अंग : बिहार राज्यातील बौद्धकालीन सोळा महाजनपदांपैकी एक विख्यात देश.नामव्युत्पत्तीबाबत मतांतरे आहेत, तथापि लोकसमूहावरून देशास हे नाव मिळाले असावे. प्राचीन संस्कृत, पाली व प्राकृत साहित्यामध्ये या देशाविषयी अनेक निर्देश आहेत. प्रवंग, कामाश्रम, अंगरट्ट व चंपादेश अशी याची नामांतरे आढळतात. बिहारमधील आधुनिक भागलपूर व मोंघीर जिल्हे आणि संथाळ परगण्याचा काही भाग मिळून प्राचीन अंग देश बनला असावा. या देशाची राजधानी चंपा (हल्लीचे भागलपूर) होती. रामायणकाली रोमपाद (ऋष्यशृंग वैभांडक या विख्यात ऋषीचा सासरा) याचे राज्य येथे होते. महाभारतकाली दुर्योधनादी कौरवांच्या प्रेरणेवरून कर्णाला अंग देशाचे राज्य बहाल करण्यात आले होते. मगध साम्राज्याचा उदय होण्याच्या अगोदरचा काळ अंग देशाच्या विस्ताराचा आणि समृद्धीचा असून त्या वेळी ब्रह्मदत्त राजाचे राज्य या देशावर होते. हर्षवर्धनकृत ‘प्रियदर्शिका’ नाटकामध्ये मगध देशावर राज्य करणाऱ्या दधिवाहन नावाच्या राजाचा उल्लेख आढळतो. जैन धर्मातील पहिली स्त्री धर्मोपदेशिका चंदनबाला ही याच दधिवाहन राजाची कन्या. याच्याच कारकीर्दीत (इ.स.पू. ६ वे शतक) मगध देशाचा राजा बिंबिसार याने हा देश आपल्या साम्राज्यात समाविष्ट केला. यानंतर हा पुन्हा स्वतंत्र झाला नाही, तथापि हे देशनाम उत्तरकालीन इतिहासामध्ये दीर्घकाळपर्यंत रेंगाळत राहिले.

शाह. र. रू जोशी, चंद्रहास