अंबर – २ : (खनिज). ⇨जीवाश्माच्या रूपाने आढळणाऱ्या शंकुमंत (सूचिपर्णी) वृक्षांच्या राळेचे नाव. तृतीय कल्पातल्या गाळांच्या काही खडकांत अंबराच्या अनियमित आकाराच्या, लहानमोठ्या गुठळ्या व कांड्या सापडतात. अंबराचे लहानसे साठे सर्व खंडांत आढळतात. त्याचे मोठे मोठे बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या खडकांत आहेत व त्यांच्यातील अंबर खणून काढले जाते. तसेच त्याचे खडक बाल्टिकाच्या पाण्याखालीही आहेत. समुद्राच्या तळावरील गाळ खरवडून त्याच्यातील किंवा तळात नळासारखी भोके खणून खोल जागेतल्या खडकांतले अंबर काढले जाते. वादळाच्या वेळी खवळलेल्या पाण्याने तळाशी असलेल्या खडकांतील उपसून निघालेले अंबर कधीकधी किनाऱ्यावर आणून टाकले जाते. अंबराचे सर्वात अधिक उत्पादन बाल्टिकलगतच्या प्रदेशात होते. ब्रह्मदेशात, सिसिलीत व रुमानियातही थोडे उत्पादन होते. ब्रह्मदेशातले अंबर गडद लाल व बाल्टिकच्या अंबरपेक्षा किंचित कठिण असते.मूळाच्या वृक्षातून बाहेर पडणाऱ्या डिंकासारख्या द्रवात आकस्मिकपणेअडकलेल्या गतकालीन कीटकांचे चांगले जीवाश्म अंबरात कधीकधी आढळतात [→ जीवाश्म]. ख्रिस्तपूर्व सुमारे नऊ हजार वर्षांपूर्वीपासून मणी, दागिने व शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी अंबराचा उपयोग आलेला आहे. ताईत बनविण्यासाठी व औषध म्हणून त्याचा वापर होत असे. अंबराच्या वस्तू अद्यापही बऱ्याच प्रमाणात वापरल्या जातात [→ रत्ने]. त्यांच्या बारीक तुकड्यांचा उपयोग टणक व्हार्निश करण्यासाठी होतो.
गुणधर्म : अस्फटिकी, रंग पिवळा, नारंगी, तपकिरी, क्वचित निळा किंवा हिरवा. पारदर्शक ते पारभासी. स्वच्छ किंवा आत हवेचे सूक्ष्म बुडबुडे असल्यामुळे गढूळ झालेले. स्वच्छ पारदर्शक किंवा दुधी काचेप्रमाणे पारभासी असलेल्या अंबरालाच किंमत येते. चमक राळेसाठी. कठिनात २−२·५. वि.गु. १·०−१·१. भंजन शंखाभ [→ खनिजविज्ञान ]. काही नमुने प्रतिदीप्तिमान असतात. घासले असता घर्षण-विद्युत् निर्माण होण्याचा गुण अंबरात विशेषत्वाने आढळतो. निरनिराळ्या प्रदेशांतल्या अंबराच्या रासायनिक संघटनांत थोडा फरक असतो. तो एक ऑक्सजनीकृत हायड्रोकारबनी पदार्थ असून त्याचे C : H : O हे गुणोत्तर सु. ४० : ६४ : ४ असते. बाल्टिक अंबराला ‘सक्सिनाइट’ असेही म्हणतात. त्याच्यात थोडे सक्सिनिल अम्ल असते व कोरड्या ऊर्ध्वपातनाने ते काढता येते. अंबरांत ते बहुधा नसते.
ठाकूर, अ. ना.