सिंहगड : महाराष्ट्रातील एक प्रसिद्घ डोंगरी किल्ला. तो पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यात पुण्याच्या नैर्ऋत्येस सु. २० किमी. वर वसला आहे. त्याच्या पुणे दरवाजापर्यंत जाण्यास मोटाररस्ता आहे. याचा नामोल्लेख कागदोपत्री कुंधाना,कोंढाणा, बक्षिंदाबक्ष, सिंहगड वगैरे भिन्न नावांनी आढळतो. त्याची सस. पासून उंची १,३१६ मी. व पायथ्यापासून ७०१ मी. असून आकार एखाद्या त्रिकोणी फरशी कुऱ्हाडीसारखा आहे. त्याचे क्षेत्रफळ सु. ७०,००० चौ. मी. आहे. यास पुणे-डोणजे आणि कल्याण अशी दोन प्रमुख द्वारे आहेत. त्यांवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, पैकी एक पुणे-डोणजे द्वाराच्या प्रवेशद्वारातून व दुसरा शिवापूर-कोंढणपूर (पुणे-सातारा रस्त्यावरील) गावांवरुन कल्याण द्वारापर्यंतचा होय. शिवकालात दुसरा मार्ग उपयोगात होता. पेशवाईत पुणे दरवाजा अधिकतर उपयोगात होता.
या गडाचा इतिहास रोमांचकारी व मनोरंजक आहे. सुरुंगाचे पाणी व तेथे जवळच असलेली घोड्याची पागा हे अवशेष मुसलमानपूर्व कालातील निश्चित आहेत, तसेच कोंढाणेश्वर मंदिरातील गर्भगृहाच्या चारही बाजूंची नक्षी व तेथील मानवाकृती शैलीकरणावरुन यादव-कालीन वाटतात. त्यामुळे यादवकाळात (९१०– १३१८) हा किल्ला केव्हा तरी बांधला असावा. तो कुणी आणि केव्हा बांधला याविषयी निश्चित पुरावा उपलब्ध नाही. मुसलमानी कालाच्या आरंभी नाग कोळ्यांच्या अखत्यारीत किल्ला असताना तो मुहम्मद तुघलक (कार. १३२५– ५१) याच्या सरदाराने हस्तगत केला (१३४०). या किल्ल्याविषयीचा पहिला लिखित निर्देश १३५० मधील इसामलिखित फुतूहुस्सलातीन (शाहनामा–इ-हिंद ) या फार्सी ऐतिहासिक महाकाव्यात आढळतो. पुढे १४८२ — ८३ च्या दरम्यान मलिक अहमद बहरी निजामशाह याने तो घेतला. निजामशाही काळात (१४९० — १६०८) हा किल्ला नसीरुल्मुल्क या बंडखोराच्या ताब्यातील काही काळ वगळता सतराव्या शतकापर्यंत निजामशाहीकडेच होता. निजामशाहीच्या पडत्या काळात हा किल्ला आदिलशाही सत्तेकडे गेला. या सुमारास शहाजी भोसले यांना भीमा व नीरा या दोन नद्यांमधील प्रदेश जहागीर म्हणून मिळाला. या प्रदेशातच तो असल्याने शहाजींच्या दृष्ट्या त्यास फार महत्त्व होते. तो कधी त्यांच्या पूर्ण ताब्यात असे, तर कधी आदिलशाहाचा किल्लेदार तिथे असे. स्वराज्याच्या स्थापनेच्या प्रयत्नात छ. शिवाजी महाराजांना सिंहगडसारख्या डोंगरी किल्ल्यांची आवश्यकता वाटू लागली. म्हणून त्यांनी १६४७ नंतर मावळातील अनेक किल्ले जिंकले. त्यात हा किल्ला त्यांनी किल्लेदारास लाच देऊन हस्तगत केला. पुढे छ. शिवाजी महाराज व मिर्झाराजा जयसिंग यांच्यातील तहानुसार (१६६५) तो मोगलांकडे गेला परंतु आग्ऱ्याहून सुटून आल्यानंतर महाराजांनी औरंगजेबाविरुद्घ मोहीम उघडली (१६७०). तीत त्यांनी पायदळाचा एक सेनापती तानाजी मालुसरे ह्याच्या करवी तो किल्ला हस्तगत केला. या वेळी तानाजीने उदयभान राठोड या किल्लेदाराशी युद्घ केले –विशेषतः द्वंद्वयुद्घ केले – आणि दोघेही त्यात मरण पावले. हा प्रसंग एवढा रोमहर्षक बनला की, त्यावर पुढे पोवाडा व ललित साहित्य निर्माण झाले. तानाजीचे नाव अजरामर झाले. यानंतर कोंढाणा किल्ल्यास ‘सिंहगड’ नाव मिळाले. महाराजांनंतर औरंगजेब दक्षिणेत स्वारीवर आला. त्याने किल्ला घेतला पण १६९३ मध्ये नावजी बलकवडे या मराठ्यांच्या सरदाराने तानाजीप्रमाणेच पराकम करुन तो जिंकून पुन्हा मराठ्यांच्या सत्तेखाली आणला. त्यानंतर एखादा अपवाद वगळता तो प्रायः १७५० पर्यंत सचिवांच्या ताब्यात होता. या दरम्यान तिथे छ. राजारामांचे निधन झाले (१७००). त्यानंतर महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाशी सु. सात वर्षे निकराचा लढा दिला. त्या राजारामांच्या समाधिदर्शनाच्या निमित्ताने सिंहगडास जात असत पण याचा उपद्रव आपणास होईल म्हणून बाळाजी बाजीराव (कार. १७४०–६१) याने तुंग आणि तिकोना किल्ल्यांच्या मोबदल्यात चिमाजी नारायण सचिव यांच्याकडून हा किल्ला घेतला. या किल्ल्याच्या कल्याणद्वाराच्या गणेशपट्टीच्या माथ्यावर बाळाजी बाजीरावाने ‘श्री शालीवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान’ हा दोन ओळींचा लेख कोरवून घेतला आहे. तो पेशवाईअखेर पेशव्यांच्या ताब्यात होता. त्याचा उपयोग मुख्यत्वे एक सुरक्षित स्थान व कैदी ठेवण्यासाठी करीत. निजामाने १७६३ मध्ये पुण्यावर स्वारी केली, तेव्हा पेशवे घराण्यातील सर्व मंडळी सिंहगडावर जाऊन राहिली. नारायणराव पेशव्यांचे लग्नसुद्घा येथेच झाले. दुसऱ्या बाजीरावाविरुद्घ इंग्रजांनी युद्घ सुरु करताच त्याने आपली संपत्ती व पत्नी राधाबाई यांस सुरक्षिततेसाठी सिंहगडावर ठेवले. इंग्रजांनी बाजीरावाचा पाडाव केल्यानंतर १८१८ मध्ये प्रिटझ्लरच्या नेतृत्वाखाली सिंहगड जिंकला. त्यांनी तेथील संपत्ती लुटली तसेच तटबंदी पाडली. स्वातंत्र्यापर्यंत तो इंग्रजांच्या ताब्यात होता.
सिंहगडावर एकूण ४८ टाकी होत्या. त्यांपैकी चार-पाच सोडता सर्वांत पाणी असे. गणेश, राजाराम, देव आदी टाकी प्रसिद्घ असून देवटाके व सुरुंगाचे पाणीटाके यांत भरपूर पाणी असे. याशिवाय तीन तळी व एक विहीर आहे. गडावर बालेकिल्ला व त्याची सदर, राजमंदिर, थोरली व धाकटी सदर, त्यापुढील बंगला, राजवाडा, जवाहीरखान्यासह सरकारवाडा, अंमलदाराचा वाडा, पुणे वाडा, इस्तादकोठी, भातखळ्याची कोठी, दोन अंबरखाने, दारुखाना, कल्याण दरवाजा, यशवंत, झुंझार, आले व खांदकडा असे चार भक्कम बुरुज, चौक्या, अमृतेश्वर भैरव, कोंढाणेश्वर, गणपती, नरसिंह इ. मंदिरे, राजाराम व तानाजी यांच्या समाध्या, उदयभानचे थडगे, शृंगारचौकी इ. अनेक वास्तू होत्या. त्यांपैकी बऱ्याच १७७१ मध्ये दारुखान्यावर वीज पडल्याने स्फोट होऊन जमीनदोस्त झाल्या. काहींची दुरुस्ती झाली आणि काही नवीन बांधण्यात आल्या. त्यांत लो. टिळकांचा बंगला आहे. आज यांतील थोड्या वास्तू सुस्थितीत अवशिष्ट आहेत. त्यांपैकी छ. राजारामांची समाधी, तानाजीची समाधी, जवाहीरखाना, दारुखाना, राजवाड्याचे अवशेष आणि कोंढाणेश्वर व अमृतेश्वर भैरव ही दोन मंदिरे इ. प्रेक्षणीय आहेत. दरवर्षी फाल्गुन वद्य नवमीला (मार्च-एप्रिल) राजारामांच्या समाधीचा उत्सव असतो, तर तानाजीच्या समाधीचा उत्सव प्रतिवर्षी माघ वद्य नवमीला भरतो.
सांप्रत येथे दूरदर्शन केंद्राची आदायी (रिसेप्टिव्ह) यंत्रणा व मनोरा असून अनेक गिर्यारोहक ट्रेकिंगच्या निमित्ताने सिंहगडला भेट देतात. शिवाय पुण्याच्या सान्निध्यामुळे हे एक सफरीचे पर्यटनस्थळ म्हणून झपाट्याने विकास पावत आहे. त्या निमित्ताने येथील परिसरात हॉटेलिंगचा व्यवसाय वाढत आहे.
संदर्भ : 1. Toy, Sidney, The Strongholds of India, Toronto, 1957.
२. खरे, ग. ह. सिंहगड, पुणे, १९६०.
३. घाणेकर, प्र. के. साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!, पुणे, १९८५.
खरे, ग. ह.