सीवर्ड, सर ॲल्बर्ट चार्ल्स : (९ ऑक्टोबर १८६३— ११ एप्रिल १९४१). ब्रिटीश पुरावनस्पतिशास्त्रज्ञ. त्यांनी वनस्पतींच्या जीवाश्मांचे (शिळारुप झालेल्या अवशेषांचे) अध्ययन करून वनस्पतींविषयी माहिती गोळा करण्यासंबंधी महत्त्वाचे कार्य केले.

 

सीवर्ड यांचा जन्म लँकेस्टर (लंडन) येथे झाला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठात निसर्गविज्ञान (प्रकृतिविज्ञान) विषयाचे अध्ययन केले. १८८६ मध्ये पदवी मिळाल्यानंतर त्यांनी मँचेस्टर येथे ⇨विल्यम क्रॉफर्ड विल्यमसन या पुरावनस्पतिशास्त्रज्ञाबरोबर एक वर्ष संशोधन केले. त्यानंतर त्यांची संपूर्ण कारकीर्द केंब्रिज येथे गेली. १८९० मध्ये ते वनस्पतिविज्ञान विषयाचे व्याख्याते झाले. १८९८ मध्ये ते रॉयल सोसायटीचे फेलो झाले. १९०६—३८ या काळात ते प्राध्यापक होते.

 

सीवर्ड यांनी ⇨ड्युकिनफील्ड हेन्री स्कॉट यांच्याबरोबर पुरावनस्पतिविज्ञानाच्या नवीन पद्घतीचा पाया घालण्याचे काम केले. प्रथम त्यांनी पुराजीव महाकल्पातील (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळातील) व नंतर मध्यजीव महाकल्पातील (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) वनस्पतींच्या जीवाश्मांचा अभ्यास केला. त्यांनी जुरासिक (सु. १८.५ ते १५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) वनश्रीसंबंधी प्रसिद्घ केलेल्या माहितीमुळे जगातील अनेक ठिकाणांहून अनेक नमुने त्यांचेकडे जमा झाले. ब्रिटीश संग्रहालयाने त्यांच्याकडील संग्रहाची सूची करण्याकरिता सीवर्ड यांना निमंत्रित केले होते. १९२१ मध्ये सीवर्ड यांनी ग्रीनलंडचा प्रवास करून जे संकलन केले त्यामुळे फुलझाडांचा प्रसार होण्यापूर्वीच्या वनश्रीसंबंधीच्या माहितीत विशेष भर पडली.

 

सीवर्ड यांनी जुरासिक फ्लोरा (१९००— ०४)आणि फॉसिल प्लँट्स फॉर स्टूडंट्स ऑफ बॉटनी अँड जिऑलॉजी (४ खंड १८९८— १९१९) या ग्रंथांचे लेखन केले. तसेच त्यांनी प्लँट-लाइफ थ्रू द एजेस या ग्रंथात अनेक विषयांचे वर्णन केले.

 

सीवर्ड अनेक नावाजलेल्या संस्थांचे सदस्य होते. त्यांना रॉयल सोसायटीने रॉयल व डार्विन ही पदके आणि जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेने वोलॅस्टन पदक देऊन गौरविले.

 

सीवर्ड यांचे लंडन येथे निधन झाले.

जमदाडे, ज. वि.