सायक्लोरामा : ‘सायक्लोरामा’ ही संज्ञा चित्रकला व रंगभूमी या दोन्ही कलाक्षेत्रांत वापरली जाते तथापि येथे मुख्यतः रंगभूमीशी निगडित सायक्लोरामाची माहिती दिली आहे.
पोकळ दंडगोलाच्या आतील पृष्ठभागाला ‘पॅनोरमा’ म्हणतात. त्यामुळे दंडगोलाकार दालनाच्या किंवा खोलीच्या आतील भिंतीवर काढलेला नैसर्गिक देखावा, लढाईचे दृश्य यांसारख्या चित्रकृतीलाही ‘पॅनोरमा’ म्हटले जाते. यामध्ये प्रेक्षक कलाकृतीच्या मध्यभागी उभा राहतो आणि स्वतःभोवती फिरू न चित्रकृती पहातो. त्यामुळे त्याला या चित्रकृतीमधील सर्व भागांचे क्रमवार दर्शन घडते. पुढे अशा चित्रकृतीला ‘सायक्लोरामा’ म्हणण्यात येऊ लागले. वर्तुळ व देखावा या अर्थांच्या ग्रीक शब्दांवरून सायक्लोरामा ही संज्ञा तयार झाली असून ही संज्ञा रंगभूमीच्या क्षेत्रातही रूढ झाली.
सायक्लोरामाचे तत्त्व १८२० इतके आधी माहीत होते मात्र रंगमंचावरील प्रकाशयोजना करणाऱ्या व तेथील देखाव्याचा आराखडा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी याची उपयुक्तता लक्षात आणून दिली नव्हती. त्यांच्यापैकी मारिआनो फॉर्च्युनी व आडोल्फ लिनेबॅक यांनी सायक्लोरामाची उपयुक्तता दाखवून दिली. सायक्लोरामाकडून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनामुळे रंगमंचीय प्रकाशयोजनेचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल, अशी फॉर्च्युनी यांची मुळात अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी १९२०–४० दरम्यान जर्मनीमध्ये प्लॅस्टरचे अनेक आकाश घुमट ( स्काय डोम ) उभारले. अशा घुमटाची प्रतिकृती प्रथम पॅरिसला १९०२ मध्ये उभारली होती, तर १९०६ मध्ये ‘थिएटर द ल अव्हेन्यू बॉस्क्यूज’ येथे असा घुमट तयार केला होता. यातून येणाऱ्या तेजस्वी प्रकाशाने रंगमंच न्हाऊन निघेल असा उद्देश होता. १९२३ मध्ये सेंट मार्टिन्स येथे, तर १९२६ मध्ये केंबिज फेस्टिव्हल थिएटरमध्ये सायक्लोरामा उभारण्यात आले.
अनेक आधुनिक रंगमंदिरांमध्ये रंगमंचाच्या मागील बाजूला पार्श्वभूमिनिदर्शक सायक्लोरामा ही रचना असते. अंतर्वक्र भिंत किंवा अंतर्वक्र जाड कापडी पडदा या रूपांतील सायक्लोरामा हा नेपथ्याचाच एक भाग होतो. सायक्लोरामाच्या वक पृष्ठभागामुळे बाह्य दृश्याच्या पार्श्वभूमीवर अमर्याद अवकाशाचा (उदा., आकाशाचा) किंवा अमर्याद अंतराचा म्हणजे खोलीचा आभास निर्माण होतो. यासाठी कधीकधी प्रकाशयोजनेची मदत घेतली जाते. रंगमंचाची मागील बाजू आणि कधीकधी बाजूंचे (पार्श्व) भाग आच्छादण्यासाठी सायक्लोरामाचा उपयोग होतो. कधीकधी सायक्लोरामा माथ्यापाशीही वक्राकार असतो व या रचनेला घुमटाकार क्षितीज (डोम होरायझन) म्हणतात. त्यामुळे मुक्त अवकाशाला उंची लाभल्याचा आभास निर्माण होतो.
सायक्लोरामाचा पृष्ठभाग गिलावा दिलेला किंवा कॅन्व्हास कापडाचा असतो. पडद्यासाठी नवीन कापड वापरणे चांगले असते. सायक्लोरामाच्या अपारदर्शक पृष्ठभागामुळे त्याच्यावर पडणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त परावर्तन होते व प्रकाश पलीकडे जाऊन वाया जात नाही. या पृष्ठभागाचा रंग सामान्यपणे फिकट म्हणजे पांढरा, करडा, निळसर वगैरे असून त्याची छटा तळापासून माथ्यापर्यंत एकसारखी असते. शिवाय हा पृष्ठभाग विविध रंगांच्या प्रकाशाने प्रकाशमान करता येतो. याच्या सफाईदार रंगछटेमुळे नजर खिळवून वा एकवटून ठेवील असा खडबडीतपणा डोळ्यांसमोर येत नाही व देखाव्यातील अंतराविषयी अंदाज करणे अवघड होते. यामुळे हा पृष्ठभाग अनंत अंतरावर असल्याचा डोळ्यांना भास होतो. आकाश दर्शविणाऱ्या प्रकाशाची तीवता कमीजास्त करुन पहाट, सूर्योदय, सकाळ, दुपार, स्वच्छ सूर्यप्रकाश असलेला दिवस, सूर्यास्त, संध्याकाळ, रात्र या दिवसामधील विविध वेळांचे आभास (सादृशीकरण) निर्माण करता येतात. तसेच पारदर्शिका, चित्रफिती यांचे सायक्लोरामाच्या पृष्ठभागावर प्रक्षेपण करू न ढग, तारे, नक्षत्रे, चांदणे, कुंद वा स्वच्छ हवामान, ऋतू, गडगडाटी वादळ इत्यादींचा आभास प्रभावीपणे निर्माण करता येतो. शिवाय नको असलेल्या सावल्या सायक्लोरामामुळे टाळता येतात.
दृक्प्रत्ययवादी व प्रतीकवादी नाटकांमध्ये पात्रांची मनःस्थिती सूचित करण्यासाठी, अभिनयातील सातत्य, तसेच घटना वैश्विक अवकाशात घडत असल्याची भावना निर्माण करण्यासाठीही सायक्लोरामाचा उपयोग करता येतो.
कापडी सायक्लोरामा पाश्चात्त्य रंगभूमीवर जवळजवळ सार्वत्रिक झालेला दिसतो. इतर अनेक देशांतही सायक्लोरामाची कल्पना स्वीकारलेली आढळते.
पहा : नाटक नाट्यप्रयोग रंगभूमि रंगमंच रंगमंदिर.
ठाकूर, अ. ना.