समूहाची हिंदुस्थान एअरक्राफ्ट लि. व एरोनॉटिक्स इंडिया लि. यांच्या एकत्रीकरणाने बनली व तिचे काम १-१०-१९६४ पासून सुरू झाले. या कंपनीच्या कारखान्यात एंजिने व आनुषंगिक सामग्रीसह निरनिराळ्या प्रकारची विमाने तयार केली जातात. हिच्या चार शाखा असून त्या अनुक्रमे बंगलोर-शाखा, मिग-शाखा (हीत पुन्हा नाशिक, कोरापुट व हैद्राबाद येथील कारखाने मोडतात), कानपूर-शाखा व नव्याने स्थापन झालेली कानपूर-शाखा अशा आहेत. कानपूरच्या नव्या शाखेत विमानांना लागणारे साहाय्यक भाग बनविण्यात येणार आहेत. ही कंपनी सांप्रत पुढील प्रकारची विमाने बनवीत आहे : (१) मरुत जेट लढाऊ (एचएफ-२४) याचे अभिकल्पन व विकास ही याच कारखान्यात झाली आहेत. (२) अधिस्वनी मार्गरोधक मिग-२१ (३) नॅट लढाऊ जेट (४) येथेच अभिकल्पन होऊन विकास पावलेले किरण-प्रशिक्षण-जेट (५) ॲल्यूट हेलिकॉप्टर व (६) वाहतूक विमान एचएस-७४८. मिग-२१ मध्ये काही बदल करून रशियाच्या अनुमतीने त्याचे उत्पादन करण्याचा विचारही आहे. पुढील गोष्टींचा विकास करण्याचे कामही चालू आहे. मरुतमध्ये जास्त सोयीसाठी बदल करणे,शेतीकामात लागणारे एंजिनासहित विमान आणि एचजेई-२५०० टर्बो-जेट एंजिन.
हिंदुस्थान केबल्स लि. कं. रूपनारायणपूर (जि. बरद्वान, प. बंगाल) येथे असून ती कोरड्या गाभ्याच्या वितरण-केबली, समाक्ष-केबली (एका केंद्रीय संवाहकाभोवती दुसरा नलिकाकार संवाहक असलेल्या केबली) आणि प्लॅस्टिक आवरणाच्या केबली व तारा तयार करते. १९६९-७० या सालात पहिल्या प्रकारच्या ५.५३ लक्ष किमी., दुसऱ्या प्रकारच्या लहान-मोठ्या आकारमानाच्या २,१०१ किमी. व तिसऱ्या प्रकारच्या ४२,६९५ घन किमी. लांबीच्या केबली तयार झाल्या.
मायनिंग अँड अलाइड मशिनरी कॉर्पोरेशन लि. ही कंपनी दुर्गापूर येथे असून तिच्या कारखान्यात कोळसा खणायची (कापायची) व भरायची यंत्रे, खाणीतील लाडिसे ओढणारी विजेची (घटमाला व वर-तारेची) एंजिने, गुंडाळणारी व ओढणारी यंत्रे, ८०० ते १,००० मिमी. रुंदीचे पट्टा-वाहक व संवातक (हवा खेळती ठेवण्याची साधने) वगैरे प्रकारची यंत्रसामग्री तयार होते.
इन्स्ट्रुमेंटेशन लि., कोटा (राजस्थान) ही कंपनी आपल्या कारखान्यात औद्योगिक विधिनियंत्रणात लागणारी उपकरणे बनविते. उत्पादनात पुढील गोष्टींचा समावेश आहे: चिरचुंबकी विद्युतीय, इलेक्ट्रॉनीय व लोहगतिकीय मापन तंत्रातील तपमान, दाब, प्रवाह, पातळी इ. चल-राशींचे संवेदक, ऊर्जापरिवर्तक दर्शविणारी, नियमन करणारी व नोंदणारी उपकरणे. तेथे पोलाद कारखाने, औष्णिक शक्तिकेंद्रे यांत लागणाऱ्या उपकरण-योजनांतील उपकरणे बनविण्यात या कंपनीचा हातखंडा आहे. खते व रसायने यांच्याशी संबंधीत उद्योगात लागणाऱ्या खास उपकरणांचेही उत्पादन लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
एंजिनिअर्स इंडिया लि., नवी दिल्ली. सर्व तऱ्हेच्या उद्योगांना लागणारा तांत्रिक व आर्थिक बाबींसंबंधी सल्ला देणे, विधि-अभिकल्पन, कच्चा माल व यंत्रसामग्री-खरेदी, कर्मचाऱ्यांची निवड वगैरे कामे ही कंपनी सरकारी व खाजगी उद्योगांसाठी करण्याचे अंगावर घेते. खनिज तेल व तज्जनित रसायने, इतर रसायने, खते व आनुषंगिक उद्योग, बंदरे व गोद्या इ. बाबतींत सल्ला देण्यात ही कंपनी तज्ञ समजली जाते. सल्ला देऊन योजना आखण्याचे काम ही उद्योगाची पहिली पायरी असते व ती जर घट्ट व चांगली रोवली गेली तर पुढील काम सोपे होते. हे काम अभियंतेच करतात व या कामाला सखोल ज्ञान व संबंधित शाखेवर चांगले प्रभुत्व असावे लागते. या दृष्टीने या कंपनीच्या कार्याला अभियांत्रिकीय उद्योगात फार महत्त्वाचे स्थान आहे.
एंजिनियरिंग प्रोजेक्ट्स (इंडिया) लि., नवी दिल्ली, ही भारत सरकारच्या महत्त्वाच्या व निरनिराळ्या क्षेत्रांतील आठ कंपन्यांची मिळून झालेली एक कंपनी आहे. आपल्या घटक कंपन्यांची मदत घेऊन ही कंपनी कोणतीही योजना प्रत्यक्ष कार्यवाहीत आणून देण्यापर्यंतच्या सर्व अटी मान्य करून योजनेची जबाबदारी पत्करते. मोठा प्रकल्प वा मोठाली संयंत्रे यांच्या बाबतीत सुरुवातीचा शक्याशक्यतेचा अहवाल व अभिकल्पन,यंत्रोत्पादन, कारखान्याची उभारणी व सबंध योजना चालू करून देणे अशा जबाबदाऱ्या ही कंपनी स्वीकारते.
सरकारी क्षेत्रात एकंदर १३१ (मार्च १९७०) औद्योगिक व व्यापारी कंपन्या असून त्यांतील सुमारे २४-२५ यांत्रिक अभियांत्रिकीशी निगडीत आहेत. त्यात मार्च १९६९ पर्यंत ३,५३३ कोटी रुपयांचे भांडवल गुंतलेले होते, पण त्यांतील केवळ सहा मोठ्या उद्योगांत १,७१९ कोटी म्हणजे जवळजवळ निम्मे गुंतले होते. ते सहा उद्योग असे : (१) हिंदुस्थान स्टील लि., (२) हेवी एंजिनिअरींग कॉर्पोरेशन लि., (३) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि., (४) हेवी इलेक्ट्रिकल्स लि., (५) मायनिंग अँड अलाइड हेवी मशिनरी कॉर्पोरेशन लि. व (६)हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.
खाजगी क्षेत्र : मिश्र अर्थव्यवस्थेतील सरकारी क्षेत्राबाहेर जे खाजगी क्षेत्र शिल्लक राहिले त्यात डीझेल एंजिने, यांत्रिक हत्यारे, मोटारगाड्या, स्कूटर, सायकली, वस्त्रोद्योगाची यंत्रसामग्री, शिवणयंत्रे, विजेची चलित्रे, पंप, विजेचे पंखे, विजेचे दिवे, विजेच्या केबली व तारा, रोहित्रे, रेडिओ व दूरचित्रवाणी-ग्रहण्या,शेतीचे ट्रॅक्टर, गोलक व रूळ-धारवे इ. बनविली जात आहेत. तसेच या गोष्टींसाठी लागणारी लोह, पोलाद व लोहेतर धातूंची ओतिवे व घडिवे खाजगी कारखान्यांतच बनवली जातात.
लहान डीझेल एंजिने महाराष्ट्रात पुणे व कोल्हापूर येथे, गुजरातेत अहमदाबाद, दिल्ली व उपनगरे आणि पंजाब-हरियाणा या राज्यांत मुख्यतः होतात. पुणे येथील किर्लोस्कर ऑइल एंजिन्स व सातारा येथील कूपर एंजिन्स या कारखान्यांत लहान व किर्लोस्कर कमिन्स कारखान्यात २०० व अधिक अश्वशक्तीची मध्यम एंजिने तयार होतात. पंप, पिठाच्या व तेलाच्या गिरण्या, छोटी जनित्रे वगैरे चालविण्यासाठी या एंजिनांचा उपयोग होतो. देशात विजेचे उत्पादन वाढून जसजशी वीज शेतीसाठी वगैरे जास्त उपलब्ध होईल तसतशी एंजिनांऐवजी विद्युत् चलित्रे वापरात येऊन एंजिने मागे पडत जातील, हे उघड आहे. वाहनांची एंजिने मात्र वाहने तयार करणाऱ्या कंपन्या स्वतःच बनवितात, त्यामुळे त्यांच्या बाबतीत हा प्रश्न येणार नाही.
मोटारगाड्यांचे चार व मालमोटारींचे सहा असे मुख्य कारखाने असून ते मुंबई, पुणे, मद्रास व कलकत्ता येथे आहेत. हिंदुस्थान मोटर्स, प्रिमियर ऑटोमोबाइल्स, स्टँडर्ड मोटार प्रॉडक्ट्स व महिंद्र आणि महिंद्र (फक्त जीप) या कंपन्या मुख्यतः प्रवासी गाड्या बनवितात. मालमोटारी बनविणाऱ्या कंपन्यांत टेल्को (जमशेटपूर व पुणे) ही मोठी आहे. गाड्या, जीप व मालमोटारी यांचे उत्पादन मागणीपेक्षा कमी आहे. पण परदेशातून गाड्या आयात करता येत नाहीत. मोटार सायकली,स्कूटर व मोपेड बनविण्याचे दहाबारा कारखाने आहेत.सायकली दिल्ली, महाराष्ट्र, तमिळनाडू, कलकत्ता व पंजाब राज्य येथे होतात. सायकलींच्या बाबतींत देश स्वयंपूर्ण आहे, इतकेच नव्हे, तर परदेशातही त्यांची निर्यात होते. १९६९-७० मध्ये रु. ४.७ कोटींची निर्यात झाली.
खाजगी क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा उद्योग म्हणजे यांत्रिक हत्यारांचा. ही सरकारी क्षेत्रात होत असली तरी खाजगी क्षेत्रातही त्यांच्या उत्पादनाला परवानगी आहे. यांत्रिक हत्यारांच्या उत्पादनास साधारण १९४० पासून देशात सुरुवात झाली. अर्थात ही अगदी अल्प प्रमाणावर होती. इन्व्हेस्टा मशीन टूल्स, मुंबई व म्हैसूर किर्लोस्कर, हरिहर-म्हैसूर हे आद्य कारखाने होते. योजनांचा काळ सुरू झाल्यानंतर मात्र या उद्योगास गती मिळून त्यांची वेगाने वाढ झाली. या हत्यारांचे १९६९-७० मध्ये रु. २७ कोटी किंमतीचे उत्पादन झाले.
सामान्य माहिती : ज्या घराण्यांनी यांत्रिक अभियांत्रिकीशी संबंधित मोठाले उद्योग स्थापन करून ते भरभराटीला आणले व देशाच्या औद्योगिक प्रगतीला हातभार लावून नावही कमावले आहे अशांपैकी काहींची माहिती पुढे दिली आहे.
(१) टाटा-या घराण्याने लोखंड-व पोलाद-धंद्यात जसे नाव मिळविले आहे तसे इतर यंत्रोद्योगांतही त्याने मोठे पाऊल टाकलेले आहे. टाटांच्या डीझेल एंजिन बसवलेल्या मालमोटारी प्रसिद्धच आहेत. तसेच त्यांचे तारा, खिळे, रूळमार्गी एंजिने, यांत्रिक हत्यारे यांचे कारखाने आहेत.
(२) बिर्ला-या घराण्याने मोटारगाड्या, मालमोटारी, वस्त्रोद्योगाची यंत्रसामग्री व सायकली बनविण्याचे कारखाने काढले आहेत. यांचे हिंदुस्थान मोटर्स व टेक्समॅको हे मोठे उद्योग आहेत.
(३) किर्लोस्कर-या घराण्याने डीझेल एंजिने, संपीडक, यांत्रिक हत्यारे, शेतीची अवजारे, पंप, विद्युत् चलित्रे वगैरेंचे कारखाने काढले आहेत. यांच्या किर्लोस्कर ब्रदर्स, किर्लोस्कर ऑइल एंजिन्स, किर्लोस्कर न्युमॅटिक्स, किर्लोस्कर कमिन्स, म्हैसूर किर्लोस्कर इ. उद्योगसंस्था आहेत.
(४) वालचंद हिराचंद-यांनी आगबोटी, विमाने व मोटारी बनविण्याचे कारखाने काढले. सरकारी धोरणानुसार काही वर्षापूर्वी त्यांचे आगबोटी व विमानांचे कारखाने सरकारने आपल्या ताब्यात घेतले आहेत. साखर-व सिमेंट-कारखान्यांची यंत्रसामग्री वालचंदनगर येथील वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या कारखान्यात तयार होते. प्रिमियर ऑटोमोबाइल्स्, ॲक्सी मॅफॅ, ॲक्सी फाऊंड्री, वालचंदनगर इंडस्ट्रीज हे मुख्य उद्योग होत.
(५) गोदरेज-यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरच तिजोऱ्या आणि कुलुपे बनविण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या जोडीला पोलादी पत्र्याचे निरनिराळ्या प्रकारचे फर्निचर व कपाटेही ते करू लागले. आता त्यांच्या उद्योगात टंकलेखन-यंत्रे व प्रशीतक यांचीही भर पडली आहे. त्यांची विविध प्रकारची कुलपे फार प्रसिद्ध आहेत.
(६) महिंद्र–हे घराणे दुसऱ्या महायुद्धानंतर प्रसिद्धीस आले. त्यांची महिंद्र आणि महिंद्र ही कंपनी सबंध देशात प्रसिद्ध असून ती सर्व तऱ्हेची जीप वाहने बनवते. तसेच त्यांनी कर्षित्रेही बनवायला सुरुवात केली आहे.
(७) बजाज-यांनी उभारलेले मुकंद आयर्न अँड स्टील, बजाज इलेक्ट्रिकल्स व बजाज ऑटो हे मोठे उद्योगधंदे आहेत.
(८) इतर काही घराणी अलीकडे पुढे आलेली आहेत, त्यांपैकी काहींची नावे : अमीन, बडोदे-ज्योती उद्योगसमूह अडवाणी, मुंबई-ब्ल्यूस्टार कंपनी लाला श्रीराम, दिल्ली सिंघाणिया, कानपूर-जे. के. उद्योगसमूह रूइया, मुंबई आणि मुखर्जी, कलकत्ता-मार्टिन, बर्न आणि कंपनी.
ज्या परदेशी कंपन्यांनी भारतीयांशी भागिदारी केली आहे व भारतीय अधिकारी व कामगार यांच्या साहाय्याने भारतात कारखाने चालविले आहेत अशांपैकी काही ठळक कंपन्यांची नावे :
कोष्टक क्र. २: भारतातील काही यंत्र-उद्योगाच्या उत्पादनाची आकडेवारी
उत्पादन |
||||
क्र. |
उद्योगाचे नाव |
१९५०-५१ |
१९६०-६१ |
१९६९-७० |
१. |
डीझेल एंजिने (स्थिर)(संख्या) |
५,५०० |
४४,७०० |
१,३५,२०० |
२. |
यांत्रिक हत्यारे (मशीन टूल्स) (कोटी रुपये) |
०.३४ |
७.०० |
२९.८६ |
३. |
मोटार गाड्या- (१) प्रवासी इ. (संख्या) (२) वाहतूक इ. (संख्या) |
८,६०० ७,९०० |
२८,४०० २६,६०० |
४०,८०० ३५,८०० |
४. |
मोटार सायकली व स्कूटर (संख्या) |
– |
१९,४०० |
९१,००० |
५. |
सायकली (संख्या) |
९९,००० |
१०,७१,००० |
१९,५९,००० |
६. |
पंप (शक्तीवर चालणारे) (संख्या) |
३५,००० |
१,०९,००० |
३,६६,००० |
७. |
शिवणयंत्रे (संख्या) |
३३,००० |
३,०३,००० |
३,६०,००० |
८ |
कर्षित्रे (संख्या) |
– |
– |
१६,००० |
९ |
कापडनिर्मितीची यंत्रे (कोटी रु.) |
– |
– |
२०.५ |
१०. |
विद्युत् मोटारी (अश्वशक्ती) |
९९,००० |
७,२८,००० |
२१,०४,००० |
११. |
विद्युत् पंखे (संख्या,लाखात) |
२.०० |
१०.६० |
१५.५० |
१२. |
विद्युत् रोहित्रे (के.व्ही.ए.,लाखात) |
१.८० |
१४.१० |
५३.५० |
१३. |
केबली व तारा (टनात) |
६,७०० |
३३,७०० |
६२,९०० |
१४. |
रेडिओ-ग्रहण्या (संख्या, जारात) |
५४.०० |
२८२.०० |
१,७५८.०० |
१५. |
विद्युत् दिवे (संख्या लाखात) |
१,४०.०० |
४८५.०० |
८६६.०० |
(१) एस्कॉर्टस लि. नवी दिल्ली-मूळ पं. जर्मनीतील. उत्पादन : डीझेल रूळमार्गी एंजिनांसाठी मधली धक्का-शोषक युग्मके, वाघिणी, अंतर्ज्वलन एंजिनाचे मिश्र ॲल्युमिनियमचे दट्टे व दट्ट्याखिळी, मोटार सायकली व स्कूटर, क्ष-किरण साधने इ.
(२) लार्सन अँ. टुब्रो लि., मुंबई-मूळ स्वीडनमधील. उत्पादने : निरनिराळी विद्युत् साधने. रस्त्याच्या कडेचे पेट्रोल पंप, धान्य कोठारांशी संबंधित यंत्रसामग्री, खाणकामात लागणाऱ्या छिद्रण-यंत्रांचे छिद्रक,दुग्धशाळेतील यंत्रे, निरनिराळी विद्युत् साधने इ.
(३) फिलिप्स इंडिया लि., कलकत्ता-मूळ हॉलंडमधील. उत्पादन : रेडिओ-ग्रहण्या व घटक, अनुस्फुरक नळ्यांचे (फ्लुओरेसंट ट्यूब) दिवे, यांचे भाग व अनुस्फुरक पूड, इलेक्ट्रॉनीय मापन-व परीक्षण-साहित्य, संरक्षण दलाला लागणार्या अती उच्च कंप्रता-ग्रहण्या इ.
(४) सँडविक एशिया लि., पुणे- मूळ स्वीडनमधील. उत्पादन :
टंगस्टन कार्बाइड टोकांची कर्तक हत्यारे व टोके आणि खाणकामातील छिद्रण-यंत्राचे छिद्रक.
(५) अँटिफ्रिक्शन वेअरींग कॉर्पोरेशन लि., मुंबई-मूळ ऑस्ट्रियातील. उत्पादन : निमुळत्या रुळांचे गोलक धारवे.
(६) ए. व्ही. बी. लि. (असोशिएटेड सिमेंट, व्हिकर्स आणि बॅबकॉक-विलकॉक्स), प. बंगाल-मूळ इंग्लंडमधील. उत्पादन : सिमेंट-कारखान्याची यंत्रसामग्री आणि वाफर.
(७) क्राँप्टन ग्रीव्ह्ज लि., मुंबई-मूळ इंग्लंडमधील. उत्पादन : विद्युत् चलित्रे, शक्ति-रोहित्रे, विजेचे पंखे व दिवे इ. विद्युत् साधने.
(८) गेस्ट, कीन, विल्यम्स लि.,कलकत्ता-मूळ इंग्लंडातील. उत्पादन : लाकडातील स्क्रू, यंत्रातील स्क्रू,बोल्ट व नट, वायसर, रिव्हेट, तार-चुका, अंतःक्षेपणाच्या सुया, टंगस्टन कार्बाइडच्या टोकांची हत्यारे इ.
(९) जनरल इलेक्ट्रिक कं. ऑफ इंडिया (मॅन्यु.) प्रा. लि., कलकत्ता-मूळ इंग्लंडमधील. उत्पादन : अनेक प्रकारची विद्युत् स्विचे, फलक, साधने, बहुकला-ऊर्जामापके, जल व वाफ-मापके इ.
(१०) गुडअर्थ मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन प्रा. लि., फरिदाबाद-दिल्ली-मूळ सहकार्य प. जर्मनी. उत्पादन :डीझेल एंजिने.
१९६९-७० सालात भारतातून अभियांत्रिकीय वस्तूंची १०८.३८ कोटी रुपयांची निर्यात झाली तर यंत्रे,वाहतुकीची यंत्रे व विद्युत् यंत्रे यांची आयात अनुक्रमे २७९.२१, ४,९८६, व ६,३६३ कोटी रु. झाली.
ज्याप्रमाणे भारताच्या औद्योगिकीकरणास पाश्चात्त्य व पौर्वात्य प्रगत देशांतील काही कंपन्यानी मदत केली त्याचप्रमाणे आता काही प्रमाणात तांत्रिक ज्ञान आत्मसात केलेला भारत आफ्रिका, पश्चिम व आग्नेय आशिया येथील विकसनशील देशांना आपल्या ज्ञानाचा फायदा देऊन त्यांच्या औद्योगिकीकरणास हातभार लावीत आहे. आर्थिक वा अन्य कारणांमुळे या भारतीय तांत्रिक सहकार्याच्या मर्यादा, अगदी अल्प प्रमाणात का होईना पण प्रगत अशा जर्मनी, जपान वगैरे देशांतही विस्तारल्या आहेत. या सहकार्याची काही ठळक उदाहरणे वानगीदाखल खालील तक्त्यात दिली आहेत.
कोष्टक क्र. ३ : परदेशांत भारतीय सहकार्याची काही उदाहरणे
भारतीय संस्था |
सहकार्याचे क्षेत्र |
देश |
|
(१) |
बिर्ला ब्रदर्स |
कापड |
इथिओपिया |
(२) |
के. टी. डोंगरे आ. कं. |
औषधे |
केन्या |
(३) |
स्वस्तिक रबर कंपनी |
रबर |
मॉरिशस |
(४) |
वालचंदनगर इंडस्ट्रीज |
साखर |
युगांडा |
(५) |
महिंद्र अँड महिंद्र |
छोटी यंत्रे |
इराण |
(६) |
अहमद उमरभॉय |
वनस्पती तूप |
सौदी अरेबिया |
(७) |
गोदरेज अँड बॉइस |
पोलादी फर्निचर |
मलेशिया |
(८) |
किर्लोस्कर इलेक्ट्रिक |
विद्युत् चलित्रे व पंप |
” |
(९) |
जय एंजिनियरिंग |
शिवण यंत्रे |
सिंगापूर |
(१०) |
किर्लोस्कर ऑइल एंजिन्स |
डीझेल एंजिने |
फिलिपीन्स |
जगातील औद्योगिक व तांत्रिक दृष्ट्या प्रगत अशा काही देशांतील काही प्रमुख व मोठ्या अभियांत्रिकीय उत्पादकांची यादी पुढे दिली आहे :
अमेरिकेची संयुक्त संस्थाने-(१) ब्राऊन अँ. शार्प मॅन्युफॅ. कं., नॉर्थ किंग्जटाउन, र्होड आयलंड (२) सिनसिनॅटी मिलेक्रॉन इनकॉ., सिनसिनॅटी, ओहायओ (३) जनरल इलेक्ट्रिक कं., शेनकटडी, न्यूयॉर्क (४) ॲलिस चामर्स मॅन्युफॅ. कं., मिलवॉकी, विस्कॉन्सिन (५) जनरल मोटर्स कॉर्पोरे., डिट्रॉइट, मिशिगन.
प.जर्मनी-(१)ऱ्हाइनष्टाला हेन्शल, आ. गे. कासेल (२) सीमेन्स, आ. गे. म्युनिक (३) मानेसमान लि. ड्युसेलडॉर्फ (४) एमआएन, आउग्जबुर्ग, न्यूरेंबर्ग (५) क्रप (६) डेमाग.
जपान-हिताची लि., चिओडाकू, टोकिओ (२) मिटसूबिशी हेवी इंडस्ट्रीज लि., चिओडाकू, टोकिओ (३) मिटसुई शिपबिल्डिंग ॲ. एंजनिअरिंग कं. लि., चिओकू, टोकिओ (४) निपॉन स्टील कॉर्पोरेशन, चिओडाकू, टोकिओ.
ब्रिटन-(१) व्हिकर्स लि. (२) आर्मस्ट्राँग व्हिटवर्थ (३) हॉकर गट (४) डब्ल्यू अँड टी एव्हरी (५) बॅबकॉक अँड विलकॉक्स (६) आल्फ्रेड हर्बट लि. (७) टेक्स्टाइल मशिनरी मेकर्स लि. (८) रोल्झरॉइस अमलगमेटेड इंजिनिअरिंग युनियन (९) बेगूड ओटिस लि.
फ्रान्स-(१) क्रोझो ल्वारे (२) फाइव्ह लिली केल (३) सेरी रेनॉल्ट इंजिनिअरींग.
स्वित्झर्लंड-(१) ब्राउन, बोव्हेरी अँड कंपनी लि., बाडेन (२) स्विस लोकोमोटिव्ह अँड मशीन वर्क्स,विंटरथूर (३) सुलझर ब्रदर्स लि., विंटरथूर (४) एशर व्हाइस, झुरिक.
इटली-(१) फियाट एस. पी. ए., टोरिनो (२) इनासेंटी, मिलानो (३) मॅगनेटी मरेली एस. पी. ए.,मिलानो (४) फिन्सायडर ग्रुप, रोम.
झेकोस्लोव्हाकिया-(१) स्ट्रोज एक्सपोर्ट फॉरिन ट्रेड कॉर्पो., प्राग (२) स्कोडा एक्स्पोर्ट फॉरिन ट्रेड कॉर्पो., प्राग (३) टेक्नो एक्स्पोर्ट फॉ. ट्रेड कं. लि., प्राग (४) प्रागोइन्व्हेस्ट फॉ. ट्रे. कॉ., प्राग.
हंगेरी-(१) गांझ-माव्हाग, बूडापेस्ट (२) म्युसझाकी क्युलकेरेसकेडेल्मी, बूडापेस्ट (३) माग्यार गेपिपरी क्युलकेरेसकेडेल्मी व्हालिआलाट, बूडापेस्ट.
स्वीडन-(१) आबे बोफॉर्स, बोफॉर्स (२) आबे रोझेनफोर्स ब्रुक, मलीला (३) सोलबेर्गा मेकानिस्का व्हेर्कस्टाड आबे, मेसयो (४) आसीया, व्हेस्टरास.
पहा : इलेक्ट्रॉनीय उद्योग जहाज बांधणी ट्रॅक्टर मोटारगाडी उद्योग मोटार सायकल यांत्रिक हत्यारेरासायनिक उद्योग विद्युत् सामग्री उद्योग विमान उद्योग सायकल स्कूटर.
संदर्भ : 1. Gadgil, D. R. The Industrial Evolution of India in Recent Times, Calcutta, 1959.
2. Hajra Choudhary, S. K. Bhattacharya, S. C. Elements of Workshop Technology, Vol. II, Bombay.1967.
3. Indian Industries, Bom-bay, 1967.
ओगले, कृ. ह.
“