साहित्य : मानवी जीवनव्यवहारविषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाच्या भाषिक अभिव्यक्तीस स्थूल मानाने ‘साहित्य’ असे संबोधिले जाते. जीवनव्यवहाराचे भावनिक, आध्यात्मिक, बौद्घिक अशा विविध अंगांनी घडविलेले सर्जनशील, वैचारिक, कल्पनात्मक, वास्तव अशा भिन्न-भिन्न स्तरांवरचे सर्वांगीण, सम्यक दर्शन साहित्यातून वाचकांस प्रतीत होते. ‘लिटरेचर’या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये ‘साहित्य’ वा ‘वाङ्मय’ हे पर्याय सामान्यतः समानार्थी म्हणून वापरले जातात. ‘Littera’ या मूळ लॅटिन शब्दापासून ‘लिटरेचर’ हा शब्द निर्माण झाला. Littera ही संज्ञा प्राचीन असून तिचा अर्थ वर्णमालेतील अक्षर वा अक्षरे, असा होतो. लिटरेचर ह्या संज्ञेला काळाच्या ओघात अनेक लेखक, समीक्षक, वाङ्मयेतिहासकार आदींनी साहित्याचा सर्वसमावेशक वा विवक्षित मर्यादित अर्थ विचारात घेऊन नानाविध अर्थ व अर्थच्छटा यांची परिमाणे बहाल केली. त्यांतून या संज्ञेचा अर्थविस्तार होऊन ती बहुआयामी व व्यापक, विस्तृत बनली. जे जे लिहिले जाते ते ते, म्हणजे सर्व लिखित मजकूर म्हणजे साहित्य, ही एक टोकाची व्याख्या काही तज्ज्ञांनी केली. अर्थातच ही भूमिका क्वचितच व अपवादाने घेतली गेल्याचे दिसते. याउलट दुसरी टोकाची भूमिका म्हणजे ⇨ इलिअड, ⇨ ओडिसी, ⇨ हॅम्लेट अशा केवळ अभिजात विश्वसाहित्याचाच निर्देश ‘साहित्य’ या संज्ञेने केला जावा, ही भूमिकाही फारशी स्वीकारार्ह ठरली नाही. या दोन टोकांच्या मध्ये अनेक परस्परभिन्न, विविधांगी भूमिका व दृष्टिकोण घेतले गेल्याचेही दिसून येते. लिटरेचर ही संज्ञा सैलसर व व्यापक अर्थाने अनेक संदर्भांत वापरली जाते. मराठीतील साहित्य व वाङ्मय या संज्ञांबाबतही हेच म्हणता येईल. उदा., एखाद्या विशिष्ट भाषेत निर्माण झालेले, विशिष्ट देशाचे साहित्य (अमेरिकन साहित्य फ्रेंच साहित्य इ.) विशिष्ट कालखंडात निर्माण झालेले साहित्य (एकोणिसाव्या शतकातील वाङ्मय) विशिष्ट जमातीने, लोकसमूहाने निर्माण केलेले वा विशिष्ट प्रदेशातील साहित्य (अमेरिकन-इंडियन साहित्य, निग्रो साहित्य, दलित साहित्य, प्रादेशिक वाङ्मय इ.) विशिष्ट विषयाला वाहिलेले साहित्य (क्रीडा, बागकाम आदी विषयांवरील लिखाण) इत्यादी. साहित्य व वाङ्मय ह्या संज्ञा सामान्यतः जरी समानार्थी वापरल्या जात असल्या, तरी त्यांच्या अर्थात व उपयोजनात भेद करावा, असे काही समीक्षकांनी सुचविले आहे. वाङ्मय हा शब्द अधिक व्यापक अर्थाने वापरावा, असे रा. श्री. जोग यांनी सुचविले आहे. डॉ. अशोक रा. केळकरांच्या मते ललित वाङ्मयालाच ‘साहित्य’ म्हणावे. साहित्य ही संज्ञा अर्थदृष्ट्या सारस्वत, विदग्ध वाङ्मय या संज्ञांच्या जवळ जाणारी आहे.
वाणीने जे युक्त ते सर्व काही वाङ्मयच होय. वाङ्मयामध्ये बोलल्या गेलेल्या व लिहिल्या गेलेल्या सर्वच अक्षररचनांचा समावेश होतो. जे जे उच्चारले जाते ते ते सर्व वाङ्मय म्हणून गणले जात असल्याने कलात्मक वाङ्मयाचा वेगळा निर्देश करण्यासाठी त्याला काही अन्वर्थक विशेषणे जोडली जातात. उदा., ललित वाङ्मय. ललित (फाइन) म्हणजे सुंदर. तेव्हा या विशेषणाने कलात्मक वा सौंदर्यपूर्ण वाङ्मयाचा निर्देश केला जातो. व्यवहारोपयोगी वा जीवनोपयोगी कलांपेक्षा त्याचे वेगळेपण व उपयुक्ततेच्या निकषापलीकडे असलेली अर्थवत्ता ललित या विशेषणाने सूचित होते. ‘belles-letters’ म्हणजे सौंदर्यपूर्ण लिखाण या अर्थाच्या फ्रेंच संज्ञेशी त्याचा अन्वयार्थ जोडला जातो. एखाद्या लिखाणाचा ‘साहित्यकृती’ म्हणून जेव्हा निर्देश केला जातो, तेव्हा तो त्याचा अप्रत्यक्ष गौरवच असतो. ह्या अर्थाने ललित साहित्य हा संगीत, चित्र-शिल्पादी कलांप्रमाणेच ललित कलांचा एक प्रकार मानला जातो. काव्य, कथा, कादंबरी, नाटक इ. प्रतिभानिर्मित वाङ्मय हे व्यावहारिक उपयोगितेच्या पलीकडचे असल्याने त्याची गणना ललित वाङ्मय ह्या सदराखाली केली जाते. ‘ललित’ प्रमाणेच ‘विदग्ध’ हे विशेषणही कित्येकदा वाङ्मयाला लावले जाते. विदग्ध वाङ्मय म्हणजे अभिजात वाङ्मय. चतुर, कलापूर्ण, नागर, सुसंस्कृत असे विविध अर्थ विदग्ध या संज्ञेने सुचविले जातात. कलात्मकतेबरोबरच उच्च अभिरुचीची निदर्शक अशी ही संज्ञा आहे.
ललित वाङ्मय ह्या अर्थी ‘सारस्वत’ हा शब्द राजशेखर ह्या संस्कृत साहित्यशास्त्रकाराने आपल्या काव्यमीमांसेत वापरला. विद्या व कला यांची देवता सरस्वती, तिचे उपासक ते सारस्वत व तिच्या कृपेने निर्माण झालेले वाङ्मय ह्या अर्थीही सारस्वत हा शब्द वापरात होता. ज्ञानेश्वरांनीही ‘ हे सारस्वताचे गोड तुम्हीच लावले जी झाड’यासारख्या अनेक ओव्यांमध्ये सारस्वत हा शब्द योजिला आहे.
ललित साहित्य हा शब्द विद्यमान मराठी साहित्यव्यवहारात जास्त रूळला आहे. ‘सहित’ ह्या विशेषणापासून साहित्य हे भाववाचक नाम बनलेले आहे. एकत्र असणे, बरोबर असणे, असा त्याचा शब्दशः अर्थ. शब्द आणि अर्थ यांचे एकत्र अस्तित्व ‘साहित्य’ या शब्दामध्ये मानले गेले आहे. राजशेखराने ‘पंचमी साहित्य विद्या’ असे म्हणून साहित्यचर्चेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. साहित्याच्या अभिप्रेत स्वरूपात शब्द आणि अर्थ हे एकमेकांत मिसळून गेलेले असतात किंवा एकजीव झालेले असतात. त्यांचे अभिन्नत्व वा एकजीवित्व हे साहित्याचे प्रधान लक्षण मानले जाते. ए. सी. ब्रॅडली या इंग्रज टीकाकारानेही ‘व्हेअर साउंड अँड मीनिंग आर वन’ अशी साहित्याची व्याख्या करून, हे शब्द व अर्थाचे एकजीवित्व अधोरेखित केले आहे. शब्द म्हणजे ध्वनी वा अक्षरसमूह किंवा वर्णसमूह असा विस्तार होऊन, अशा अनेक शब्दसमूहांचे बनणारे वाक्य व वाक्यसमूहांतून व्यक्त होणारा आशय असा व्यापक अर्थ शब्द या संज्ञेत सामावलेला आहे. संवेदनांची, विचारांची, कल्पनांची संघटना असाही अर्थ ही संज्ञा वापरताना अभिप्रेत असतो. तद्वतच अर्थ या संज्ञेमध्ये चातुर्य, रमणीयत्व, सहेतुकत्व अशा अनेक छटा सामावलेल्या आहेत. अशा व्यापक अर्थाने शब्द व अर्थ यांचे सहअस्तित्व व एकजीवित्व हे साहित्याचे मुख्य लक्षण ठरते.
प्राचीन काळी ‘काव्य’ ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली जात असे व ती सर्वच वाङ्मयप्रकारांची निदर्शक होती. प्राचीन ग्रीक व संस्कृत वाङ्मयात हे विशेषत्वाने दिसून येते. उदा., ॲरिस्टॉटलचे पोएटिक्स (काव्यशास्त्र) हे मुख्यत्वे ग्रीक महाकाव्ये, डिथिरॅमनामक वृंदगीते व सुखात्मिका ह्या प्रकारांशी संलग्न असले, तरी त्यातील विवेचनाचा मुख्य भर व मध्यवर्ती आशय हा शोकात्मिका ह्या प्रकाराशी संबंधित आहे. प्राचीन काळी गद्य, पद्य, नाटक इ. सर्व प्रकारच्या लेखनांचा अंतर्भाव काव्यामध्येच केला जात असे. त्या काळी बहुतेक सर्व लेखन पद्यबद्घ असे. शास्त्रीय ग्रंथसुद्घा श्लोकबद्घच असत. तत्त्वज्ञान, नीती, व्याकरण यांसारखे शिक्षाग्रंथही पद्य माध्यमातूनच निर्माण होत. पठणाच्या मार्गानेच साहित्य टिकवून ठेवण्याची व जोपासण्याची पद्घती त्या काळात सर्वदूर प्रचलित होती. साहित्य हे गेय व पठणसुलभ असावे, असा जणू दंडकच ठरून गेला होता. त्यातून मौखिक साहित्याची परंपरा विकसित होत गेली. त्यामुळेच साहित्य ह्या व्यापक अर्थाने काव्य हा मर्यादित अर्थाचा शब्द रूढ झाला होता. गद्य साहित्याचा प्रसार व प्रचार मुद्रणकलेच्या शोधानंतरच अधिकाधिक प्रमाणात होत गेला. पंधराव्या शतकाच्या अखेरीस ⇨ मीशेल एकेम द माँतेन या फ्रेंच लेखकाने ललित निबंध ह्या स्वरूपाच्या लेखनप्रकारास प्रारंभ केला व पुढे ⇨ फ्रान्सिस बेकन, ⇨ जोसेफ ॲडिसन प्रभृती लेखकांनी त्याला नवनवी रूपे प्राप्त करून दिली. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून पाश्चात्त्य साहित्यात खऱ्या अर्थाने गद्ययुग सुरू झाले, असे मानले जाते. संस्मरणिका, रोजनिशी (दैनंदिनी), आत्मवृत्ते, चरित्र, कादंबरी इ. गद्य वाङ्मयप्रकारांची भरभराट सतराव्या शतकानंतरच होत गेली. ⇨ विल्यम काँग्रीव्ह, ⇨ रिचर्ड ब्रिंझली शेरिडन, ⇨ ऑलिव्हर गोल्डस्मिथ इ. नाटककारांनी नाटकांचे पूर्वापार चालत आलेले रूढ पद्यात्म रूप अव्हेरून गद्य रूपाचा अंगीकार केला. साधारणपणे एकोणिसाव्या शतकापासून साहित्याची विभागणी स्थूलमानाने गद्य व पद्य अशी केली जाऊ लागली. पुढे मुद्रणकला स्थिरस्थावर झाल्यावर स्मरणसुलभतेची व पाठांतराची गरज फारशी उरली नाही. त्यामुळे कादंबरीसारखे दीर्घ लांबीचे व मोठ्या व्याप्तीचे प्रकार विकसित होत जाऊन जास्त रूढ व लोकप्रिय झाले. गद्य अधिकाधिक प्रसार पावलेच पण त्याचबरोबर वास्तव जीवनचित्रणाला गद्य अधिक निकटचे आहे, जीवनाचे अधिक यथातथ्य दर्शन गद्यातून घडते व वैचारिक लिखाणाला गद्यच जास्त अनुकूल आहे, ह्याची जाण लेखकवाचकांमध्ये सर्वदूर प्रसृत होत गेल्याने गद्य साहित्याचा गेल्या दोन शतकांत जगभर झपाट्याने विकास होत गेला. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापासून काव्यावरील छंद, वृत्ते, लय, तालादी बंधने इ. शिथिल होऊ लागली व त्यातून मुक्तछंद, निर्यमक कविता असे प्रकार उदयास आले. चिंतनपर, वैचारिक असाही मोठा भाग काव्याच्या आशयात सामावू लागला. त्यामुळे उत्कट भावगीतात्मकता हे काव्यलक्षण व्यवच्छेदक न ठरता इतरही अनेक प्रकारचे निकष निर्माण झाले. याउलट उत्कट भावाविष्कार, आर्तता, स्वैर कल्पनाविलास ह्यांना गद्यातूनही स्थान मिळू लागले. गद्यकाव्य हा नवा प्रकार उदयास आला. अनेक ललित निबंध, कथा ह्या काव्याच्या पातळीवर पोहोचल्याने गद्यपद्याच्या सीमारेषा पुसट होऊ लागल्या. साहित्यप्रकारांबाबतही ठोस व ठाशीव स्वरूपाची भूमिका न घेता, त्यांतील लवचीकपणा व सैलसरपणा विचारात घेऊन साहित्यकृतींचे वर्गीकरण, आकलन व समीक्षण करण्याची प्रवृत्ती विद्यमान काळात वाढीस लागल्याचे दिसून येते.
साहित्याचे वर्गीकरण व प्रकार यांसंबंधी प्राचीन काळापासून वेगवेगळी मते व दृष्टिकोण व्यक्त झाले आहेत. ॲरिस्टॉटलने पोएटिक्समध्ये निवेदनपद्घतीनुसार साहित्याचे वर्गीकरण केले. दृश्यकाव्य (रिप्रेझेंटेशन) व श्राव्यकाव्य (नॅरेशन) असे दोन मुख्य भेद त्याने केले. ह्याशिवाय त्याने विषयांनुसार अनेक उपप्रकारही मानले. त्याच्या वर्गीकरणानुसार दृश्यकाव्यात शोकनाट्याचा व सुखांतिकांचा समावेश होतो तर श्राव्यकाव्यात महाकाव्ये व उपहासिका ह्यांचा अंतर्भाव त्याने केला. ॲरिस्टॉटलनंतरच्या काळात वेगवेगळ्या काव्यप्रकारांची भर साहित्यात पडत गेली. उदा., विलापिका (एलेजी), जानपद विलापिका (पास्टोरल एलेजी), गीतीकाव्य, भावगीत, उद्देशिका (ओड), नीतिकाव्य इत्यादी. मध्ययुगात रोमान्स (स्वच्छंदतावादी साहित्यप्रकार) व बॅलड (पोवाडा) ह्या साहित्यप्रकारांची भर पडली.
अर्वाचीन काळात मराठीमध्ये वि. का. राजवाडे ह्यांनी वाङ्मयाचे (तोंडी व लेखी) ऐहिक आणि पारमार्थिक किंवा पारलौकिक असे दोन प्रमुख भाग मानले. ऐहिक वाङ्मयाचे ज्ञानोत्पादक (शास्त्र), व्यवहारोपकारक (कला) आणि शास्त्रकला ज्ञानप्रसारक असे तीन भाग केले. तसेच शास्त्रकला ज्ञानप्रसारक वाङ्मयाचे बालोपयोगी व बालेतरोपयोगी (विदग्ध वाङ्मय) असे आणखी दोन भाग केले. विदग्ध वाङ्मय ध्वनी, व्यंजना, लक्षणा, अर्थालंकार, रीती या गुणांनी युक्त असते. विदग्ध वाङ्मय म्हणजेच ललित वा कलात्मक वाङ्मय होय.
वाङ्मयाचे वर्गीकरण स्थूल मानाने ललित (फिक्शन) व ललितेतर (नॉनफिक्शन) अशा प्रकारांतही केले जाते :
(अ) ललित साहित्य : ललित साहित्य हे लेखकाच्या प्रतिभेतून, कल्पनाशक्तीतून निर्माण होते. त्याला वास्तवातील व्यक्ती, घटना, प्रसंग, तपशील ह्यांचा पायाभूत आधार असला, तरी त्यातून साकारणारे अनुभवविश्व ही लेखकाची कल्पक निर्मिती असते. ललित साहित्याचे लेखन हे मूलतः व्यक्तिनिष्ठ, भावप्रेरित, कल्पनानिर्मित म्हणजेच प्रतिभानिर्मित असते. सौंदर्यसिद्घीच्या तत्त्वांनुसार ते अवतरलेले असते. तदंतर्गत सुसंघटना ही प्रत्येक ललित साहित्यकृतिपरत्वे एक वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण सुसंघटना असते. काव्य, कथा, कादंबरी, नाटक हे ललित साहित्याचे प्रमुख प्रकार होत. ललित वा लघुनिबंध, नाट्यछटा आदी प्रकारांचाही उल्लेख करता येईल.
(आ) ललितेतर साहित्य : ललितेतर वाङ्मयाचे मुख्य उद्दिष्ट वाचकाला माहिती व ज्ञान देणे, अशा स्वरूपाचे असते. त्यात प्रत्यक्ष वास्तवाला, त्यातील तथ्यालाच केवळ प्राधान्य असते. लेखकाच्या कल्पनाविलासाला त्यात अजिबात वाव नसतो. शब्द हेच माध्यम स्वीकारून विविध ज्ञानशाखांमधील ललितेतर वाङ्मय निर्माण होत असते. वैचारिक, शास्त्रीय, संशोधनपर, चर्चाचिकित्सात्मक, तत्त्वमीमांसक अशा विविध प्रकारच्या वाङ्मयाचा समावेश त्यात होतो. अर्थशास्त्र, मानवशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र अशा विविध सामाजिक शास्त्रांवरील तसेच मानव्यविद्याविषयक ग्रंथ भौतिकी, रसायनशास्त्र, प्राणिविज्ञान, वनस्पतिविज्ञान इ. शास्त्रीय माहिती देणारे वा तत्संबंधी चर्चा करणारे ग्रंथ संशोधनपर, वैचारिक लिखाण आदींचा अंतर्भाव ललितेतर वाङ्मयात केला जातो. हे वाङ्मय वस्तुनिष्ठ, बुद्घिप्रेरित, तर्क-अनुमानादींवर आधारित असल्याने त्याची सुसंघटना तर्काधिष्ठित व ठरीव ठशाची असते.
(इ) ललित व ललितेतर ह्यांच्या सीमारेषेवर मोडणारे लेखन: चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, चर्चात्मक गद्य, निबंध इ. प्रकारांचा समावेश ह्यात करता येईल. दोन्ही प्रकारच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये अशा लिखाणात एकवटलेली दिसतात. लेखकाच्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वाचा ठसा, मांडणीकौशल्य, शैलीवैशिष्ट्ये इ. ललित स्वरूपाची तर त्याच्या आशयातून प्रकटणारे विचार, माहितीपूर्णता, ज्ञानात्मकता इ. ललितेतर वैशिष्ट्ये निबंध, चरित्र आदी वाङ्मयप्रकारांतून आढळतात. त्यामुळे त्यांचा समावेश ललित व ललितेतर यांच्या सीमारेषेवरील लेखन, म्हणून करता येईल.
⇨जॉन रस्किन या इंग्रज समीक्षकाने साहित्याचे वर्गीकरण क्षणजीवी साहित्य (बुक्स ऑफ द अवर) व शाश्वत साहित्य (बुक्स ऑफ ऑल टाइम्स) अशा दोन वर्गांत केले आहे. ते साहित्याच्या सार्वकालीन आस्वाद्यतेवर व काळाच्या ओघात टिकून राहण्याच्या क्षमतेवर आधारलेले आहे.
शास्त्रीय व वैचारिक स्वरूपाच्या लेखनाहून ललित साहित्याचे प्रयोजन व प्रकृती सर्वस्वी भिन्न असते. जे लीलेतून म्हणजे स्वानंदासाठी केलेल्या मुक्त क्रीडेतून निर्माण होते, ते ललित. त्यामुळे जी निर्मिती आपल्या स्वयंपूर्ण अस्तित्वाने व्यक्तीला लौकिक आशा-आकांक्षांपासून मुक्त, विशुद्घ व व्यवहारनिरपेक्ष आनंद देते, तिची जगाविषयीची आणि स्वतःविषयीची समज विशाल, व्यापक व उन्नत करते आणि आपल्या सुभगतेने तिला सौंदर्याचा साक्षात्कार घडवते, त्या कलाकृतीस ललित म्हणता येईल. अशा प्रकारच्या कलाकृतीपासून रसिकास होणाऱ्या अलौकिक आनंदाला संस्कृत साहित्यशास्त्रात ‘ब्रह्मास्वाद सहोदर’ असे म्हटले आहे. ॲरिस्टॉटलने पोएटिक्समध्ये म्हटले आहे, की काव्य इतिहासापेक्षा अधिक तत्त्वज्ञानात्मक व अधिक उच्च आहे. काव्याची प्रवृत्ती विश्वात्मकतेचा आविष्कार करण्याकडे, तर इतिहासाची प्रवृत्ती विवक्षिताचा आविष्कार करण्याकडे असते. कलावंताच्या ठायी वसत असलेल्या ज्या शक्तीने किंवा क्षमतेने त्याच्या व्यक्तिगत अनुभवाला विश्वात्मकता लाभते, तिला ॲरिस्टॉटल ‘सर्जक अनुकृतिशीलता’ असे संबोधतो आणि सर्व ललित कलांचे ते व्यवच्छेदक लक्षण मानतो. वास्तवाची ही अनुकृती म्हणजेच सर्जनशील निर्मिती होय. संस्कृत साहित्यमीमांसकांनी काव्यनिर्मितीमागील जनक कारणांचा ऊहापोह करताना ‘अपूर्ववस्तूनिर्माणक्षमा प्रज्ञा’प्रतिभेचा निर्देश केला आहे. व्यक्तीच्या ठायी प्रतिभा असेल, तर ती ‘नियतिकृतनियमरहिता आल्हादमयी’ अशी स्वतंत्र सृष्टी निर्माण करू शकते. ‘नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा प्रतिभा’अशीही तिची व्याख्या हेमचंद्र व भट्टतौत यांनी केली आहे. कलावंताच्या प्रतिभेचा प्रत्यय देणारी साहित्यकृती सौंदर्यपूर्ण, चैतन्ययुक्त, नित्यनूतन भासते. या सौंदर्याचा किंवा साहित्यास लालित्यपूर्णता प्राप्त करून देणाऱ्या लक्षणांचा सखोल व सूक्ष्म विचार भारतीय साहित्यमीमांसेत आढळतो. संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी सौंदर्य हे ललित साहित्याचे प्राणभूत तत्त्व मानले आहे.
शास्त्रज्ञ हा कलावंताप्रमाणेच जीवनातील सत्याचा शोध घेत असतो. त्यासाठी त्याला अनेक साधने व उपकरणे उपलब्ध असतात. निश्चित तत्त्वाच्या, प्रमेयाच्या आधारे त्याचे हे शोधकार्य चालते. हा शोध सर्वस्वी वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो. तेथे व्यक्तिगत भावभावनांना स्थान असत नाही. साहित्यिक मात्र जीवनातील सत्याचा शोध आपल्या प्रतिभेच्या बळावर व अंतःप्रेरणेच्या सामर्थ्यावर घेत असतो. सौंदर्यदृष्टी, कल्पनाशक्ती व अंतःप्रज्ञा यांच्या योगे जीवनातील अनेकविध घटना-प्रसंगांच्या, व्यक्तींच्या संदर्भात आपल्या जाणिवा तो व्यक्त करीत असतो. त्यातून त्याच्या साहित्यातील अनुभवविश्व साकारते. आपल्या अनुभवाचा अन्वयार्थ लावण्याचा, त्यावर कलात्मक भाष्य करण्याचाही त्याचा प्रयत्न असतो. त्याचा हा सर्व निर्मितिव्यवहार व्यक्तिनिष्ठ, अनुभवनिष्ठ असतो व तो साहित्यातून व्यक्त करतो ती मूलतः भावसत्ये असतात. वैज्ञानिक सत्यांपेक्षा त्यांचे स्वरूप प्रकृतिस्वभावतःच भिन्न व सर्वस्वी आगळेवेगळे असते.
शास्त्रीय व वैचारिक वाङ्मयापेक्षा ललित साहित्याचे वेगळेपण हे सौंदर्यात्मक निकषांच्या पार्श्वभूमीवर जास्त स्पष्ट करता येते. विश्वात घडणाऱ्या घटनांमागील कार्यकारणभाव शोधून काढणे, त्यासाठी आवश्यक ठरतील ती निरीक्षणे, परीक्षणे, प्रयोग करणे आणि त्यांतून प्रस्थापित होणारे निष्कर्ष काटेकोर व शुद्घ अभिधात्मक (डीनोटेटिव्ह) भाषेत मांडणे, हे विज्ञानविषयक वाङ्मयाचे ध्येय असते. निष्कर्षांची वस्तुनिष्ठ व तार्किक मीमांसा तेथे अभिप्रेत असते. सामाजिक शास्त्रांतही व्यक्तीचा व तिच्या वर्तनव्यवहारांचा अभ्यास काही एका पद्घतीने झालेला असतो. अशा कोणत्याही पद्घतीने मनुष्य वा जग यासंबंधी सिद्घ झालेले सर्वसाधारण परंतु ठोस स्वरूपाचे निष्कर्ष ललित साहित्य समोर ठेवत नाही. त्यामुळे या प्रकारच्या लेखनाची भाषा सर्वस्वी निराळी, स्पष्ट नव्हे तर सूचक व व्यंजनाप्रचुर (कनोटेटिव्ह) असते.
अशा प्रकारे ललित साहित्य व सामाजिक शास्त्रे यांत काही मूलभूत व प्राकृतिक भेद असले, तरी सामाजिक शास्त्रांचा अभ्यास ललित साहित्याच्या निर्मिति-आस्वादास काही एका मर्यादेपर्यंत उपयुक्त व पोषकच ठरतो. साहित्याचा विषय प्रामुख्याने माणूस हा असल्याने मानव्यविद्या शाखेत मोडणारी जी शास्त्रे आहेत, त्यांचा व साहित्याचा संबंध हा अधिक निकटचा असतो. मानव्यविद्यांचा अभ्यास व व्यासंग लेखकाला निर्मितीच्या संदर्भात जसा उपयुक्त व फलदायी ठरतो, तसाच तो वाचकालाही आस्वादनक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो. मानव्यविद्यांतर्गत सामाजिक शास्त्रांचे अध्ययन मानवी जीवन व माणूस समजून घेण्याच्या दृष्टीने निश्चितच फलदायी ठरते. साहित्यिक आपल्या साहित्यनिर्मितीतून मानवी जीवनाचा जो शोध घेऊ पाहतो, तो या अध्ययनातून अधिक विस्तृत, बहुआयामी व सूक्ष्म होऊ शकतो.
नित्याच्या जीवनव्यवहारात वापरल्या जाणाऱ्या भाषेपेक्षा ललित साहित्यात योजिल्या जाणाऱ्या भाषेचे स्वरूप वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण असते. व्यक्तिविशिष्ट तरीही व्यापक, वास्तवाधिष्ठित तरीही कल्पनेपेक्षा अद्भुत असे अनुभव ललित साहित्याच्या भाषेतून अभिव्यक्त होतात. त्यामुळे ही भाषा चित्रदर्शी, प्रतिमायुक्त व विविध संवेदनासूचक असते. ती सूचक आणि व्यंजनाप्रचुर तर असतेच परंतु त्याचबरोबर भावानुभव यथातथ्य व अविकृत स्वरूपात गोचर करणे, हे तिचे अवतारकार्य असते. त्यासाठी प्रसंगी प्रचलित भाषेची मोडतोड करणे, नवी भाषा, नवी शब्दकळा घडविणे, नवीन भाषिक संकेत निर्माण करणे, अशा प्रयुक्त्यांचा आश्रय लेखकाला घ्यावा लागतो. साहित्यकृतीच्या भाषेवर ती निर्माण करणाऱ्या लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा उमटावी लागते. व्यक्ती, वस्तू, घटना यांचे हुबेहूब वर्णन, स्पष्टीकरण, निवेदन करणे एवढेच ललित साहित्यकृतीचे ईप्सित नसते, तर वेचक व अर्थपूर्ण अनुभवांच्या निवडीतून व त्यांच्या कौशल्यपूर्ण रचनेतून वाचकाच्या जाणिवा समृद्घसंपन्न करणे, त्याला सुजाण, सजग करणे हे ललित साहित्याची निर्मिती करणाऱ्या लेखकास साधावे लागते.
ललित साहित्यकृतीमध्ये लेखकाने स्वतःच्या प्रतिभेने, कल्पनाशक्तीने एक स्वतंत्र, स्वायत्त व अंतर्बाह्य सुसंगत असे अनुभवविश्व साकारलेले असते. ते स्वयंपूर्ण व अनन्यसाधारण असते. त्यात लेखकाचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित झालेले असते. ह्या अनुभवसृष्टीचा प्रत्यक्ष वास्तव जीवनाशी घनिष्ठ संबंध असला, तरी ते वास्तवाचे निव्वळ प्रतिबिंब नसते. हे वास्तव हा त्या कल्पसृष्टीचा मूलाधार असतो. ह्या वास्तवातून त्याला लेखनाची कच्ची सामग्री मिळते व त्यावर आपल्या प्रतिभेचे, कल्पनाशक्तीचे संस्कार करून तो साहित्यकृतीतले स्वतंत्र भावविश्व उभे करतो. साहित्यकृतींतून अनेकपदरी, बहुआयामी, व्यामिश्र, तरल, सूक्ष्म असे विविध स्वरूपाचे जीवनानुभव गोचर होत असतात. अशा प्रकारच्या अनेकत्वातून एकत्व प्रकट करणे, ही ललित साहित्यकृतीची प्रकृती आहे. सुसंघटितपणा, एककेंद्रियत्व, बांधेसूदपणा, प्रमाणबद्घता हा तिचा धर्म आहे. प्रत्येक साहित्यकृती जी अनुभवसृष्टी व्यक्त करीत असते, ती साकारण्यासाठी योजिला जाणारा आकृतिबंध हा सौंदर्यसिद्घीच्या शाश्वत सूत्रांनुसार घडविला जातो. आशय आणि अभिव्यक्तीची अभिन्नता व एकात्मता, घाटाचा सुडौलपणा, भाषेचे सौष्ठव, शब्दांचे लावण्य अशा सौंदर्याच्या काही अंगभूत तत्त्वांचे तीत पालन झालेले दिसते. श्रेष्ठ दर्जाच्या साहित्यकृतीतून व्यक्त होणारा जीवनानुभव चैतन्यपूर्ण असतो व तो आपली अंतर्गत सौंदर्यसंघटना स्वतःच सिद्घ करीत असतो. ती एखाद्या सजीव प्राणिमात्रासारखी चैतन्ययुक्त असल्याने अशा संघटनेचे स्वरूप सेंद्रिय एकात्म (ऑर्गॅनिक होल) असते व ती एकमेवाद्वितीय, अनन्यसाधारण असते. प्रत्येक ललित साहित्यकृतीमध्ये बौद्घिक, भावनात्मक व कलात्मक अंगे एकत्र एकवटलेली असतात आणि त्यांचा रसिकांना येणारा प्रत्ययही एकात्म, एकसंध स्वरूपाचा असतो. साहित्यातून अखेर माणसांचीच गोष्ट सांगितली जाते. माणसे माणसांशी कशी वागतात, माणसा-माणसांच्या हितसंबंधांत व भावसंबंधांत कशी गुंतागुंत निर्माण होत असते, अशा बाबींवरच साहित्यातून प्रकाश टाकला जातो. त्यातून जीवनाची शाश्वत सत्येच प्रकट होत असतात. वाङ्मयाने निर्मिलेल्या कल्पनासृष्टीच्या बुडाशी ही सत्येच असतात.
श्रेष्ठ प्रतीच्या साहित्यकृतीतून शाश्वत मानवी जीवनमूल्यांचे दर्शन घडावे, त्यातून सत्य-शिव-सौंदर्य ही तत्त्वे प्रतीत व्हावीत, असे अभिप्रेत असते. जे साहित्य काळाच्या कसोटीवर टिकून राहते, ते अक्षर वा चिरंतन वाङ्मय होय. श्रेष्ठ साहित्यातून सत्य, शिव व सुंदर या त्रयींचा एकात्म, संघटित आविष्कार होत असल्याने अशा साहित्यकृतीला अक्षरत्व व चिरनूतनत्व प्राप्त होते. प्रत्येक नव्या पिढीच्या वाचकाला तिच्या आस्वादातून अलौकिक आनंद मिळतो. मानवी जीवनाविषयीच्या नव्या जाणिवा, नवे अर्थ त्यातून प्रतीत होतात. अशा कलाकृतीचे नवनवे अन्वयार्थ वेगवेगळ्या देश-काळातल्या, वेगवेगळ्या समाज-संस्कृतींतल्या, वेगवेगळ्या भाषक रसिक पिढयांकडून वेळोवेळी लावले जातात. साहित्यातील सत्यदर्शन म्हणजे वास्तव जीवनाचे प्रत्ययकारी पण आभासमय चित्रण होय. वाङ्मयीन सत्याच्या बाबतीत शक्यतेपेक्षा संभवनीयतेला प्राधान्य दिले जाते. वाङ्मयीन सत्याप्रमाणेच शिवतत्त्वही सापेक्ष आहे. प्राचीन काळात धर्मकल्पनेवर तर अर्वाचीन काळात मानवता या जीवनमूल्यावर शिवतत्त्व अधिष्ठित आहे. शाश्वत नैतिक जीवनमूल्यांचे दर्शन श्रेष्ठ साहित्यकृतीतून घडावे, हे शिवतत्त्वात अभिप्रेत असते. शिवतत्त्वाच्या आविष्कारामुळे मानवी मनाचे उन्नयन होऊन ते अधिक सुसंस्कृत व प्रगल्भ बनते. ह्या अर्थाने साहित्य हे मानवी संस्कृती समृद्घ करते. सौंदर्य हे कलेचे अंगभूत प्राणतत्त्व मानले जाते पण कलेतील सौंदर्याच्या व्याख्येबाबत एकवाक्यता आढळत नाही. प्रमाणबद्घता, सुसंवादित्व, लयबद्घता, वैचित्र्य, नावीन्य यांसारखी सौंदर्याची काही प्रधान लक्षणे मानली जातात.
ललित साहित्याच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळेच त्यासंबंधीचा विचार काळाच्या ओघात वेगवेगळ्या दिशांनी विकसित होत गेला. पाश्चात्त्य साहित्यविचारात प्राचीन काळी ॲरिस्टॉटलप्रणीत अनुकृतिसिद्घांतापासून सुरू झालेली चर्चा पुढे, साहित्याविष्काराचे प्राणभूत तत्त्व म्हणून उदात्तता (लाँजायनस), उत्स्फूर्त भावनांचा उत्कट आविष्कार (वर्ड्स्वर्थ), कल्पनाशक्ती (कोलरिज), जीवनभाष्य (आर्नल्ड), भावसंतुलन (आय्. ए. रिर्चड्स ) अशा अनेकविध मतप्रणालींच्या मंथनातून विकसित होत गेलेली दिसते. टी. एस्. एलियट, सुसान लँगर, नॉर्थ्रप फ्राय इ. समीक्षकांनी ललित साहित्याच्या संकल्पनेस नवा आशय प्राप्त करून दिला. मराठी साहित्यविचारात मा. गो. देशमुख, बा. सी. मर्ढेकर, दि. के. बेडेकर, शरच्चंद्र मुक्तिबोध, प्रभाकर पाध्ये, वा. ल. कुळकर्णी, रा. ग. जाधव इ. समीक्षकांनी साहित्याच्या स्वरूपाची चर्चा करून मोलाची भर घातली आहे.
साहित्याचे प्रयोजन काय, ह्या प्रश्नाची चर्चा प्राचीन काळापासून आजतागायत अनेक लेखक, समीक्षक, वाङ्मयमीमांसक यांनी केली आहे. ह्या प्रयोजनांची चर्चा लेखकसापेक्ष व वाचकसापेक्ष म्हणजेच साहित्याचा निर्मितिव्यापार व आस्वादव्यापार अशा दोन्ही अंगांनी वारंवार होत राहिली आहे. प्रसिद्घी, यश, कीर्ती, मानसन्मान, धनप्राप्ती, मतप्रचार, सामाजिक सुधारणा, दुष्ट रुढींचा नाश, हितोपदेश, राष्ट्रभक्ती व देवभक्ती अशी नानाविध प्रयोजने लेखकांनी मनाशी बाळगून प्राचीन काळापासून आजतागायत साहित्यनिर्मिती केली आहे. काही प्रयोजने विशिष्ट काळ, परिस्थिती यांना अनुलक्षून प्रभावी ठरतात. उदा., पारतंत्र्य काळात स्वातंत्र्यप्राप्ती हाच एकमेव वा प्रधानहेतू मनाशी बाळगून अनेक साहित्यिकांनी लेखन केले. मराठीमध्ये शि. म. परांजपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी प्रभृती लेखकांनी आपली लेखणी देशकार्यासाठीच राबवली पण साहित्यनिर्मितीचा स्थल-काल-परिस्थितिनिरपेक्ष विचार केला, तर उच्च कोटीच्या अलौकिक आनंदाची प्राप्ती हेच साहित्याचे सार्वकालीन, सर्वदूर, सर्वत्र आढळणारे प्रयोजन असल्याचे दिसून येते. असा सर्जनशील आनंद लेखकाला निर्मितीसाठी, तर वाचकाला आस्वादासाठी प्रवृत्त करतो. सर्जनशीलतेच्या पातळीवर उच्च दर्जाची कलात्मक निर्मिती साधणे, हे लेखकाच्या आनंदाचे निधान होय. आत्माविष्कार व आत्मशोध ह्या प्रेरणाही लेखकाला लिखाणासाठी उद्युक्त करतात.
साहित्याचे प्रयोजन हे जसे लेखकाच्या दृष्टीने तसेच वाचकाच्या दृष्टीनेही प्रतिपादिले जाते. वाचक साहित्याचे वाचन कशासाठी करतो, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधतानाही समीक्षकांनी विविध उपपत्ती, प्रणाली मांडल्या आहेत. चार घटका मनोरंजन, विरंगुळा, दैनंदिन जीवनातील ताणतणावापासून सुटका, स्वप्नरंजन, उद्बोधन, जिज्ञासातृप्ती, ज्ञान व माहिती मिळविणे, दैनंदिन समस्यांवर तोडगा शोधणे, अशा अनेकविध कारणांनी वाचक साहित्याकडे वळत असतात व काही प्रमाणात त्यांना साहित्याकडून वरील प्रकारचे समाधान लाभतही असते तथापि वाचकाच्या ठायी साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी सहृदयता असेल व त्याची वाङ्मयीन अभिरुची विकसित, संपन्न व प्रगल्भ झालेली असेल, तरच त्याला दर्जेदार व श्रेष्ठ प्रतीच्या साहित्याच्या आस्वादातून उच्च कोटीचा अलौकिक आनंद मिळू शकतो, लौकिक व्यवहारनिरपेक्ष सौंदर्याची प्रचीती येते. त्याच्या जीवनविषयक जाणिवा समृद्घ होऊन आयुष्याचा नवा अर्थ प्रत्ययास येतो. साहित्यात मानवी जीवनाचे प्रतिबिंब पडत असते. व्यक्तिगत रीत्या प्रत्येकाचे अनुभव तसे मर्यादितच असतात पण श्रेष्ठ साहित्यिकाने निर्मिलेल्या उच्च दर्जाच्या साहित्यकृतीतून मानवी मनाचे व जीवनाचे विस्तृत, वैविध्यपूर्ण, सर्वांगीण व परिपूर्ण दर्शन घडते. अशा साहित्याच्या परिशीलनातून वाचकाच्या अनुभूतीच्या कक्षा विस्तारत जातात. त्याला कल्पनेच्या पातळीवर अनेकविध प्रकारचे अनुभव घेता येतात. त्याला पूर्वपरिचित असलेल्या अनुभवांच्या साहित्यातील दर्शनातून पुनःप्रत्ययाचा तर सर्वस्वी अपरिचित असलेल्या अनोख्या, अद्भुत, अज्ञात, नावीन्यपूर्ण अशा अनुभवांच्या साहित्यातील दर्शनातून नवप्रत्ययाचा अलौकिक आनंद मिळतो. मानवी जीवनाची अफाट व्याप्ती व खोली तसेच व्यामिश्र, बहुआयामी, नानाविध परिमाणे त्याला साहित्याच्या परिशीलनातून जाणवतात. जीवनातील गुंतागुंतीच्या गहनगूढ समस्यांवर उद्बोधक प्रकाश पडतो. मानवतेचे अधिष्ठान असलेल्या नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांची नव्याने जाणीव होते व त्याची एकूण मानवी जीवनाविषयीची जाण समृद्घ, प्रगल्भ बनते. कोणत्याही सर्जनशील साहित्यातून त्या त्या मानवसमूहाच्या भाषेतील व संस्कृतीतील सूक्ष्मता आणि प्रगल्भता व्यक्त होत असते मनुष्य आणि भौतिक-आधिभौतिक जग यांच्यातील संबंधांची अभिव्यक्ती होत असते. सर्जनशील साहित्य हा खरेतर एक ज्ञानगर्भ व्यवहार असतो आणि साहित्यसमीक्षा व वेगवेगळे साहित्यसिद्घांत आपापल्या परीने वेगवेगळ्या उपपत्ती व अर्थनिर्णयनप्रणाली मांडून ह्या ज्ञानात्म सर्जनशील व्यवहाराचा उलगडा करण्याचाच प्रयत्न करीत असतात. अशा वेगवेगळ्या भूमिकांतून व दृष्टिकोनांतून जगभरातल्या वाङ्मयांचे भाषिक इतिहास लिहिण्याचे प्रयत्नही आजवर वेळोवेळी झालेले आहेत. विशिष्ट भाषेतील समग्र वाङ्मयकृतींचा आणि वाङ्मयविषयक घडामोडींचा एका विवक्षित दृष्टिकोनातून केलेला पद्घतशीर व परंपराधिष्ठित ऐतिहासिक अभ्यास म्हणजे वाङ्मयेतिहास. साहित्याचा हा इतिहास विशिष्ट समाजाच्या वाङ्मयीन संचिताचा व त्याचबरोबर सामाजिक-सांस्कृतिक दस्तऐवजाचा ऐतिहासिक आलेख असतो. मानवी संस्कृती समृद्घ करणाऱ्या ललित व वैचारिक साहित्यास लाभलेल्या वैविध्यपूर्ण व व्यापक परिमाणांची कल्पना अशा वाङ्मयेतिहासातून व साहित्यसमीक्षेतून येऊ शकते.
मराठी विश्वकोशात साहित्य ह्या विषयाशी संबंधित अशा तात्त्विक, सैद्घांतिक विवेचनावर भर देणाऱ्या तसेच सर्वांगीण, विस्तृत व व्यापक आढावा घेणाऱ्या शेकडो लहानमोठ्या नोंदी, व्याप्तिलेख इ. योजिले आहेत. तात्त्विक विवेचनावर भर देणाऱ्या नोंदींत भाषा, भाषांतर, वाङ्मयेतिहास, शैलीविचार, साहित्यप्रकार, साहित्यशास्त्र, साहित्यसमीक्षा, सौंदर्यशास्त्र इ. प्रमुख नोंदी आहेत. साहित्यप्रकारांतर्गत कथा, कादंबरी, काव्य, नाटक, निबंध इ. प्रकारांवर स्वतंत्र नोंदी आहेत. तद्वतच एकांकिका, कथाकाव्य, खंडकाव्य, नाट्यगीत, नाट्यछटा, भावगीत, महाकाव्य, लघुनिबंध, विनोद, शोक-सुखात्मिका, शोकात्मिका, सुखात्मिका इ. उपप्रकारांवरही स्वतंत्र नोंदी आहेत. वेगवेगळे कलावाङ्मयीन संप्रदाय, सिद्घांत व उपपत्ती, निरनिराळे वाङ्मयप्रवाह इत्यादींवर स्वतंत्र नोंदी आहेत. उदा., अतिवास्तववाद, अभिजाततावाद, अस्तित्ववाद, निसर्गवाद, प्रतीकवाद, वास्तववाद, स्वच्छंदतावाद इ. संप्रदाय अलंकार, छंदोरचना, निर्यमक कविता, प्रतिमा व प्रतिमासृष्टी, भावविरेचन, मुक्तछंद, रससिद्घांत इ. उपपत्ती, सिद्घांत व तंत्रे दलित साहित्य, निग्रो साहित्य, प्रादेशिक वाङ्मय, बालवाङ्मय, लोकसाहित्य इ. वाङ्मयीन प्रवाह वगैरे. काही संकीर्ण साहित्यप्रकारांवरही स्वतंत्र नोंदी आहेत. उदा., पत्रवाङ्मय, पुस्तपत्र, प्रवासवर्णन, नियतकालिके, लघुनियतकालिके, वृत्तपत्रे इ., तसेच पोवाडा, बॅलड, रोमान्स यांसारखे प्रकार. जगातील निरनिराळ्या देशांतील व भाषांतील वाङ्मयाचा ऐतिहासिक आढावा व त्यांतील वैशिष्ट्ये नोंदविणाऱ्या अनेक व्याप्तिलेखवजा दीर्घ नोंदी वाचकांना अकारविल्हे यथास्थळी मिळतील. उदा., अमेरिकन साहित्य, इंग्रजी साहित्य, ग्रीक साहित्य, जर्मन साहित्य, फ्रेंच साहित्य, रशियन साहित्य,लॅटिन साहित्य, चिनी साहित्य, जपानी साहित्य इ. उर्दू साहित्य, कन्नड साहित्य, तमिळ साहित्य, तेलुगु साहित्य, पंजाबी साहित्य, फार्सी साहित्य, बंगाली साहित्य, मराठी साहित्य, मलयाळम् साहित्य, संस्कृत साहित्य, हिंदी साहित्य इत्यादी. त्याचप्रमाणे निवडक व प्रमुख अशा पाश्चात्त्य, पौर्वात्य, भारतीय व मराठी साहित्यिकांवर विपुल प्रमाणात शेकडो नोंदी आल्या आहेत. काही निवडक साहित्यकृतींवरही स्वतंत्र नोंदी आहेत. उदा., अभिज्ञान शाकुंतल, इलिअड, ओडिसी, कोजीकी, गेंजी मोनोगातारी इत्यादी.
संदर्भ : 1. Booth, Wayne C. The Rhetoric of Fiction, Chicago, 1961.
2. Bronowski, J. Mazlisn, Bruce, The Western Intellectual Tradition,1975.
3. Butcher, S. H. Aristotle’s Theory of Poetry andFine Art, 1951.
4. Chatman, Seymour, Story and Discourse,Ithaca, 1978.
5. Daiches, David, Approaches to Literature, 1956.
6. Ellis, John M. The Theory of Literary Criticism, 1974.
7. Genette, Gerard, Narrative Discourse, Oxford, 1972.
8. Hamilton,Clayton, The Art of Fiction, New York, 1939.
9. Ingarden,Roman, The Literary Work of Art, Evanston, 1980.
10. Iser,Wolfgang, The Act of Reading, Baltimore, 1978.
11. Jakobson,Roman, Language in Literature, Cambridge ( M. S.), 1987.
12.Jefferson, Ann Robey, David, Modern Literary Theory, Bastford, 1986.
13. Lodge, David, 20th Century Literary Criticism, London, 1990.
14. Lubbock, Percy, The Craft of Fiction, London, 1921.
15. Richards, I. A. Principles of Literary Criticism,London, 1960.
१६.करंदीकर, गो. वि. ॲ रिस्टॉटलचे काव्यशास्त्र, मुंबई, १९७८.
१७. कुळकर्णी, वा. ल. साहित्य : स्वरूप आणि समीक्षा, मुंबई, १९७५.
१८. गोडबोले, ना. वा. जोगळेकर, गं. ना., साहित्य समीक्षा : स्वरूप आणि विकास, पुणे, १९८१.
१९. जाधव, रा. ग. साहित्याचे परिस्थितिविज्ञान, पुणे, २००३.
२०. देशपांडे, ग. त्र्यं. भारतीय साहित्यशास्त्र, मुंबई, १९६३.
२१. वेलेक, रेने वॉरन, ऑस्टिन, अनु. मालशे, स. गं. साहित्यसिद्घांत, मुंबई, १९८२.
इनामदार, श्री. दे.
“