अंतःस्रावी ग्रंथि : अंतःस्रावी ग्रंथि, त्यांचे तंत्र, यंत्रणा व प्रक्रिया या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या सर्व ग्रंथींचे सामान्य लक्षण म्हणजे त्यांच्यामध्ये उत्पन्न होणारा स्राव वाहिनीवाटे बाहेर न पडता एकदम रक्तातच मिसळतो. या ग्रथींना ‘वाहिनी-विहीन ग्रंथी’ असेही म्हणतात. शरीरातील ऊतकांचा विकास, ⇨चयापचय व प्रजनन यांच्यावर या ग्रंथींच्या स्रावांचा परिणाम फार खोलवर व गंभीर असा होतो. त्यांच्या या स्रावाला ‘अंतःस्राव’ असे नाव असून त्याचा दुसरा एक विशेष म्हणजे त्यातील कार्यकारी घटक अतिशय सूक्ष्म प्रमाणात असूनही आपले कार्य प्रभावीपणे करु शकतात. या दृष्टीने या स्रावांचे कार्य प्रवर्तनाचे असते म्हणजे ते घटक ज्या रासायनिक विक्रिया घडवून आणतात त्या विक्रियांमध्ये ते घटक स्वतः काही भाग घेत नाहीत, पण त्यांचे नुसते सान्निध्यच त्या विक्रिया घडवून आणण्यास पुरेसे असते. म्हणून या पदार्थांना ‘सान्निध्य- विकारी पदार्थ’ असे म्हणतात. अंतःस्रावी ग्रंथीच्या स्रावातील अल्पसा स्रावही आपले कार्य करण्यास पुरेसा असतो. त्यामानाने अंतःस्रावी ग्रंथी मात्र पुष्कळ पटीने स्रावक्षम असतात. उदा., ⇨पोषग्रंथीच्या अग्रभागातून होणाऱ्या अंतःस्रावामधील अवघा ०·४ ग्रॅम एवढा अल्प स्रावही शरीरातील ऊतकांवर गाढ परिणाम करु शकतो व एवढा स्राव उत्पन्न करण्यास ग्रंथीचा केवळ चौथा भाग पुरेसा असतो. यावरुन ही ग्रंथी शरीराला जरुर तर अधिक स्रावाचा पुरवठा करु शकेल हे दिसून येईल.
काही अंतःस्रावी ग्रंथी बाह्यस्रावही उत्पन्न करतात म्हणजे त्यांच्यामध्ये ज्याप्रमाणे एकदम रक्तात मिसळणारा अंतःस्राव असतो. त्याचप्रमाणे वाहिनीवाटे बाहेर पडणारा बाह्यस्रावही उत्पन्न होतो. अग्निपिंडाचे उदाहरण या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे. या पिंडातून उत्पन्न होणारा बाह्यस्त्राव वाहिनीवाटे ग्रहणीमध्ये [→ आंत्र] जाऊन पचनक्रियेला मदत करतो अग्निपिंडीतील विशिष्ट कोशिकापुंजामध्ये अंतःस्त्रावही उत्पन्न होऊन तो एकदम रक्तात मिसळतो. त्या त्या अंतःस्त्रावात ‘इन्शुलीन’ (द्वीपीप्रवर्तक) या नावाचे प्रवर्तक [→हॉर्मोने] उत्पन्न होते. या प्रवर्तकाचा शर्करासदृश पदार्थाच्या चयापचयावर गाढ परिणाम होतो. खुद्द ग्रहणीमध्ये अन्न येऊन पोचल्यावर तेथील अधिस्तरामध्ये (आतील थरात) एक अंतःस्त्राव उत्पन्न होऊन तो रक्तामार्गे अग्निपिंडात जाऊन त्या पिंडाच्या बाह्यस्त्रावजननास उत्तेजित करतो.
अंतःस्रावी ग्रंथी भ्रूणस्तरातील निरनिराळ्या थरांपासून उत्पन्न होतात. या बाबतीतही त्यांच्या सारखेपणा नसतो. काही स्रा ग्रंथींचे निरनिराळे भाग निरनिराळ्या भ्रूणस्तरांपासून उत्पन्न होऊन नंतर एकत्र येऊन त्यांची संपूर्ण ग्रंथी बनते. पोषग्रंथीचे तीन भाग अथवा अधिवृक्क ग्रंथीचे दोन भाग अशी उदाहरणे सांगता येतील.
वर्गीकरण : अशा प्रकारे अंतःस्रावी ग्रंथींना वाहिनीविहीनता यापेक्षा सामान्य असे दुसरे लक्षण नसल्यामुळे त्यांचे वर्गीकरण करणे थोडे कठीण आहे. एका प्रकारचे वर्गीकरण शरीरातील त्यांच्या स्थानांवरून करतात : (१) डोक्यातील, (२) मान व छाती येथील आणि (३) पोटातील. दुसऱ्या प्रकारचे वर्गीकरण भ्रूणावस्थेतील विकासानुसार करतात : (१) मस्तिषकसंबंधी (मेंदूसंबंधी) ग्रंथी (पोष व तृतीय-नेत्र ग्रंथी, (२) क्लोमीयग्रंथी (अवटू आणि परावटु- ग्रंथी, यौवनलोपी ग्रंथी), (३) वृक्क-संबंधी ग्रंथी (अधिवृक्क-बाह्यक, अंडाशय, वृषण), (४) पचनतंत्रासंबंधी ग्रंथी (अग्निपिंड, ग्रहणी) आणि (५) रंजकाकर्षी (काळा रंग शोषणाऱ्या) अधिवृक्क-मध्यक). या वर्गीकरणामध्ये भ्रूणावस्थेतील कोणत्या भागापासून त्या ग्रंथीची उत्पत्ती झाली हे कळले तरी एकाच ग्रंथीचे दोन भाग निरनिराळ्या भ्रूणस्तरांपासून उत्पन्न झालेले असल्यामुळे एकच ग्रंथी दोन वर्गात विभागल्यासारखी दिसते. तिसऱ्या प्रकारचे वर्गीकरण अंतःस्त्रावाच्या रासायनिक घटकांप्रमाणे करतात. तेही तितकेसे समाधानकारक वाटत नाही. यावरून लक्षात येईल की अजून अंतःस्रावी ग्रंथीचे सर्वमान्य वर्गीकरण होऊ शकलेले नाही.
या ग्रंथींच्या अंतस्त्रावातील प्रभावी घटकाला ‘प्रवर्तक’असे नाव आहे. प्रवर्तके स्वतः अलिप्त राहून कोशिकांमध्ये महत्त्वाच्या रासायनिक घडामोडी घडवून आणतात.
अंतःस्रावी ग्रंथींचे शारीर व शारीरक्रियाविज्ञान यांचे वर्णन त्या त्या ग्रंथींच्या स्वतंत्र नोंदींत केले आहे. येथे त्यांच्या अंतःस्त्रावांसंबंधीच त्रोटक वर्णन दिले आहे.
(१) पोषग्रंथी : अंत:स्रावी ग्रंथीमधील सर्वप्रमुख अशी ही ग्रंथी असून तिच्या अंत:स्रावाचा परिणाम इतर अंत:स्रावी ग्रंथी आणि सर्व शरीरातील कोशिका यांवर होतो. या ग्रंथीचे तीन भाग असून त्यांपैकी अग्रखंड भ्रूणाच्या आद्य मुख-कुहरा-पासून [→भ्रूणविज्ञान] उत्पन्न होतो. अग्रभागाच्या मागे त्या कुहराचा अवशेषरुप मध्यखंड असतो. पश्चखंडाची उत्पती मध्यमस्तिष्कापासून (मेंदूचा मधला भाग) होते. हे तीनही भाग पुढे एकत्र येऊन मेंदूच्या तळाशी असलेल्या अस्थिविवरात (हाडांच्या पोकळीत) बसविल्यासारखे दिसतात. पोषग्रंथीला ‘अंत:स्रावी ग्रथिवृंदांचा नेता’ असे म्हणतात, कारण या ग्रंथीमध्ये जे अनेक प्रवर्तक उत्पन्न होतात त्यांचा फार गाढ व प्रदीर्घ परिणाम इतर कित्येत अंत:स्रावी ग्रंथींवर व सर्व शरीरीच्या वाढीवर होत असतो [→ पोषग्रंथि].
(२) तृतीय-नेत्र ग्रंथी (पिंड) : ही ग्रंथी मध्यमस्तिष्कापासूनच उत्पन्न होते.तिच्या अंत:स्रावाबद्दल अजून विशेष ज्ञान झालेले नाही परंतु तिचा संबंध जननग्रंथींच्या विकासाशी असावा असा तर्क आहे [→ तृतीय नेत्रपिंड].
(३) अवटु ग्रंथी : ही ग्रंथी ग्रसनीच्या (घशाच्या) तळाजवळच्या भ्रूणाच्या मागील भागापासून उत्पन्न होते. मानेच्या मध्यभागी ही त्रिखंडात्मक ग्रंथी असून या ग्रंथीच्या अंत:स्रावात आयोडीन असते. शरीराचा विकास व चयापचय यांवर अंत:स्रावातील प्रवर्तकाचा गाढ परिणाम होतो [→ अवटु ग्रंथि ].
(४) परावटु ग्रंथी : क्लोमाच्या [→ भ्रूणविज्ञान] चौथ्या व पाचव्या कमानीपासून ह्या ग्रंथीची उत्पत्ती होते. या ग्रंथी म्हणजे चार लहानलहान अशा ग्रंथी असून त्या अवटुग्रंथीच्या मागच्या बाजूस त्या ग्रंथीच्या उजव्या व डाव्या खंडांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे बसविल्यासारख्या दिसतात. या ग्रंथींच्या अंत:स्रावाचा कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या चयापचयावर गाढ परिणाम होतो [→ परावटु ग्रंथि].
(५) यौवनलोपी ग्रंथी : या ग्रंथीची उत्पत्ती क्लोमाच्या तिसऱ्या व चौथ्या कमानीपासून होते. ग्रंथीचे दोन खंड असून उरामध्ये अग्रभागी ही ग्रंथी असते. वयोमानाबरोबर ही ग्रंथी लहान होत जाऊन प्रौढपणी जवळजवळ नाहीशी होते. या ग्रंथीच्या अंत:स्रावाबद्दल निश्चित ज्ञान झालेली नाही, परंतु जनननेंद्रियांच्या पूर्ण विकासासाठी या ग्रंथीची जरूरी असावी असे मानले जाते कारण प्रौढ वयापर्यंत ही ग्रंथी जवळजवळ नाहीशी झालेली असते.रक्तातील लसीकाकोशिकांच्या [→ लसिका तंत्र] उत्पतीशी या ग्रंथीचा संबंध असावा, तसेच स्नायूंच्या ताणाशीही काही संबंध असावा, असा तर्क आहे. कित्येक वेळा विशेष दृश्य कारणावाचून अकस्मात मृत्यू आला तर त्यावेळी ही ग्रंथी मोठी झालेली दिसते त्यावरुन तिचा रक्तवाहिन्यांशी संबंध असावा, असे पूर्वी मानीत [→ यौवनलिपी ग्रंथि].
(६) अधिवृक्क ग्रंथी : या ग्रंथीचे दोन भाग असून ते भ्रूणावस्थेतील दोन निरनिराळ्या थरांपासून उत्पन्न होतात. त्यांना अनुक्रमे ‘बाह्यक’ आणि ‘मध्यक’ असे म्हणतात. बाह्यकाच्या अंत:स्रावातील प्रवर्तकाचा सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन, वसा, प्रथिने व शर्करा यांचे चयापचय आणि जंतुप्रतिरक्षा (जंतुसंसर्गास प्रतिकार करण्याची शक्ती) वगैरे गोष्टींवर परिणाम होतो. नोंदीच्या शेवटी दिलेल्या कोष्टकात या ग्रंथीच्या अंत:स्रावातील प्रवर्तकांबद्दल माहिती दिलेली आहे. मध्यमकाच्या अंत:स्रावामुळे हृदयाच्या आकुंचनाचा जोर वाढतो. काही रोहिण्यांचा संकोच होतो, काही रोहिण्यांचा विस्तार होतो. यकृतातील मधुजनाचे (ग्लायकोजेनाचे) द्राक्षशर्करेत रुपांतर होते [→ अधिवृक्क ग्रंथि].
( ७) जनन ग्रंथी : स्त्री व पुरूष यांच्या जननग्रंथीमध्ये मुख्य जनन कोशिका उत्पन्न होतात. त्याशिवाय त्या ग्रंथींच्या अंतर्भागात काही विशेष कोशिका असून त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या अंत:स्रावातील प्रवर्तकापासून गौण लैंगिक लक्षणे उत्पन्न होतात, तसेच रजःस्राव, गर्भधारणा व स्तन यांच्यावरही गाढ परिणाम करणारी प्रवर्तके स्त्रीजननग्रंथींच्या अंत:स्रावात असतात [→ जनन ग्रंथि].
(८) अग्निपिंड : अग्निपिंडाचा बाह्यस्राव उत्पन्न करणाऱ्या कोशिकांमध्ये दुसऱ्या प्रकारच्या कोशिकांची द्वीपके असतात, त्यांना ‘अग्निपिंडद्वीपके’ असे नाव असून त्या द्वीपकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या अंत:स्रावाला ‘इन्शुलीन’ असे नाव आहे. या प्रवर्तकाचा परिणाम पिठूळ व शर्करामय पदार्थाच्या चयापचयावर होत असतो. हे प्रवर्तक योग्य प्रमाणात उत्पन्न न झाल्यास ⇨मधुमेह हा रोग होतो. इन्शुलिनाच्या विरुद्ध कार्य करणारे ‘ग्लुकागॉन’ नावाचे प्रवर्तकही यात उत्पन्न होते [→ अग्निपिंड].
काही गॅस्ट्रिन, सिक्रिटीन यांसारखी प्रवर्तके अंत:स्रावांत मोडतात, परंतु ती ज्या जठर, आंत्र इ. इंद्रियांत उत्पन्न होतात. तेथेच त्यांचे कार्य होते. त्यांना ‘स्थानिक प्रवर्तके’ म्हणतात.
अंत:स्रावी यंत्रणा : अंत:स्रावी ग्रंथीमध्ये उत्पन्न होणाऱ्या अंत:स्रावात विशिष्ट रासायनिक घटना असलेले प्रवर्तक पदार्थ असून त्यांच्या प्रभावामुळेच अंत:स्रावी ग्रंथींचे कार्य चालते. हे कार्य संघटित व अनुकूलित पद्धतीनेच चालते. म्हणजे एकमेकांविरुद्ध क्रिया असलेल्या प्रवर्तकांची उत्पत्ती शरीरस्वास्थ्याला जरूर तेवढीच होत असते. प्रवर्तकांच्या उत्पत्तीवर दुसऱ्या अंत:स्रावी काही ठिकाणी तंत्रिकातंत्राचे नियंत्रण असते. अशा नियंत्रणामुळे शरीरातील ऊतकांच्या जरुरीप्रमाणे प्रवर्तकाचे उत्पादक कमी-अधिक होत असते.
पुष्कळशा प्रवर्तकांची रासायनिक घटना निश्चित करण्यात आली असून त्यांपैकी काही कृत्रिम रीतीनेही तयार करण्यात येतात. प्रत्येक प्रवर्तकांची निर्मिती विशिष्ट कोशिकांतच होऊन ती ग्रंथीच्या नीलांमधील रक्तात मिसळून सर्व शरीरभर पसरतात. विशिष्ट ऊतकातील कोशिकांपाशी ही प्रवर्तके पोचली म्हणजे त्यांच्या सानिध्याने रासायनिक विक्रिया घडून येते. अशीच प्रवर्तके वनस्पतींमध्येही असून त्यांचा वनस्पतींच्या चयापचयावर परिणाम होतो.
अंत:स्त्रावी प्रवर्तकांचे प्रमुख कार्य म्हणजे सर्व शरीरव्यापारांचे रासायनिक नियंत्रण करणे हे होय. सर्वच प्रवर्तकांची कार्यपद्धती अजून पूर्णपणे समजलेली नसली तरी सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल, की ऊतकांतील रासायनिक विक्रियांचे उत्तेजन किंवा दमन करणे हे कार्य प्रवर्तकांच्या नियंत्रणामुळे घडते.
प्रवर्तकांची कार्ये निश्चित करण्यासाठी अनेक प्रयोग केले जात आहेत. प्राण्यांच्या शरीरातील अंत:स्रावी ग्रंथी काढून टाकल्यानंतर काय लक्षणे दिसतात, याचा अभ्यास करण्यात येतो. त्यानंतर त्याच ग्रंथीचा अर्क किंवा कृत्रिम तऱ्हेने बनविलेल्या तत्सदृश्य पदार्थ त्या प्राण्यांच्या शरीरात घालून काय फरक दिसतो त्याचाही अभ्यास करून या दोन्ही अभ्यासांवरुन काही निष्कर्ष काढण्यात येतात. मनुष्यात त्या ग्रंथीच्या रोगांमध्ये उत्पन्न होणाऱ्या लक्षणांवरुनही त्या ग्रंथींच्या कार्यासंबंधी ज्ञान प्राप्त होते. या सर्व पद्धतींनी जे ज्ञान मिळते त्यावरुन त्या प्रवर्तकाच्या कार्याची निश्चिती करण्यात येते. त्यानंतर प्रवर्तकांची रासायनिक घटना ठरविण्यात येऊन तो पदार्थ कृत्रिम तऱ्हेने तयार करण्यात प्रयत्न करण्यात येतो. या पद्धतीने व या पायऱ्यांनी प्रवर्तकांसंबंधी सम्यक ज्ञान होते. कित्येक प्रवर्तकांबद्दलचे असे सम्यक ज्ञान अजून झालेले नाही.
प्रवर्तके शरीरप्रकियांवर जे नियंत्रण ठेवतात ते अनेक प्रकारांचे असते. वर्णाच्या सोयीकरिता या नियंत्रणाचे पुढील चार प्रकार कल्पिले आहेत : (१) समन्वयी, (२) स्थितिरक्षक, (३) उत्कर्षी किंवा क्रमिक आणि (४) आवर्ती.
(१) समन्वयी नियंत्रण : या प्रकाराच्या नियंत्रणाचे उत्तम उदाहरण पचनतंत्राचे देता येईल. अन्न जठरात गेल्याबरोबर जठराच्या अधिस्तरात ‘जठरी’ या नावाचे प्रवर्तक उत्पन्न होते. ते रक्तामार्गे जठरग्रंथींमध्ये गेल्यानंतर त्या ग्रंथीची स्रावक्रिया सुरु होते. त्यात जो बाह्यस्राव तयार होतो तो जठरातील अन्नात मिसळून पचनक्रिया सुरु होते. असे अर्धवट पचलेले अन्न ग्रहणीमध्ये गेल्याबरोबर तेथील अधिस्तरात ‘स्रावी’ नावाचे प्रवर्तक उत्पन्न होते. ते प्रवर्तक रक्तमार्गे अग्निपिंडाच्या ग्रंथींमध्ये गेल्यावर त्या पिंडातील कोशिकांचा बाह्यस्राव तयार होतो. या बाह्यस्रावातील पाणी व क्षार यांच्यामुळे जठररसातून आलेल्या अम्लाचे उदासीनीकरण होते. त्याशिवाय ग्रहणीच्या अधिस्तरात ‘अग्निपिंडप्रवर्तक’ आणि ‘पित्ताशयचालक’ अशी दोन प्रवर्तके उत्पन्न होतात. त्यांच्यामुळे अनुक्रमे अग्निपिंडाचा बाह्यस्राव आणि पित्ताशयाचे आंकुचन या क्रिया उद्दीपित होतात त्यामुळे अन्नपचन त्वरेने होऊ लागते. काही काळाने ग्रहणीतच ‘आंत्र:स्रावप्रवर्तक’ उत्पन्न होऊन त्यामुळे जठरातील पचनक्रिया मंदावून आंत्रातील क्रिया सुरू होते. या उदाहरणामध्ये प्रवर्तकांची उत्पत्ती, त्या उत्पत्तीचा काल, योग्य वेळी बाह्यस्राव कमी होणे या सर्व क्रियांचा समन्वय उत्तम तऱ्हेने झालेला दिसून येतो.
प्राणिसृष्टीतही प्रवर्तकांची अशीच उदाहरणे दिसतात. उदा., क्रस्टेशियन (कवचधारी) व उभयचर प्राण्यांत परिस्थितीशी संवादी असे त्वचेचे रंग पालटण्याची क्रिया या अंत:स्रावी प्रवर्तकांमुळेच होते.
(२) स्थितिरक्षक नियंत्रण : रक्तातील शर्करावर्गीय पदार्थांच्या प्रमाणांचे नियंत्रण व नियमन हे अग्निपिंडातील द्वीपकात उत्पन्न होणाऱ्या इन्शुलिनामुळे होते. या प्रवर्तकाच्या क्रियेबद्दल अजून संपूर्ण ज्ञान झालेले नसले तरी एवढे खात्रीने सांगता येते, की कोशिकांमध्ये, विशेषतः स्नायुकोशिकांमध्ये, शर्करांचा उपयोग करून ऊर्जा उत्पन्न करण्याच्या कामी व शर्करा, वसा व मधुजन उत्पन्न करण्याच्या कामी या प्रवर्तकाचा उपयोग होतो. या प्रवर्तकाच्या विरोधी क्रिया असलेले दुसरे अनेक प्रवर्तक पोषग्रंथी आणि अधिवृक्कग्रंथीच्या अंतःस्रावात असतात. त्यांचे व इन्शुलिनाचे रक्तातील प्रमाण कमी जास्त होऊन शरीरसंरक्षणाला व शरीरव्यापाराला योग्य असे शर्करा प्रमाण टिकून राहते.
परिसरात बदल झाल्यामुळे प्राण्याला भय, क्रोध वगैरे विकार उत्पन्न होतात. अशा वेळी शरीरसंरक्षणासाठी शरीरव्यापार जास्त जोमाने व त्वरेने होण्याची आवश्यकता असते. त्यासाठी अधिवृक्क-मध्यकात उत्पन्न होणाऱ्या प्रवर्तकाचे प्रमाण एकदम वाढते. त्यामुळे यकृतातील मधुजनाची शर्करा अधिक प्रमाणात बनून रक्तात मिसळते. शर्करामुळे स्नायूंचे आकुंचनकार्य अधिक जोराने चालते तसेच हृदयाची क्रिया जलद व जोमाने चालते. त्यामुळे शरीराच्या वाढत्या गरजांना योग्य असा शर्करा व रक्त यांचा पुरवठा केला जातो.
अवटुग्रंथीच्या अंत:स्रावातील प्रवर्तकामुळे शारीरिक चयापचयाचे नियंत्रण होते. रक्तातील सोडियम व पाणी यांचे नियंत्रण अनुक्रमे अधिवृक्क व पोष-ग्रंथी यांच्या अंतःस्रावातील प्रवर्तकांमुळे होते.
ही सर्व उदाहरणे शरीराचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून त्यांमध्ये अंतःस्रावी ग्रंथीचे स्थितिक्षक नियंत्रणकार्य दिसून येते.
(३ ) उत्कर्षी अथवा क्रमिक : उभयचर प्राण्यांमध्ये होणारी शारीरिक वाढ अवटुग्रंथीच्या अंत:स्रावामुळे होते. बेडकाच्या भैकराला (प्रथमावस्थेला) जर अवटुग्रंथीच्या अंत:स्रावातील प्रवर्तक दिले तर त्याची वाढ फार त्वरेने होऊन त्याचे संपूर्ण वाढीच्या बेडकात रुपांतर होते पण तो आकाराने लहान रहातो. उलट भैकराची अवटुग्रंथी काढून टाकली तर त्याचे प्राकृतिक रूपांतरणही होत नाही.
सर्व पृष्ठवंशीय (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांमध्ये पोषग्रंथीच्या अग्रखंडात उत्पन्न होणाऱ्या अंत:स्रावातील ‘तनुपोषी’ प्रवर्तकामुळे शरीरातील अस्थी व मांस यांची वाढ होत असते. या प्रवर्तकाचे प्रमाण अधिक झाल्यास तो प्राणी ‘प्रचंडकाय’ बनतो. संधिपाद प्राण्यांमध्ये कात टाकण्याची क्रिया पोषग्रंथीच्या अंत:स्रावामुळे होते.
जननेंद्रियांचा विकास अनेक अंत:स्रावी ग्रंथींतील प्रवर्तकांमुळे होतो. स्त्री व पुरुष यांच्यामधील गौण लैंगिक लक्षणे जननेंद्रियांच्या अंत:स्रावीय प्रवर्तकांमुळे होतात.
उत्कर्षी नियंत्रणाची ही व अशी अनेक उदाहरणे असून त्यांच्यामुळे शारीरिक विकास होतो.
(४) आवर्ती नियंत्रण : पृष्ठवंशीय प्राण्यांतील मादीला ठराविक वेळेला येणारा मदकाल, ऋतुप्राप्ती, गर्भधारणा व प्रसूती या सर्व गोष्टी पोषग्रंथी व अंडाशयातील अंतःस्रावातील प्रवर्तकांमुळेच होतात. प्रसूतीनंतर होणारे दुग्धोत्पादनही पोषग्रंथीतील ‘दुग्धप्रवर्तका’ मुळे होते. ही सर्व उदाहरणे आवर्ती म्हणजे कालांतराने पुन्हा पुन्हा होणाऱ्या नियंत्रणाची आहेत.
प्रमुख अंत:स्राव, त्यांतील प्रवर्तके, त्यांचे रसायनिक स्वरूप, विक्रिया व त्यांच्या न्यूनाधिक्याने उत्पन्न होणारे विकार खालील तक्यात दाखविले आहेत.
संदर्भ : 1. Beckman, H. Pharmacology, The Nature, Action and Use of Drugs, Philadelphia, 1961.2. Best, C. H. Taylor, N. B. The Physiological Basis of Medical Practice, Baltimore, 1961.3. Craig, R. L. Hormons in Health and Disease, New York, 1954.4. Harrison, T. R. Adams, R. D. Bennett, I. L. Resnik, W. H. Thorn, G. W. Wintrobe, M. M. Principles of Internal Medicine,
Tokyo, 1961.
ढमढेरे, वा. रा.