सिक्वेरा, जॉन बाप्तिस्त : (२ जून १९३७ – ). एक प्रसिद्घ कोकणी कवी आणि मुक्त स्तंभलेखक. जे. बी. सिक्वेरा या नावाने ते प्रसिद्घ आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे एका सधन उद्योगप्रधान व सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे घराणे मूळचे कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील कटपाडी या गावचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण पांगळा व कटपाडी येथे झाले आणि माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. पुढे धंद्यानिमित्त त्यांचे मुंबईतच वास्तव्य राहिले. त्यांनी वडिलोपार्जित उद्योगधंद्यामध्ये लक्ष घातले.
सिक्वेरा यांनी मुक्त लेखन हा छंद जोपासला आणि त्या निमित्ताने त्यांनी आधुनिक काव्याचा अभ्यासही केला. त्यांनी प्रामुख्याने काव्यलेखन केले. काळजाचे उमाळे (१९८७),एक सपन अधुरें (१९८९),अशीं आपलीं ल्हारां (१९९२), चिकोली (१९९७), सतां खतां (१९९८), आवाळे धुवाळे (२००१) हे त्यांचे विशेष उल्लेखनीय काव्यसंग्रह. यांशिवाय कादंबरी, निबंध इ. अन्य लेखनही त्यांनी केले. त्यांच्या अन्य लेखनात सलवाणेंत जिक (१९५७) ही कादंबरी दोत कितली (१९६३) हा निबंध, मुखावरां आणि मोवळां ( ३ खंड, १९९९–२००२ ) हा कोकणी म्हणींचा संग्रह आमी कोंग्लीश उलय तांव (खंड १ ते ३ २००४) हा भाषाविषयक ग्रंथ आदींचा समावेश होतो. ते कोंकण दायज या नियतकालिकाच्या संपादक मंडळावर होते (१९५८) आणि वावराड्यांची ताळी या कोकणी नियतकालिकाचे संपादक होते (१९६८).
सिक्वेरा यांनी आपल्या काव्यामध्ये समाजाच्या विविध अंगांचे सूक्ष्म निरीक्षण करुन मानवाला केंद्रबिंदू मानले. सरळ, साधी, सोपी शब्दकळा असलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण काव्यसंपदा ही कोकणी काव्यसाहित्याला लाभलेली मौलिक देणगी होय.
सिक्वेरा यांच्या अशीं आपलीं ल्हारां या काव्यसंग्रहाला प्रतिष्ठेचा साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला (१९९७). याशिवाय डॉ. टी. एम्. ए. पै प्रतिष्ठानचा पुरस्कार (१९८८), ‘कविराज’ ही मुंबईच्या कलासागर या संस्थेकडून दिली जाणारी उपाधी तसेच संदेश कोंकणी साहित्य पुरस्कार (२००३) इ. मानसन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.
अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी तसेच भाषाविषयक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. त्या संस्थांच्या कार्यात ते हिरिरीने सहभागी होतात. ‘कोकणी भाषा मंडळ’ (मुंबई) या संस्थेचे ते उपाध्यक्ष असून कोकणी भाषेला वैभव व प्रतिष्ठा मिळावी म्हणून ते कार्यरत असतात. अखिल भारतीय कोकणी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. सध्या त्यांचे मुंबई येथे वास्तव्य असून लेखन-वाचन यांत ते व्यस्त आहेत.
पोळ, मनीषा