ॲसिरिया : मेसोपोटेमियाच्या उत्तर पठारास म्हणजेच हल्लीच्या उत्तर इराकमध्ये ४७५०—६०५ इ.स.पू. च्या दरम्यान एक समृद्ध संस्कृती अस्तित्वात होती. तेथील आशूर ह्या प्राचीन देवतेवरून त्या प्रदेशात ॲसिरिया नाव पडले व तेथील शहरास असुर हे नाव प्राप्त झाले. हा प्रदेश प्रामुख्याने टायग्रिस व झॅब नदीचा संगम आणि त्याचा दुआब ह्यांच्या सभोवती पसरलेला आहे. त्यात असुरबरोबरच कालाख ( निमरूद), दुरशरूकिन (खोर्साबाद) आणि निनेव्ह ह्या प्रमुख शहरांचा समावेश होता. ह्या प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ १२,९५० चौ. किमी. असून काही भाग डोंगराळ व काही सुपीक मैदानाचा आहे.
ह्या प्रदेशाच्या उत्तरेस अर्मेनियाच्या नायफेट्स डोंगराच्या रांगा, पूर्वेस कुर्दिस्तानच्या झॅग्रॉसच्या शाखा, दक्षिणेस बॅबिलोनियाचे पठार आणि पश्चिमेस सिरियन वाळवंट आहे. उन्हाळ्यात येथील हवामान उष्ण आणि कोरडे असते, परंतु हिवाळ्यात भरपूर पाऊस पडतो आणि उत्तर हिवाळ्यात येथे बर्फ पडते.
ॲसिरियाविषयीची माहिती प्रामुख्याने पुढील साधनांवरून उपलब्ध झाली आहे : (१) जुना करार, (२) अभिजात साहित्य, (३) हीरॉडोटसचा इतिहास, (४) क्यूनिफॉर्म लिपीतील ॲसिरियन बखरी आणि (५) उत्खननांद्वारे उपलब्ध झालेले अवशेष. त्यांपैकी पहिली तीन साधने साहित्य, दंतकथा, पुराणकथा आदींनी भरलेली असल्यामुळे, ती फारशी विश्वसनीय नाहीत मात्र एकोणिसाव्या शतकात क्यूनिफॉर्म लिपीचा शोध लागल्यावर ॲसिरियाबद्दल बरीच विश्वसनीय माहिती ज्ञात झाली. ॲसिरियनांना इतिहास-लेखन माहीत होते. ह्याशिवाय त्यांच्या वंशावळी, दैनंदिन व्यवहार, सैन्य, प्रशासन आदीसंबंधीचीही विपुल माहिती त्यांतून मिळते. त्यानंतर अलीकडे ॲसिरियाच्या असुर, निनेव्ह वगैरे प्राचीन शहरांतून विस्तृत प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे. त्यांत सापडलेल्या अवशेषांवरूनही ह्या संस्कृतीची खूप माहिती मिळले.
ॲसिरियन संस्कृतीचे स्थूलमानाने दोन प्रमुख कालखंडांत विभाजन करता येईल : (१) साम्राज्यपूर्वकाल किंवा हलाप संस्कृतीचा काल व (२) साम्राज्यकाल. साम्राज्यकालाचेही पूर्व साम्राज्यकाल, मध्य साम्राज्यकाल व उत्तर साम्राज्यकाल, असे आणखी तीन उपविभाग सोयीसाठी केलेले आहेत.
साम्राज्यपूर्वकाल (४७५०—२३७० इ.स.पू.) : पश्चिम आशियातील इतर संस्कृतींप्रमाणेच ॲसिरियन सत्तेचे मूलस्थान ग्रामीण भागांतून सापडते. हलाफ संस्कृतीपूर्वी हसौना संस्कृती प. आशियाच्या बऱ्याच मोठ्या भूभागावर पसरली होती. ॲसिरियाच्या भूप्रदेशात सापडलेल्या प्राचीन अवशेषांवरून असे दिसते, की ह्या प्रदेशात प्राचीन काळी दाट लोकवस्ती असावी. त्यांचे देवधर्म बॅबिलोनियन लोकांप्रमाणेच होते. मात्र हलाप संस्कृती ही खुद्द ॲसिरियात उत्पन्न व विकसित झाली. त्याबाबत बहुतेक संशोधकांचे एकमत आहे. ह्याचा काल ४००० ते ३५०० इ.स.पू.च्या दरम्यानचा असावा. यापुढे सुमेरियातील उबाइड (Ubaid) संस्कृतीचा प्रसार उत्तरेकडे म्हणजे ॲसिरियाकडे झाला. त्या काळात व त्यानंतर ॲसिरियन संस्कृतीची प्रगती अत्यंत संथ होती. तिची मुख्य रूपे टेपे गौरा, निनेव्ह, असुर, निमरूद आदी शहरांतील उत्खनित अवशेषांत दिसून येतात.सुमेर नंतर जवळजवळ सात शतकांनी लेखनविद्या इकडे अाली. टेपे गौरा-काळात आयुधांसाठी दगडाऐवजी तांब्याचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला. अद्यापि चाकावर चालणाऱ्या गाड्या येथे नव्हत्या. परंतु सामाजिक संघटनेच्या बाबतीत मात्र काही अंशी येथे प्रगती दिसते. गौरा येथील थडग्यांपैकी काही मोठी व काळजीपूर्वक बांधलेली होती व त्यांत मृतांबरोबर भांडीकुंडी, दागदागिने ठेवलेले असत. यावरून ती संपन्न अशा सत्ताधीशांची असण्याची शक्यता आहे. यापूढच्या निनेव्ह-काळात चाकावर घडविलेली बहुरंगी मृत्पात्रे, चाकाच्या गाड्यांचा वापर व धातुकामाचा मुबलक उपयोग दिसतो. या काळात बऱ्याच आहत-मुद्रा सापडल्या, तरी लेखनकला त्यांना अवगत नसावी. याच वेळी सुमेरियाशी व्यापारही वाढला होता. स्थानिक उद्योगधंदेही सुरू झाले होते. मुख्य म्हणजे राज्यसंस्था स्थिर झाली होती.
हलाफ व उबाइड संस्कृती अस्तित्वात असताना सर्व मेसोपोटेमियात तिचे पडसाद उमटत होते. किंबहुना सुमेरियन संस्कृती ह्यापूर्वी कित्येक वर्षे ॲसिरियात पोहोचली होती. असुर येथील एका प्राचीन मंदिराच्या उत्खननात प्राचीन राजांची जंत्री आढळून आली आहे. त्यावरून पूर्वसार्गनिद काळाद म्हणजे इ.स.पू. २३७० पूर्वी किमान सतरा प्रमुख सत्ताधीश येथे होऊन गेले असावेत. कदाचित ते भटक्या जमातींचे प्रमुखही असावेत. कारण ते तंबूत राहत असत, असे उल्लेख येतात. पुढे काही काळ ॲसिरिया अगेडच्या सारगॉन ह्या राजाच्या साम्राज्यात समाविष्ट होता आणि नंतर अरचा तिसरा वंश त्यावर अंमल गाजवू लागला. त्याच्या पतनानंतर ॲसिरिया स्वतंत्रपणे उदयास आला.
पूर्व साम्राज्यकाल (२३७०—१६०० इ.स.पू.) : स्थिरपद समाजाच्या आरंभापासून ते सुसंघटित नागरिक जीवनाच्या स्थापनेपर्यंत ॲसिरियाला शेकडो वर्षांचा काळ लागला. अक्कडचा सारगॉन (२३४०—२३०५ इ.स.पू.) याने ॲसिरियावर अंमल बसविला होता. याच्या आधी सतरा राजे होऊन गेल्याचा उल्लेख ॲसिरियन बखरीत आढळतो. अरच्या तिसऱ्या राजघराण्याच्या अंतानंतर (इ.स.पू. २०००) थोड्याच कालावधीत ॲसिरियाचा इलुशुमा (१९००—१८५० इ.स.पू.) याने बॅबिलनवर स्वारी करून डेरॅ गाव काबीज केले अाणि ईलम ते ॲसिरिया हा व्यापारी मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित केला. याचा सुमगा पहिला इरीशुम (१८७०—१८६० इ.स.पू.) व पणतू पहिला सारगॉन (इ.स.पू. १८६०) यांची नावे ॲसिरियाचे राजे म्हणूनच सापडतात. परंतु शामशी-आडाद (१८१४—१७८२ इ.स.पू.) हा हामुराबीपूर्वी आलेली राजा अधिक आक्रमक होता. त्याने मारीच्या राज्यावर ताबा मिळवून अनेक वर्षे तो प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. त्याच्यानंतर हामुराबी (१७९२—१७५० इ.स.पू.) ह्याने आपले वर्चस्व झपाट्याने वाढविले आणि जवळजवळ सर्व पश्चिम आशिया त्याच्या साम्राज्यात समाविष्ट झाला. मात्र हामुराबीच्या निधनानंतरचा सु. चारशे वर्षांचा काळ ॲसिरियाच्या इतिहासात अवनतकाळ समजावा लागेल. ह्या सुमारास म्हणजे १७००—१६०० इ.स.पू.च्या दरम्यान वायव्येकडून रानटी टोळ्यांचा सतत उपद्रव होत होता, पुढे तिथेच स्थापन झालेल्या मितानी सत्तेने ॲसिरियाला पूर्णतः अंकित केले.
१६००—१२०० इ.स.पू. या काळातील राजकीय घडामोडींचे दर्शन
इजिप्तमधील एल्-अमार्ना येथील मृत्पात्रांतून होते. त्यांतून पत्रव्यवहार व तहनामे अशांसारखी माहिती देणारी अस्सल साधने उपलब्ध होतात. या ठिकाणी सापडलेल्या मृत्पात्रांचा ऐतिहासिक साधने म्हणून इतका उपयोग आहे, की या सबंध काळाला ‘अमार्नी-युग’ असेच नाव इतिहासकार देतात. येथील माहिती व खुद्द ॲसिरियन राजांचे शिलालेख यांवरून या काळातील ॲसिरियन सत्तेची कल्पना येते. वरील काळात ॲसिरियाचा निरनिराळ्या तीन सत्तांशी प्रत्यक्ष संबंध आला आणि अप्रत्यक्षपणे ईजिप्त, हिटाइट यांच्याशीही संबंध राहिला. वायव्येस असणारे मितानी, दक्षिणेकडील कॅसाइट व उत्तरेकडच्या ऊरार्तू टोळ्या यांच्या सरहद्दी ॲसिरियाला भिडलेल्या असल्यामुळे त्यांचा संबंध ॲसिरियाशी सतत यावा हे स्वाभाविकच होते. परंतु या काळातील मुख्य संघर्ष पॅलेस्टाइन व सिरिया यांवरील वर्चस्वासाठी होता आणि तोही प्रामुख्याने उत्तरेचे हिटाइट व दक्षिणेचे ईजिप्शियन यांच्यात होता. या चढाओढीत आपापले हितसंबंध सुरक्षित राहावेत, म्हणून इतर लहान राज्ये कधी या पक्षाशी तर कधी त्या पक्षाशी मैत्री संपादीत. थोडक्यात, इरीशुमपासून एरिब-आडादपर्यंत, म्हणजे १५५०—१३६० इ.स.पू.च्या दरम्यान, सु. १२ राजे होऊन गेले. यातील पूर्वार्धात ॲसिरियावर मितानीचे वर्चस्व होते, पण मध्यंतरी काही दिवस तो स्वतंत्र होता. येथून पुढे त्याचा बॅबिलोनियाशी संघर्ष सुरू झाला तथापि मितानी व ईजिप्त ह्यांचा संभवनीय धोका लक्षात घेऊनच
.ॲसिरियाने बॅबिलोनियाशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले होते.
इ.स.पू.) याने बॅबिलोनिअोबरोबरचे मित्रत्वाचे संबंध विवाहाने दृढतर केले. द्वितीय बुर्नबुरिॲश
(१३७५-१३४७ इ.स.पू.) याचा पुत्र कर-इंदाशा किंवा कर-हर्दाश ह्याच्याशी याने आपल्या कन्येचा विवाह करून दिला. या कर-इंदाशचा मुलगा कदश्मान खर्बे याच्याविरुद्ध बंड होऊन त्याला गादीवरून पदच्युत करण्यात आले. परंतु आशुर-उबालिट ह्याने या तोतयाचा मोड करून आपला पणतू द्वितीय कुरिगल्झु (१३४५-१३२४ इ.स.पू.) ह्यास गादीवर बसविले. याची कारकीर्द बरीच मोठी होती. त्याने पूर्वेकडून होणारा ईलमी लोकांचा उपद्रव बंद केला. तथापि याच्या कारकीर्दीत बॅबिलोनिया व ॲसिरिया ह्यांचे मित्रत्वाचे संबंध दुरावले. मितानी व ईजिप्त ह्यांचा धोका हळूहळू कमी होत होता व त्यामुळे या दोन सत्तांचे एकमेकांस पूर्वीसारखे साहाय्य आवश्यक वाटत नव्हते. मात्र हे वितुष्ट नेमके कशामुळे उद्भवले ते ज्ञात नाही. यापुढील राजा एनलिल-नीरारी याने बॅबिलनवर स्वारी करून कुरिगल्झु याचा सपशेल पराभव केला आणि आपली दक्षिण सीमा आपल्याला हवी तशी बदलून घेतली. या विजयाची स्मृती एनलिलचा नातू पहिला आडाद-नीरारी (१३०७-१२७५ इ.स.पू.) यानेही ठेवली होती. असुरचा महापुजारी एनलिल-नीरारी याने कॅसाइट लोकांचे सैन्य नष्ट केले. शत्रूचा पूर्णतः बीमोड करून राज्याच्या मर्यादा वाढविल्या. इ.स.पू. १३०० मध्ये या युद्धाला पुन्हा तोंड फुटले आणि याही वेळी ॲसिरियाचाच विजय झाला. अशा प्रकारे दक्षिण सरहद्द सुरक्षित झाल्यावर आडाद-नीरारीने हसन व कारकेमिश येथपर्यंत म्हणजे युफ्रेटीसच्या किनाऱ्यापर्यंत आपले साम्राज्य वाढविले. ईजिप्शियन व हिटाइट यांची चढाओढ संपून दोघेही हतबल होण्याच्या सुमारास पहिला शॅल्मानीझर (१२७४-१२४५ इ.स.पू.) गादीवर आला. याने प्रथम उत्तरेकडील व्हॅन सरोवरानजीकच्या ऊरार्तू टोळ्यांकडून स्वामित्वनिदर्शक खंडणी वसून केली, मात्र त्याने बॅबिलनवर स्वारी केली नाही. कारण ह्य सुमारास हिटाइट लोक ॲसिरियावरच स्वारी करण्याचा संभवनीय धोका होता. ईजिप्तशी सलोखा करूनही हिटाइच सत्तेचा जोर कमी झालेला नव्हता आणि बॅबिलोनियाच्या रक्षणासाठी व हितासाठी नसले, तरी ॲसिरियाच्या वाढत्या सत्तेस पायबंद घालण्यासाठी त्यांना ही संधी अनुकूल होती. तथापि पहिला टूकुल्टी-नीनुर्टा (१२४४-१२०८ इ.स.पू.) याच्या वेळेस ह्या परिस्थितीत थोडासा बदल झाला होता. इतके दिवस एकसंध असणाऱ्या हिटाइट राज्यात अंतर्गत यादवीस आरंभ झाला. या संधीचा फायदा घेऊन त्याने एकदा काय तो सोक्षमोक्ष लावावा या भावनेने कॅसाइट लोकांवर हल्ला केला आणि कश्टीलिआश ह्या राजास इ.स.पू. १२४५ त कैद केले. बॅबिलनची तटबंदी नष्ट केली आणि विजयाची निशाणी म्हणून मार्डूकची मूर्ती मायदेशी नेली. टूकुल्टीनीनुर्टा याच्या कारकीर्दीच्या शेवटी ईलम टोळ्यांचा उपद्रव पुन्हा सुरू झाला आणि त्याच वेळी राजपुत्र आशुर-नदिन-अपली (इ.स.पू. १२०८) ह्याने बंड केले. त्यात त्याने राजाला वेढून ठार मारले. वरील नाव घेण्यासारखे काही राजे सोडले, तर १३३०-१११७ इ.स.पू. च्या दरम्यान सु. १३ अप्रसिद्ध राजे असुरच्या गादीवर आले. यापुढे सु. पाऊणशे वर्षे ॲसिरियन सत्तेची विशेष प्रगती झालेली दिसत नाही. त्यानंतर मात्र पहिला टिग्लॅथ-पायलीझर (१११७-१०७७ इ.स.पू.) ॲसिरियाच्या गादीवर आला आणि त्याने आक्रमक धोरण स्वीकारून पुन्हा ॲसिरियाचे वर्चस्व वाढविले. ह्याच्या मोहिमांवरुन ह्या वेळी ॲसिरिया किती बलवान झाला होता, ह्याची कल्पना येते. अर्थात ह्या बेळी ॲसिरियाच्या सभोवतालच्या इतर सत्ताही दुर्बळ झाल्या होत्या. त्याचा फायदा टिग्लॅथ-पायलीझरला निश्चितच मिळाला असावा. प्रथम त्याने वायव्येच्या कुमुख प्रांतावर हल्ला करून तेथील राज्याचा बंदोबस्त केला. पुढे त्याने हिटाइट राजांना जेरीस आणले. यानंतर भूमध्यसमुद्राच्या किनाऱ्यावरीलफिनिशियन नगरे व लेबाननमधील संस्थाने यांजकडून त्याने खंडणी वसूल केली. ह्याशिवाय त्याने ॲसिरियाचे नागरी जीवन समृद्ध करण्याचे प्रयत्न केले. ठिकठिकाणी त्याने पाणी खेचण्याची यंत्रे बसविली, जागोजाग धान्याचे साठे केले, गुराढोरांची पैदास वाढविली – वगैरे उल्लेख
त्याच्या लेखात सापडतात. पहिला टिग्लॅथ-पायलीझरनंतरचे राजे विशेष कर्तवगार व समर्थ नव्हते. शिवाय त्यांच्या वेळी भोवतालच्या परिस्थितीतही मोठे बदल झालेले होते. पश्चिम आशियातील राजकीय व सामाजिक स्थैर्याला कायमचा धोका असणारी अर्धरानटी टोळ्यांची भ्रमंती पुन्हा चालू झाली होती. पश्चिमेस अखलम, दक्षिणेस खाल्डियन आणि उत्तरेस ऊरार्तू टोळ्या ह्यांनी आपल्या लुटालुटीच्या कारवायांस पुन्हा प्रारंभ केला होता. त्यामुळे या टोळ्यांची हालचाल थोडी थंडावून स्थिरस्थावर झाल्यावर किंवा चालू असतानाच ॲसिरियन भूमी आणि मुख्यतः ॲसिरियाच्या व्यापाराचे रक्षण करणे ह्या गोष्टींतच तत्कालीन राजांचा जवळजवळ दोनशे वर्षाचा काळ व्यतीत झाला. द्वितीय आशुर-नाझिर-पाल (८८४-८५९ इ.स.पू.) व तृतीय शॅल्मानीझर (८५९-८२४ इ.स.पू.) हे राजे बलाढ्य व कर्तृत्ववान असूनही या बंदोबस्तातच त्यांची सर्व शक्ती त्यांना खर्च करावी लागली. त्यांनी परप्रांतांवर आक्रमणे केली, पण तीसुद्धा साम्राज्यवृद्धीपेक्षा आक्रमकांना दहशत बसविण्यासाठी किंवा त्यांना दूर ठेवण्यासाठीच होती. पुढे इ.स.पू. ७७५ च्या सुमारास हे स्वसंरक्षणाचे काम अवघड होऊन बसले आणि या कालखंडातील शेवटचा राजा आशुर-नीरारी हा अंतर्गत बंडाळीत मारला गेला.
उत्तर साम्राज्यकाल (७७५-६२६ इ.स.पू.) : ह्या १२५ वर्षाच्या साम्राज्यकालात ॲसिरियात एकामागून एक असे सहा अत्यंत कर्तबगार व पराक्रमी राजे झाले. त्यांनी पश्चिम आशियावर आपली सत्ता वसविली. त्यांतील तृतीय टिग्लॅथ-पायलीझर (७४५-७२७ इ.स.पू.) हा राजा जेव्हा गादीवर आला, त्या वेळी ॲसिरियाची परिस्थिती अत्यंत खालावली होती. विशेषतः अंतर्गत स्थिती कमकुवत होऊन राज्यपालांचे वर्चस्व आणि सत्ता प्रबल होऊ पाहत होत्या. टिग्लॅथ-पायलीझरने प्रथम प्रांतांच्या राज्यापालांचे वर्चस्व कमी करण्याचे ठरविले. त्याकरिता त्याने आरंभीच पूर्वीच्या प्रांतांचे क्षेत्र लहान केले आणि कोणत्याच राज्यपालास बंड करण्याची प्रवृत्ती होणार नाही याची खबरदारी घेतली. तसेच राज्यपालांपेक्षा लहान क्षेत्रांवर असणाऱ्या प्रशासकांना जरबेत ठेवून राज्यपालांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवले. नंतर ॲसिरियाच्या भोवताली असलेल्या लहानमोठ्या संस्थानांवर काही खंडणी लादून ॲसिरियाचे वर्चस्व त्यांनी मान्य करावे व त्याबद्दल ॲसिरियाने त्यांना लष्करी रक्षण द्यावे, अशी पद्धत अंमलात आणली. यामुळे ॲसिरियाच्या भोवती मित्रराष्ट्रांचे कडे तयार झाले. यानंतर त्याने ॲरेमियन टोळ्यांवर स्वारी करून ॲसिरियन साम्राज्य-विस्तारास आरंभ केला. त्याने वायव्येच्या व उत्तरेच्या सर्व शत्रूंचा मोड केला आणि सिरिया, पॅलेस्टाइन व बॅबिलोनिया यांना आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून घेतले. त्याच्यानंतर आलेल्या शॅल्मानीझरची (७२६-७२२ इ.स.पू.) कारकीर्दे अगदीच अल्पकाळाची होती. त्यानंतर द्वितीय सारगॉन (७२२ – ७०५ इ.स.पू.) या सेनापतीने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. त्याने टिग्लॅथ-पायलीझरचेच चढाईचे धोरण स्वीकारून शासनयंत्रणा अधिक कार्यक्षम केली. नंतर तो परराष्ट्रांकडे वळला. त्याच्यानंतर झालेले सेनॅकरिब (७०४-६८१ इ.स.पू.) आणि एसार-हॅडन (६८०-६६९ इ.स.पू.) हे राजे कुशल संघटक, पराक्रमी सेनानायक आणि यशस्वी राज्यकर्ते होते, परंतु सांस्कृतिक दृष्ट्या त्यांनी विशेष कामगिरी केली नाही. मात्र ह्यानंतर गादीवर आलेल्या असुरबनिपाल (सु. ६६९-६३० इ.स.पू.) याने ईजिप्तशी युद्ध करून ठिकठिकाणी वडिलांनी गादीवर बसविलेल्या मांडलिक राजांची पुन्हा स्थापना केली. याच्या सत्तेविरुद्ध वारंवार बंडे होत पण ती सर्व त्याने क्रूरपणे मोडून काढली. पुढे त्याचे भाऊ त्याच्या विरुद्ध कारस्थाने करू लागले शत्रूंशी संधान बांधू लागले. यामुळे मध्यवर्ती सत्ता कमकुवत होऊ लागली. असुरबनिपालने ईलमविरुद्ध मिळविलेला विजय हा शेवटी ॲसिरियन साम्राज्यास घातक ठरला, कारण ईलमची सत्ता नष्ट झाल्यामुळे इराणचे बळ वाढले आणि त्यानेच ॲसिरियाची पुढे अवनती झाली.
तथापि असुरबनिपालचे ग्रंथसंग्रहालय अप्रतिम होते. वरील तिन्ही राजांनी टिग्लॅथ-पायलीझरने संघटित केलेले साम्राज्य टिकवून घरणे हेचे कार्य केले. अर्थात असुरबनिपालच्या वेळी टिग्लॅथ-पायलीझरच्या कार्याची लोकांना विस्मृती होऊ लागली होती. भोवतालच्या एकाही महत्त्वाच्या राजाशी ॲसिरियाचे मित्रत्वाचे संबंध राहिले नव्हते. शिवाय त्याच्या लष्करी धोरणात क्रौर्यच अधिक होते. शत्रूच्या मुलखातील हजारो लोकांना धरून एकदम निराळ्या प्रांतात पाठविण्यात येई आणि त्यांचे सामाजिक व राजकीय ऐक्य नष्ट करण्यात येई. असुरबनिपालने केलेल्या ईलमच्या स्वारीच्या वर्णनावरून त्याच्या क्रूरपणाची कल्पना येते. ह्या धोरणाचा जसा वचक बसविण्यास उपयोग झाला, तसाच अनेक लहानमोठे शत्रू एकत्र येण्यातही झाला.
६२५-६१२ इ.स.पू. दरम्यानच्या काळात आशुर-एटिलु-इलि व सिन-शर-इश्कुन हे दोन राजे प्रसिद्धीस आले. तथापि त्यांची सर्व कारकीर्द नवीन उदयास आलेल्या खाल्डियन साम्राज्याच्या आक्रमणास प्रतिकार करण्यात खर्ची पडली. त्याच वेळी असुर व निनेव्ह ह्या शहरांचा पाडाव झाला आणि ॲसिरियाच्या भूमीवर नेबोपोलॅसर ह्याची सत्ता प्रस्थापित झाली. पुढे इ.स.पू. ६०५ मध्ये उरलेल्या ॲसिरियन सैन्याचा इराणकडून सपशेल पराभव होऊन ॲसिरियन सत्ता संपुष्टात आली आणि ह्या भूमीवर इराणचे वर्चस्व प्रस्थापित झाले.
लोक व समाजजीवन : ॲसिरियन लोक हे मूळचे सेमिटिक वंशाचे. ॲसिरिया हे एक स्वतंत्र बलशाली राष्ट्र होते आणि सर्व सत्ता केंद्रशासित होती. निनेव्ह हे नंतरचे राजधानीचे शहर सोडले तर ॲसिरियात असुर, निमरुद वगैरे काही मोठी शहरे होती. शहरांतून प्रामुख्याने सधन व्यापारी व लष्करी अधिकारी असत. शेती-व्यवसाय करणारा बहुसंख्य समाज खेड्यांतून विखुरलेला होता. समाजात तीन प्रमुख वर्ग होते. त्यांची नावे मारबनुती (उच्चभ्रू), उमाने (कारागीर) आणि खुब्शी (सामान्यवर्ग) होत. मारबनुती-वर्गात राजघराण्यातील लोक, पुरोहितवर्ग, राज्यपाल, मोठे सरदार, लष्करी अधिकारी इत्यादींचा समावेश असे, तर उमाने-वर्गात सर्व प्रकारचे व्यापारी व दुकानदार असत आणि खुब्शी-वर्गात सामान्य शेतकरी, शिपाई, मजूरवर्ग हे प्रामुख्याने असत.
शासनयंत्रणा : ॲसिरियन राष्ट्राचा गाभा म्हणजे ॲसिरियन लोक व त्यांचे नेतृत्व करणारा राजा होता. शासनाच्या अग्रभागी सर्व सैन्याचा अधिपती व नेता जो राजा तो असे. त्याच्या हाताखाली राज्यपाल, प्रांताधिपती, ग्रामाधिपती असे अधिकारी असत. हे अधिकारी गुणवत्तेमुळे निवडलेले असत ते वंशपरंपरेने काम करणारे नव्हते. या सर्वांना निर्वाहासाठी जमिनी दिलेल्या असत पण जोपर्यंत ती व्यक्ती अधिकारपदावर असेल, तोपर्यंतच त्या व्यक्तीला ती जमीन उपभोगता येई. या व्यवस्थेमुळे राज्यात कधीही सरंजामदारांचा वर्ग उत्पन्न होऊ शकला नाही. देवस्थानांच्या जमिनीवरही राजाचे पूर्ण नियंत्रण असल्याने येथे पुरोहितांची सरंजामशाही उत्पन्न झाली नाही. या शासनयंत्रणेच्या जोडीला विशेषतः मुख्य नगरांतून काही प्रमाणात तरी स्थानिक स्वराज्य असे. तेथील ज्येष्ठांचे अथवा व्यापारी श्रेष्ठींचे एक सल्लागारमंडळ राजप्रतिनिधीला साह्य करीत असे. साम्राज्याच्या उत्तरकालात शासनाच्या कार्यक्षमतेसाठी प्रदेशाचे लहानलहान भाग पाडण्यात आले, तरी शेवटपर्यंत राजाचीच सत्ता बलिष्ठ राहिली. राजपुत्रांना प्रांताधिकारी म्हणून नेमण्याची प्रथा आरंभापासून शेवटपर्यंत अस्तित्वात होती. सबंध समाज आणि शासन ही दोन्ही लष्कराप्रमाणे संघटित आणि नियमबद्ध ठेवण्यात आलेली होती.
शेती हा ॲसिरियन अर्थव्यवस्थेचा पाया होय. सर्वसामान्य नागरिक हा उत्तम शेतकरी व उत्तम सैनिक होण्याचीच आकांक्षा धरीत असे. ही दोन्ही कामे परस्परपूरक असत. बऱ्याच मोठमोठ्या जमिनी राजाच्या मालकीच्या असत, त्याविषयीच्या नोंदी मृत्पात्रांवर पाहावयास सापडतात. देवस्थान हे जमिनीवर स्वतंत्र कर बसवीत नसे. कर आकारणीसाठी ठरावि मुदतीने पाहणी आणि गणती करण्यात येई. हारानच्या गणतीच्या अनेक नोंदी ॲसिरियन बखरीत आढळतात. काही ठिकाणी कालवे असले, तरी शेतीसाठी मुख्यतः विहिरी व हिवाळी पाऊस यांचा उपयोग होई. इ.स.पू. १५०० च्याही आधीपासून ॲसिरियन व्यापार भरभराटीत होता. कॅपाडोशियात या काळात व्यापारी वसाहतीही होत्या. वर सांगितल्याप्रमाणे आरंभीच्या ॲसिरियन राजांच्या बहुतेक स्वाऱ्या इराणशी भूमध्य समुद्राशी चालणारा व्यापार सुरक्षित राखण्यासाठीच झाल्या.
कायद्याच्या बाबतीत ॲसिरिया स्वतंत्र होता, तो बॅबिलोनियावर अवलंबून नव्हता. शब्दसंहती, तांत्रिक संज्ञा व दंडशास्त्र यांत फरक आहे. इ.स.पू. तेराव्या शतकातील संहिता शतकात येथे सापडली आहे. याशिवाय कायद्याची नोंद असणारी अनेक मृत्पात्रे सापडली आहेत. यांत जमीनधारणा, व्यावसायिक करार, स्त्रियांचे हक्क, विवाह बंधने व तत्सम सामाजिक आचारांविषयी नियम सापडतात. शारीरिक दंडाबरोबर अार्थिक दंडही प्रचलित होता. पण हा दंड एखाद्या देवतेला अर्पण करावयाचा असे. कायद्याला धर्माचे अधिष्ठान अशा प्रकारे प्राप्त करुन दिलेले दिसते.
धर्म : आशूर हा ॲसिरियन समाजाचा प्रमुख देव होय. असूर या नगरीचे ह दैवत कालांतराने सर्वच ॲसिरियन राष्ट्राचे दैवत बनले. आशूर म्हणजे सूर्य. दोन्हीकडे पंख असलेले चक्र हीच या देवतेची निशाणी व ॲसिरियन सेनेचा ध्वज. नव्या जिंकलेल्या वा वसविलेल्या प्रदेशात आशूर देवतेची स्थापना करण्यात येत असे. खुद्द असुरमधल्या मंदिराचे माहात्म्य मात्र कधीच कमी झाले नाही. विजयप्राप्तीनंतर किंवा उत्सवप्रसंगी आशूरसमोर मोठा नरमेधही होत असावा.
याशिवाय काही दुय्यम देवता होत्या. नवीन जिंकलेल्या नगरांच्या वा प्रदेशांच्या देवतांचाही ॲसिरियाच्या देव्हाऱ्यांत सहज समावेश होई. दुय्यम देवतांमध्ये इश्तार ही प्रमुख. इश्ता देवतेविषयी अनेक कल्पना आढळतात कधी तिला आशूरची बहीण, तर कधी त्याची पत्नी समजण्यात येते. महत्त्वाची गोष्ट अशी, की ॲसिरियन इश्तार ही बॅबिलनियातील इश्तारप्रमाणे प्रीतिदेवता नसून रणचंडी होती. सर्व देवतांत अग्रगण्य, विनाशाची देवता, युद्धाच्या रौद्र स्वरूपाची निर्मिती अशा शब्दांनी तिचे वर्णन केलेले आढळते. मार्डूक या बॅबिलनच्या श्रेष्ठतर देवतेला साम्राज्यकाळात श्रेष्ठत्व प्राप्त झाले आणि काही वेळा तिला आशूरइतका मान मिळावयास लागला. याखेरीज ऊरुकचा आकाशदेव अनु, इतर ठिकाणचे नाबु, शामाश, एनर्त, नर्गाल यांसारख्या देवदेवतांची पूजा व प्रार्थना ॲसिरियन राजे व समाज यांनी पतकरली वा या देवदेवतांची मंदिरे उभारली, जुन्यांचा जीर्णोद्धार केला आणि मूर्ती कोरविल्या.
इतक्या देवदेवता व मंदिरे असली आणि सर्व तऱ्हेचे उत्सव, यज्ञ, पूजा यांची गर्दी असली, तरी ॲसिरियात पुरोहितवर्गाचे वर्चस्व बॅबिलोनियासारखे कधीही अमर्याद झाले नाही. राजसत्ता ही मुळातच आक्रमक व लष्करी म्हणजे तामस असल्याने आपल्या सत्तेला आव्हान देणारी कोणतीही शक्ती ॲसिरियन राजांनी समाजात उत्पन्न होऊ दिली नाही. पूजा-अर्चाशिवाय भुतखेते, जादूटोणआ, ताईत, गंडेदोरे, तंत्रमंत्र यांवरही सामान्य समाजाची श्रद्धा असे. प्राण्यांच्या वा पक्ष्यांच्या आकाराचे अनेक ताईत मिळाले आहेत, त्यांवरुन या अंगाची कल्पना येते.
विज्ञान, साहित्य इ. : प्राचीन ॲसिरियात कालगणनेसाठी एक विशिष्ट पद्धत वापरण्यात येई. या पद्धतीस ‘लिमम-याद्या’ किंवा ‘संकेत-नाम-याद्या’ म्हणतात. म्हणजे एखाद्या वर्षी काही विशेष घटना घडली असेल, तर त्या वर्षाला ते नाव मिळे आणि पुढील कालगणना येथून पुढे सुरू करीत. प्रत्येक महत्त्वाचे शहर स्वतःची काही संकेतनामे देत असे. अशा सगळ्या याद्यांना जर कोणताच समाज घटक नसता, तर त्यांचा उपयोग करता आला नसता परंतु सुदैवाने या संकेतनामांबरोबरच त्या वेळचा राजा, त्यांचे प्रशासक, उपप्रशासक या सगळ्यांचे उल्लेख असत.
नवीन राजा आल्यावर त्याप्रमाणे याद्यांत फेरबदल करण्यात येत. आडादनीरारी ते असुरबनिपाल या राजांच्या काळातील सविस्तर नोंदी या याद्यांत सापडतात. राजा हा जसा तौलनिक संबंधाचा आधार, तसा दुसरा आधार खगोलशास्त्राचा. ॲसिरियन राजांना आकाशातील ग्रहांची माहिती देणारे खास अधिकारी असत. एका यादीमध्ये निनेव्हच्या बंडाचा व त्याच वेळी झालेल्या सूर्यग्रहणाच्या उल्लेख आहे. हे ग्रहण इ.स.पू. ७५२ मध्ये झाले असावे. यावरून या याद्यांतील वर्षांची सध्याच्या पद्धतीने कालगणना करता येते.
बखरी किंवा ऐतिहासिक वाङ्मयात ॲसिरिया व बॅबिलोनिया यांच्यातील परस्परसंबंधाची सविस्तर हकिकत नोंदविणारी एक बखर आहे. याशिवाय वेगवेगळ्या राजघरांण्याच्या वंशवेलीही उपलब्ध आहेतच. सगळ्यांत प्राचीन वंशवेल इ.स.पू. २२०० मधील आहे. यांच्या जोडीला तुलनात्मक अभ्यासाठी बेरोसस याची बखर उपयोगी पडते. या विविध याद्या परस्परांशी आणि बॅबिलोनियन व इतर तत्कालीन साधनांशी ताडून पाहून ॲसिरियन इतिहास सुसंगतपणे सांगता येतो. ॲसिरियन ज्ञानविज्ञान हे बव्हंशी बॅबिलोनियन विज्ञानावरच अधिष्ठित होते. हे प्राचीन ज्ञान भविष्यकाळासाठी जतन करणे, हीच ॲसिरियाची मोठी कामगिरी असावी. ॲसिरियाने स्वतंत्रपणे सिद्ध केलेले असे कोणतेही शोध अथवा प्रमेये दाखविता येत नाहीत. कोणाचेही ज्ञान व माहिती ही सुसंबद्ध रीतीने संघटित करणे व त्यात सुसूत्रपणा आणणे ही ॲसिरियन मनाची ठेवण होय. याचा उपयोग ज्ञानजतनास फार झाला. खगोलशास्त्रात सर्व आकाशस्थ ग्रहतारकांच्या भ्रमणांची नोंद ठेवणारा अधिकारीवर्ग होता, याचा उल्लेख वर आलाच आहे. वैद्यकशास्त्रात शरीरशास्त्रविषयक काही संज्ञा व संहती सापडतात, पण चिकित्सा नाही. रसायनांचा उपयोग कातडकाम, काचेच्या झिलईची भांडी अशा आवश्यक व नित्योपयोगी व्यवसायांपुरताच मर्यादित आहे. यांना वास्तू किंवा स्थापत्य-
शास्त्राची उत्तम माहिती असावी, असा समज त्यांच्या प्रचंड राजवाड्यांचे व मंदिरांचे अवशेष पाहून होतो. परंतु हा समज फारसा खरा नाही, कारण कोणत्याच इमारतीचे आयुष्य पन्नास—पाऊणशे वर्षांपेक्षा जास्त नव्हते. ॲसिरियाने लेखनविद्येची जोपासना फार काळजीपूर्वक केलेली होती.
ॲसिरियन सम्राट जसे निष्णात योद्धे होते, तसे वाङ्मयाचे भोक्तेही होते. म्हणूनच कालाख व निनेव्ह येथील राजवाड्यांत मोठाली ग्रंथालये सापडली. हुकुमनामे, करारपत्रे यांखेरीज काही वाङ्मयीन ग्रंथही आहेत. यांतील बरेचसे ग्रंथ हे जुन्या बॅबिलोनियन ग्रंथांच्या सुधारलेल्या आवृत्या आहेत. यातच गिलगामेशमहाकाव्य आणि विश्वनिर्मितीसंबंधीचा ग्रंथ ह्यांचा समावेश होतो. पशुजीवनावरच्या अनेक कथा खास ॲसिरियन आहेत. काही भविष्यकथने आहेत. इमारतींवरचे शिलालेख हा स्वतंत्र वर्ग आहे. ह्याचाही आराखडा बॅबिलोनियम लेखांसारखाच आहे. आरंभी ईशस्तवन, त्यानंतर इमारतीचे वा मंदिराचे नाव, तत्संबंधी इतिहास व शेवटी शापवाक्या येते. या लेखांवरूनच राजे, राजवंश, त्यांची युद्ध व तह यांची पुष्कळ माहिती उपलब्ध झाली आहे.
कला : कलेच्या क्षेत्रात ॲसिरियाने बव्हंशी बॅबिलोनियाचेच अनुकरण केले असले, तरीसुद्धा उत्थितशिल्पाकृतींत ॲसिरियाचे काही खास आगळे स्थान आहे. त्यांची असुर, निनेव्ह आणि कालाख ही तीन शहरे सर्वत्र कलात्मक वास्तूंनी सुशोभित केलेली होती. त्या वास्तूंतील राजवाडे, त्यातील फर्निचर, तसेच देवळे आणि देवळांतील शिल्पकाम यांचे नमुने आजही पाहावयास सापडतात. येथील मृत्पात्रे विशेष उल्लेखनीय नाहीत. विटांवरील क्यूनिफॉर्म लिपीतील मजकुरावरून ॲसिरियन संस्कृतीवर बराच प्रकाश पडतो. तसेच संगीतामध्ये त्यांनी बॅबिलोनियन लोकांचीच परंपरा पुढे चालू ठेवली. परंतु → चिकणरंगचित्रणाच्या बाबतीत ॲसिरियाने कल्पनातीत प्रगती केलेली आढळून आलेली आहे. ती पुढे इराणमध्ये पूर्णत्वास पोहोचली.
दुसऱ्या सारगॉन, सेनॅकरिब, एसर-हॅडन आणि असुरबनिपाल ह्यांच्या कारकीर्दीत उत्थितशिल्पाकृतींत राजाश्रयामुळे खूपच नवीन नवीन विविध कलाकृती निर्माण झाल्या. त्यांपैकी बहुतेक ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांतील मार्डूक देवतेची प्रतिमा लक्षवेधक असून इतर मानवी आकृत्या उठावदार आहेत. तसेच पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या आकृत्या उत्थितशिल्पात खोदलेल्या आहेत. मूर्तिकलेमध्ये ॲसिरियन लोकांनी विशेष प्रगती केलेली आढळतात नाही. मात्र काही प्राण्यांच्या ओबडधोबड मूर्ती सापडलेल्या आहेत. ॲसिरियन वास्तुशिल्पांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तथापि या लोकांच्या बाधकामात मुख्यतः कच्च्या विटांचा भरणा जास्त असे. दोन नद्यांमधल्या या सुपीक प्रदेशात दगड सापडणे कठीण विटांच्या द्दष्टीने माती फार चांगली असावयाची. विटा तीस सेंमी. रुंद व तीस सेंमी. लांब, नुसत्या उन्हात वाळविलेल्या असावयाच्या. या प्रत्येक विटेवर शिक्का असावयाचा. भिंतींना पक्क्या भाजलेल्या विटा असत. खांब बहुतेक लाकडी आणि त्यांवर सोन्याचा किंवा चांदीचा पत्रा चढवीत प्रत्येक देवळास जो मनोरा असे, त्याचा उपयोग ग्रह व नक्षत्रांचा वेध घेण्यासाठी केला जात असे. भिंतींवर शिकारीची व पशुपक्ष्यांची अनेक चित्रे रंगविलेली विशेषकरून दिसतात. कलेच्या बाबतीत ॲसिरियन लोक वास्तववादी होते पशू किंवा माणसे जशी असतील, तशी ती रंगविण्याची वा खोदण्याची त्यांची पद्धती असे.
पहा : बॅबिलोनिया.
संदर्भ : 1. Bury, J. B. Cook, S. A. Adcock, F. E. Ed. The Cambridge Ancient History Vol. III, Cambridge, 1960.
2. Durant, Will, Our Oriental Heritage, New York, 1954.
3. Saggs, H. W. F. The Greatness that was Babylon, London, 1962,
माटे, म. श्री.
“