ॲव्होगाड्रो, आमेडेओ : (९ ऑगस्ट १७७६—९ जुलै १८५६). इटालियन भौतिकीविज्ञ, वायूसंबंधीच्या नियमाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म तूरिन येथे झाला. १७९६ त त्यांनी कायद्याची पदवी मिळविली, परंतु भौतिकी व गणित या विषयांच्या विशेष आवडीमुळे या विषयांचाही त्यांनी अभ्यास केला (१८००—०५). १८०९ मध्ये व्हर्सायच्या रॉयल कॉलेजमध्ये व १८२०—५० या काळात तूरिन विद्यापीठात ते गणितीय भौतिकीचे प्राध्यापक होते. ॲव्होगाड्रो यांनी त्यांचा सुप्रसिद्ध नियम ‘सारखेच तपमान व सारखाच दाब असणाऱ्या सर्व वायूंच्या सारख्याच घनफळातील रेणूंची संख्या ही सारखीच असते’ हा १८११ मध्ये प्रसिद्ध केला. दर ग्रॅम मोलमध्ये (ग्रॅममध्ये मांडलेल्या रेणुभारामध्ये ) असणाऱ्या रेणूंच्या संख्येला ॲव्होगाड्रो स्थिरांक म्हणतात. ही संख्या ६·०२२×१०२३ आहे. या नियमाला डाल्टन, वुलस्टन, बर्झीलियस यांसारख्या समकालीन सुप्रसिद्ध शास्त्रज्ञांनी विरोध दर्शविला. ॲव्होगाड्रो यांच्या हयातीत त्या नियमाचा स्वीकार झाला नाही. कान्नीद्झारो यांनी १८६० मध्ये ॲव्होगाड्रो यांच्या नियमाचे सोप्या भाषेत विस्तृत स्पष्टीकरण करून त्याचा जोरदारपणे पुरस्कार केला व त्यामुळे या नियमाचे शास्त्रीय महत्त्व पुढे प्रस्थापित झाले. ते तूरिन येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.