सिल्लांपॅ, फ्रान्स ए अमिल : (१६ सप्टेंबर १८८८— ३ जून १९६४). फिनिश कादंबरीकार. जन्म फिनलंडमधील हमेनक्योरा येथे भूमिहीन शेतमजुराच्या कुटुंबात. निसर्गविज्ञानांच्या अभ्यासासाठी त्याने हेल्सिंकी विद्यापीठात प्रवेश घेतला परंतु पदवी न मिळवताच तेथून बाहेर पडला (१९१३) आणि लेखनाला वाहून घेतले. १९१५ पासून त्याच्या कथा प्रसिद्घ होऊ लागल्या. १९२४— २७ ह्या काळात तो एका प्रकाशनगृहासाठी काम करीत होता. त्याची पहिली कादंबरी ‘लाइफ अँड सन’ (१९१६, इं. शी.) तत्पूर्वीच प्रसिद्घ झालेली होती. उन्हाळ्यात घरी आलेल्या एका तरुणाची ही प्रेमकहाणी आहे.सिल्लांपॅच्या कादंबरी लेखनाची लक्षणीय ठरलेली वैशिष्ट्ये ह्या अगदी पहिल्या कादंबरीतही दिसून येतात. येथे माणसे ही निसर्गाचा एक अविभाज्य घटक म्हणून वावरताना दिसतात. माणसांच्या कृतींवर सहजप्रेरणांचे वर्चस्व दिसून येते. त्यांतून त्यांच्या आयुष्याचे एरव्ही मूक, अप्रकट असलेले हेतू प्रकट होत राहतात. ह्या कादंबरीला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. १९१८ मध्ये फिनलंडमध्ये सुरु झालेल्या यादवी युद्घामुळे सिल्लांपॅला मोठा धक्का बसला. त्यातूनच त्याची मीक हेरिटेज (१९१९, इं. भा. १९३८) ही कादंबरी लिहिली गेली. युद्घ करणाऱ्यांच्या ह्या युद्घामागील भूमिका, ते कशासाठी लढायचे ह्याची कल्पनाही नसलेला एक गरीब शेतमजूर आणि ह्या युद्घात त्याचा गेलेला बळी ह्या बाबी ह्या कादंबरीत त्याने दाखविल्या आहेत. फॉलन अस्लीप व्हाइल यंग किंवा द मेड सिल्जा (१९३१ इं. भा. १९३३) ही त्याची सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली जाते. शेतावर मजुरी करणाऱ्या एका मुलीची ही कहाणी. ‘वन मॅन्स वे’ (१९३२, इं. शी.) ह्या कादंबरीत त्याने दोन शेतमजुरांच्या नातेसंबंधांचे चित्रण केले आहे. वास्तववादी चित्रण आणि भावगेयता ह्यांचे प्रभावी मिश्रण तीत आढळते. १९४० मध्ये ह्या कादंबरीवर चित्रपट काढण्यात आला. ‘पीपल इन द समर नाइट’ (१९३४, इं. शी.) ही त्याची शैलीच्या दृष्टीने उत्कृष्ट अशी काव्यात्म कादंबरी. ‘द ब्यूटी अँड मिझरी ऑफ ह्यूमन लाइफ’ (१९४५, इं. शी.) ही त्याची अखेरची कादंबरी. त्याचे कथालेखनही विपुल आहे.
‘टेलिंग अँड डिस्क्राइबिंग’ (१९५३, इं. शी.) आणि ‘द हाय मोमंट ऑफ द डे’ (१९५६, इं. शी.) ह्या त्याच्या आठवणींच्या संग्रहांतून लेखक म्हणून त्याच्या व्यक्तिमत्त्वावर नवा प्रकाश पडतो.
१९३९ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आला. साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवणारा तो पहिला फिनिश साहित्यिक होय.
हेल्सिंकी येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.
“